मनाला भावणारा, विचारांना दिशा देणारा एक कहाणी संग्रह

मनाला भावणारा, विचारांना दिशा देणारा एक कहाणी संग्रह

Monday December 07, 2015,

5 min Read

प्रसिद्ध पत्रकार मिलिंद खांडेकर यांनी हिंदी मध्ये " दलित करोडपती – १५ प्रेरणादायक कहानियाँ" हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की, या पुस्तकात १५ अशा दलित करोडपतींच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला निश्चितच प्रेरणादायी ठरतील.

या पुस्तकाच्या वाचनानंतर आपल्याला जाणीव होते की, खरोखर या पुस्तकातील प्रत्येक संघर्षगाथेत आपणा सर्वांना एक प्रकारचे संदेश व ज्ञान देण्याचे सामर्थ्य आहे.


image


ज्या दलितांच्या मेहनतीची आणि संघर्षाची कहानी या पुस्तकात नमूद आहे त्यांत अशोक खडे, कल्पना सरोज, रतिलाल मकवाना, मालकीत चंद, सविता बेन कोलसावाला, भगवान गवई, हर्ष भास्कर, देवजीभाई मकवाना, हरिकिशन पिपल, अतुल पासवान, देवकीनंदन सोन, जेएस फुलील्या, सरथ बाबू, संजय क्षीरसागर आणि स्वप्नील भिंगरदेव यांचा समावेश आहे.

अशोक खाडे यांची कहानी वाचल्यानंतर लोकांमध्ये एक नवी उमेद जागृत होते. १९७३ मध्ये जेव्हा अशोक ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जात होते तेव्हा त्यांच्या जवळ पेनाची निब बदलण्यासाठी चार आणे सुद्धा नव्हते. एका शिक्षकांनी चार आण्याची मदत केली तेव्हा ते परीक्षेला बसू शकले. व आज अशोक खाडे करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे मालक आहे. आज त्यांचा एका मोठ्या आर्थिक साम्राज्यावर त्यांचा अधिकार आहे. आता अशोक त्यांच्या गावाला अलिशान गाडी मधून जातात पण ४० वर्षापूर्वी ते याचा गावात अनवाणी फिरायचे.

महाराष्ट्रातील कल्पना सरोज यांनी आपल्या आयुष्यात अस्पृशता, गरिबी, बाल विवाह, घरगुती अत्याचार, आणि लैगिक शोषण, हे सगळे जवळून बघितले आणि स्वतः अनुभवले तसेच त्याला त्या बळी पण पडल्या. त्यांच्यासाठी परिस्थिती अत्यंत बिकट होत गेली आणि त्याच परिस्थितीत त्यांनी आत्महत्येचा पण प्रयत्न केला. पण नंतर मात्र त्यांनी त्यांच्या दृढ संकल्पाने जीवनातल्या कठीण परिस्थितीशी पूर्ण ताकदीने लढा दिला आणि त्यानंतर पाठीमागे वळून बघितले नाही. आपल्या कार्याच्या सफलतेमुळे आणि समाजसेवेमुळे भारत सरकारने त्यांना " पद्मश्री ’’ने गौरवांकित केलेले आहे.

गुजरातच्या रतिलाल मकवाना यांना इंडियन पेट्रोकेमिकल लिमिटेड (IPCL) ची पेट्रोकेमिकल्स विकण्याची एजन्सी मिळाली. प्लास्टिकचे समान बनवणाऱ्या उद्यमींनी त्यांच्याकडून समान विकत घेण्यास नकार दिला कारण की ते दलित होते. आपल्या संघर्षाच्या काळात त्यांच्याबरोबर सामाजिक भेदभाव पण खूप झाले. पण यशाच्या शिखरावर पोहचण्याच्या ध्येयाने ते खचले नाही. आज ते पेट्रोकेमिकल्सचे ट्रेडिंग करणारी कंपनी गुजरात पिकर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहे. त्यांची कंपनी आईओसी आणि गेल ही इंडियाची वितरणकर्ता आहे. रेनबो पॅकेजिंग ही अजून एक कंपनी आहे. दोन्ही कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न ४५० करोड पेक्षा अधिक आहे.

पंजाबच्या मलकितचंद यांनी होजियरीचा व्यवसाय सुरु केला तेव्हा त्यांना किलो मागे १५ – २० रुपयांचा महागडा कपडा मिळायचा कारण ते दलित होते. एक वेळ अशी होती की मलकितचंद यांची आई शिवणकाम करून उदरनिर्वाह चालवीत आसे. पण आज परिस्थिती बदलली आहे. होजियरीचा कपडा बनविण्यापासून तर शिवणकाम करण्यापर्यंत त्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत ज्या आज करोडो रुपयांची उलाढाल करतात.

गुजरातच्या साविताबेनने घरोघरी जाऊन कोळसा विकून कामाला सुरुवात केली होती. एकत्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या आपल्या यजमानांना हातभार लावत होत्या. आज साविताबेन स्टर्लिंग सिरॅमिक प्राईव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या मालकीण आहे. आज घरांना लावल्या जाणाऱ्या टाइल्स बनवणाऱ्या कंपनीची वार्षिक उलाढाल करोडोंत आहे.

१९६४ मध्ये भगवान गवाई यांच्या वडिलांचे आकस्मित निधनाने त्यांची आई चार मुलांना घेऊन गावापासून दूर ६०० किलोमीटर मुंबईला आल्या. मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या या मातेचा एक मुलगा भगवान गवाई, यांनी आपल्या मेहनतीने आणि गुणांनी दुबई मध्ये आपली स्वतःची कंपनी सुरु केली.आज ते करोडपती आहेत.

हर्ष भास्कर आग्र्याच्या ज्या परिवारातून आले तिथे अभ्यासाची परंपरा नव्हती. पण हर्ष यांची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की त्यांना आय आय टी सारख्या देशातील नामांकित संस्थेत प्रवेश मिळवण्यात यश प्राप्त झाले. पुढे त्यांनी कोटा टयूटोरीयल ची स्थापना केली.आज हे टयूटोरीयल हजारो विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश परीक्षेची पूर्व तयारी करायला मदत करते.

हरी किशन पिप्पल यांनी सुरवातीला बँकेतून १५ हजाराच्या कर्जापासून व्यवसायाला सुरवात केली. आज ते चप्पल बूट बनविणाऱ्या कंपनीचे मालक आहेत, जिची वार्षिक उलाढाल करोडोंची आहे.

अतुल पासवान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दरम्यान बेडकाचे रक्त बघून ते बेशुद्ध पडले. या नंतर त्यांनी इतर काहीही करेल पण डॉक्टर होणार नाही असा निश्चय केला. अतुल यांनी त्या नंतर जपानी भाषा शिकली आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

देवकी नंदन यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर बुटांच्या व्यवसायाला सुरवात करून व आग्र्यामध्ये ताजमहालजवळ हॉटेल सुरु करून उत्तुंग भरारी घेतली.

सरथ बाबू यांचा जन्म अशा एका गरीब परिवारात झाला की, मुलांचे जेवण झाल्यानंतर आई साठी अन्नाचा एक कण सुद्धा शिल्लक रहात नसे. आईचा हा त्रास बघून सरथ ने तिचा त्रास संपवण्यासाठी निश्चय करून जे पुढे पाउल टाकले ते परत मागे वळून कधीही बघितले नाही.

जेएस फुलीया यांनी मेहनतीने कमावलेले पैसे ज्या कंपनीत गुंतवले ती कंपनी गाशा गुंडाळून पळून गेली. फुलीया हे जातीपातीच्या भेदभावाला पण बळी पडले. पण हार न मानण्याच्या आवेशाने त्यांना यशस्वी केले.

संजय क्षीरसागर यांनी देशातल्या मोठमोठ्या उद्योगपतींचा आदर्श घेतला व त्यांच्या मार्गावर चालू लागले.

स्वप्नील भिंगर देवे यांना आपल्या वडिलांच्या झालेल्या अपमानाची एवढी सल होती की त्यांनी साबित करून दाखविले की दलित सुद्धा व्यवसाया सारख्या क्षेत्रात नाव कमावू शकतात.

लेखकाने आपल्या पुस्तकात या पंधरा दलितांच्या कहाणी विस्तृतपणे लिहिल्या आहेत. त्यांनी आयुष्यातील महत्वपूर्ण आणि धाडसी घटनांचे सुंदर वर्णन केले आहे. या गोष्टीमध्ये त्यांनी सांगितले आहे की, कशा प्रकारे या १५ दलित व्यक्तींनी रोड ते करोडोपर्यंत, जमिनीपासून आकाशापर्यंत, संघर्षातून यशाचा प्रवास केला. या १५ गोष्टी आपल्यातच सुख - दु;ख, चढ-उतार, संघर्ष – विजय अश्या वेगवेगळ्या रंगांनी परिपूर्ण आहेत. काही घटना वास्तविक वाटत नसल्या तरी त्या सत्य आहे आणि त्यातील पात्र नजरेसमोर आहेत. दलित असल्यामुळे या व्यक्तींना समाजातील भेदभाव, बहिष्कार, जातपात, तिरस्कार या सारख्या कठोर परिस्थितींचा सामना करावा लागला. अशी परिस्थिती इतर प्रसिद्ध उद्योगजकांच्या समोर कधीच आली नाही. त्यांच्या सफलतेमध्ये दलित असणे ही एक मोठी समस्या होती. ज्या प्रकारे या १५ लोकांनी संघर्ष करून, साहस आणि धीराच्या जोरावर परिस्थितीचा सामना करून, सगळ्या अडचणी व बंधनांना दूर करून सफलता मिळवली. असे लोक समाजासाठी खरेच एक आदर्श आहेत.

हे पुस्तक वाचण्याचा सल्ला या साठी दिला जातो की, सहज व सोप्या भाषेत असणाऱ्या यातील सर्व गोष्टी खऱ्या, आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि प्रतिभाशाली आहेत. मनाला भावणाऱ्या या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पडतात.

मिलिंद खांडेकर हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे . आज ते स्टार न्यूज सारख्या लोकप्रिय वाहिनीसाठी काम करत आहेत. ते इंदोर मध्ये लहानाचे मोठे झाले. अहिल्यादेवी विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. त्यांनी टाईम्स सेंटर फॉर मिडिया स्टडीज मधून प्रशिक्षण घेतले. त्यांना १९९१ मध्ये उत्तम हिंदीसाठी ‘राजेंद्र माथुर पुरस्कार’ मिळाला.

पत्रकारितेमध्ये त्यांना २५ वर्षाचा अनुभव आहे. सध्या ते नोएडा मध्ये मिडिया कंटेंट अॅन्ड कम्युनिकेशन सर्विसेस (इं) प्रा.लि. (MCCS) मुंबईचे प्रबंध संपादक आहेत. ज्याच्या अंतर्गत एबीपी न्यूज , एबीपी आनंदा आणि एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनी चालतात.

इंग्रजी वाचकांसाठी ‘दलित करोडपती – १५ प्रेरणादायक कहानियाँ’ चा इंगजी मध्ये अनुवाद केलेला आहे. हा संग्रह इंग्रजीमध्ये ‘दलित मिलेनियर – १५ इन्स्पायरिंग स्टोरीज’ या नावाने उपलब्ध आहे.


लेखिकाः पद्मवथी भुवनेश्वर

अनुवाद : किरण ठाकरे