‘रिलिजमायअॅड’ने तंत्र-शक्तीतून रचला जाहिरात विश्वात एक इतिहास !

‘रिलिजमायअॅड’ने तंत्र-शक्तीतून रचला जाहिरात विश्वात एक इतिहास !

Monday December 21, 2015,

6 min Read

विचार करा. तुम्ही अवाढव्य समस्या चुटकीसरशी सोडवणारे एखादे चमत्कारिक उत्पादन साकारलेय, पण फार थोडे लोक त्याबद्दल काही जाणून आहेत. तुम्हाला ते मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहचवायचे आहे… सांगा पाहू कोणकोणते पर्याय तुमच्यासमोर यासाठी आहेत. किंवा तुम्हाला कोणता पर्याय निवडायला आवडेल?

सोशल मिडिया, मित्र आणि कुटुंबीयांसमवेत संवाद? आणि समजा तुमच्या उत्पादनाबद्दल तुम्हाला वृत्तपत्रात जाहिरात द्यायची असेल तर तुम्ही काय कराल?

शरद लुणिया यांना ‘रिलिजमायॲअॅड’ (releaseMyAd) सुरू करण्यासाठी याच प्रश्नांनी प्रेरणा दिली. लुणिया यांनी त्यांची उभी कारकीर्द जाहिरात आणि संबंधित क्षेत्रात घालवलेली. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील व्हार्टन स्कुलमधून मार्केटिंग या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. पुढे न्युयॉर्कमधील सॅत्ची अँड सॅत्ची या जाहिरात एजंसीमध्ये त्यांनी नोकरी पत्करली. पुढे थेट ‘मायक्रोसॉफ्ट’च्या डिजिटल अॅडव्हर्टायझिंग सोल्युशन्स ग्रुपमध्ये कारकीर्द गाजवली. इथे शरद लुणिया दोन वर्षे होते. आपले ज्ञान आपण आपल्या लोकांसाठी वापरू म्हणून भारतात परतण्याचे त्यांनी ठरवले. मातृभूमीच्या आठवणीही अस्वस्थ करतच होत्या. २००९ मध्ये आपले गृहनगर कोलकात्याला अखेर ते परतले. इथं त्यांनी याचवर्षी डिसेंबरमध्ये व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर releaseMyAd चा श्रीगणेशा केला.

‘रिलिजमायॲअॅड’ हे जाहिरातीचे एक ऑनलाइन व्यासपीठ… व्यावसायिक तसेच एखाद्याला वैयक्तिकरित्याही प्रसारमाध्यमांतून जाहिरात द्यावयाची असल्यास सहकार्य करणे हे या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, चित्रपटगृहे वा मासिके अगदी कुठेही जाहिरात द्यायची असल्यास हे काम सोपे, सहज, सुलभ, सचोटीने व मुख्य म्हणजे वाजवी दरात करून देणे असे सुरू झाले.

image


व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी व्यवसाय सुरू करण्यामागे शरद लुणिया यांचा सांस्कृतिक उद्देश होताच, तसेच त्याला ओघातच व्यावसायिकतेचाही बाज आला. वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा ‘मॅसेज’ स्वरूपात देण्याची संधी ‘रिलिजमायॲअॅड’द्वारे लुणिया यांनी उपलब्ध करून दिली.

शरद सांगतात, ‘‘आपण व्हॅलेंटाइन डेनिमित्त लोकांकडून वर्तमानपत्रासाठी मॅसेज स्वीकारावेत की नाही, याबाबत आम्ही सुरवातीला साशंक होतो. एकतीस वर्षांचे शरद बोलताना अत्यंत मनमोकळे असतात. ते आणि त्यांच्या टिमने फेसबुकच्या माध्यमातून चौदा दिवसांपर्यंत आपल्या या योजनेचे ‘प्रमोशन’ करायचे, असे ठरवलेले होते. चौदा दिवसांच्या या ‘प्रमो’शनवासानंतर त्यांना मोजून बारा ग्राहक मिळाले. अर्थातच योजनेचे बारा वाजलेले नव्हतेच. व्यवसायाची ही सुरवात सगळ्यांनी जोरदार साजरी केली.

शरद सांगतात, ‘‘पहिल्या ग्राहकाने जेव्हा पेमेंट केले तेव्हा ओसंडलेला आमचा तो आनंद मला अजूनही आठवतो. कुठलीही शँपेन फुटताना एवढे फेसाळली वा उसळली नसेल, जितके आम्ही सगळेच आनंदाने उसळलो होतो. खर्च वजा जाता उरलेली रक्कम काही फार मोठी नव्हती, पण हा नफा आम्ही सेलिब्रेट केला आणि सेलिब्रेशनवर तो सगळा खर्चही केला. एका पिझ्झा हटमध्ये आम्ही गेलो आणि या पैशांवर खूप धुम केली!’’

‘रिलिजमायॲड’चे कामकाज

‘रिलिजमायॲअॅड’ आपल्या ग्राहकांना २१२ वृत्तपत्रांच्या माध्यमातून सेवा देते. ‘रिलिजमायॲअॅड’च्या यादीतील वृत्तपत्रांची ही भलीमोठी संख्या उगीचच नाही. चोख व्यवहार व सचोटीच्या बळावरच मारुतीच्या शेपटासारखी ती लांबतच चाललीय. २७ रेडिओ स्टेशन्स, १९ मल्टिप्लेक्स शुंखला आणि सर्वच आघाडीच्या मासिकांतून रिलिजमायॲअॅडकडून ग्राहकांना जाहिरात सेवा उपलब्ध करून दिली जाते. शरद यांच्याकडे डिजिटल मिडियाची यादी मात्र नाही, कारण जाहिरातदाराने स्वत: अशा जाहिराती दिलेल्या बऱ्या, असे त्यांना वाटते. दुसरे म्हणजे पारंपरिक मिडिया हा डिजिटल मिडियापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. व्यापकता, पोहोच अशा सर्वच बाबतीत पारंपरिक मिडियाला तोड नाही.

‘केपीएमजी’च्या अहवालानुसार २०१४ या वर्षातला भारतभरातील जाहिरातीचा एकूण महसूल पाहिला तर तो ४१४ अब्ज रुपये एवढा आहे. त्यातला छापील माध्यम आणि दृकश्राव्य माध्यमाचा वाटा तब्बल ८० टक्के आहे.

‘रिलिजमायॲअॅड’कडून युजर्सना व्यवहाराची एक अशी जागा उपलब्ध करून दिली जाते जिथून युजर्स स्वत:च आपल्या स्वत:च्या बळावर संबंधित, अपेक्षित प्रसारमाध्यमाला जाहिरात देऊ शकतात. उदाहरणार्थ युजरला आपली एखादी मालमत्ता विकायची असेल आणि त्याबाबतची जाहिरात त्याला अमुक एका शहरात अमुक एका वर्तमानपत्रात द्यायची असेल तर तसे सगळे पर्याय इथे त्याला उपलब्ध होतात. वर्तमानपत्र निवडल्यानंतर त्याला जाहिरातीचे स्वरूप या कोष्टकांतर्गत ‘मालमत्ता’ निवडावी लागेल… नंतर जाहिरात त्या वर्तमानपत्राच्या कुठल्याकुठल्या आवृत्त्यांमध्ये प्रसारित करायची ते निवडावे लागेल. पेमेंट दिले, की त्याने निर्धास्त व्हावे, त्याचे काम झालेच समजा! कुठे जायची दगदग नाही एवढेच काय जागचे हलायचीही गरज नाही!

सध्या रिलिजमायॲअॅडकडून वैयक्तिक पातळीवर सेवा दिली जाते आहे, त्यासह वैधानिक आस्थापनांनाही सेवा दिल्या जात आहेत. नोटिसेस्, निविदा, मालमत्ता, रेशीमगाठी (वैवाहिक) अशा सगळ्याच स्वरूपाच्या जाहिराती यात आल्या. कंपनी कमिशन तत्वावर काम करते.

काळानुरूप रिलिजमायॲअॅडच्या कल्पना विकसित होत गेल्या. शरद सांगतात, ‘‘सुरवातीला डोक्यात मायक्रोसॉफ्टमधल्या अनुभवाचा फायदा इथं व्हावा हीच कल्पना होती. म्हणून मग मी संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारलेले ऑनलाइन अॅड प्लेटफॉर्म विकसित केले. जाहिरातदारांना ऑफलाइन मिडियात त्यांची जाहिरात सुलभपणे व सत्वर देता यावी म्हणून हे ऑनलाइन माध्यम मी वापरले, हे विशेष! दररोज नवनव्या कल्पना सुचत असतात आणि त्या प्रसंगानुसरूप व्यवहारातही आम्ही आणत असतो.’’

शरद यांच्या कल्पनाविश्वातून पुढे क्रमश: लघुउद्योजक आणि नवोदित युवा व्यावसायिकांसाठी सेवेची एक नवी वाट निर्माण झाली. या सगळ्या मंडळींना आपल्या मर्यादित बजेटमध्ये विश्वासाची जाहिरात एजंसी मिळणे, जेणेकरून प्रसारमाध्यमांतून आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचता यावे, जरा जिकिरीचेच असते. ‘रिलिजमायॲअॅड’ हे शरदाचं चांदणं या सगळ्यांनाच आपल्या लख्ख प्रकाशात मग वाट दाखवतं झालं!

कितीतरी लघुउद्योजकांना आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांना त्यांना अपेक्षित असलेल्या ग्राहकवर्गापर्यंत विविध मल्टी-मिडिया कंपन्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं व्रत रिलिजमाय ॲअॅडने पार पाडलेलं आहे.

ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

शरद असे एक उदाहरण समोर ठेवतात. ते म्हणतात, ‘‘पारंपरिक कलात्मक वस्तूंचे ऑनलाइन दालन ‘क्राफ्टस्-व्हिला’ने सुरवात केली तसे आमचे व्यासपीठ वापरले. जवळपास एक लाख रुपयांपर्यंतच्या मिळून जाहिराती विविध प्रसार माध्यमांतून दिल्या.’’

‘क्राफ्टस्-व्हिला’चे सीएमओ प्रतीक शाह याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, ‘‘हो आम्ही आमच्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात रिलिजमायअॅडची सेवा घेतली होती. शरद यांच्यासह एकूणच टिमने आम्हाला खूप मदत केली. आम्हाला व्यवसायाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल, असे सर्व प्रकारचे सहकार्य केले.’’

शरद सांगतात, ‘‘आमच्या मग हे लक्षात आले, की या सगळ्यांना आम्ही ज्या सवलती आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळवून देत आलो, त्या इतरांनाही आपण देऊ शकतो.’’ तेव्हापासून रिलिजमायॲअॅड इतर संपन्न ‘स्टार्टअप्स’समवेतही काम करू लागले. Peppertap, Swiggy, Housejoy, ZipGo, Doormint, TaskBob आणि LocalOye अशी ही यादीही मग वाढत गेली.

अनेक प्रकाशक आणि जाहिरात प्रतिनिधींशी चर्चा करून, किस पाडून जाहिरातीचे दर कसे कमीत कमी होतील, त्या दिशेने रिलिजमायॲअॅड चमूने आपले प्रयत्न सुरू केले. त्यात यशही येत गेले. जाहिरातदाराचे हित साधले जाईल, त्याचे दोन पैसे वाचतील, असे दर प्रकाशकांकडून ठरवून घेणे सुरू केले. रिलिजमायॲअॅडच्या सर्वच ग्राहकांना मग ऐतिहासिक म्हणावे इतपत अल्पदरात जाहिरातींचा लाभ मिळू लागला.

शरद सांगतात, ‘‘स्थानिक जाहिरात एजंसीज्‌प्रमाणे आमचा व्यवसाय काही वैयक्तिक हितसंबंधांवर, लागेबांध्यांवर आधारलेला नाही. जे काही आहे ते सगळे पारदर्शक आहे. स्पष्ट आहे. ज्याला धक्कास्टार्ट म्हणतात असा आमचा व्यवसाय नाही. उदाहरणार्थ एजंसी प्रकाशकांसोबत मनाला पटेल तसे रेट ठरवते आणि एखाद्या क्लायंटकडून वाटेल तसे आणि तेवढे कमिशन लाटते, असे आमचे काम नाही. सगळे ठरलेले असते आणि क्लायंटनिहाय त्यात कुठलाही भेद केला जात नाही.’’

आज रिलिजमायॲअॅड आपल्या क्षेत्रात प्रस्थापित असले तरी सुरवातीच्या काळातला प्रवास अनेक अडथळ्यांचा असाच होता. जाहिरात संकलन व्यवसायासाठी ऑनलाइनसारख्या नवख्या आणि वेगळ्या माध्यमाचा वापर करणे सोपी गोष्ट नव्हती. बहुतांश प्रसारमाध्यमांचे चालक-मालक इतर मंडळी जिथे पारंपरिक पद्धतीचे जाहिरात तंत्र वापरताहेत, तिथे हा ऑनलाइन पोर्टलचा नवा फंडा त्यांच्या गळी उतरवणे म्हणजे तारेवरली कसरतच होती. जाहिरात प्रतिनिधींची व्यक्तिश: भेट घेणे, जाहिरात एजंसीत स्वत: जाणे हे सगळे अंगवळणी पडलेल्या जाहिरातदारांनाही त्यांनी ऑनलाइन पोर्टलवरून जाहिराती द्याव्यात म्हणून तयार करणेही गंमत नव्हती. पण हे सगळे अधिक सोपे, अधिक पारदर्शक, अधिक छान आहे ही गोष्ट आपल्या उक्तीने आणि कृतीने ‘रिलिजमायॲअॅड’ची टिम सिद्ध करत गेली आणि गुंता सुटत गेला… खेळ जमत गेला!

शरद सांगतात, ‘‘खरा मध्यस्थ, उत्तम विश्वस्त’, असाच रिलिजमायॲअॅडचा चेहरामोहरा आम्ही तयार करत गेलो. तंत्राधारित सुलभ यंत्रणाही मदतीला होतीच. सगळ्या शंकांवर आम्ही मात करत गेलो आणि डंका वाजत गेला!’’

आलेख प्रगतीचा…

शरद यांचा दावा पाहिला, की रिलिजमायॲअॅड हे किती दमदार दालन आहे, ही गोष्ट लक्षात येते. आजअखेर रिलिजमायॲअॅडने २ लाख १९ हजार जाहिरातदारांना सेवा दिलेली आहे. २०१५ या आर्थिक वर्षात या प्रतिष्ठानाची वार्षिक उलाढाल तब्बल ३२ कोटींची राहिली… ३२ कोटी देवच या सेवासाधनेला प्रसन्न झाले म्हणा हवं तर! पुढले व्यवहार पाहता हा आकडा लवकरच ८० कोटींच्या पुढे जाईल, असे दिसते. कंपनी छान चाललेली आहे. शरद सांगतात, आता एक नवा आयाम म्हणून मला आपत्कालिन भांडवलातही लक्ष घालायचे आहे.

रिलिजमायॲडने नुकतेच बंगळुरूत आपले कार्यालय सुरू केलेले आहे.

शरद सांगतात, ‘‘देशातल्या प्रत्येक भागांत आम्हाला कार्यालय सुरू करायचे आहे. ऑनलाइन तर आम्ही आहोतच, पण तुमच्यासोबतही आहोत, हा आमच्या क्लायंटस्बद्दलचा सद्भाव याद्वारे आम्हाला त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवायचाय. लवकरच आम्ही अनेक प्रादेशिक कार्यालये सुरू करणार आहोत.’’

लेखक : सिंधू कश्यप

अनुवाद : चंद्रकांत यादव