‘मनरेगा’ मध्ये मजुरी व अभ्यास करुन ४६ गरीब आणि अनाथ मुलांचे शिक्षक बनून उचलली जबाबदारी

0

या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे पळत आहे. आपल्याला जीवनात सगळे ऐहिक सुख मिळावे हीच प्रत्येकाची मनोकामना असते. चांगले घर, गाडी, नोकर-चाकर, जमीन-जुमला याचे दावेदार काहीजण असतात पण काही या शर्यतीत मागे पडतात. परंतु काही तिसऱ्या प्रकारचे लोक स्वतःला या शर्यतीपासून वेगळे ठेवतात व स्वतःसाठी एक वेगळी स्पर्धा आयोजित करतात ज्यात ते पळणारेही एकटेच असतात आणि त्यांचे ध्येय सुद्धा सुनिश्चित असते. ही शर्यत त्यांच्या यशासाठी नसून यश अपयशाचे मोजमाप हा विषय इतरांशी जोडलेला असतो. अशोकभाई चौधरी हे असेच व्यक्तिमत्व आहे. महात्मा गांधी यांना आपली प्रेरणा मानणारे अशोकभाई अशाच मुलांच्या शोधात आहेत जे अनाथ आहेत. अशोकभाई एक चांगली नोकरी करून आरामात आपले आयुष्य जगू शकले असते पण त्यांनी गरीब आणि अशिक्षित मुलांच्या पालनपोषणाचा निर्णय घेतला. अशोकभाई चौधरी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील करुठा गावात राहणाऱ्या ४६ मुलामुलींना शिक्षित करून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे. ज्या मुलांचे पालक आपल्या मुलांना शिकवण्यास सक्षम नाही अशा मुलांची पण ते काळजी घेतात. अशोकभाई हे कार्य लोकांच्या मदतीने मागील पाच वर्षापासून करीत आहेत.


अशोकभाई हे मागासवर्गीय समाजाचे आहेत. त्यांना जाणवले की त्यांच्या आजूबाजूला अशिक्षित मुले आणि प्रौढांची संख्या खूप आहे. त्यांच्या गावातील इतर मुले रस्त्यावर उनाडक्या करण्यात वेळ वाया घालवितात. त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला की ते स्वतः शिकून दुसऱ्यांना पण शिकवण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. शाळेपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या अशोकभाई यांना शाळेच्या दिवसात शिष्यवृत्ती मिळायची म्हणून शिक्षणात कधी त्यांना अडचण आली नाही. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर अशोकभाई यांनी सुरत जिल्यातील मांडवी भागातल्या एका कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. कॉलेजचा अभ्यास करत असतांना त्यांनी मनरेगा योजनेंतर्गत मजुरी केली.


अशोकभाई युवर स्टोरी ला सांगतात, ‘मजुरी करून जो पैसा मिळत असे त्याची मी बचत करीत असे. जेव्हा कॉलेजचा अभ्यास पूर्ण झाला तेव्हा याच पैशाचा उपयोग पुढच्या अभ्यासासाठी केला.’

अशोकभाई यांनी कॉलेजच्या अभ्यासक्रमानंतर अहमदाबादला जावून गुजरात विद्यापीठात एमए च्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासादरम्यान अशोकभाईंना महात्मा गांधींच्या संदर्भातील अनेक पुस्तके वाचण्याची संधी मिळाली ज्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशोकभाई हे एका चांगल्या शाळेत मुलांना शिकवू शकले असते पण त्यांनी निर्णय घेतला की आपल्या गावाला परत जावून तिथे अशा मुलांचे पालनपोषण करतील जे अनाथ व गरीब आहेत.


जेव्हा अशोकभाई अहमदाबाद्वरून परतले तेव्हा त्यांनी १७ मुलांना आपल्या बरोबर घेतले. पण प्रारंभिक गरज होती ती त्यांच्या निवाऱ्याची. अशोकभाई या मुलांना प्रथम करूठा गावात घेऊन आले. गावकऱ्यांना जेव्हा कळले की अशोकभाई या अनाथ मुलांचे पालन पोषण करतात तेव्हा त्यांना एका सामुदायिक भवनाच्या बाहेर राहण्याची परवानगी दिली. अशोकभाई सांगतात की, ‘पहिल्या रात्रीच आमचे सामान चोरीला गेले. या सामानात आमचे कपडे, भांडे आणि पांघरूने होती. पण तरीही आम्ही गावकऱ्यांना याची कोणतीही तक्रार केली नाही कारण या गोष्टींनी आम्हाला आमच्या उद्देशापासून दूर केले असते म्हणून नव्या उमेदीने आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एकजूट झालो’.


एकीकडे १७ अनाथ मुले तर दुसरीकडे अतिशय बिकट परिस्थिती त्यामुळे मुलांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना अनेक वेळा भिक मागावी लागली. तरीही आपल्या हिंमतीने मुलांच्या पालनपोषणाच्या निर्णयाशी ते ठाम राहिले तर दुसरीकडे गावकऱ्यांना या मुलांच्या प्रती अशोकभाईंची इतकी मेहनत आणि प्रेमभाव बघून त्यांना त्यांच्या मुलांसमवेत सामुदायिक भवनात राहण्याची परवानगी दिली. त्यानंतर एक वर्षाने गावातील एका शेतकऱ्याने आपली जमीन त्यांना राहण्यास देवू केली. जेव्हा हळूहळू त्यांच्या कामाचा प्रचार झाला तेव्हा अहमदाबादहून पण अनेक लोक त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या निवासाची पण सोय केली. अशोकभाई यांनी त्यांच्या मुलांचे मनोधैर्य वाढवून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर त्यांनी करूठा गावाहून पाच किलोमीटर दूर पिपळवाडा गावातील एका सरकारी शाळेत मुलांच्या प्रवेशाची सोय केली. अशोकभाईंनी मुलांच्या या जागेला ‘आनंद वन कन्या वसतिगृह’ असे नाव दिले आहे. आज त्यांच्याजवळ ४६ मुले राहतात ज्यात २८ मुले आणि १८ मुली सामील आहेत. या सगळ्या मुलांचे वय ९ ते १४ वर्ष आहे. अशोकभाई मुलांना अभ्यासाबरोबरच चांगले संस्कार पण देतात जेणेकरून उद्या ती मुले समाज आणि देशाचे नाव उज्ज्वल करू शकतील.

शालेय अभ्यासानंतर जेव्हा ही मुले परत येतात तेव्हा अशोकभाई या मुलांची परीक्षा घेऊन राहिलेल्या उणीवा भरून काढतात. तसेच या मुलांना संगीत कलेचे ज्ञान पण देतात. लोकांच्या मदतीने त्यांनी आपल्या वसतिगृहात संगणकाची व्यवस्था पण केली आहे. ते मुलांना अभ्यासाबरोबर तांत्रिक ज्ञानासाठी संगणक प्रशिक्षण पण देतात. तसेच मुलांच्या जेवणाची व्यवस्था त्यांची पत्नी सांभाळते. अशोकभाईंची इच्छा आहे की, गावातच जवळपास शाळा सुरु व्हावी म्हणजे मुलांना लांब पायपीट करावी लागणार नाही आणि भविष्यात ही मुले आपल्या पायावर खंबीरपणे उभी राहू शकतील.  

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे