मानवता आणि प्रेम याचे जिवंत उदाहरण बनून गरीबाच्या घरात आनंद फुलविणाऱ्या सदफ आपा 

0

वेद, पुराण, गीता, महाभारत, कुराण, बायबल धर्मग्रंथ कुठलाही असो, धर्म कसाही असो, त्याने नेहमीच आपल्याला सांगितले आहे की एक स्त्री त्याग, बलिदान, ममता यांचे मूर्त स्वरुप असते आणि परमेश्वराद्वारे बनविली गेलेली कुठलीही रचना स्त्री हून सुंदर नाही. असं म्हटलं जातं की शक्तीपासूनच उर्जेचा संचार झाला आहे. शक्तिविना उर्जेची कल्पना व्यर्थ आहे.

वरील वाक्य वाचून कदाचित तुम्ही हा विचार करत असाल की अखेर असे काय आहे की ज्यामुळे आज एका कहाणीच्या सुरुवातीला आम्ही इतके आध्यात्मिक झालो आहोत? कारणच तसं आहे. आजची आमची ही कहाणी घडली आहे २२  फेब्रुवारी २०१६ रोजी, मात्र आजही ती तितकीच ताजी आहे, तितकीच अद्वितीय आहे जितकी ती २२  फेब्रुवारीला होती.  २२  फेब्रुवारीला रोहितचा जन्म झाला. तसं बघायला गेलं तर रोहित भारतामध्ये दररोज जन्माला येणाऱ्या करोडो मुलांपैकी एक आहे. मात्र जी गोष्ट त्याला या करोडो मुलांपासून वेगळं ठरवते ती आहे त्याच्या जन्माची कहाणी. या कहाणीतील पात्र आहेत रोहित, चौकीदार असलेला त्याचा गरीब पिता केडी लाल, रोहितची आई राजकुमारी आणि सदफ आपा.

पुढे जाण्यापूर्वी सुरुवातीला आम्ही तुम्हाला सदफ आपाची ओळख करुन देतो. सदफ आपा लखनऊच्या एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका आहेत, ज्यांना आपण रोहितची दुसरी आईही म्हणू शकतो. सदफ आपा आणि त्यांचा समजूतदारपणा यामुळेच आज गरीब केडी लाल आणि राजकुमारीच्या अंगणात रोहितच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज घुमतो आहे.

काहीसे असे घडले होते २२  फेब्रुवारीच्या दिवशी

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौतील पॉलिटेक्निक चौक, फेब्रुवारीच्या एका आळसावलेल्या दुपारची गुलाबी थंडी, आसपास जमलेली गर्दी आणि समोर कण्हत असलेली एक गर्भवती महिला आणि तिचा पती.

लोक तमाशा बघत होते. गर्दीमधील काही लोक मोबाईलवरुन विडिओ शूट करत होते. तर काही लोक महिलेचे फोटो काढण्यात व्यस्त होते. लोक सल्लेही देत होते, “अरे तिला सावलीत बसवा” “सावली करा, तिला डिवायडरवरच झोपून राहू दे”.

सदफ आपासुद्धा नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर आपल्या मुलाबरोबर घरी जात होत्या. तिथून जाताना अकाली जमलेल्या गर्दीने त्यांचेही लक्ष वेधले आणि त्यासुद्धा काय घडलं आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या गाडीतून उतरल्या आणि समोरचं दृश्य पाहून अवाक झाल्या. त्यांच्या समोर एक गर्भवती महिला होती जी लेबर पेनने तडफडत होती आणि तिथे उपस्थित लोक तमाशा पाहून पुढे निघून जात होते.

सदफ आपाने हुमैदला घाईघाईने घरी सोडले आणि पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. अजूनही गर्दी कायम होती, लोक अजूनही जमलेले होते, महिला अजूनही वेदनेने, भयंकर वेदनेने तळमळत होती, महिलेचा गरीब पती अजूनही कुठला तरी चमत्कार घडेल या आशेवर होता. तिथे पोहचल्याबरोबर सदफ आपाने त्या महिलेच्या पतिला बोलावले आणि ‘108’ वर फोन केल्यानंतर काही पैसे दिले. तोपर्यंत ऍम्ब्युलन्स आली होती. आपाद्वारे महिलेला किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, जिथे ‘सी सेक्शन’ नंतर महिलेने सुंदर, सुदृढ बाळाला जन्म दिला. सांगण्यात येते की सदफ आपाने या मुलाचे नाव रोहित ठेवले आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना सदफ जाफरने सांगितले, “एका महिलेच्या वेदना त्याही विशेष करुन लेबर पेनच्या वेदना एक महिलाच समझू शकते आणि मी तेच केले जे या देशाच्या एका जबाबदार महिला नागरिकाने करायला पाहिजे.”

सदफ यांचे म्हणणे आहे की धर्म कुठलाही असो, तो नेहमीच मानवता आणि बंधुतेच्या मार्गावर चालण्यास सांगतो आणि व्यक्तिला तेव्हाच मनुष्य म्हणावं जेव्हा त्याच्यामध्ये माणूसकी शिल्लक असेल.

रोहित विषयी माहिती देताना सदफ यांनी सांगितले की रोहितच्या वडिलांच्या आईची तब्येत ठीक नसल्यामुळे आणि त्यांचे कुटुंब बिकट परिस्थितीतून वाटचाल करत असल्याने त्यांनी बाळाचे पिता केडी लाल यांना आश्वासन दिले आहे की जोपर्यंत त्या जिवंत आहेत तोपर्यंत त्याच या बाळाचे पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळतील. सदफ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना हेही सांगितले की त्यांची प्रबळ इच्छा आहे की पुढे जाऊन हे बाळ एक चांगला नागरिक व्हावे जेणेकरुन आपली येणारी पिढी मानवता आणि संस्कृतीला पुढे घेऊन जाईल.

सदफ आपांनी समाजासाठी प्रेरणादायी असे काम करुन संदेश दिला आहे की आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन नंतर आहोत, पहिले आपण माणूस आहोत आणि जर आपल्यामध्ये माणूसकी नसेल तर मग काबा असो वा काशी किंवा इतर सर्व तिर्थक्षेत्र, नमाज आणि पूजा-अर्चना सर्व व्यर्थ आहे, जर आपल्या हृदयात प्रेम, त्याग आणि बलिदानाची ज्योत पेटत नसेल.

‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हेच त्यांच्या मन:शांतीचे कारण! तन्ना दंपतीना तरूणमुलाच्या अकस्मात निधनाने मिळाला जगण्याचा नवा मार्ग!

२३ वर्षांपासून गरीब मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांनी सोडले घर, लोक आता त्यांना ‘सायकल टीचर’ म्हणून ओळखतात!

पैश्यांसाठी झाडू-पोछा करणाऱ्या इंदुमतीताई आज इतर महिलांना बनवत आहेत आत्मनिर्भर

लेखक – बेलाल जाफरी
अनुवाद – अनुज्ञा निकम