विदर्भ- मराठवाड्यातील दुग्धउत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी सामंजस्य करार

विदर्भ-मराठवाड्यातील २  हजार गावातील शेतकऱ्यांना फायदा...६० हजार ग्रामीण कुटुंबांना उपजिवीकेचे साधन मिळणार....विदर्भ- मराठवाड्यातील दुधाळ जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न....राज्य शासन व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल कंपनीशी करार

0

विदर्भ व मराठवाडा येथील दुध उत्पादन वाढीसाठी तसेच त्या भागातील उत्पादित दुध संकलित करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रा. लि. या कंपनीशी करार करण्यात आला आहे. यामुळे या भागातील दोन हजार गावांतील शेतक-यांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकार व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रा.लि. कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्यव्यवसाय विकास विभागाचे मंत्री महादेव जानकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्यव्यवसाय विकास विभागाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्यव्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे चेअरमन दिलीप रथ, दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आर.जी.कुलकर्णी, मदर डेअरीचे कार्यकारी संचालक एस.नागराजन, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर येथील दुग्ध व्यवसाय आयुक्तांच्या अखत्यारीतील 21.86 एकर जमिनीपैकी 9.88 एकर जमीन त्यावरील दुग्ध शाळेची इमारत, गुदाम, बॉयलर, दुध भुकटी प्रकल्प, ट्रक टर्मिनल तसेच यंत्र सामग्री 30 वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्वावर ‘मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल’ कंपनीला देण्यात येत आहे. या सामंजस्य करारामुळे विदर्भ व मराठवाड्यातील दोन हजार गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, तसेच 60 हजार ग्रामीण कुटुंबांना उपजिवीकेचे साधन मिळणार आहे. विदर्भ- मराठवाड्यातील दुधाळ जनावरांच्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत दुग्ध व्यवसाय विकास कार्यक्रम राबविणार असल्याचे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

या सामंजस्य करारावर राज्य शासनातर्फे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रा.लि. कंपनीचे कार्यकारी संचालक एस.नागराजन यांनी स्वाक्षरी केल्या.