शॉपयार्डः ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या तगड्या खेळाडूंच्या स्पर्धेत स्वतःचे स्थान निर्माण करणारी ई-कॉमर्स स्टार्टअप...  

0

ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट.... ई-कॉमर्सच्या क्षेत्रातील हे दोन तगडे खेळाडू.... आज घराघरांत जाऊन पोहचलेल्या या दोन कंपन्यांनी सुरुवात केली ती मात्र पुस्तकांच्या विक्रीपासून... पुस्तकप्रेमींसाठी ही खऱ्या अर्थाने एक खुषखबर ठरली, कारण त्यापूर्वीपर्यंत आपल्याला हवी ती पुस्तके मिळविण्यासाठी त्यांना चांगलेच झगडावे लागत असे, पण आता मात्र पुस्तकांचे एक प्रचंड मोठे ग्रंथालयच जणू त्यांच्यासाठी खुले झाले होते आणि ते देखील केवळ एक बटण दाबल्याने.... सहाजिकच, या यशानंतर इतरही अनेक खेळाडूंना या विशिष्ट विभागातील संधी खुणावू लागल्या.

सुशांत राजपुत्र आणि श्रवण कुमार हे असेच दोन तरुण... काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकीचे आणि त्यापाठोपाठ व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेत असताना, त्यांच्या लक्षात आले, की अभ्यासक्रमाशी निगडीत पुस्तकांपेक्षाही प्रवेश परिक्षांसाठी लागणारी पुस्तके मिळविण्यात विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत. त्याचबरोबर त्यांना हेदेखील जाणवले की, प्रत्येक राज्याची भरती प्रक्रिया ही स्वतंत्र असल्यामुळे, त्या त्या राज्यांच्या प्रवेश किंवा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक ती पुस्तके मिळविणे तर आणखीनच कठीण होते.

विद्यार्थ्यांबरोबरच रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांपर्यंत कार्यक्षमपणे अभ्यास साहित्य पोहचविण्याचे लक्ष्य ठेवून, सुशांत आणि श्रवण यांनी एप्रिल, २०१४ मध्ये शॉपयार्ड (Shopeyard) ची मुहूर्तमेढ रोवली. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील विद्यार्थी आणि रोजगार मिळविण्यासाठी इच्छुक तरुणांपर्यंत पोहचून, त्यांच्या अभ्यास साहित्य विषयक सर्व गरजा या ऑनलाईन पोर्टलद्वारे एकत्रितरीत्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचा, या हैदराबाद स्थित शॉपयार्डचा दावा आहे.

प्रवास

या जोडगोळीने कोणत्याही बाह्य गुंतवणूकदाराच्या मदतीशिवाय पंधरा लाख रुपयांच्या वैयक्तिक बचतीसह या व्यवसायाला सुरुवात केली होती. “ कार्यालयाची उभारणी करण्यापासून आमचा सुरुवातीचा संघर्ष सुरु झाला, त्यानंतर प्रकाशक, वितरक आणि लॉजिस्टीक पार्टनर्स यांना राजी करण्याच्या आणि हातळण्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. त्याशिवाय, आम्हाला प्रचंड कष्ट पडले ते आमच्या संभाव्य आणि लक्ष्यित ग्राहकांना या संकेतस्थळापर्यंत आणण्यासाठी आणि त्यानंतर त्यांनी येथे मागण्या नोंदवाव्यात यासाठी त्यांना राजी करण्यासाठी,” पंचवीस वर्षीय सुशांत सांगतात.

आता, सुमारे दोन वर्षांनंतर, एकूणच वाढ चांगली असल्याचा शॉपयार्डचा दावा आहे. पहिल्या वर्षांत ते ५.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यशस्वी ठरले. तर यंदाच्या आर्थिक वर्षात ३५ लाख रुपये प्राप्ती होण्याचा त्यांचा अंदाज आहे. सध्या त्यांच्याकडे १४,५०० नोंदणीकृत ग्राहक आहेत.

ऐंशीहून जास्त प्रकाशनांचे एकशे-वीसहून अधिक प्रवेश परीक्षांसाठी उपयुक्त ठरु शकेल, असे अभ्यास साहित्य आणि पुस्तके मिळविण्यासाठी शॉपयार्डने वीसहून अधिक प्रकाशक/वितरकांबरोबर भागीदारी केलेली आहे.

बाजारपेठ आणि स्पर्धा

निल्सन इंडीया बुक मार्केट रिपोर्ट, २०१५ च्या अहवालानुसार भारतातील पुस्तकांच्या बाजारपेठेचे मूल्य २६१ बिलियन रुपये एवढे असून, ती जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि इंग्रजी भाषेचा विचार करता तिचा जगातील क्रमांक दुसरा आहे. तर २०२० पर्यंत ती ७३९ बिलियन रुपयांपर्यंत जाऊन पोहचेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर या अभ्यासाद्वारे आगामी पाच वर्षांत या उद्योगाचा सीएजीआर (कंपाऊंड ऍन्युअल ग्रोथ रेट) हा १९.३ टक्के एवढा असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या क्षेत्रात सध्या ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि पेटीएम यांसारखे अनेक ई कॉमर्स खेळाडू आहेत जे काल्पनिक कथा कादंबरी ते स्पर्धा परिक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची विक्री करतात. या क्षेत्रात असलेल्या या मोठ्या खेळाडूंच्या स्पर्धेबाबत विचारता, सुशांत सांगतात, “ जेंव्हा आम्ही हे काम सुरु करण्याचा विचार केला, तेंव्हाच आम्ही या क्षेत्रात असलेली स्पर्धाही विचारात घेतली होतीच. एक धोरण म्हणून, शॉपयार्डला एका विशिष्ट किंवा सर्व प्रकारच्या अभ्यास साहित्यासाठीचे सिंगल विंडो पोर्टल म्हणून स्थान मिळवून देण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. आमच्या या धोरणामुळे या विशेष विभागात आम्हाला इतर ऑनलाईन विक्रेत्यांकडून खूप जास्त स्पर्धा अपेक्षित नाही.”

आव्हानांचा सामना करताना

या विभागात लक्ष्यित बाजारपेठेपर्यंत पोहचणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र विविध विपणन योजना आणि काही विशेष योजनांच्या सहाय्याने हे साध्य करणार असल्याचा शॉपयार्डचा दावा आहे. त्याशिवाय, लॉजिस्टीक्स आणि दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी म्हणून ते अनेक लॉजिस्टीक्स पार्टनर्सनाही आपल्याबरोबर घेत आहेत.

भविष्यातील योजना

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशशिवाय शॉपयार्डने शेजारी राज्य कर्नाटकमध्येही आता विस्तार केला आहे आणि कोणत्याही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहीत्य मिळविण्याच्या निमित्ताने देशभरात आपले अस्तित्व निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले आहेत.

सध्या तरी आपला भौगोलिक विस्तार करण्याचा आणि इतर राज्यांच्या अधिकाधिक राज्यस्तरीय स्पर्धा/ शैक्षणिक साहित्याचा समावेश करुन उत्पादनाची यादी वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर वापरकर्त्यांना कोणत्याही परीक्षेशी संबंधित सर्व माहिती मिळविण्यास मदत करण्यासाठी म्हणून विविध साधनांवर त्यांचे काम सुरु आहे, तसेच उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत - ज्यांच्याकडे प्रसंगी दुर्लक्ष होऊ शकते - जागरुकता निर्माण करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

“ एक असा वेब प्लॅटफॉर्म उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेथे वापरकर्ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी किंवा नोकरीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक अशा पुस्तकांची/अभ्यास साहित्याची मागणी नोंदवू शकतात,” सुशांत सांगतात.

आणखी काही स्टार्टअपसंबंधी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

एक लाखांवरुन १०० कोटी रुपये, इ-कॉमर्स स्टार्टअपच्या विकासाचा सातत्यपूर्ण आलेख

तीन वर्षांत तीन स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तेहतीस वर्षिय अर्पिता खद्रीया म्हणतात ‘ही तर केवळ सुरुवात’….

२०१५ आणि भारतातील दिग्गज ‘स्टार्टअप’ची कथा…

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन