शाळेच्या बसवर निगरणी ठेवणारे 'लोकॅटेरा'

शाळेच्या बसवर निगरणी ठेवणारे 'लोकॅटेरा'

Friday January 22, 2016,

4 min Read

लहान मुलांना शिक्षण प्रदान करणे आणि त्यांच्या आजुबाजुला संस्कारी वातावरण ठेवणे, ही पालक आणि शाळांची सर्वात मोठी जबाबदारी असते. लहान मुलांना बसमधुन शाळेत पाठवणे, ही पालकांची तर मोठी सत्वपरिक्षा असते. स्कूलबसमधुन शाळेत जाताना आणि शाळेतून परत घरी येताना मुलांच्या सुरक्षेची त्यांना प्रामुख्याने काळजी असते. सद्यस्थितीला अनेक शाळा आणि पालक स्कूलबस सेवेबाबत अधिक सतर्क आहेत. अर्जुन एस. कुमार हा विद्यार्थी एकदा जोरदार पावसामुळे घरी उशिरा पोहोचला. परिणामी त्याच्या पालकांना चिंता वाटू लागली. तेव्हा अनेक पालकांना याच समस्येचा सामना करावा लागत असणार, असा विचार त्यांनी केला. आणि या समस्येवर उपाय म्हणून 'लोकॅटेरा' (Locatera) नावाचे एक मोबाईल एप्लिकेशन तयार केले.

image


लोकॅटेरा एप्लिकेशनमुळे शाळांना त्यांच्या बसेसचे व्यवस्थापन अधिक सुकर पद्धतीने करणे, शक्य होते. ट्राय एप पद्धतीने त्यांना हे व्यवस्थापन करता येते. या एप्लिकेशनमध्ये तीन विविध विकल्प आहेत. त्यापैकी एक विकल्प पालकांकरिता आहे, दुसरा शाळा व्यवस्थापकांकरिता आणि तिसरा बस सहाय्यकाकरिता आहे. याशिवाय या एप्लिकेशनमध्ये बरयाच सुविधा आहेत. बस सहाय्यकाला स्मार्टफोनद्वारे बस सुटल्यावर किंवा एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यावर माहिती स्कॅन करायची आहे. ही माहिती विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळा व्यवस्थापनाला आपसूकच पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे बसची इत्यंभूत माहिती त्यांना मिळू शकणार आहे. या एप्लिकेशनमुळे शाळांना अधिक कल्पकतेने त्यांची वाहतूक सेवा वापरता येणार आहे. याशिवाय त्यांना त्यांच्या शाळेच्या बसेसची तत्कालीन परिस्थिती या एप्लिकेशनमुळे समजू शकणार आहे. याशिवाय शाळा त्यांच्या बसेसची वेळ, नियोजन तसेच बसेसचा मार्ग या एप्लिकेशनद्वारे ठरवू शकणार आहेत. बसमध्ये सहाय्यकांद्वारे घेण्यात येणाऱ्या हजेरी प्रक्रीयाचे स्थानदेखील लवकरच लोकॅटेरा घेणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान बस सहाय्यक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे जीवन सुकर आणि सोपे बनवणार आहे. शाळा आणि पालकांना विद्यार्थ्यांची माहिती, त्यांचे लॉग-इन आणि लॉग-आऊट तपशील, बस वाहतूक अहवाल, बसची वेळ सहजपणे उपलब्ध होणार आहे. या एप्लिकेशनची काही महत्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

 या एप्लिकेशनद्वारे नकाशावर शाळेच्या बसचे स्थान दिसणार आहे. ज्यामुळे लहान मुलांच्या पालकांना त्यांच्या ड्रॉपचे स्थान ठरवता येणार आहे.

 शाळेच्या बसमध्ये विद्यार्थी बसल्यास किंवा त्याने मध्येच बस सोडल्यास त्याबाबतचा संदेश या एप्लिकेशनद्वारे मिळणार आहे

 करंट लोकेशनपासून शाळेच्या बसचे अंतर किती आहे. तसेच तिला एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अंदाजे किती वेळ लागू शकतो, याची माहिती मिळणार आहे.

यापैकी अनेक विकल्प हे स्मार्टफोन्सकरिता उपलब्ध आहेत. ज्या पालकांकडे स्मार्टफोन्स नाही, सर्वसाधारण फोन आहेत, ज्यात एप्लिकेशन्स किंवा इंटरनेट सुविधा नाहीत. अशा पालकांना लोकॅटेरा वेगळीच सुविधा उपलब्ध करुन देतो. बस सहाय्यकाच्या फोनवर पालकांनी एक मिसकॉल दिल्यानंतर त्यांना त्या बसची इत्यंभूत माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. ज्यात बसची तत्कालीन स्थिती, मुलाची उपस्थिती यांसारख्या माहितीचा समावेश असणार आहे.

या एप्लिकेशनच्या निर्मितीमागील खरी गोष्ट म्हणजे चेन्नईमधील सुरापेत येथील वेलाम्मल विद्याश्रमात दहावीच्या इयत्तेत शिकणारे अर्जुन हे या लटेरालॉजिक्सचे (LateraLogics) संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. आयुष्य सुकर बनवण्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल अशा अभिनव तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी एका कंपनीची सुरुवात केली. अर्जुन यांना फार लहान वयातच तंत्रज्ञानाचे आकर्षण वाटत होते. जेव्हा त्यांच्या वडिलांनी घरी स्मार्टफोन आणला, तेव्हा त्यांनी मॅसेच्युसेट्ट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) प्रोग्रामिंग टूल एप इन्व्हेन्टरबद्दल माहिती काढली आणि स्वतःचे एप्लिकेशन तयार करण्यास सुरुवात केली. आठव्या इयत्तेत शिकत असताना अर्जुन यांची एमआयटीने प्रशंसा केली होती. इज स्कूल बस लोकेटर आणि आय-सेफगार्ड ही त्यांची एप्लिकेशन्सच प्रशंसेस पात्र ठरली होती. नुकतेच त्यांना सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून ‘National Child Award for Exceptional Achievements for Computer Technology (2014)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया – चेन्नई, आयईईई कॉम्प्युटर सोसायटी – मद्रास आणि आयईईई प्रोफेशनल कम्युनिकेशन सोसायटी – मद्रास यांच्याकडून गौरवण्यात आले आहे. वापरकर्त्यांच्या प्रतिसादानंतर त्यांनी नवे आणि विकसित 'इझ स्कूल बस लोकेटर व्हर्जन २.० - लोकेटेरा' तयार केले. या एप्लिकेशनकरिता त्यांना मॅसेच्युसेट्ट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचा 'एप ऑफ द मन्थ (बेस्ट डिझाईन) २०१५' हा पुरस्कारदेखील मिळाला. सद्यस्थितीला अर्जुन एकटेच या स्टार्टअपचा भार वाहत आहेत. विपणन, विक्री आणि इतर गोष्टींबाबत अर्जुन त्यांच्या पालकांची मदत घेतात. अर्जुन फक्त तंत्रज्ञानाचे काम पाहतात. या एप्लिकेशनचा नोंदणीकृत व्यवसाय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चेन्नईमधील शाळांना ते या एप्लिकेशनचे कस्टम व्हर्जन पुरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नुकताच चेन्नई शहराला पुराचा फटका बसला होता. तेव्हा अर्जुन यांनी 'आयव्हॉलेंटीयर फॉर चेन्नई' नावाचे एप्लिकेशन तयार केले. ज्यामुळे स्वयंसेवकांना मदतनिसांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने शहराची पुनर्बांधणी करता येऊ शकते. अर्जुन यांनी तयार केलेली अनेक एप्लिकेशन्स वापरण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रासाठी काही कस्टम एप्लिकेशनदेखील तयार केली.

image


आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना अर्जुन सांगतात की, 'अभ्यासक्रम आणि लोकॅटेरा एप्लिकेशन निर्मिती या दोघांचाही समन्वय साधणे, फार आव्हानात्मक काम होते. मात्र आता मी माझ्या वेळेत ते पूर्ण करू शकतो. भविष्यात मला कॉम्प्युटर सायन्स या विषयात शिक्षण घ्यायचे आहे. तसेच आयआयटी किंवा एमआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे माझे स्वप्न आहे.' सध्या चेन्नईमधील अनेक शाळांमध्ये लोकॅटेराच्या चाचण्या सुरू आहेत. चेन्नईमधील अनेक शाळांमध्ये या एप्लिकेशनचा प्रचार आणि प्रसार करण्याचा त्यांचा विचार आहे. चेन्नईनंतर भारतातील इतर शहरांमध्ये ते या एप्लिकेशनचा विस्तार करणार आहेत. अर्जुन यांचे वडिल संतोष कुमार सांगतात की, 'हे एप्लिकेशन मोठ्या स्तरावर कशापद्धतीने वापरता येईल, याबाबत आमची सरकारी यंत्रणांसोबत बोलणी सुरू आहेत.' बसचे व्यवस्थापन करण्यासाठी शाळांना लोकॅटेरा हे एप्लिकेशन मदतगार ठरत आहे.

लेखक – हर्षिथ माल्या

अनुवाद – रंजिता परब