बायाबापड्यांची बँक माणदेशी, ‘चेतना’ मुळाशी, स्त्री-शक्तीची!

बायाबापड्यांची बँक माणदेशी,
‘चेतना’ मुळाशी, स्त्री-शक्तीची!

Friday October 16, 2015,

6 min Read

मसवाड हे महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातले अन् माण तालुक्यातले खेडेगाव. रिझव्हॅ बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पुढ्यात या गावातल्या बायाबापड्यांनी ठाण मांडलेले. ‘आम्हाला बँक सुरू करायचीय, लायसन्स द्या’, अशी या बायकांची मागणी होती. अर्थात सहा महिन्यांपूर्वीही ही मागणी अधिकाऱ्यांनी धुडकावून लावलेली होती. ‘आम्ही शिकलेल्या नाही. अंगठेबहाद्दर आहोत. सबब सही जमत नाही. बँकिंगच्या सगळ्या व्यवहारांवर (कागदपत्रांवर) अंगठाच टेकवणार.’ असे या बायकांचे म्हणणे होते. अधिकाऱ्यांनी परवाना द्यायला नकार दिलेला होता. बायकांची बँकेवर आता ही दुसरी धडक होती. आता त्यांचे म्हणणे जरा बदललेले होते, ‘आम्ही शिकलेल्या-सवरलेल्या नसलो तरी हिशेबी आहोत. मुळात आमच्या गावात शाळाच नाही, तर आम्ही शिकायला जाणार कुठे? आणि जेवढे गरजेचे असते तेवढे आता शिकून झालेले आहे, मगच दुसऱ्यांदा इथे तुमच्या दारी आम्ही आलेल्या आहोत. आमचे गणित पक्के आहे. वाटल्यास आम्हाला तुम्ही प्रश्न विचारा. इतकी ठेव तर तिच्यावर व्याज किती, असे वाट्टेल ते विचारा. वाटल्यास तुमच्या कर्मचाऱ्यांनाही बोलवा आणि तपासून बघा तुमच्या कर्मचाऱ्यांकडून आधी उत्तर येते की आमच्याकडून!’ स्त्री-शक्तीचा असा यल्गार पाहून बँकेचे अधिकारी थक्क झालेले होते.

… तर दुसरीकडे आपण संघटित केलेल्या स्त्रीशक्तीतील हे चैतन्य पाहून चेतना विजय सिन्हा आनंदात न्हाऊन निघालेल्या होत्या. अभिमानाने त्यांचा उर दाटून आलेला होता. ‘माणदेशी फाउंडेशन’ ही महिलांची संघटना उभारताना चेतना सिन्हा यांना जे काही कष्ट पडलेले होते, त्या कष्टांचे हे फळ होते. लहानशा खेड्यातल्या बायाबापड्यांना असा आवाज फुटलेला होता, की अधिकाऱ्यांची तोंडे गप्पगार झालेली होती. सहा महिन्यांपूर्वी या सगळ्याच जणी किती उदास होत्या. हळूहळू सगळे स्थिरस्थावर होत गेले. अधिकारीही नरमले होते.


image


१९९७ मध्ये बँकेची स्थापना

…आणि १९९७ मध्ये माणदेशी बँकेची स्थापना झालेली होती. महिलांसाठी महिलाच चालवत असलेली ही सहकार तत्वावरील बँक आहे. महाराष्ट्रातल्या मोजक्या ‘मायक्रोफायनांस बँकां’पैकी ही एक.

चेतना यांचा जन्म मुंबईचा. लग्नानंतर पती विजय सिन्हा यांच्यासह त्या मसवाडला सासरी आल्या. चेतना आणि विजय यांच्या सामाजिक जाणिवा जवळपास सारख्याच होत्या. दोघांची पहिली भेटही जयप्रकाश नारायण यांनी उभारलेल्या चळवळीदरम्यान झालेली होती.

सुरवातीला नाव ठेवणारे गाव…

मुंबईत वाढलेल्या चेतनाला मसवाडसारख्या खेड्यात जुळवून घेणे सुरवातीला जरा अवघडच गेले. बससाठी इथे लोक तासन्‌तास वाट बघत. वीज कमीच येत असे. जास्त जात असे. स्त्रीवादी असल्याने चेतना मंगळसूत्र घालत नसत. पेहरावही त्यांचा आधुनिक असे. गावातले लोक नावे ठेवत. बायका जरा हटकूनच असत. चेतना यांचे उभे चारित्र्य मूल्यांवर अधिष्ठित होते. मूल्य चिरंतन असतात म्हणून चेतना यांचा विश्वासही चिरंतन होता. लवकरच तो दिवस उजाडेल, की त्या जशा आहेत, तसे अवघ्या मसवाडने त्यांना स्वीकारलेले असेल, ही खात्री त्यांना म्हणूनच होती. पुढे झालेही अगदी तसेच… आणि ‘माणदेशी फाउंडेशन’चा पाया रचला गेला.

१९८६-८७ च्या काळात उभ्या देशातच स्त्री-शक्तीत एक नवे चैतन्य संचारलेले होते. नवा अध्याय लिहिला गेलेला होता. संसदेने पंचायत राज विधेयकात काही दुरुस्ती केल्या होत्या आणि यापुढे पंचायतींतून महिलांसाठी ३० टक्के आरक्षण लागू झालेले होते. चेतना यांनी मग गावातील महिलांमध्ये याबाबत जागरूकता आणायला सुरवात केली. स्थानिक प्रशासनाबाबत महिलांना धडे द्यायला सुरवात केली.

खाते अन् छोट्या बचतीशी नाते

अशात चेतना यांच्या पुढ्यात कांता अमनदास नावाची एक लोहारकाम करणारी भगिनी येऊन उभी राहिली आणि म्हणाली, की तिला तिने जमवलेली काही रक्कम बँकेत भरायची आहे, पण तिचे खाते सुरू करायला बँक नाही म्हणते. चेतना यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या कांतासह बँकेत गेल्या. बँकेतला अधिकारी म्हणाला कांताबाईकडची रक्कम ही तुटपुंजी आहे म्हणून खाते उघडले जाऊ शकत नाही. चेतना यांच्या डोक्यात आले, की अरे छोटी बचत करणाऱ्या बायकांनी मग जायचे कुठे? आणि इथूनच डोक्यात बसले, की आपण बँक सुरू करायची.

चेतना म्हणतात, ‘‘गावातल्या बऱ्याच बायका मला मदत करायला तयार होत्या, पण मी योग्य वेळेच्या आणि संधीच्या शोधात होते.’’

आता बँक आपल्या दारी…

पुढे बँक सुरू झाली. पण नंतरही अडचणी आ वासून उभ्याच होत्या. कामधंद्याच्या वेळेत कोण बँकेत पैसे भरायला जाईल म्हणून बऱ्याच बायका बचत करत नव्हत्या. पैसे भरत नव्हत्या. मग ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम चेतना यांनी सुरू केला. पासबुकमुळे अनेक जणींच्या पतीमहाशयांना अकाउंटमधली रक्कम कळत असे आणि मग पत्नीकडे पैशांसाठी तगादा सुरू होई. दारूडे नवरे तर याबाबतीत मोठी अडचण होती. मग ‘मानदेशी’ने महिलांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ जारी केले. लवकरच कर्जवाटपही सुरू केले.

मोबाईलला, सायकलीलाही कर्ज

एके दिवशी गावातल्याच केराबाई धनगर बँकेत आल्या आणि मोबाईल फोनसाठी कर्ज हवे म्हणाल्या. अधिकाऱ्यांना वाटले, केराबाईंची मुलेच मोबाईलसाठी हट्टाला पेटलेले असतील म्हणून केराबाई कर्ज काढताहेत. केराबाईंनी मग सांगितले, की अनेकदा शेळ्या चारायला लांबवर जावे लागते. अशावेळी घरी कळवण्याचे, काही सांगण्याचे साधन हवे ना. केराबाईंना मोबाईल मिळाला. त्यांना तो हाताळता येत नव्हता. चेतना यांनी शिकवले. महिलांसाठी बिझनेस स्कूलची तसेच महिलांना साक्षर करण्यासह इतर लहानमोठ्या गोष्टी शिकवण्यासाठी रेडिओ स्टेशनची कल्पना या प्रसंगातून चेतना यांना सूचली. लवकरच रेडिओ स्टेशन सुरू झाले.

ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनात ‘माणदेशी’ने मोठा वाटा उचलला आहे. व्यवसाय सुरू करायला वित्तपुरवठ्यापासून अन्य सगळी मदत ‘माणदेशी’ करते. चेतना सांगतात, ‘‘गावातल्या या अडाणी बायका खरं म्हणजे माझ्या गुरू आहेत. रोज काहीतरी नवे मी त्यांच्याकडून शिकत असते. सागरबाईंकडून मी दृढ संकल्प आणि धाडस शिकलेले आहे.’’ सागरबाई पाचवी शिकलेल्या. चहाटपरीही त्यांनी चालवली. आता त्यांना सायकलसाठी कर्ज हवे आहे. कारण त्यांना पुढे शिकायचे आहे. त्यासाठी गावाहून लांब असलेल्या शाळेत जायचे आहे. सायकल मग लागेलच ना. चहाटपरीसाठीही त्यांना बँकेनेच कर्ज दिले होते. पुढे घरगुती वापराचा गॅस व्यवसायासाठी वापरते म्हणून पोलिस केस झाली. दोन दिवस त्या अटकेत होत्या. मला वाटले बाई खचली असेल. आता काही पुन्हा टपरी सुरू करायची नाही, पण सुटून आली आणि म्हणाली, कमर्शिअल हंडी वापरेल, पण पुन्हा टपरी सुरू करेन.

image


हॉवर्ड विद्यापीठातून भेटीला विद्यार्थी

आज हॉवर्ड आणि येल या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून इथं मसवाडला विद्यार्थी येतात… खास ‘माणदेशी’चे बिझनेस मॉडेल शिकायला… चेतना यांचे किती मोठे यश आहे हे!

दुष्काळात दीड वर्ष चारापाणी

महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण तर बँक देतेच, पण माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकलसाठीही कर्ज द्यायला का कू करत नाही. एके दिवशी केराबाई आपले दागिने घेऊन ते गहाण ठेवायला बँकेत आल्या आणि म्हणाल्या त्यांना जनावरांना चारा हवा आहे. दुष्काळातला तो प्रसंग होता. चेतना यांच्यावर केराबाई जरा रागावलेल्याच होत्या. शिकणे आणि शिकवणे या पलीकडे तुम्हाला काही दिसतच नाही, असे त्या चेतना यांना उद्देशून बोलल्या. अगदी दुष्काळाचा दाहही तुम्हाला दिसत नाही, असेही म्हणाल्या.

चाऱ्याचे सोडाच. संपूर्ण परिसरात कुठे पाणीही नाही आता. दागिने गहाण ठेवले तर बँक पाणी देऊ शकेल काय, चारापाण्याशिवाय जनावरे जगतील काय, असा खडा सवाल त्यांनी चेतना यांच्या पुढ्यात ठेवला. त्यादिवशी चेतना यांचा रात्रभर डोळा लागला नाही. पती विजय यांच्याशी याबाबतीत त्या बोलल्या. पुढल्याच दिवशी चेतना यांनी जनावरांसाठी चारा आणि पाण्याचे शिबिर आयोजिले. चारापाण्याची व्यवस्था कशी होईल, त्याचा विचारही चेतना यांनी केलेला नव्हता. लोकसहभागातून मार्ग निघाला. महिनाभरात ७००० शेतकरी आणि १४००० जनावरांना शिबिराचा लाभ झाला. माण तालुक्यातले हे सर्वांत मोठे शिबिर होते. लोकांनी पाण्यासाठी नव्या विहिरी खोदल्या. ट्रक भरून-भरून दररोज लांबून-लांबून शिबिराच्या ठिकाणी चारा येऊ लागला. चेतना म्हणतात, ‘‘शिबिर जवळपास दीड वर्ष चालले आणि लोकांचा त्याला भरघोस पाठिंबा मिळाला.’’

image


जन्मलाही… बरसलाही ऐसा मेघराज

या शिबिरात एक आगळाच किस्सा घडला. एक गर्भवती महिलाही जनावरे घेऊन आलेली होती. उगाच शिबिराला गालबोट नको म्हणून चेतना यांनी तिला आपल्या गावी परतायला सांगितले. ती म्हणाली, आमच्या गावात पाणीच नाही. चेतना यांचा नाइलाज झाला. जनावरांसाठीच्या या शिबिरातच बाळाचा जन्म झाला. चेतना सांगतात, की कुठलीही गोष्ट त्या तर्कसंगत असेल तरच स्वीकारतात, पण या बाळाचा जन्म झाला आणि असा काही पाऊस बरसला, की बापरे. लोकांनीच या बाळाचे नाव मेघराज असे ठेवले.

मेघराजाच्या नावे लाखाची एफडी

मेघराजच्या आगमनाने शिबिरातले वातावरणच ढवळून निघालेले होते. लोक म्हणाले, हे बाळ आमच्यासाठी पाऊस घेऊन आले. मग त्याला एखादे चांगले बक्षिस आपण द्यायला नको का. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा यांनी सुचवले, प्रत्येकाने दहा रुपये द्यायचे. तासाभरात मेघराजच्या नावाने ७०००० रुपये गोळा झाले. माणदेशी फाउंडेशनने आपले ३०००० त्यात घालून मेघराजच्या नावे लाखाची एफडी केली!