खेळता खेळता 'त्यानं' बनवले व्हिडिओ गेम्स

नाशिकच्या अनुप सरोदेंची भरारी

0

लहानपणीच्या आठवणी ह्या नेहमीच रम्य असतात. शाळेचा गृहपाठ, छोट्या छोट्या खोड्यांसाठी आई - वडिलांचं रागवणं, मित्रांसोबत भरपूर मजा मस्ती किंवा गल्लीत वेळी-अवेळी खेळणं, ह्या गोष्टी कुणीच विसरु शकत नाही. बदलत्या काळानुसार व्हिडिओ गेम्सशी मुलांनी मैत्री केली. टीव्हीवर व्हिडिओ गेम्स पाहण्याची मुलांमध्ये क्रेझ होती, ही क्रेझ मुलं कधीही विसरु शकत नाही. पण व्हिडिओ गेम्स खेळणा-या एका मुलाला यामध्ये इतकी गोडी निर्माण झाली की त्यानं स्वत: गेम्स तयार केले. सतत व्हिडिओ गेम्स खेळणारा एखादा मुलगा स्वत:ही गेम तयार करेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

व्हिडिओ गेम्समध्येच या मुलाला त्याचे करिअर सापडलं. हे गेम्स त्याचा आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले. त्यानं याची कंपनी बनवली. नाशिकच्या अनुप सरोदे याची ही गोष्ट. झपाटलेपण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी Xaxistarts ही यशस्वी कंपनी उभारलीय.

खेळाचं प्रेम

खेळला, बागडला तर होणार खराब

शिकलात तर होणार नवाब

आपल्या देशातल्या प्रत्येक मुलानं लहानपणी ही म्हण नक्कीच ऐकली असेल. पण अनुप यांनी या म्हणीकडं वेगळ्या नजरेनं पाहत होते. खेळलात, बागडलात तरच नवाब व्हाल यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी आपलं बालपण व्हिडिओ गेम्समध्येच घालवलं. सुपर मारियो, कॉन्ट्रा, डक हंट, अल्लाउद्दीन हे गेम्स तेंव्हा लोकप्रिय होते. हे सर्व गेम्स खेळण्यासाठी विशिष्ट प्रकारचा बॉक्स आणि कॅसेट्स मिळत असत. अनुपकडे अशा१५ कॅसेट्स होत्या. २०० पेक्षा जास्त मनोरजंक गेम्सचा संग्रह त्यांच्याकडे होता. या संग्रहामुळे ते मित्रांमध्येही मोठे लोकप्रिय होते.

नाशिक जिल्ह्यातल्या छोट्याशा गावामध्ये जन्मलेल्या अनुपच्या आयुष्यात व्हिडिओ गेम्सचं मोठं महत्त्व होतं. हळूहळू या गेम्सचा स्तर उंचावू लागला. अनुप नव्या गेम्सकडे आकर्षित होऊ लागले. माझे आई-वडील कधीही माझ्या या आवडीच्या आड आले नाहीत. उलट त्यांनी माझा उत्साह वाढवला, असे अनुप सांगतात. १७ व्या वाढदिवसाच्या दिवशी आईने अनुपला खासगी संगणक भेट दिला. त्यामुळे त्यांची व्हिडिओ गेम्सबद्दलची गोडी आणखी वाढली. रोड रॅश, क्वेक-३, मिडटाऊन मॅडनेस यासारखे गेम्स अनुप आपल्या संगणकावर खेळत.

Xaxistarts चा जन्म

अनुप यांनी इंजिनिअरिंगसाठी पुण्याच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालात त्यांचा पुन्हा एकदा संगणकाशी संबंध आला. इथं अनुप संगणकाच्या विश्वातले बारकावे समजण्याचा खेळ शिकू लागले. अनुपला इंजिनिअरिंगमध्ये गोडी कमी होती. त्यामुळे पहिल्या वर्षी ते नापास झाले. पण व्हिडिओ गेम्सच्या विश्वाच्या आपण प्रेमात पडलोय याची खात्री अनुपला झाली. याच विश्वात आपलं भविष्य घडवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अनुप यांना गेम प्रोग्रॅमर व्हायचं होतं. हे वेड पूर्ण करण्यासाठी अनुप यांनी २००७ साली सी., सी.प्लस आणि जावा या संगणकाच्या भाषा पूर्ण आत्मसात केल्या. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांनी वेगवेगळ्या गेमिंग कंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला. यापैकी गेमसॉफ्ट ही एक कंपनी होती. या कंपनीतल्या सर्व रिक्त जागा भरल्या आहेत, हे अनुप यांना अर्ज केल्यानंतर समजले. त्यामुळे ते निराश झाले. पण तरीही त्यांनी धैर्य सोडलं नव्हतं. कोडावाला या दुस-या कंपनीत अनुप यांनी अर्ज केला. कोडावाला कंपनीत त्यांची निवड झाली. या कंपनीत ते गेम प्रोग्रॅमर म्हणून काम करु लागले. आपण या क्षेत्रामध्ये काही नवं करु शकतो याची जाणीव अनुप यांना हे काम करत असताना झाली. हाच विचार पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोडावाला कंपनीमधून राजीनामा दिला. अनुप आता स्वतंत्रपणे काम करु लागले होते.

Xaxistarts ची टीम

अनुप यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत असताना अनेक जणांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्यांनी वेगवेगळ्या गेमिंग स्टुडिओंशी संपर्क केला होता. स्वतंत्र काम सुरु केल्यानंतर याचा त्यांना फायदा झाला. नाशिकमध्ये परतल्यानंतर अनुप यांनी Xaxistarts ही कंपनी सुरु केली. अनुप यांच्याकडे होते तेवढ्या पैशांची गुंतवणूक करुन त्यांनी या कंपनीचं काम सुरु केलं. Xaxistarts ही जागतिक दर्जाची गेमिंग कंपनी बनावी यासाठी अनुप प्रयत्न करु लागले. डिसेंबर २०१२ पर्यंत कंपनीत दोनच कर्मचारी होते असं अनुप सांगतात. यापैकी एक अनुप याचं काम प्रोग्रॅमिंगशी संबंधित होतं. तर दुसरे होते अनुप यांचे जवळचे मित्र परशूराम कोरडे. प्रसिद्ध २ डी आर्टिस्ट असलेल्या परशूराम यांचं काम गेमसंबंधी सर्व आर्ट वर्क पाहणे हे होते. दुर्दैवाने खासगी कारणामुळे काही महिन्यातच अनुप आणि परशूराम वेगळे झाले. पण याचा कंपनीच्या भवितव्यावर काही परिणाम झाला नाही.

Xaxistarts कंपनीनं १६ महिन्यानंतर पहिला गेम बाजारात आणला. या गेमचं नाव होतं रोलिंग जिमरो. हा अतिशय वेगवान आणि तंत्रकुशल असा गेम होता. Xaxistarts कंपनीच्या अन्य कर्मचा-यांना वाटत होते की हा गेम कंपनीनं मोफत द्यावा ज्यामुळे याची लोकप्रियता वाढेल. पण अनुप यांचं वेगळं मत होतं. त्यांनी १.९९ डॉलर इतका या गेमचा दर निश्चित केला. ज्यांना हा गेम आवडेल ते यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार होतील असा अनुप यांचा विश्वास होता. मार्केटिंगवर कोणताही पैसा न खर्च करता हा गेम लोकप्रिय झाला. असं अनुप यांनी सांगितलं. ज्यांनी हा गेम डाऊनलोड केला त्यांच्याकडून मिळालेल्या फिडबॅकमुळे कंपनीच्या कर्मचा-यांचा उत्साह वाढला.

या गेमला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लवकरच याची अँड्रॉइड आवृत्ती बाजारात येईल असा Xaxistarts कंपनीचा दावा आहे. त्यामुळे लोकं सहजपणे मोबाईलवर डाऊनलोड करुन या गेमचा आनंद लुटू शकतात. Xaxistarts कंपनीनं बनवलेल्या गेम्सचं बाजारात चांगलं स्वागत झालंय. आजवर मिळालेल्या अनुभवामुळे कंपनीचा उत्साह वाढला आहे. खेळलात, बागडलात तरच नवाब व्हाल हा विश्वास असलेल्या मुलानं आपला ध्यास जिद्दीनं पूर्ण केला. आपल्याला जे काम आवडतं त्यामध्ये १०० टक्के झोकून दिलं तरच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता असं अनुप यांनी सांगितलं. अनुप सरोदे यांचा हा आत्मविश्वास आणि काही तरी करण्याची जिद्दीमुळेच आज लाखो तरुणांचे ते प्रेरणास्थान बनले आहेत.

लेखक – जुबीन मेहता

अनुवाद – डी.ओंकार

Related Stories