नागरिकांना परिणामकारक, जलद ऑनलाइन सेवा देण्यासाठी उत्तम क्लाऊड सेवांचा उपयोग करणार! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापे येथे २०० कोटींचे अद्ययावत डेटा सेंटरचे उद्घाटन 

0

पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटीज कार्यक्रमात महाराष्ट्राने तब्बल १० शहरे स्मार्ट करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. अशा शहरांच्या कायापालटात माहिती तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असून स्मार्ट तसेच जबाबदार आणि कार्यक्षम सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी उत्कृष्ट डाटा सेंटर्स आणि ती सुध्दा आपल्या भूमीतील असणे ही काळाची गरज आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथील महापे परिसरात उभारण्यात आलेल्या इएसडीएस (ESDS) आयटी कंपनीच्या अद्ययावत अशा डाटा सेंटरचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सर्व नागरिकांना सर्व शासकीय सेवा ऑनलाइन

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने राज्यात नागरिकांना देण्यात येणाऱ्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यावर आपला भर असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपले सरकारसारख्या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना परिणामकारक, आणि कालबध्द सेवा देण्यात येत असून विविध विभागांच्या १५० सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन झाली आहेत. ऑक्टोबरपर्यंत २५० सेवा ऑनलाईन होतील. महाराष्ट्रातील एकाही नागरिकाला कुठल्याही सेवेसाठी शासकीय कार्यालयात जावे लागणार नाही आणि त्यासाठी सर्वोत्तम क्लाऊड कॉम्प्युटिंग असणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने आयटी क्षेत्राची मदत घेण्यात येत आहे. या प्रक्रियेत इएसडीएससारख्या कंपनीने देखील शासनाला उत्तम कल्पना द्याव्यात असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. नागरिकांपर्यंत आज उत्तमोत्तम सेवा वेगाने पोहचवायच्या असतील तर क्लाऊड कॉम्प्युटिंगशिवाय पर्याय नाही. आज शासनाकडे चांगले कार्यक्रम आहेत, पैसा आहे पण हे नागरिकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसे पोहचायचे त्यात अडचणी आहेत. विविध विभागांच्या सेवांमध्ये अद्यापही सुसूत्रता नाही. त्यामुळे एक विश्वासार्ह यंत्रणा फक्त क्लाऊडच्या माध्यमातून उभारली जाऊ शकते. आज बव्हंशी डेटा सेंटर्स परदेशात आहेत मात्र इएसडीएससारख्या अशा स्थानिक सेंटरमुळे देशातील डेटा सुरक्षितता राहू शकते असे मुख्यमंत्री म्हणाले.

मध्यंतरी मी चीनमध्ये फोक्सकॉन कंपनीला भेट दिली. १ लाख लोक याठिकाणी आयफोन या उत्पादनावर काम करतात.यातून केवळ १०टक्के पैसा चीनला तर ९०टक्के पैसा अमेरिकेला जातो याचे कारण बौद्धिक संपत्तीवर असलेला अमेरिकन्सचा अधिकार. भारतात सुध्दा अशा संपत्तीचा मालक होण्याची ताकद आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातील आय टी क्षेत्रातील तरुणांना सर्वात जास्त मागणी आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हार्डवेअरसाठी उत्तम सोल्युशन काढण्याची गरज प्रतिपादन केली.

शासनाकडे आपल्या कार्यपद्धतीत नवनवीन बदल आणण्यासाठी नव्या, वैविध्यपूर्ण कल्पनांची कमी आहे. अशा कल्पना ज्यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारेल आणि त्या अधिक परिणामकारक होतील. आयटी क्षेत्रातील मंडळींकडे आऊट ऑफ दि बॉक्स विचार करण्याची शक्ती आहे. या शक्तीचा फायदा महाराष्ट्र शासन घेऊ इच्छिते असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्य आयटीमध्ये आपली आघाडी कायम ठेवेल असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या कंपनीने सुरु केलेल्या eNlight 360 या अद्ययावत अशा हायब्रीड क्लाऊड प्लॅटफॉर्ममुळे राज्याला देखील याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वीच्या तुलनेत आता एकापाठोपाठ एक येणाऱ्या  डेटा सेंटर्समुळे आयटीत राज्य आघाडीवर राहील असे ते म्हणाले.

खासदार आणि आयटी विषयक संसदेच्या संयुक्त स्थायी समितीचे सदस्य अनुराग ठाकूर यांनी देखील आपल्या भाषणात कंपनीच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले .कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पियुष सोमाणी यांनी आपल्या भाषणात कंपनीची नाशिकहून अगदी छोट्या प्रमाणावर झालेली सुरुवात आणि आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला. कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे, महापौर सुधाकर सोनावणे हे देखील उपस्थित होते.

२०० कोटींच्या सामंजस्य करारातून डेटा सेंटर

इएसडीएस या कंपनीची सुरुवात २००५ साली नाशिक येथे झाली त्यवेळी या कंपनीत अवघे १-२ संगणक आणि २० -३० कर्मचारी होते. क्लाऊड सर्व्हिस कंपनी म्हणून काम सुरु केल्यानंतर या कंपनीने अमेरिका, कॅनडा, अशा ठिकाणी सेंटर्स उघडले. महापे येथील हे अपटाईम इन्स्टिट्यूट सर्टिफाईड डेटासेंटर असून राज्य शासनाशी या केंद्राच्या उभारणीसाठी २०० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला होता. ८० हजार चौफुट परिसरावर उभारण्यात आलेले हे अद्ययावत सेंटर आपल्या लाखो ग्राहकांना क्लाऊड सेवा पुरविते. या केंद्रावर २० लाख वेबसाईटस आहेत.

लेखक : किशोर आपटे