प्रत्येक मुलाच्या हाती असावे पुस्तक, ‘प्रथम’ चे हेच लक्ष्य ... !

0

कोणत्याही देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे शिक्षण होय. ज्या देशाची लहान मुले आणि युवक साक्षर आहेत, त्या देशाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. हे एक सत्य आहे. या सत्य गोष्टीला सर्व लोक मानतात, त्यामुळे जगातील सरकार आणि संस्था लहान मुलांना साक्षर करण्यासाठी प्रयत्नात आहेत. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. काही सेवाभावी संस्था मुलांना मोफत शिक्षण देत आहेत, तर काही राज्यांचे सरकार मुलांना शाळेत येण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देखील प्रदान करत आहेत. तसेच काही संस्था मुलांकडे जाऊन त्यांना शिक्षण देत आहेत. काही ठिकाणी नव्या तंत्राच्या माध्यमातून मुलांना शिकविले जात आहे. या सर्वांचे उद्दिष्ट साक्षरतेचा प्रसार करण्याचे आणि शिक्षणाच्या पातळीला सुधारण्याचे आहे. भारतात देखील अशा अनेक संस्था आहेत, ज्या सरकारच्या मदतीने आणि स्वत:च्या प्रयत्नाने या कामाला हातभार लावत आहेत. ‘प्रथम’ बुक्स अशीच एक संस्था आहे, जी भारतात साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

सन २००४ मध्ये सुजैन सिंह यांनी ‘प्रथम’ या संस्थेचा पाया रचला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, मुलांना शिकण्यासाठी आवश्यक सामग्री तर आहे. मात्र ती केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्येच उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर, भारतातील एक वर्ग असाही आहे, जो या भाषांपासून थोडा लांब आहे. त्यामुळे सुजैन यांनी भारतात बोलल्या जाणा-या वेगवेगळ्या भाषांमध्ये मुलांसाठी पुस्तके काढण्याचा निर्णय घेतला. कारण, भारतातील प्रत्येक मुलाच्या हातात त्यांना पुस्तक पहायचे होते. त्यांनी आपल्या पुस्तकांच्या किंमती देखील खूप कमी ठेवल्या. मागील ११ वर्षात ‘प्रथम’ ने १८ भाषांमध्ये १४ दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहेत. ज्यात त्यांनी ६ आदिवासी भाषांना देखील सामिल केले आहे. सुरुवातीच्या ८ वर्षापर्यंत त्यांनी आपल्या पुस्तकांच्या किंमती वाढविल्या नाहीत. त्यांची अव्वल पुस्तके २५ रुपयात बाजारात उपलब्ध होती. आता या पुस्तकांची किंमत ३५ रुपये झाली आहे. २००८ मध्ये सुजैन या मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करणा-या अशा प्रकाशक म्हणून उदयास आल्या, ज्यांना परवाना प्राप्त होता.

‘प्रथम’ बुक्स चा उद्देश प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तके पोहचविण्याचे होते. त्यासाठी त्यांनी मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या. तसेच वेगवेगळ्या शाळांसोबत मिळून अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले. त्यांचा विषय इतका चांगला होता की, अनेक सेवाभावी संस्था आणि अन्य प्रकारच्या संस्था त्यांच्याकडे आल्या आणि मोफत पुस्तके देण्याचा त्यांनी आग्रह केला. या संस्था मुलांना साक्षर करण्याचेच काम करत होत्या. मात्र मोफत पुस्तके देणे ‘प्रथम’ ला अशक्य होते. त्यामुळे त्यांनी असा एक उपाय शोधून काढण्याचे ठरवले, ज्यामुळे प्रत्येक मुलासाठी पुस्तके उपलब्ध करता येऊ शकतील. ‘प्रथम’ बुक्सने अनेक संस्थांसोबत मिळून ‘डोनेट अ बुक’ या नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला. सुजैन सांगतात की, भारतात ३०० दशलक्ष मुले आहेत आणि ‘प्रथम’ बुक्स दरवर्षी एक दशलक्ष पुस्तके बनवत आहेत. इतकी मोठी पोकळी कशी भरून काढावी, ही मोठी समस्या होती. यासाठी त्यांनी विचार केला की, केवळ अव्वल दर्जाची पुस्तके काढल्याने या समस्याचे समाधान होणार नाही. तर, त्यासाठी आम्हाला अशी काही नवे पावले उचलावे लागतील, जेणेकरून मुलांच्या हातात पुस्तके पोहोचण्याचे लक्ष्य गाठता येईल. ‘डोनेट अ बुक’ चे आयोजन देखील त्याच्यापैकीच एक महत्वाचे पाउल होते. या आयोजना अंतर्गत कुठलीही व्यक्ती जी मुलांची मदत करू इच्छिते, ती काही पैसे घेवून त्यांची मदत करू शकतात. काही इच्छुक लोकांनी केलेल्या पैशांच्या सहकार्यातून ‘प्रथम’ आपली पुस्तके अशा सेवाभावी संस्थांना देतील, ज्यांना ती गरजू मुलांपर्यंत पोहोचवतील.

ज्या सेवाभावी संस्थांमार्फत ‘प्रथम’ पुस्तके पाठवतात, त्यांची ते पुस्तके देण्याआधी संपूर्ण माहिती घेतात आणि हे सुनिश्चित करतात की, पुस्तके योग्य व्यक्तींच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचत आहेत का नाहीत.

‘प्रथम’ ने स्वत:साठी काही लक्ष्य देखील निश्चित केले आहेत. जसे की, बाल दिनापूर्वी पन्नास हजार पुस्तकांना त्यांना या आयोजनामार्फत मुलांपर्यंत पाहोचवायचे आहे. भारतात अशा काही सेवाभावी संस्था आहेत, ज्या दुर्गम गावात मुलांना साक्षर करण्याचे काम करत आहेत. अनेक असे वाचनालये देखील आहेत, जी या सेवाभावी संस्था आणि अन्य संस्थांमार्फत दुर्गम भागात चालविले जात आहेत. त्यांना देखील ‘प्रथम’ आपली पुस्तके पाठवत आहे.


लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किशोर आपटे