‘वाय सेंटर’: भारतीय उद्योजक तरूणाच्या ‘धैर्य’ आणि परिश्रमाचे फळ.

‘वाय सेंटर’: भारतीय उद्योजक तरूणाच्या ‘धैर्य’ आणि परिश्रमाचे फळ.

Thursday October 22, 2015,

6 min Read

परिश्रम आणि आवड हे असे दोन शब्द आहेत जे व्यक्तीला एका नव्या उंचीवर घेऊन जावू शकतात. परिश्रम आणि आवडीच्या जोरावर आपल्या प्रगतीच्या मार्गात येणा-या प्रत्येक अडचणींना दूर सारून माणूस पुढे जाऊ शकतो. हे गूण असतील तर मग कोणतीही गोष्ट त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकत नाही. याचे नेमके उदाहरण द्यायचे झाले, तर ते धैर्य पुजारा या २५ वर्षीय तरूणाचे देता येईल. उत्साह आणि आवड असलेले धैर्य पुजारा इतक्या कमी वयात परिश्रम आणि आवडीच्या जोरावर एक यशस्वी उद्योजक बनले. आपले स्वप्न साकार करण्यासाठी धैर्य पुजारा यांनी अमेरिकेतील आपली नोकरी सोडून दिली आणि आपले लक्ष गाठण्यासाठी जीवतोड मेहनत केली. आपले स्वप्न प्रत्यक्ष साकार झालेले त्यांनी पाहिले आणि त्यानंतरच त्यांनी मोकळा श्वास घेतला.

image


मुंबईत जन्मलेल्या धैर्य पुजारा यांनी आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. ही कंपनी जुनी पुस्तके विकण्याचे काम करत असे. नव्या उद्योजकांना प्रमोट करण्याच्या उद्देशाने २००९ मध्ये इकॉनॉमिक्स टाईम्सने पॉवर ऑफ आयडियाज’ या नावाचा एक कार्यक्रम सुरू केला होता. धैर्य पुजारा यांच्या कंपनीची या कार्यक्रमाअंतर्गत निवड करण्यात आली होती. एका १९ वर्षीय उद्योजकासाठी ही खूपच मोठी गोष्ट होती. परंतु त्यांचे इतर सहकारी परदेशात गेल्यामुळे त्यांना ही कंपनी बंद करावी लागली.

image


या कंपनीद्वारे मिळालेला अनुभव त्यांना पूढे खूपच उपयोगी पडला. कारण आपण काय करू नये हे मागच्या अनुभावने त्यांना शिकवले होते. आपण ९-५ ची नोकरी करण्यासाठी जन्माला आलेलो नाही आणि अशा स्वरूपाची नोकरी आपण करू शकणार नाही याची जाणीव धैर्य पुजारा यांना खूपच आधी झालेली होती. यामुळे काहीतरी नवे करावे असे त्यांना सारखे वाटत होते. आपण केलेल्या कामाचा समाजात सकारात्मक परिणाम दिसावा आणि लोकांनी त्यापासून काही प्रेरणा घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. मला नोकरी करायची नाही, तर इतरांना नोकरी द्यायची आहे असे ते लहानपणापासून आपल्या वडिलांना नेहमी सांगत आले आहेत.

२०१० मध्ये धैर्य इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी बायोमेडिकल हा विषय निवडला. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर जेव्हा त्यांना नोकरी मिळाली तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना खूप आनंद झाला. परंतु धैर्य यांच्या मनात काही वेगळेच चालले होते. नोकरीला लागल्यानंतर ते जेव्हा पहिल्याच दिवशी ऑफीसला गेले तेव्हाच त्यांनी आपण उद्यापासून कामावर यायचे नाही असा निर्णय घेऊन टाकला. हा निर्णय खूपच मोठा होता. या निर्णयामुळे त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होऊ शकत होता. पहिली-वहिली नोकरी पहिल्याच दिवशी सोडणे हा निर्णय तर मोठाच होता, परंतु धैर्य यांनी आपल्या मनाशी पक्के ठरवले होते आणि म्हणून त्यांनी राजीनामा देऊन टाकला सुद्धा. त्यानंतर त्यांनी आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या मदतीने एक कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांसाठी त्यांना एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्याचा होता. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे त्यांना वाटत होते आणि सुरूवातीला या कार्यक्रमासाठी ते त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेणार नाहीत, त्यांना केवळ काम करायचे आहे असे त्यांनी कुलगुरूंना सांगितले. दरम्यानच्या काळात ते अनेक गुंतवणूकदारांना भेटले आणि त्यांना आपल्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यांच्या कार्य करण्याच्या क्षमतेबाबत शंका सुद्धा घेण्यात आल्या. धैर्य पुजारा हे केवळ २४ वर्षांचे आहेत आणि असे असताना ते खासगी महाविद्यालयांसाठी एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत आहेत याचे गुंतवणूकदारांना आश्चर्य वाटत होते. शिवाय या कामाचा त्यांना अनुभव नाही आणि ज्या देशातील विद्यार्थ्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे त्या आफ्रिका देशातही ते कधी गेलेले नाहीत अशा प्रकारच्या शंका अशाच एका बैठकीत एका गुंतवणूकदाराने त्यांच्या समोर उपस्थित केल्या. अशा प्रश्नांमुळे धैर्य पुजारा विचारात पडले. या प्रश्नांची कोणतीही योग्य उत्तरे धैर्य यांच्याकडे नव्हती. यानंतर धैर्य यांनी आफ्रिकेतील मोझांबिकला जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा ते स्वत: तिथे जाऊन काम करू इच्छित होते. तो पर्यंत त्यांनी हा कार्यक्रम सुरू सुद्धा केला होता.

image


मोझांबिकमध्ये ते जवळजवळ ६ महिने राहिले. या सहा महिन्यात ते पुष्कळ काही शिकले. मोझांबिकमधील नागरिकांना इंग्रजी भाषा सुद्धा येत नव्हती. यामुळे त्यांना खूपच अडचणी आल्या. आफ्रिका महाद्वीपात राहणा-या लोकांचे जीवन तितके सोपे नव्हते. तिथे गरीबी होती, साक्षरतेचे प्रमाण कमी होते. लोकांना तंत्रज्ञानाची सुद्धा विशेष माहिती नव्हती. तेथील लोकांमध्ये मिसळता यावे म्हणून धैर्य त्यांची भाषा शिकले. सुरुवातीचे ५ महिने त्यांनी एका ग्रामीण रूग्णालयात बायोमेडिकल इंजिनिअर म्हणून काम केले.

तेथील लोक वैद्यकीय उपकरणांचा उपयोग करत नसत. धैर्य यांनी त्या लोकांना वैद्यकीय उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. हळू हळू ते लोक त्यांना ओळखू लागले. अमेरिकेत शिकून आलेला एक भारतीय तरूण लोकांना मदत करत आहे अशी बातमी तिथे पसरू लागली.

त्यानंतर लोक त्यांना फोन करू लागले आणि आपल्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना दुरूस्त करायला सांगू लागले. अशा प्रकारे त्यांनी स्वत:ला त्या वातावरणाशी लवकरच जुळवून घेतले.

धैर्य यांनी आपले काम इतकेच मर्यादित स्वरूपाचे ठेवले नाही. त्यांनी मोझाम्बिकमध्ये पहिली ‘ट्रेड एक्स कॉन्फरन्स’ आयोजित केली. गुंतवणूकदार आणि संशोधक यांना एकत्र आणणे हा या परिषदेचा उद्देश होता.

image


धैर्य आफ्रिकेतून पुन्हा अमेरिकेला परते पर्यंत विद्यापीठाने तो कार्यक्रम बंद सुद्धा केला होता. आणि इथूनच धैर्य यांच्या ‘वाय सेंटर’ची आणि आपल्या उद्योकजकतेच्या करिअरची सुरूवात झाली. हा कार्यक्रम केवळ कागदावरच न राहता तो वास्तवात उतरावा आणि सर्वांची जबाबदारी निश्चित व्हावी असे धैर्य यांनी सर्वप्रथम ठरवले. ‘वाय सेंटर’ विद्यार्थांना परदेशात घेऊन जात असे आणि तेथील लोकांना फायदा होईल अशा प्रकारचे सामाजिक काम त्यांच्याकडून करवून घेत असे. यातून विद्यार्थ्यांनाही शिकायला मिळायचे.

२०१४ मध्ये अमेरिकेतील फिलाडेलफियामध्ये एका छोट्या टीमसोबत धैर्य यांनी “वाय सेंटर”ची नोंदणी केली. सध्या ‘वाय सेंटर’ ही एक अमेरिकन कंपनी आहे. पीएचडी आणि तत्सम पदवी नसल्याकारणाने धैर्य यांना अनेक अडचणी येत असत. एखादे महाविद्यालय किंवा विद्यापीठ त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्याचे सौजन्य देखील दाखवत नव्हते. परंतु हळूहळू ते पुढे जात राहिले. त्यांनी प्रयत्न करून आपल्या सोबत त्यांनी चांगल्या टीमची बांधणी केली. त्यांच्या टीममध्ये संस्थापक संचालकांच्या स्वरूपात प्राध्यापक मायकल ग्रेलसर यांचा समावेश आहे, तर आदित्य ब्रह्मभट्ट हे कार्यक्रम संचालक म्हणून काम पाहत आहेत.

एक सुरूवात ही नेहमीच दुस-या मोठ्या कार्याचा पाया रचत असते. आणि धैर्य यांच्याबाबतीत हेच झाले. ते पेंसिल्वेनिया विद्यापीठ आणि ड्रेक्सिलच्या बोर्डावर आले. त्याच्या कार्यक्रमाला डॉगुर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना ३० हजार डॉलर्स बक्षिसाच्या स्वरूपात प्राप्त झाले.

वाय सेंटर सुरू केल्यानंतर त्यांना पुन्हा मोझाम्बिकला जायचे आहे आणि तिथे मलेरियाच्या विरूद्ध एक लढाई लढायची आहे याची धैर्य यांना जाणीव होती. त्यांनी तिथे रूग्णांसाठी एक मोबाईल एसएमएस अॅप बनवले. आंतरराष्ट्रीय अनुदानामुळे रूग्णांना मोफत उपचार तर मिळत होते, परंतु त्यांना रूग्णालयांपर्यत घेऊन यणे खूपच कठीण काम होते. याचे कारण म्हणजे आरोग्य केंद्रं घरापासून अतिशय दूर असल्यामुळे, तसेच लोकांमध्ये निरक्षरता असल्यामुळे रूग्ण आपल्या घरातच उपचार करणे योग्य समजत असत. यामुळे अनेकदा हे आजार गंभीर स्वरूप धारण करत असत. जी गोष्ट लोकांसाठी उपलब्ध आहे त्या गोष्टीचा लोकांनी उपयोग करावा यासाठी त्यांची मदत केली पाहिजे असे धैर्य यांना वाटत होते.

मोझाम्बिकच्या लोकांकडे नेहमीच मोबाईल फोन आणि कोकाकोलाचे कॅन्स असतात अशी माहिती कुणीतरी धैर्य यांना दिली. याशिवाय तेथील लोकांची ईश्वरावर खूप श्रद्धा असते अशी माहीतीही धैर्य यांना मिळाली. त्या लोकांकडे मोबाईल असल्याने त्यांच्यासाठी धैर्य यांनी एक अॅप तयार केले होते. आपली तब्येत बिघडली तर या अॅपद्वारे लोक एक मेसेज पाठवत असत. हा मेसेज जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये फ्लॅश होत असे. त्यानंतर मग आरोग्य केंद्र आपली टीम त्या रूग्णाचा इलाज करण्यासाठी त्याच्या घरी रवाना करत असे. आपल्या आईच्या माध्यमातून बाळाला होणारा एचआयव्हीचा धोकाही मोझाम्बिकमध्ये खूपच जास्त होता. या अॅपच्या माध्यमातून इतर कुणालाही न कळता गुप्तपणे या महिला डॉक्टरांशी संपर्क साधून आपला इलाज करून घेऊ शकत होत्या.

'वाय सेंटर' आज मोझाम्बिक सरकारसोबत काम करत आहे, तर अमेरिकेतील चार विद्यापीठांतील विद्यार्थी वाय सेंटर आणि मोझाम्बिक सरकारच्या संयुक्त कार्यक्रमाअंतर्गत काम काम करत आहेत. धैर्य यांना मिळालेल्या यशामुळे त्यांना विविध व्यासपीठांवर बोलावले जाऊ लागले आहे. लोकही त्यांच्याकडून एक यशस्वी सामाजिक उद्योजक बनण्याचे गूण शिकत आहेत.