हजारो HIV पीडितांचे लग्न जुळून देणारे माध्यम 'पॉजिटिव साथी'

0

जगातील एड्स पीडितांच्या बाबतीत भारताचे स्थान तिसरे आहे. इथे २०११ च्या आकडेवारी नुसार सुमारे २१ लाख लोक एड्सबाधित असून सुमारे १.३ लाख एड्सचे रुग्ण दरवर्षी मृत्युमुखी पडतात. अशा मध्ये ज्या व्यक्तीला हा आजार जडतो त्याने काय जगणेच सोडून द्यावे, संसार करण्याच्या आपल्या इच्छेलाच त्यागून द्यावे. असे होणे तर योग्य नाही. ज्या प्रमाणे एका सामान्य माणसाला योग्य जोडीदारासह लग्न करण्याचा अधिकार आहे तसाच एड्स बाधितांनाही असायला हवा. मात्र असे असले तरी एड्स बाधितांना स्वतः साठी जोडीदार निवडताना खूप समस्या येतात, कारण आजही आपल्या समाजात एवढा मोकळेपणा आलेला नाही की कोणी सहज पणे सांगावे की मला एड्स झाला आहे आणि मी एड्सबाधित जोडीदाराचा शोध घेतो आहे.

एड्स बाधितांच्या या समस्येला समजून महाराष्ट्राच्या आरटीओ विभागात काम करणाऱ्या संजय वळीव यांनी तोडगा म्हणून एड्स बाधितांसाठी अशा मंचाची निर्मिती केली जिथे एड्स बाधित लोक एकमेकांना भेटू शकतील, बोलू शकतील आणि लग्नही करू शकतील.

अनिल यांनी यासाठी ‘पॉजिटिव साथी’ नावाची वेबसाईट सुरु केली आहे. ज्याच्या माध्यमातून ते आता पर्यंत हजारो एड्सबाधितांची लग्न जुळून आणण्यात यशस्वी झाले आहेत.

अनिल वळीव हे महाराष्ट्राच्या आरटीओ विभागात सहाय्यक आरटीओच्या पदावर पुणे येथे काम करत आहेत. त्यांनी आधी अमरावती, लातूर, सोलापूर येथे काम सांभाळले आहे. युवरस्टोरीला ते सांगतात “ जेव्हा मी अमरावतीला होतो तेव्हा ट्रक चालकांसाठी रस्ता सुरक्षेसंदर्भात अनेक कार्यक्रम करत असे. ट्रक चालकांना दर तीन वर्षांनी आपले लायसेन्सचे नूतनीकरण करण्यासाठी एका कार्यशाळेमध्ये यावे लागत असे, जिथे रस्ता सुरक्षे विषयी मी त्यांना मार्गदर्शन करत असे. यानंतर जेव्हा लातूर इथे बदली झाली तेव्हा या कार्यशाळेत मी ट्रक चालकांना एड्स बद्दल माहिती देण्याचे काम सुरु केले.”

याचे एक विशेष कारणही होते. त्यांच्या एका मित्राला  एड्स झाला आणि त्यानंतर त्याचा सगळा संसार विस्कटला. या घटनेला अनिल यांनी अगदी जवळून पहिले होते. त्यामुळे दुसऱ्यांना जागरूक करण्यासाठी अनिल यांनी एड्स बद्दल माहिती देण्याचे काम चालू केले. सोबतच एका सरकारी रुग्णालयाच्या मदतीने ट्रक चालकांच्या समुपदेशनाचे कामही त्यांनी चालू केले.

आरटीओ मध्ये नोकरी करत असताना आपला मित्र आणि अन्य लोकांकडून त्यांना हे जाणवले की एड्सबाधित व्यक्तींचे लग्न ही एक मोठीच अडचण आहे. त्यांनी पहिले की अनेकदा घरातील एकुलता एक मुलगा एड्स बाधित असूनही त्याचे आई बाबा त्याचे लग्न करून देऊ इच्छितात. याशिवाय एड्स बाधित व्यक्ती सहसा स्वतःची ओळख सांगत नाहीत आणि यामुळे त्यांना योग्य जोडीदार मिळणेही कठीण होऊन जाते. क्वचितच कोणी कोणी स्वतः साठी योग्य साथी शोधू शकतो. तसेच त्यांनी हे पण पाहिले की अनेक एड्स बाधित लोक लग्न करताना स्वतःच्या आजारा बद्दल माहिती देत नाहीत आणि गरीब, अशिक्षित अथवा अपंग व्यक्तीला जोडीदार बनवतात. ज्याने हा आजार जोडीदारालाही ग्रासतो. अनिल सांगतात – “ मी विचार केला की, का नाही एक असा मंच बनवला जावा तिथे एड्स बाधित व्यक्ती एकमेकांना भेटू शकतील आणि ज्यांना हा आजार नाही त्यांचे प्राण वाचतील”. या नंतर त्यांनी २००७ मध्ये 'पॉजिटिव साथी' नावाने एक वेबसाईट सुरु केली. या वेबसाईट च्या माध्यमातून कोणीही एड्स पीडित महिला अथवा पुरुष स्वतः साठी योग्य जोडीदाराची निवड करू शकतो. तो इथे आपल्या बद्दल माहिती देऊ शकतो आणि समोरच्याला जर त्यांनी दिलेली माहिती पसंत आली असेल तर तो त्यांना संपर्कही करू शकतो. या संकेत स्थळावर कोणीही आपली माहिती मोफत देऊ शकतो आणि लग्नानंतर त्या माहितीला काढून टाकू शकतो. या कामाची सुरवात करताना अनिल या कामाला घेऊन थोडे साशंक होते की एड्सबाधित लोक याला पसंत करतील अथवा नाही. मात्र जसजसा वेळ सरत गेला तसतसे या कल्पनेला फारच चांगला प्रतिसाद मिळू लागला. एका अंदाजनुसार आतापर्यंत हजाराहून अधिक लोक या वेबसाईट च्या माध्यमातून लग्न बंधनात बांधले गेले आहेत. अनिल सांगतात की या वेबसाईटला लोक इतके पसंत करतात की केवळ फोन करूनच नाही तर दिल्ली, बेंगळूरू सारख्या लांबच्या शहरातून लोक त्यांना भेटायला पुण्यात येतात आणि त्यांचे आभार मानतात. अनिल यांच्या सांगण्या नुसार ते अशा अनेक दाम्पत्यांना ओळखतात ज्यांनी या वेबसाईट च्या माध्यमातून लग्न केले आणि आता सुखाने संसार करत आहेत.

या वेबसाईट ला चालवण्याचा सगळा खर्च अनिल स्वतःच उचलतात. लोकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर त्यांनी ‘पॉजिटिव साथी’ नावाने एका संस्थेची पण स्थापना केली आहे. जी एड्स पीडित लोकांना एकत्र आणून ओळख करवून देण्याचे काम करते. यासाठी वेळोवेळी पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर सारख्या वेगवेगळ्या शहरात ते मेळाव्याचे आयोजन करतात. जिथे एड्सग्रस्त व्यक्ती समोरासमोर भेटून लग्नाबद्दल बोलू शकतात. आतापर्यंत अशा २० मेळाव्यांचे आयोजन त्यांनी केले आहे. कित्येक मेळाव्यामध्ये तर दोनशे ते अडीचशे लोकांनी भाग घेतला होता.

अनिल जितके आपल्या सरकारी कामाला घेऊन इमानदार आहेत तितकेच या सामाजिक कामाबद्दल गंभीर आहेत. त्यामुळेच ते अभिमानाने सांगतात की या वेबसाईट च्या माध्यमातून काही विवाह तर अवघ्या काही तासातही झाले आहेत. आणि आज ते सारे आपल्या कुटुंबसोबत आनंदात आहेत.

भविष्यात अनिल यांची योजना एड्स बाधित अनाथ मुलांसाठी काम करण्याची आहे. सध्या ते एका अशा योजनेवर काम करत आहेत ज्याच्या माध्यमातून अनाथ एड्स बाधित मुलांना सामान्य व्यक्ती दत्तक घेऊ शकतील अथवा त्यांचा खर्च उचलण्याची जवाबदारी घेऊ शकतील. ज्याने एड्स ग्रस्त लहान मुलांच्या त्रासाला दूर करता येईल.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : सुयोग सुर्वे

Related Stories

Stories by Team YS Marathi