मेक इन इंडियाच्या पटावरील ‘चेस ऑटोमेटेड’

0

अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी जास्तीत जास्त गुण मिळवण्याच्या स्पर्धेत उतरतात किंवा आपण अभियांत्रिकीला प्रवेश घेतला एवढंच पुरे असल्याचं मानणारे काही जण असतात. पण काही मोजके विद्यार्थी असे असतात की जे स्वत:च्या महत्त्वाकांक्षा आणि समाधानासाठी अभियांत्रिकीला प्रवेश घेतात. भव्य गोहिल आणि आतुर मेहता हे दोघं त्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी आहेत. भव्य आणि आतुर या दोघांची ओळख सौमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली.

“अभियांत्रिकीच्या पहिल्या सत्रात फावला वेळ मिळाला की आम्ही अभ्यासासोबतच काही नवीन तांत्रिक प्रयोग आणि छोट्या प्रकल्पांवर काम करायचो”, असं भव्य सांगतो. महाविद्यालयातील एका समितीच्या बैठकीत या दोघांची भेट झाली. या दोघांचा काहीतरी नवीन आणि भरीव करण्याचा प्रयत्न असल्याने ते कायम चर्चेत असायचे.


नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी लवकर मिळत नाही पण सोमय्या महाविद्यालयाची संशोधन प्रयोगशाळा RIIDL मध्ये काम करण्याचं आणि शिकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं असं भव्य सांगतो. या संशोधन प्रयोगशाळेत विविध समस्यांवरील उपायांचं संशोधन, कौशल्य विकास योजना आणि नवीन उपक्रमांना सहकार्य करण्याचं काम केलं जातं. यातूनच या दोघांना भविष्यातील वाटचालीचा मार्ग सापडला. “RIIDLमध्ये काम करत असताना मेकर फेअर, गोदरेज, कॅपजेमिनी, वॉट्सप अंधेरी, आयआयटी मुंबई, खडगपूर आयआयटीमधील कार्यक्रमांमध्ये आम्ही तयार केलेले प्रोटोटाईप रोम्स प्रदर्शित करण्यात आले. यातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली,” असं आतुर सांगतो.

बैठ्या खेळांचं स्वरुप तसंच ठेवून ते अधिक रंगतदार बनवण्याचा त्यांचा विचार होता. बुद्धीबळाची आवड असल्यानं त्यांनी बुद्धीबळाचा स्वयंचलित पट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याला त्यांनी ‘चेस ऑटोमेटेड’ असं नाव दिलं. या स्वयंचलित बुद्धीबळाच्या पटावर कोणीही संगणकाविरुद्ध खेळू शकतं.

सुरूवातीला अंधांसाठी हे स्वयंचलित बुद्धीबळ तयार करण्याचा त्यांचा विचार होता, पण नंतर हा खेळ खेळू शकणाऱ्या वर्गाचा विस्तार होत गेला. “ त्यानंतर आम्ही राष्ट्रीय अंध संघटनेच्या कार्यालयात गेलो. तिथं आम्ही बुद्धीबळ खेळणाऱ्या खेळाडूंकडून त्यांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतली.” जवळपास चार महिन्यांच्या संशोधनानंतर असं एक मॉडेल तयार झालं जे निर्मात्यांना तर खूप आवडलंच पण बुद्धीबळपटू आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचीही त्याला पसंती लाभली. त्यानंतर या मॉडेलमध्ये काही सुधारणा आणि अतिरिक्त वैशिष्ट्य समाविष्ट करण्याविषयी त्यांच्याकडे प्रस्ताव येऊ लागले.


या खेळाची नवीन आवृत्ती निर्मितीसाठी तयार आहे. आधी या स्वयंचलित बुद्धीबळपटाची निर्मिती चीनमध्ये करण्याचा या दोघांचा विचार होता. पण त्यात येणाऱ्या अडचणी पाहता त्यांनी देशातच उत्पादन करण्याचा निर्णय घेत मेक इन इंडिया मोहीमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दर्जेदार उत्पादन सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेतच समांतर काम सुरू केलं. एक नवउद्योग (स्टार्टअप) असल्याने आम्हाला ग्राहकांशी कायमस्वरुपी संपर्क प्रस्थापित करण्यास मदत झाली असं आतुर सांगतो.

राष्ट्रीय अंध संघटनेशी २०१३ मध्ये चर्चा केल्यानंतर या टीमने आतापर्यंत विविध प्रकारचे प्रोटोटाइप तयार केले आहेत. या उपक्रमात अभियांत्रिकीतील विविध प्रकारांचा वापर करावा लागत असल्यानं या टीमची कसोटी लागली होती. त्यासाठी त्यांना आधी इलेक्ट्रॉनिकची कामं पूर्ण केली मग त्यानंतर ते मेकॅनिकल कामांकडे वळले आणि त्यानंतर मग या स्वयंचलित बुद्धिबळासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी काम केले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रोममध्ये झालेल्या मेकर फेअरमध्ये चेस ऑटोमेटेड मांडण्यात आलं होतं. त्यानंतर विमानतळ, रिसॉर्ट, हॉटेल्स, कॅफे, अनेक सोसायट्यांच्या क्लबहाऊसमध्येही चेस ऑटोमेटेडला पसंती मिळाली आहे.

लोकांच्या या प्रतिसादामुळे या दोघांचाही उत्साह वाढला आहे. “अनेक बुद्धीबळ संघटनांनी आमच्यासोबत करार करण्याची तयारी दाखवली आहे, त्यादृष्टीनं आम्ही संशोधनालाही सुरूवात केली आहे,” असं भव्य सांगतो. सुरूवातीला हा खेळ छोट्या गटासाठी तयार केला जाणार आहे. एका प्रत्यक्ष पटाबरोबरच त्यांनी या खेळाची एक ऑनलाईन आवृत्तीही तयार केली आहे. यातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून लोक एकमेकांशी बुद्धीबळ खेळू शकतील असा त्यांचा प्रयत्न आहे.

भारतात हार्डवेअरच्या क्षेत्रात रोज बदल होत आहेत. आज या क्षेत्रात खूप नवीन स्टार्ट्अप आणि निर्माते प्रयत्न करताना दिसत आहेत आणि हा सर्व बहुतेक मेक इन इंडिया मोहीमेचा परिणाम आहे.