इंग्रजी शिका पण मातृभाषेेचा भाषेचा अभिमान बाळगा

इंग्रजी शिका पण मातृभाषेेचा भाषेचा अभिमान बाळगा

Friday March 11, 2016,

3 min Read


"भाषा हा मुख्य विषय घेऊन तसेच भारतीय भाषांचा उत्सव साजरा करण्याचा विचार माझ्या मनात गेल्या वर्षी आला. आपण काय नवीन करू शकतो, असा विचार कायम माझ्या मनात सुरू असतो. यातूनच भारत आणि इंडियामधली दरी सांधण्यासाठी आणि भारतीय इंटरनेट माध्यमात स्थानिक भाषांचा पाया रचण्यासाठी युअरस्टोरीच्या माध्यमातून भारतीय डिजिटल भाषा मेळयाचे आयोजन करण्याचे मी ठरवले," युअरस्टोरीच्या संस्थापक आणि मुख्य संपादिका श्रद्धा शर्मा सांगतात. युअरस्टोरीच्या भारतीय डिजिटल भाषा मेळा समारंभात संबोधित करताना त्या सांगत होत्या.

image


याबाबत आपला अनुभव कथन करताना त्या सांगतात की, 'हा विचार माझ्या मनात का आला, यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मी मूळची बिहारची आहे. जेव्हा मी बिहारमध्ये होते तेव्हा माझ्या आईचा कायम एक हट्ट असायचा की, तिच्या मुलींनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायला हवे. याकडे ती जाणीवपूर्वक लक्ष ठेऊन असायची. पण मी लहान असल्यामुळे मला माझ्या आईच्या अट्टहासाचे कारण समजायचे नाही. अखेरीस मला पटणा येथील एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर माझे शिक्षण सुरू झाले. पाचवी-सहावीत असताना आमच्या शाळेत पालकसभा होत असे. तेव्हा माझी आई त्या सभेला आली होती. माझे शिक्षक अस्खलित इंग्रजीमध्ये बोलत होते. तेव्हा तेथील अनेक विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांसोबत इंग्रजीमध्ये संभाषण करत होते. मात्र माझ्या आईला ते शक्य नव्हते. ती फक्त हिंदीमध्येच संवाद साधू शकत होती. त्यामुळे तिने मोडक्या तोडक्या इंग्रजीत तेथे संवाद साधला. तेव्हा मला तेथे खूप अवघडल्यासारखे वाटत होते. अखेरीस मी माझ्या आईला सांगितले की, तू शांत रहा. मी त्यांच्याशी बोलेन. तेव्हा मी माझ्या आईच्या वतीने त्या पालकसभेत शिक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर जेव्हा मी दहावीत शिकत होते. तेव्हा मी पुन्हा एकदा माझ्या आईला शाळेत घेऊन गेले. तेव्हा मला अपेक्षित होते की, मलाच माझ्या आईच्यावतीने बोलावे लागणार आहे. पण तेव्हा माझी आई मला इंग्रजीमध्ये म्हणाली की, आता तू शांत रहा, मी बोलेन. तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की, श्रद्धा जिथून तू आली आहेस, जेथे आहेस आणि तुझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा कायम तुला अभिमान असायला हवा. आत्ताच तुला इंग्रजीमुळे इतर गोष्टींची लाज वाटायला लागली. तर आयुष्यभर तुला कमीपणाच वाटेल. तू इंग्रजी शिक पण तुला हिंदी भाषेचादेखील अभिमान वाटायला हवा.'

image



त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी श्रद्धा दिल्लीत आल्या. तेथील लोक त्यांना कायम तुम्ही मूळच्या बिहारच्या असल्याने तुमचे हिंदी फार चांगले असेल. तुम्ही 'हम हम' असे बोला, ते खूप चांगले वाटते. तेव्हा पुन्हा त्यांना तेथे अवघडल्यासारखे वाटू लागले. त्या सांगतात की, 'मला वाटायचे की, हे सर्व विद्यार्थी दिल्लीमधील आहेत. त्यामुळे त्यांचे इंग्रजी खूप चांगले असणार. तेव्हा मला माझ्या आईचे ते वाक्य आठवले की, तुला कायम आपल्या भाषेचादेखील अभिमान वाटायला हवा. 

image


आमच्या भाषेची 'हम' या शब्दावरुन कायम गंमत केली जायची. मात्र आज मला त्याचा अभिमान वाटतो.', असे श्रद्धा सांगतात. त्या पुढे सांगतात की, 'आज मी आय़ुष्यात एका चांगल्या टप्प्यावर आहे, तेव्हा मला असे वाटू लागले की, आपण काहीतरी चांगले काम करायला हवे. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आपण भाषेसाठी काहीतरी करू. भारतीय भाषांचा उत्सव साजरा करू. आपल्याला कुठूनतरी सुरुवात करायला हवी. मी प्रत्येकाला सांगेन की, या विषयावर एका मिशनप्रमाणे काम करा. या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सांस्कृतिक मंत्रालयाचे मी विशेष आभार मानेन. आज मला अभिमान वाटतो की, युअरस्टोरी संकेतस्थळ १२ भाषांमध्ये काम करत आहे.'

अनुवाद : रंजिता परब