ग्रामीण युवकांच्या भविष्यासाठी ‘बोधी वृक्ष’ लावणारी अश्विता शेट्टी

0

‘‘तमिळनाडूतल्या तिरुनेलवेली जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात माझे बालपण गेले. खेड्यातल्या बालपणाचे तोटेच असतात का? बरेच फायदेही असतात. मातीत खेळणे, दगड मारून पेरू पाडणे, चिंचा तोडणे आणि शालीचं, उपरण्याचं जाळं करून मासळ्या पकडणे असे इथल्या माझ्या दंगामस्तीचे अनेक प्रकार होते. लहान होते तोपर्यंत हे सारे मजेत चाललेले होते. जशी मी जरा मोठे झाले माझ्यावर बंधने आली. घरातूनही आली आणि दारातूनही. पुरुषप्रधान व्यवस्था तशीही गावाकडे जरा जास्तच बळकट आहे. पुढे गावात मी एखाद्या पुरुषाशी कधी बोलल्याचेही मला आठवत नाही. घरातही आपल्याहून मोठ्यांसमोर आपले मत व्यक्त करायला मी कचरत असेच, बोलण्याचेही माझे धाडस होईना.’’ अश्विता शेट्टी सांगत होत्या.

योगायोगाने १३ वर्षांच्या असताना हेलन केलर यांचे आत्मचरित्र अश्विता यांच्या वाचण्यात आले. अश्विता म्हणतात, ‘‘या पुस्तकानेच माझ्यासाठी परिवर्तनाची निर्णायक वाट खुली केली.’’

‘‘जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती तुझ्यातच… तुझ्याच आत दडलेली आहे. कुठेही अन्यत्र ती नाही. तू स्वत:चाच शोध घे’’, अशी एक साद जणू मग अंतर्मनातून अश्विता यांना ऐकायला आली. अश्विता यांनी ती ऐकली.

अश्विता यांना अभ्यासात अगदी सुरवातीपासूनच गती होती. शिक्षणाला त्या आपले अभिन्न अंग मानत असत. वर्गमित्रांना आणि शेजाऱ्यापाजारच्या मुलांना अभ्यासात त्या मदत करत. पुढे मुलांसाठी शिकवणीही सुरू केली. १५-२० मुले येत. अश्विता यांचे शिकवणे सुंदरच होते. मुलांची संख्या वाढत गेली तसा अश्विता यांचा आत्मविश्वासही वाढत गेला.

अश्विता यांचे आई-वडील विडी कामगार. रात्रंदिवस विड्या वळूनही कशीबशी दोन वेळची चूल पेटेल, इतकाच पैसा यातून मिळे.

‘‘माझे आई-वडील निरक्षर आहेत. शिक्षण तसेच शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लेखी काहीही नाही. पुढल्या इयत्तेत जाताना दरवेळेस मला त्यांना विनवावे लागे. त्यांचा होकार मिळवताना नाकीनऊ येत. अर्थात परिस्थितीही प्रतिकूल होती, पण शेवटी ते मला समजून घेत. स्वत:पेक्षाही मला जास्त जपणारे आई-वडील मला मिळाले म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजते. आता तर त्यांनाही माझ्या वाटा, माझी दिशा आणि माझे ध्येय चांगल्याप्रकारे कळू लागलेले आहे.’’

कॉलेज आणि स्वप्ने

शाळेतही आणि कॉलेजातही इंग्रजी या विषयात अश्विता यथातथाच होत्या. आपली ही मर्यादा स्वीकारताना त्यांना जराही अडचण जाणवत नाही. त्या म्हणतात, ‘‘तिरुनेलवेलीतून बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट विद्याशाखेत मला सुवर्णपदक मिळाले. अभ्यासक्रमाबद्दल म्हणाल तर ज्ञानाच्या पातळीवर मी फारसे काही मिळवलेले आहे, असा माझा दावा नाही. वरून सर्वच अभ्यासक्रम इंग्रजीतून. माझे पाठांतर फार उत्तम आहे आणि माझे अक्षर तसेच लेखनशैलीही छान आहे, या बळावरच मला हे यश मिळालेले.’’

गावापलीकडच्या जगाची अश्विताला कमालीची ओढ होती. आपण एका मोठ्या कॉलेजात शिकतो आहोत. शिकवायला मोठमोठे प्रोफेसर आहेत, अशी स्वप्ने ती हायस्कूलला असताना रंगवत असे. आईला ती नेहमी म्हणे, ‘‘एक दिवस मी कॉलेजात जाईन म्हणजे जाईन.’’ ‘‘आधी दहावी तर होऊन जाऊ दे’’, अशी आईची प्रतिक्रिया असे. अश्विता म्हणतात, ‘‘मला हतोत्साहित करणे, हा अर्थातच आईचा उद्देश नसे. पण मी मुलगी असल्याने तिला वाटायचे, की हे माझ्यासाठी एवढे सोपे नाही. दिल्ली माझ्यासाठी फार दूर आहे.’’

पदवीचे अंतिम वर्ष आटोपल्यावर एका तमिळ नियतकालिकातून ‘यंग इंडिया फेलोशिप’संदर्भातली माहिती अश्विताच्या वाचण्यात आली. नंतर मग नियतीच जणू तिच्यासाठी कामाला लागली. तिची स्वप्नपूर्ती हे जणू नियतीचेही ध्येय बनले. एका ग्रंथपालाने ईमेल आयडी तयार करून दिला. अर्जासाठी एकाची मदत झाली. टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठी हवा म्हणून एका मित्राने फोनही तिला देऊन टाकला. अंतिम फेरी दिल्लीला होती. भाड्याला पैसे नव्हते. अशात इंटरव्हयू बोर्डने स्काईप इंटरव्ह्यूची सोय लगतच्याच शहरात उपलब्ध करून दिली.

परिवर्तनाचा क्षण

टेलिफोनिक इंटरव्ह्यूदरम्यान अश्विताने २० व्या वर्षी आयुष्यात पहिल्यांदा इंग्रजीतून संभाषण केले. अश्विताची निवड झाली. दिल्ली आता जवळ आलेली होती. अश्विता दिल्लीला रवाना झाल्या. पुढे वाढून ठेवलेल्या प्रसंगांसाठी अश्विता अद्याप स्वत:ला तयार करू शकलेल्या नव्हत्या. त्या सांगतात, ‘‘सुरवातीला तर मी न्युनगंडाने अगदी पछाडलेले होते. पहिल्यांदा जेव्हा शहराचा सामना मी केला होता तेव्हाही मी भांबावलेलेच होते. अमेरिकन शैलीत इंग्रजी बोलणारे प्राध्यापक तर माझ्यासाठी मोठी अडचण होते. ते काय बोलताहेत, हे मला बरेच कमी समजत असे. शिवाय मी स्वत:ही माझे मत, माझ्या भावना इंग्रजीतून नेमकेपणाने मांडू शकत नसे.’’ पण हिंमत न हरण्याची उपजत वृत्ती असलेल्या अश्विताने पुढे इंग्रजीवर खुप कष्ट उपसले. इंग्रजीत त्या पारंगत झाल्या. इतक्या, की इंग्रज लाजावेत. फेलोशिपने त्यांना अशा नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या.

‘‘फेलोशिपमधून मी काही शिकले असेन तर ते म्हणजे आपल्या देशातली विविधता मी अगदी मनापासून स्वीकारली. लोक कुठल्याही सांस्कृतिक वळणाचे असतो त्यांचा मान ठेवायला मी शिकले. इंग्रजीतून अस्खलित बोलणे, धाराप्रवाही लिहिणेही मी यातूनच शिकले. माझ्या सहकाऱ्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. सहकाऱ्यांशी मित्रवत नाते जोडण्यात मलाही यश मिळाले.’’

संधीने दार ठोठावले

फेलोशिप यशस्वीपणे पार पाडल्यानंतर अश्विता ‘कम्युनिटी एंगेजमेंट मॅनेजर’ म्हणून ‘एसव्ही हेल्थकेअर’ या सामाजिक क्षेत्राशी निगडित उद्योगाशी संलग्न झाल्या. ग्रामीण भागात आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात एसव्ही हेल्थकेअर सक्रिय आहे. अश्विता यांनी नोकरीतील आपल्या कामाचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांतून रक्तक्षय आणि हृदयरोगासंबंधी जागरूकता यावी म्हणून चर्चासत्रे आयोजिली.

चांगले शिक्षण आणि उपजिविकेचे सन्मानजनक साधन कुणाला नको असते? अश्विताही अशीच जरा अस्वस्थ होती. राहून राहून तिला वाटे आपण जे ज्ञान मिळवले, त्याचा या कामात कितीसा उपयोग होतो आहे? ज्या ज्ञानासाठी आपण एवढा संघर्ष केला, त्याची फलनिष्पत्ती यात काय आहे? आपण आपल्या पातळीवर जगात काही परिवर्तन घडवून आणू शकत नसलो तर आपला उपयोग काय? जे आपले सवंगडी अजूनही गावातच उपजिविकेच्या पर्यायासाठी झगडताहेत, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? फरक असेल तर आपण त्यांच्या उपयोगात पडायला नको काय? अशा प्रश्नांनी अश्विता यांना भंडावून सोडलेले होते.

बोधी ट्री फाउंडेशनची स्थापना

अश्विता तिरुनेलवेलीला परतल्या. ‘बोधी ट्री फाउंडेशन’या संस्थेची स्थापना त्यांनी केली. ग्रामीण पदवीधरांना सशक्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. त्यांना उपजिविकेच्या चांगल्या संधी मिळाव्यात म्हणून ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण द्यायला सुरवात केली.

अश्विता सांगतात, ‘‘इतरांशी उत्तम संवाद साधण्यात ग्रामीण भागातील पदवीधाराकानाही तयार केले जाऊ शकते, यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. निर्णयक्षमता ग्रामीण युवकांमध्येही रुजवली जाऊ शकते. शिवाय स्वत:साठी फार मोठी स्वप्ने न रंगवता आपल्या गावाच्या विकासासाठी झटू इच्छिणारे युवकही घडवले जाऊ शकत असतील तर तेही एक मोठे यशच आहे.’’

फेलोशिप, शिष्यवृत्ती, सरकारी आणि खासगी क्षेत्रात उपलब्ध संधींबाबत अश्विता जागरूकता सत्र आयोजित करतात. तीन तास ते चालते. भविष्यातील संधींबाबत माहितीही या सत्रांतून दिली जाते. कला आणि विज्ञान शाखांतील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रही त्या आयोजित करतात. पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोन या विषयाला वाहिलेले सत्रही आवर्जून घेतले जाते.

अश्विताच्याच कॉलेजातून बीबीए केलेल्या गांधी माथी या अश्विताच्या उपक्रमांतील एक लाभार्थी आहेत. गांधी यांची सॉफ्ट स्किलमधली प्रगती कौतुकास्पद आहे. इंग्रजीतून उत्तमपणे त्या संवाद साधतात. व्याकरणाची एखादी चुक होते. गांधी म्हणतात, ‘‘मी खेड्यातली आहे. मला अजिबात इंग्रजी येत नाही. संवादावर आधारित एका सत्रात मला इंग्रजीचे महत्त्व कळले. आणि आता मला इंग्रजीची भीती वाटत नाही.’’ अश्विता या यशाचे श्रेय एकट्या लाटत नाहीत. आपल्या टीममधील बालाजी, सेबेस्टियन आणि पद्मा या त्रिमूर्तीचा त्यात मोलाचा वाटा असल्याचे त्या नमूद करतात.

अश्विता ‘एक्यूमॅन’च्याही फेलो आहेत. बोधी ट्री फाउंडेशन स्थापनेच्या वेळी अश्विता यांचा खासगी खर्च उचलण्यात प्लसटार्टने मदत केली होती. मदर टेरेसा वायआयएफ सोशल एंटरप्राइज स्कॉलरशिपही त्यांना मिळालेली आहे. या माध्यमातून त्यांना आपला हा उपक्रम चालवण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळाला. काहींनी वैयक्तिक पातळीवरही अश्विता यांच्या उपक्रमांना आर्थिक सहकार्य केलेले आहे. आपल्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांना आणखी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठीही प्रयत्न चाललेला आहे.

ज्ञानार्जन, कौशल्यार्जन, स्त्रोतार्जनासह संधीच्या पातळीवरही जिथे ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव केला जात नाही, असा देश घडवण्यावर अश्विता यांचा भर आहे. आणि बोधी ट्री फाउंडेशन हे या ध्येयाच्या दिशेने अश्विता यांनी टाकलेले पहिले पाऊल आहे.

Stories by Chandrakant Yadav