महाराष्ट्रात साकारतंय भारतातील पहिलं ‘पुस्तकांचं गाव’

महाराष्ट्रात साकारतंय भारतातील पहिलं ‘पुस्तकांचं गाव’

Saturday April 29, 2017,

3 min Read

सातारा जिल्हयातील भिलार हे गाव स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द आहे. आता या गावाची ओळख पुस्तकांचे गाव म्हणूनही ओळख होणार असल्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. भिलार येथील पुस्तकांचे नाव नेमके कसे असेल याबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालयातील परिषद सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तावडे यांना पुस्तकाच्या गावाबाबत माहिती दिली.


image


१५ हजारहून अधिक पुस्तके वाचण्याची संधी

यावेळी तावडे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून रुपांतरित होत आहे. महाराष्ट्रात साकारत असेल्या भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्धाटन येत्या ४ मे, रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भिलार गावातील श्रीजननीमाता मंदिर परिसरात दु. ३.०० वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ ही भावना मनात ठेवून भिलार गाव पर्यटकांचे आणि रसिक-वाचकांचे स्वागत करायला सज्ज झाले आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे ४०० ते ४५० अशी एकूण सुमारे १५,००० पुस्तके वाचकांसाठी गावात उपलब्ध आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी कपाट, टेबल, टी-पॉय, खुर्च्या, सुशोभित छत्री, बिन बॅग इत्यादी वस्तूही पुरवण्यात आल्या आहेत. पर्यटक किंवा रसिक-वाचक घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्पात सहभागी असलेल्या २५ ठिकाणांचे (घरे व सार्वजनिक जागा) सुसज्ज व सुंदर ग्रंथालयांत रुपांतर करण्यात आले आहे. पर्यायाने, संपूर्ण भिलार गावच एक ग्रंथालय बनले आहे. भिलारवासीयांनी राज्य शासनाच्या पुढाकाराला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने निसर्गरम्य असलेल्या गावात स्वत्व या स्वयंसेवी गटाच्या सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील २५ ठिकाणे आपल्या कलेच्या माध्यमातून सजवली आहेत.तर एशियन पेंट्स कंपनीनेही मदत केली आहे.

पुस्तकांच्या गावांमध्ये २५ साहित्यप्रकार वाचण्याची संधी

घरे, लॉजेस्, मंदिरे आणि शाळा अशा एकूण २५ ठिकाणी कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य, स्त्री-साहित्य, बालसाहित्य, इतिहास निसर्ग-पर्यावरण-पर्यटन, लोकसाहित्य, चरित्रे-आत्मचरित्रे, दिवाळी अंक अशा विविध 25 साहित्य प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले आहेत. यामुळे एकाच ठिकाणी 25 साहित्यप्रकार वाचण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक, लोकअभ्यासक यांची माहिती देणारे 50 साहित्यिक प्रदर्शनीही येथे असणार आहे.

शाळांनी शैक्षणिक सहल येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार

पुस्तकांचे गाव नेमके काय आहे हे शाळेतील मुलांनाही कळावे यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेची शैक्षणिक सहल येथे असावी असे आवाहन शाळांना करण्यात येणार आहे. यामागे विदयाथर्यांना किमान १ ते २ दिवस पुस्तकांच्या सान्निध्यात घालवण्याची संधी मिळावी हा आहे. याशिवाय आजच्या तरुण पिढीला आपली साहित्य संस्कृती किती संपन्न आहे हे कळण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

साहित्य महोत्सव आयोजित करणार

सन २०१५च्या २७ फेब्रुवारी रोजी (मराठी भाषा दिनी) ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या गावाचा संदर्भ देऊन, ‘महाराष्ट्रात पुस्तकांचं गाव उभारण्यात येईल,’ अशी घोषणा करण्यात आली होती. मुळातच ज्या भागात पर्यटकांची वर्दळ मोठ्या संख्येने आहे, अशा भागातील गाव निवडण्याचे ठरले आणि भिलारची निवड करण्यात आली. मूळ संदर्भ हे ऑन वे चा असला, तरी ‘पुस्तकांचं गाव’ या संकल्पनेचे एका अर्थाने महाराष्ट्रीकरण करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अभूतपूर्व पुढाकार, भिलारवासीयांचा उत्साह व औदार्य आणि पुस्तके वाचण्यासाठीची विनामूल्य व्यवस्था ही पुस्तकाच्या गावाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत.शालेय विदयार्थ्यांना असलेली दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याची उन्हाळी सुटटी लक्षात घेऊन येथे साहित्य महोत्सव आयोजित केले जाणार आहेत. याचबरोबर वाचन, लेखन, प्रकाशन आणि प्रशिक्षण्‍ कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने, काव्यवाचन, अभिवाचन आणि साहित्यिक गप्पा असे विविध कार्यक्रमांचेही आयोजन आता करण्यात येणार आहे.

उदघाटन कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार

डॉ. सदानंद मोरे, बाबा भांड, दिलीप करंबेळकर, अरुणाताई ढेरे, पांडूरंग बलकवडे, राजन गवस, अशोक नायगावकर असे अनेक मान्यवर पुस्तकांच्या घरात थांबून येणा-या पुस्तकप्रेमींशी, पुस्तकांबाबत गप्पा आणि मार्गदर्शन करणार आहेत. दि. ४ मे रोजी पर्यटकांनी साहित्यिक-प्रकाशकांनी आणि पुस्तकप्रेमींनी दिवसभरासाठी पुस्तकांच्या गावात (भिलारला) यावे, असे आवाहन तावडे यांनी केले. शांत व निसर्गसंपन्न गाव, गावक-यांचे आदरातिथ्य व आपुलकी आणि विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके यांचा अनुभव घेण्यासाठी पुस्तकांच्या गावास भेट देऊन वाचनसंस्कृती संवर्धनाच्या मूळ हेतूला बळ द्यावे, असे आवाहन तावडे यांनी केले. (साभार - महान्युज)