डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष

Wednesday November 09, 2016,

2 min Read

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड जॉन ट्रम्प यांनी अनपेक्षित विजय मिळवला. ट्रम्प हे अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटनचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. ते २० जानेवारी २०१७ रोजी पदाची शपथ घेतील.

अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व ठरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय धक्का मानला जात आहे, कारण हिलरी क्लिंटन सहजरित्या निवडणूक जिंकतील असा अंदाज लावण्यात येत होता. सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेत हिलरींना पिछाडीवर टाकलं.

image


राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेले तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरित्या २०१६ च्या रिपब्लिकन पक्ष प्राथमिक निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरिक्षकांनी हिलरी क्लिंटन या निवडणुक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. परंतु सर्वांचे अंदाज मोडत ट्रम्पने अध्यक्षीय निवडणुकीत सनसनाटी विजय मिळवून जगभर एकच खळबळ उडवली.

हिलरी क्लिंटन यांचा पराभव केल्यानंतर ट्रम्प यांनी समर्थकांशी संवाद साधला, ते म्हणाले की, आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आपल्या सर्वांच्या पाठींब्यामुळे मला हे यश मिळाले. मला चांगले काम करून इतिहास रचवून दाखवायचा आहे. अमेरिकेला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी आपण सर्व एकत्रित काम करू या. आपणा सर्वांमध्ये खूप क्षमता आहे. अमेरिकेला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे खूप योजना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.