सहज फिरणाऱ्या चाकाच्या रुपात पिण्याचे पाणी, अर्थात 'वेल्लोज वाॅटर व्हिल !

0

सिंथिया केनिग यांनी दहा वर्ष मेक्सिको, भूतान आणि ग्वाटेमालासारख्या विकसनशील देशांतील दुर्गम भागात घालविली आहेत. सिंथिया सांगतात, “पाणी भरण्याचे काम महिलांवर शारिरीक व मानसिकदृष्ट्या किती परिणाम करते आणि त्यांना विकासाच्या संधींपर्यंत कसे पोहचूच देत नाही हे मी मेक्सिकोच्या दुर्गम खेड्यात प्रत्यक्ष पाहिले.” जगभरातल्या अनेक महिला त्यांचा २५ टक्के वेळ पाणी भरण्यात आणि स्वच्छ पाणी मिळविण्यासाठी खर्ची घालतात ही मोठी समस्या आहे. दारिद्र्य निर्मुलनाविषयी व्यावसायिक दृष्टीकोन दाखविल्यास या समस्येचे निराकरण होऊ शकेल का? या जिज्ञासेतून मिशिगन विद्यापीठातील ईआरबी इन्स्टीट्यूट फॉर ग्लोबल सस्टेनेबिलीटी येथून एमएस,एमबीए केलेल्या सिंथिया यांनी सस्टेनेबल टूरिझम क्षेत्रातल्या आपल्या करिअरला विराम दिला.

दरम्यान सिंथिया यांनी तहानलेल्या लोकांना स्वच्छ पाणी मिळवून देण्याच्या उद्देशाने वेल्लो हा सामाजिक उपक्रम सुरु केला. “आम्ही अशी उत्पादने आणि उपाय तयार करतो ज्याची समाजाला केवळ गरजच नाही तर लोकांना ते पाहिजे आहे,” असे त्या सांगतात. या प्रवासात त्यांची भेट फायनान्स, जाहिरात क्षेत्र, ब्रँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन डिझाईन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील कामाचा अनुभव गाठीशी असलेल्या श्रद्धा राव यांच्याशी झाली. श्रद्धा यांनी मुख्य सदस्य म्हणून वेल्लोच्या भारतातील उपक्रमांचे प्रतिनिधित्व स्विकारले आणि आता वेल्लोने भारताबरोबरच झांबिया आणि पाकिस्तानमध्येही आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे.

काय आहे वेल्लो व्हिल?

कल्पना करा की कडक उन्हामध्ये एक महिला डोक्यावर भरलेला पाण्याचा हंडा घेऊन मैलभर अंतर पार करते आहे. आता त्याच पाण्याच्या हंड्याची स्टिअरिंगच्या सहाय्याने एका सहज फिरणाऱ्या चाकाच्या रुपात पुन्हा कल्पना करा. हेच आहे वेल्लो व्हिल.

भारतातील सात दशलक्ष लोकांना स्वच्छ पाण्याचा स्रोतच उपलब्ध नाही. ज्यामुळे त्यांना पाण्यातून जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. अस्वच्छ पाण्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे. भारतातील ३५ राज्यांपैकी केवळ सात राज्य गावांना सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध करुन देत आहेत. देशाच्या लोकसंख्येच्या मोठ्या हिस्स्यापर्यंत स्वच्छ पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे त्यांना स्वच्छ पाण्याच्या शोधात दूरवर पायपीट करणे किंवा अव्वाच्या सव्वा पैसे मोजून पाणी विक्रेत्यांकडून पाणी विकत घेणे भाग आहे. हीच समस्या सोडविण्याचा वेल्लो व्हिलचा प्रयत्न आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या उत्पादनाची पहिली विक्री राजस्थानमध्ये झाली. जिथे आदिवासी गावातील पुढाऱ्यांनी स्थानिक आदिवासींनी उंटाच्या केसांपासून बनविलेल्या घोंगडीच्या बदल्यात वेल्लो व्हिलने नमुन्याखातर बनविलेल्या पहिल्या वॉटरव्हिलचा सौदा केला. त्यानंतर उत्पादन प्रमाणित करुन वेल्लो व्हिलने स्थानिक उत्पादकांच्या सहाय्याने उत्पादन घ्यायला सुरुवात केली. “पहिल्या दिवसापासून आम्ही आमच्या ग्राहकांचा विचार करुन उत्पादनाची किंमत ठरविण्याचे निश्चित केले आहे. रोखीचा व्यवहार हा किंमत मोजण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.

आज आमचे वॉटर व्हिल्स रिटेल बाजारात ठिकाण आणि तिथली आर्थिक परिस्थिती याचा विचार करुन २००० ते २५०० रुपयापर्यंत विकले जातात,” असं श्रद्धा सांगतात.

काही संभाव्य मार्गांच्या सहाय्याने वेल्लोची टीम वॉटरव्हिल्स ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढण्याच्या प्रयत्नात आहे. “पारंपरिक वितरक, स्वयंसेवी संस्था आणि मायक्रो फायनान्स संस्थांच्या मार्फत आम्ही सध्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करित आहोत. सध्या आम्ही महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र त्याचबरोबर आम्ही इतर भागातील ग्राहकांनाही वॉटरव्हिल्सची विक्री करित आहोत,” असं सिंथिया सांगतात.

एक कंपनी म्हणून वेल्लो एक डिझाईन व्हेंचर आहे. जी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण वस्तूंचे उत्पादन करते. पुढील वाटचालीबद्दल बोलताना सिंथिया सांगतात, “वेल्लो सध्या आजवरच्या आमच्या प्रवासातल्या सर्वात रोमांचक वळणावर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही आमचे पहिले उत्पादन ‘वॉटरव्हिल २.५’ व्यावसायिकदृष्ट्या बाजारात आणले, जे लगोलग विकले गेले आणि आता आम्ही आणखी दोन उत्पादनांचे संशोधन आणि विकास करायला सुरुवात केली आहे.” कंपनी सध्या तिच्या ऑपरेशन ऍण्ड सेल्स टीमसाठी कर्मचारी भर्ती करित आहे. त्याचबरोबर कंपनीचा विस्तार वाढविण्याच्या दृष्टीने वेल्लो गुंतवणूकदार आणि सल्लागार यांच्याही शोधात आहे.