कलाकारांना समृध्द करणारी मराठी रंगभूमी

 ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.यानिमित्ताने विशेष लेख....

0

रंगभूमी म्हणजे कलाकारांसाठी पूजास्थान. रंगभूमीची पूजा करूनच कलाकार आपल्या कारकीर्दीला सुरुवात करतो. नाटकाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. कलाकारांच्या कौशल्याला पैलू पाडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रंगभूमीच्या माध्यमातूनच होत असते. 5 नोव्हेंबरला ‘मराठी रंगभूमी दिन’ हा मोठय़ा थाटामाटात साजरा करण्यात येतो.

नाटक हे महाराष्ट्रातील कित्येक पिढयांचे व्यक्त होण्याचे माध्यम राहिले आहे. महाराष्ट्र कित्येक पिढयांपासून या नाटकांवर जगत आला आहे. त्यामुळे नाटक हा महाराष्ट्राचा जीव की प्राण असेच म्हणावे लागेल. रंगभूमी हा महाराष्ट्राच्या जीवनातील एक अविभाज्य घटक. मराठी माणूस नाटकाशिवाय जगू शकत नाही. नाटक हे मराठी कलाकरांचे जगण्याचे साधनच. पूर्वी एक काळ होता जेव्हा नाटकात काम करणे खालच्या दर्जाचे मानले जायचे. त्यानंतर परिस्थिती सुधारली. सुशिक्षित माणसे या क्षेत्रात उतरली. त्यानंतर या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर मराठी रंगभूमीचा अश्व चौफेर धावू लागला असेच म्हणावे लागेल.मराठी माणूस हा तर जात्याच कलाप्रेमी, पण रंगभूमीवर त्याने जास्त प्रेम केलं. संगीत नाटकांपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत सर्व स्थित्यंतर त्याने स्वीकारली. आणि जे-जे चांगले, त्याला मनापासून दाद दिली. त्यामुळे आपले रंगभूमीशी ऋणानुबंध फार जुने आहेत. रंगभूमी म्हणजे कलाकारांसाठी पूजास्थान. रंगभूमीची पूजा करूनच कलाकार आपल्या कारकीर्दीला सुरुवात करतो. नाटकाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. कलाकारांच्या कौशल्याला पैलू पाडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रंगभूमीच्या माध्यमातूनच होत असते.

मराठी रंगभूमीचा इतिहास बघायचा झाला तर मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले.नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले...

साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. आज अनेक नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले. महाराष्ट्राला १७० वर्षाची ही रंगभूमीची परंपरा आहे. महाराष्ट्र नाटयसंस्कृती विषय व प्रकारांच्या बाबतीत फार श्रीमंत आहे. संगीत नाटकांचा सुवर्णकाळ महाराष्ट्राने पहिला आहे. त्याकाळी रात्र रात्रभर संगीत नाटके चालत आणि लोक ती पाहत, त्यांचा आस्वाद घेत. बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर आदींनी त्यावेळी संगीत नाटकांची रंगभूमी गाजवली आहे. हळूहळू संगीत नाटकांचा काळ ओसरला. तीन अंकी नाटके दोन अंकी झाली आणि अडीच तासांमध्ये होऊ लागली. व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांचा प्रवेश मराठी रंगभूमीवर झाला. डॉ. काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले असे अनेक ताकदीचे नट आणि विजय मेहता, लालन सारंग, रीमा लागू, सई परांजपे, रोहिणी हट्टंगडी अशा अनेक स्त्रियांनी आपला ठसा रंगभूमीवर उमटवला आहे. आताचे नवीन कलाकारांच्या अभिनयामुळे आजही मराठी प्रेक्षकांची नाटकांना होणारी गर्दी तितकीच आहे.नाटकांबरोबर विविध चळवळी सुद्धा रंगमंचावर सातत्याने होत आहेत. आविष्कार, ललित कला केंद्र, बालनाटय चळवळी, पृथ्वी थिएटर्स यांसारख्या उपक्रमांनी सातत्याने मराठी रंगभूमीला समृद्ध केले आहे, उत्तम कलाकार प्रदान केले आहेत. मराठी नाटक या अर्थाने फार श्रीमंत आहेच.याचबरोबर सुयोग, अथर्व, भद्रकाली, चतुरंग अशी अनेक नाटय निर्माते मंडळी मराठी रंगभूमीवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. विविध चांगले विषय रंगभूमीवर सातत्याने येत आहेत.एकंदरीत मराठी रंगभूमीला आर्थिक बळही प्राप्त झाले आहे. आज नाटकापासून सुरुवात केलेले कित्येक कलाकार हे चित्रपट, जाहिराती, टीव्ही मालिका इत्यादी क्षेत्रांतही काम करीत आहेत. असे असले तरी कित्येक कलाकारांनी आजही मराठी रंगभूमीला दूर केलेले नाही. त्यामुळे मराठी रंगभूमी पुन्हा एकदा आपल्या सुवर्णकाळाकडे जाण्यास सज्ज आहे. आज नाटक हे फक्त प्रत्यक्ष रंगभूमीसाठीवरच सादर करायचे असे काही नाही, तर आपल्याकडे आकाशवाणी व दूरदर्शनसाठी देखील नाटके, एकांकिका आदी बसवल्या जातात. तिथेही अनेक कलावंत काम करीत आहेत.

व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ हा शब्द आणि मराठीत आपण रंगभूमी हा समानार्थी शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाटय़संहिता, नाटय़दिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सार्या गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार मानला जातो. प्रतिभावंत नाटककार व दिग्दर्शक, कल्पक तंत्रज्ञ, आधुनिक तांत्रिक-यांत्रिक सुविधा, सुजाण अभिरुचिसंपन्न रंगभूमीवरील वरील वेगवेगळे प्रकार वा रूपे उदयास आली, असे म्हणता येईल. नाटय़प्रयोग व त्याचा प्रेक्षक यांच्या परस्पर संबंधांविषयीच्या वैशिष्टय़पूर्ण संकल्पनाही प्रयोगशील रंगकलेमागे दिसून येतात. अलीकडे तर पथनाटय़े होऊ लागली आहेत आणि त्यांच्या रूपाने रंगकला जशी बंदिस्त रंगमंदिरातून बाहेर पडली, तशीच ती विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकविषयक कल्पनांतूनही बाहेर पडली आहे. रंगभूमीचे हे प्रकार किंवा प्रयोग हे अखंडपणे होत राहतील अशीच आशा आहे. यापुढेही मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटके, नाटकांमधील प्रयोगशीलता आणि नाटकांचे विविध प्रकार हाताळले जातील हे नक्की...

लेखिका - वर्षा फडके