’अजब दुनिया तेरी गजब तेरे शौक’ रजनीश बंसल यांच्या अंतर्वस्त्राच्या संग्रहाने केला जागतिक किर्तीमान!

’अजब दुनिया तेरी गजब तेरे शौक’ रजनीश बंसल यांच्या अंतर्वस्त्राच्या संग्रहाने केला जागतिक किर्तीमान!

Monday January 04, 2016,

5 min Read

गाजियाबाद आणि जवळपासच्या क्षेत्रात राहणा-या अधिकाधिक लोकांसाठी ‘मंगली हौजरी’ आणि त्याचे कर्ताधर्ता ३९वर्षीय रजनीश बंसल हे काही अनोळखी नाव नाही. काही अनोखे करताना आपल्या जीवनात उंच शिखर गाठणारे रजनीश आपल्या अंतर्वस्त्र संग्रहासोबत त्याचे सर्वात मोठे संग्रहकर्ता म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये आपले नाव सामील करण्यात यशस्वी झाले. सध्या त्यांच्याकडे २२हजारपेक्षा अधिक अंतर्वस्त्राचा संग्रह आहे आणि गेल्या १०वर्षापासून सलग हा विक्रम आपल्या नावावर करण्यात यशस्वी होत आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांनी वर्ष१९९०मध्ये १४वर्षाच्या वयात केवळ ५०हजार रुपयातच आपल्या व्यवसायाचा पाया रचला होता आणि आज ते वर्षभरात ५कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय करतात.

image


आजपासून २५वर्षापूर्वी वर्ष१९९०मध्ये १४वर्षीय रजनीश बंसल दहावीत शिकत होते आणि त्याच काळात तत्कालीन केंद्र सरकारने सरकारी नोकरीत आरक्षणाची तरतूद लागू केली. रजनीश यांना वाटले की, आता त्यांना सरकारी नोकरी मिळणे अशक्यच आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. वर्ष१९९०च्या परिस्थितीबाबत ‘युअर स्टोरी’सोबत संवाद साधताना रजनीश सांगतात की, “ त्या दरम्यान माझ्या वडिलांकडे दिल्लीच्या रोहिणीमध्ये एक प्लॉट होता, ज्याला त्यांनी १लाख २२हजार रुपयामध्ये विकले आणि मिळालेल्या पैशांपैकी ५०हजार रुपये व्यवसाय करण्यासाठी मला दिले.” रजनीश यांनी वडिलांनी दिलेल्या पैशांपासून घरातूनच एखादा व्यवसाय करण्याचा निश्चय केला आणि त्यांनी धागा विकत घेऊन पायात घातले जाणारे मोजे तयार करून विकण्यास सुरुवात केली.

रजनीश पुढे सांगतात की, “त्यावेळी मी धागा विकत घेऊन मोजे तयार करणा-या फॅब्रिकेटर्सशी संपर्क साधला आणि मोजे तयार करून विकायला लागलो. मी आपल्या ब्रांड चे नाव ‘सुपरटेक्स’ ठेवले. केवळ चार महिन्यानंतर मी गाजीयाबाद्च्या तुराबनगर भागात एक दुकान उघडले, जेथे केवळ मोजेच मिळत असत. असे असूनही माझी खूप थट्टा देखील करण्यात आली. कारण एक असे दुकान जेथे केवळ मोजेच मिळतात, हे कुणालाही पचत नव्हते.” परंतु या दुकानाने वेळेसोबतच लोकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि विकत घेण्यासाठी त्यांच्या दुकानावर येणा-या ग्राहकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या या दुकानात अंतर्वस्त्र इत्यादी ठेवण्यास सुरुवात केली.

वर्ष१९९२ आले, त्यांनी आपल्या या मोज्यांच्या दुकानाचा विस्तार करताना त्याला पूर्णपणे होजिअरीशी संबंधीत दुकानात बदलले. रजनीश सांगतात की, “आमच्याकडे मोजे विकत घेण्यासाठी येणारे ग्राहक नेहमी म्हणायचे की, आम्ही आमच्या या दुकानात अंतर्वस्त्र देखील विकण्यासाठी ठेवले पाहिजेत. ग्राहकांच्या आग्रहामुळे आम्ही वर्ष १९९२मध्ये आपल्या दुकानाला ‘मंगली हौजरी’चे नाव देत पूर्णपणे अंतर्वस्त्राच्या दुकानात बदलले.” काळ बदलत होता आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या व्यवसायाची गती दिवसेंदिवस वाढतच होती आणि ते जवळपासच्या क्षेत्रात अंतर्वस्त्राच्या आपल्या विविधतेने ते प्रसिद्ध झाले.

image


वर्ष२००३ आले, त्यांच्या दुकानात पुरुष आणि महिलांच्या अंतर्वस्त्राचे इतके विविध प्रकार आले की, पूर्ण क्षेत्रात ही धारणा बनली की, जर एखादे अंतर्वस्त्र कुठे मिळत नसेल तर, ते रजनीश यांच्या दुकानावर नक्की मिळेल. जुन्या दिवसांची आठवण करत रजनीश पुढे सांगतात की, “ तो वर्ष२००३चा काळ होता, जेव्हा एक ग्राहक आमच्या दुकानावर आला आणि त्याने स्वतःसाठी एक वस्तू मागितली, जी त्यावेळी उपस्थित कर्मचा-यांना मिळाली नाही. त्या ग्राहकाचे म्हणणे होते की, असे होऊच शकत नाही, की त्याला जी वस्तू हवी आहे ती या दुकानातच नसेल आणि त्याने पुन्हा शोधण्यासाठी आग्रह धरला. अखेर तासभराच्या मेहनतीनंतर त्यांच्या आवडीची वस्तू मिळालीच.” त्यानंतर त्यांना असा विचार आला की, आता त्यांच्याजवळ अंतर्वस्त्रांची इतकी संख्या आहे की, जितकी कदाचित कुणाकडेही नसेल.

त्याच दरम्यान रजनीश यांनी वर्तमानपत्रात विभिन्न प्रकारच्या वस्तूंना एकत्रित करणा-या बद्दल वाचले आणि त्यांना पण वाटले की, जेव्हा दुसरे लोकदेखील विभिन्न प्रकारच्या वस्तू जमवू शकतात तर अंतर्वस्त्र का नाही? रजनीश पुढे सांगतात की, “त्या काळात मी एका वर्तमानपत्रात वस्तूंचा संग्रह करणा-याबाबत एक लेख वाचला, त्याचे शीर्षक मला आजही आठवते. त्या लेखाचे शीर्षक होते ‘अजब तेरी दुनिया-गजब तेरे शौक’ त्यानंतर मी माझ्याकडे असलेल्या वस्तूंची मोजणी केली, ज्याला २२ हजार पार केल्यानंतर मी ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ला संपर्क साधला.”

सुरुवातीला ‘लिम्का बुक’च्या व्यवस्थापकांनी त्यांच्या याचिकेकडे लक्ष दिले नाही आणि दोन वेळा केलेल्या पत्राचे त्यांनी कुठले उत्तरदेखील दिले नाही.

image


त्यानंतर एक दिवशी रजनीश स्वतः ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या गुडगावमध्ये असलेल्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांची भेट त्यांच्या संपादकांशी झाली. याबाबत बोलताना रजनीश सांगतात की, “त्यांनी माझ्याशी संवाद साधला आणि सांगितले की, त्यांना असे वाटत होते की, अशा प्रकारच्या विक्रमासाठी एखाद्या मेट्रो शहरातून प्रस्ताव येईल. कारण त्यावेळी संपूर्ण देशात गाजीयाबाद्चे नाव गुन्ह्यांमुळे खूप बदनाम होते. त्यामुळे त्यांना वाटले होते की, माझा हा दावा खोटा आहे. मी एकदा भेटल्यानंतर त्यांनी पडताळणी केली आणि त्यानंतर २२,३१५प्रकारचे विभिन्न अंतर्वस्त्रांसोबत माझे नाव ‘लिम्का रेकोर्ड बुक’मध्ये सामिल झाले.” वर्ष२००४च्या सत्रात पहिल्यांदा सामील झाल्यानंतर त्यांचे नाव या रेकोर्ड बुकमध्ये प्रतिवर्ष सामील होत आहे आणि आजपर्यंत त्याला मोडण्यात कुणीही यशस्वी होऊ शकलेले नाही.

image


काही वर्षापूर्वी रजनीश यांनी ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये देखील आपला दावा प्रस्तूत केला. मात्र त्यांच्याकडे या प्रकारच्या संग्रहाची कोणतीही श्रेणी नसल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. रजनीश पुढे सांगतात की, “वर्ष१९९०मध्ये केवळ १४वर्षाच्या वयात केवळ ५०हजार रुपयापासून सुरुवात करताना मी कधी स्वप्नात विचारही केला नव्हता की, एक दिवशी या शिखरापर्यंत पोहोचण्यास यशस्वी होईन. सध्या माझी वर्षाची उलाढाल पाच कोटींपेक्षा अधिक आहे आणि ‘आयएसओ९००१:२००८’ने प्रमाणित होणा-या कंपन्यांपैकी कदाचित माझीच एक कंपनी आहे.”

त्याव्यतिरिक्त रजनीश आता लवकरच आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी एक मोबाईल ऍपदेखील आणणार आहेत, ज्यावर त्यांचे काम चालले आहे. रजनीश पुढे म्हणतात की, व्यवसायाच्या क्षेत्रात आमचा दावा आहे की, आमच्याकडे सर्वात अधिक विविध प्रकार आहेत आणि त्याव्यतिरिक्त आम्ही उत्पादनाच्या किंमतीबाबत देखील आव्हान देतो. आम्ही आमच्या ग्राहकांना बाजारात कमीत कमी किंमतीत उपलब्ध करून देतो. अशातच दूर क्षेत्रात राहणा-या आमच्या ग्राहकांना आमच्या या ऍपच्या माध्यमातून आपल्या आवडीची वस्तू विकत घेऊ शकतात आणि आम्ही त्यांच्यापर्यंत त्यांच्या आवडीची वस्तू पोहोचविण्यासाठी काही लॉजिस्टिक्स भागीदारांसोबत अखेरच्याटप्प्यातील चर्चा करत आहोत.”

रजनीश यांना आशा आहे की, येणा-या काळात देखील ते या संग्रहामुळे आपले नाव ‘गिनीज बुक ऑफ रेकोर्ड’मध्ये देखील नोंदविण्यात यशस्वी होतील.

लेखक: निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.