फक्त ४०० रुपयात घरात प्रकाश,११ वर्षाच्या छोट्या शास्त्रज्ञाची कमाल

फक्त ४०० रुपयात घरात प्रकाश,११ वर्षाच्या छोट्या शास्त्रज्ञाची कमाल

Saturday January 09, 2016,

4 min Read

काही मुलं अनोखी असतात. कमी वयातच आपले विचार आणि समजूतीच्या आधारावर जगाला कोड्यात टाकतात. वेदांतही अशाच मुलांपैकी एक आहे. जो आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा हटके आहे. त्याच्या वयाची मुलं एखादं खेळणं तुटल्यावर त्या खेळण्याला फेकून देतात. पण वेदांत त्याच तुटक्या खेळण्यापासून नवी गोष्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. वेदांत हा मुंबईतल्या मीरा रोड परिसरातल्या शांतीनगर विद्यालयातला सहावीचा विद्यार्थी. या सहावीत शिकणा-या मुलानं सोलर लाईट तयार केलीय. जी लाईट खूप कमी खर्चात बनवली जाऊ शकतेच. शिवाय यामुळे विजेचीही मोठी बचत होते. या सोलार लाईटचा वापर करुन मुलं अभ्यास तसंच महिला घरात स्वयपाक करु शकतात. ११ वर्षाच्या वेदांतची भरारी इथंच थांबलेली नाही. त्यानं एक ‘रिमोट डोर अनलॉकींग’ यंत्रणाही तयार केलीय. ज्यामुळे दूर बसून रिमोट कंट्रोलच्या साह्याने दरवाजा उघड-बंद करता येतो.

image


वेंदांतला लहानपणापालसून वेगवेगळ्या गोष्टींशी खेळण्याचा आणि त्याबाबत पूर्ण माहिती गोळा करण्याचा छंद आहे. विजेचे उत्पादन बनविणे, सोप्या पद्धतीनं हे उपकरण तयार करुन त्याचा गरजू व्यक्तींना कसा फायदा होईल याचा विचार वेदांत करत असतो. “ सुरुवातीला तो एखादी चांगली गोष्ट तोडत असे. आता तुटलेल्या अनेक वस्तूंना एकत्र करुन तो काही ना काही बनवतो ” असं वेदांतचे वडिल धिरेन ठक्कर यांनी सांगितले. धिरेन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत. ते सांगतात, “ एके दिवशी माझा लॅपटॉप खराब झाला होता. मी तो घेऊन लॅपटॉप दुरुस्त करणा-या तंत्रज्ञाकडे गेलो. त्यानं या लॅपटॉपची बॅटरी खराब झालीय. असं सांगितलं. त्यानं मला नवी बॅटरी दिली. त्यावेळी वेंदातनं खराब बॅटरी मला फेकू दिली नाही. ती त्यानं स्वत:कडेच ठेवली.”

वेदांतनं खराब बॅटरी घरी जाऊन उघडली. त्यामध्ये त्याला सहा इलेक्ट्रीक सेल मिळाले. त्यानं मीटरनं हे सेल तपासले. त्याला अशी सारी काम पूर्वीपासूनच येत होती. याचं कारण म्हणजे वेंदातला पूर्वीपासून इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंची आवड होती. तसंच त्याचे वडिलही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असल्यानं त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिकची कित्येक उपकरणं होती. वेदांतनं सर्व पाच सेल चेक केले. त्यावेळी त्याला सहापैकी केवळ एकच सेल खराब असल्याचं लक्षात आलं. हे सर्व सेल एकाच रांगेत लावण्यात आली होती. त्यामुळे यापैकी एक सेल बिघडला की विजेचा प्रवाह पुढे जाऊ शकत नसे. त्यामुळे बॅटरी फेकून द्यावी लागे.

image


वेदांतनं आता सहा पैकी एक खराब सेल बाजूला ठेवला. त्यानंतर त्यानं घरातला एक सीएफएलवर चालणारी जुनी इमरजेंसी लाईट शोधली. ही लाईट पूर्वीपासून खराब होती. त्या लाईटमध्ये त्यानं लॅपटॉपमधले दोन चांगले सेल बसवले. वेदांतची ही युक्ती कामी आली. बंद पडलेली इमरजेंसी लाईट पुन्हा सुरु झाली. त्यानंतर ही गोष्ट वेदांतनं सर्वांना सांगितली.बंद पडलेला लाईट अचानक सुरु झालेला पाहून सारेच आश्चर्यचकीत झाले होते. पण त्यावेळी वेदांतनं त्यामागचे कारण सर्वांना सांगितले. ते ऐकल्यानंतर सारे खूश झाले. वेंदातनं त्यांना हे ही सांगितलं की हे सेल एकदा खराब झाले की याचा लॅपटॉपमध्ये पुन्हा उपयोग करणे शक्य नाही. पण तरीही त्याच्यामध्ये इतकी वीज असते की एखाद्या अंधा-या घरात एलईडी लावून त्या प्रकाशात एखादा मुलगा अभ्यास करु शकतो. गृहिणी स्वयपाक करु शकते.

image


लॅपटॉपच्या बॅटरीमध्ये लिथियम आर्यन असते. जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. तसेच आपल्या देशात या कच-याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये वेदांतचा हा प्रयत्न नक्कीच मोलाचा आहे. ज्यामुळे केवळ पर्यावरणाचे रक्षण होणार नाही तर गरजू व्यक्तींना मोफत वीजही मिळेल. याच गोष्टीचा विचार करुन वेदांतच्या वडिलांनी पेटंटसाठी अर्ज केलाय. “ वेदांतचा विज्ञान हा आवडता विषय आहे. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा नव्या संशोधनामध्येच जास्त असते.” असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

वेदांत वर्षातून दोनदा त्याच्या गावी जातो. त्याच्या गावात मोठ्या प्रमाणात भारनियमन होते. अनेकदा रात्रभर लाईट नसते.त्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये अडथळा येतो. बायकांना स्वयपाक करताना काहीतरी भलतंच घडेल अशी भीती वाटते. त्यावेळी अशा ठिकाणी मोफत वीजेची व्यवस्था करायला हवी असं वेदांतला वाटलं. त्यासाठी त्यानं त्याच्या वडिलांकडे एक एलईडी लाईट आणि छोटं सोलर पॅनल मागितले. त्यानंतर वेदांतनं सोलार पॅनलचं चार्जिंग सर्कीट बनवलं. त्यानंतर त्यानं एक पाच तासांपासून ४८ तासांपर्यंत सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी बनवली. विशेष म्हणजे या बॅटरीचा केवळ ४०० रुपये खर्च आहे. मुलांना रात्री अभ्यास करता यावा यासाठी मोफत वीजेची निर्मिती करणे हाच वेदांतचा या सा-या धडपडीचा उद्देश आहे. असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

image


वेदांतनं दैनंदिन आयुष्यातल्या अनेक वस्तुंची निर्मिती केलीय. वेदांतच्या घरात लोकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे त्याच्या आईला आपली सारी काम सोडून दरवाजा उघड-बंद करावा लागायचा. वेदांतनं आईचा हा त्रास कमी करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यानं रिमोटनं चालणारं कुलूप बनवलं. यासाठी त्यानं रिमोटनं चालणारी खेळणी खरेदी केली. ती खेळणी फोडून त्याचं सर्कीट त्यानं बाहेर काढलं. त्या सर्कीटमध्ये थोडे बदल करुन त्यानं ते घराच्या दरवाज्यावर लावले. आता घरात कुणी आलं तर दरवाजा उघडण्यासाठी वेदांतच्या आईला मुख्य दरवाज्यापर्यंत येण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे २५ मीटरपर्यंत हा रिमोट चालू शकतो. आता मोठेपणी इंजिनिअर होण्याचं वेदांतचं ध्येय आहे. ज्यामुळे तो देशाला वीजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करु शकेल.

लेखक - हरिश बिश्त

अनुवाद – डी. ओंकार