दिल्लीचा चहावाला! २४ पुस्तकांचा लेखक!!

दिल्लीचा चहावाला! २४ पुस्तकांचा लेखक!!

Thursday October 29, 2015,

9 min Read

तुम्ही जे काही काम करता, तीच तुमची एकमेव ओळख असावी, हा काही नियम नाही. तुमची दुसरी ओळखही असू शकते. विशेष म्हणजे ज्या कामाने तुम्ही ओळखले जाता, त्या कामाशी तुमच्या या दुसऱ्या परिचयाचा अजिबात ताळमेळ बसत नसला तरीही. लक्ष्मण राव यांचे काहीसे असेच आहे. चहा घोटणे अन्‌ विकणे हा त्यांचा पोटापाण्याचा धंदा, पण तरी खरी ओळख आहे ती लेखक म्हणूनच.

लक्ष्मण राव यांच्या नावावर आजअखेर १२ पुस्तके आहेत. तशी एकूण २४ पुस्तके लिहून झाली आहेत. पैकी १२ प्रकाशित आहेत. ६ मुद्रणाच्या प्रक्रियेत आहेत म्हणजे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत आणि ६ लिहून तयार आहेत. ‘रामदास’ या त्यांच्या कादंबरीला दिल्ली सरकारचा ‘इंद्रप्रस्थ साहित्य भारती’ हा मानाचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे, हे विशेष!


image


लक्ष्मण राव हे हाडाचे लेखक आहेत. घटकाभराची सवडही ते दवडत नाहीत. उसंत मिळाली रे मिळाली, की बसलेच काहीतरी लिहायला. आज ते ६२ वर्षांचे आहेत, पण चहाचा धंदाही सुरूच आहे आणि लेखनप्रंपचातूनही निवृत्ती नाहीच. तारुण्यात पाऊल टाकले तसेच ते लिहिताहेत. १९७९ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. परिचित मंडळी ‘लेखकराव’ म्हणून हाक मारते तेव्हा लक्ष्मण रावांना आकाश दशांगुळे उरते!

बांधकाम मजुर अन्‌ घरगडीही

आता लक्ष्मण रावांचा हा काही एकच एवढा परिचय नाही. चहावालेही ते आहेतच. ॲअॅल्युमिनियमची किटली, ग्लास, स्टोव्ह आणि फुटपाथवरला तो धंदा असे सगळे दुष्टचक्र आहेच. लेखनाने लक्ष्मण यांची हौस तेवढी भागते. पोटापाण्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे सामर्थ्य मात्र या हौसेत खचितच नाही. महागाईच्या या वणव्यात कुणाचाही भरवसा पटणार नाही, की कपभर चहा ते रुपयात देतात म्हणून. ग्राहकांवर लक्ष असतेच, पण ‘एमसीडी’ पथकावरही ते लक्ष ठेवून असतात. कधी येतील ‘अतिक्रमण निर्मूलन’वाले आणि कधी चहाचं खोकडं उडेल याचा काही नेम नसतो.

गेल्या २५ वर्षांपासून ते रस्त्यावर चहा विकताहेत आणि या काळात कितीतरीदा त्यांचं खोकडं अस उडवण्यात आलेलं आहे. चहात स्वत:ला आजमावण्याआधी त्यांनी भांडीही घासली आहेत आणि घरगडी म्हणूनही ते राबलेले आहेत. एका अर्थाने दररोज स्वत: मेले आहेत, पण स्वत:तला लेखक त्यांनी कधीही मरू दिलेला नाही. खरं पाहिलं तर त्यांचे जगणे आणि त्यांच्या हालअपेष्टा या देशभरातल्या कलावंतांच्या परिस्थितीचं प्रातिनिधिक रूपच. राव यांचे अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यांची गर्दीत हरवल्यासारखी स्थिती ही हिंदी भाषेत लिहिणारे लेखक आणि इंग्रजीतून लिहिणारे श्रीमंत लेखक यांच्यातील दरीही दाखवून देते.

image


अवघी दिल्ली सायकलीखाली

महत्त्वाचे म्हणजे हे, की लक्ष्मण राव यांची कुणाबद्दलही काहीही तक्रार नाही. कुणीतरी आपलं पुस्तक वाचतं आहे, ही भावनाच त्यांना सुखावणारी. त्यांच्यातील लेखकाचा पिंड शमविणारी. वाचकांपर्यंत आपली पुस्तके पोहोचावीत म्हणून चक्क सायकलीवरून ते दिल्लीचे हे टोक ते ते टोक गाठतात. शिक्षण संस्था, वाचनालये पालथी घालतात. थेट त्यांच्याकडून पुस्तक विकत घेणाऱ्याला हे बहुतांशी माहितीच नसते, की तेच पुस्तकाचे लेखक आहेत म्हणून.

लक्ष्मण सांगतात, ‘‘माझ्याकडे पाहून कोण म्हणणार आहे, की मी लेखक आहे म्हणून. माझी मोडकळीला आलेली सायकल, अंगावरून चालणारा घाम, धुळीने माखलेले अन फाटके कपडे पाहून सर्वांना हेच वाटते, की मी पुस्तकांचा फेरीवाला आहे. आणि जोवर समोरचा विचारत नाही, तोवर मीही सांगत नाही, की पुस्तक मीच लिहिलेले आहे म्हणून.’’ जेव्हा एखादा जिज्ञासू वाचक लेखकाबद्दल विचारतो आणि लक्ष्मण राव ‘मीच’ म्हणून सांगतात, तेव्हा तो वाचक रावांना बसायला खुर्ची देतोच आणि चहा तरी घ्या म्हणून आग्रह धरतोच.

लेखकही, प्रकाशकही, विक्रेताही...

राव यांना प्रकाशकांनी उभेच केले नाही. आपल्या नावावर एकतरी पुस्तक असावे म्हणून जेव्हा ते पहिल्यांदा एका प्रकाशकाकडे विनवण्या करायला गेले, तेव्हा प्रकाशकाने त्यांच्या हस्तलिखितावर आधी नजरही फिरवली नाही आणि प्रस्ताव धुडकावून लावला. प्रकाशकाने त्यांचा अवमान केला आणि हद्द म्हणजे कार्यालयाबाहेर हाकलून लावले. प्रकाशकांनी ही हद्द गाठली म्हणून राव यांनी जिद्द सोडली नाही. आपल्या दमावर आपले पुस्तक काढू, अशी गाठ जणू शेंडीला मारली. तेव्हापासून ते आपली पुस्तके ते स्वत: प्रकाशित करतात. १००० प्रतींसाठी २५००० रुपयांपर्यंत खर्च येतो. सर्व प्रती विकल्यानंतर पुरेसा पैसा उभा राहिला, की मग ते नवे पुस्तक प्रकाशित करतात.

राव सांगतात, ‘‘मी माझ्या पुस्तकांच्या विक्रीतून जे काही कमवतो, ते सर्व नव्या पुस्तकाच्या प्रकाशनात लावून देतो.’’ उर्वरित सर्व १२ पुस्तकांचे प्रकाशनही त्यांना लवकरच करायचे आहे. शिवाय आयएसबीएन नंबर मिळवून त्यांनी ‘भारतीय साहित्य कला प्रकाशन’ या नावाने आपले स्वत:चे ‘पब्लिकेशन हाउस’ही त्यांनी नोंदणीकृत करून ठेवलेले आहे.

image


खांबाखालून ग्रॅज्युएशन...

राव यांनी आपल्या पुस्तकांसह समाजातील अनेक प्रतिष्ठित मंडळींकडेही चकरा मारल्या. कुणीही त्यांची दखल घेतली नाही. ते कसे दिसतात, त्यांचे कपडे कसे आहेत, त्यांचे जोडे किंवा चपला कशा आहेत, यावरूनच त्यांची पारख या प्रतिष्ठितांकडून केली गेली आणि हेटाळणीही. ‘ग्रॅज्युएट’ झालो तर दोन लोक विचारतील म्हणून त्यांनी पत्रव्यवहाराद्वारे पदवीसाठी पुढे अर्जही केला. दिवसा बांधकामावर मजुर म्हणून राबत आणि रात्री रस्त्यावरल्या लाइटाच्या खांबाखाली अभ्यास करत. अखेर वयाच्या बेचाळिशीत ते पदवीधर झाले, पण कुणालाही त्यांच्या या ‘बीए’च्या प्रमाणपत्रात स्वारस्य नव्हते.

राव सांगतात, ‘‘फुटपाथवर चहा विकणारा हा फाटका लिहू शकतो आणि पदवीही मिळवू शकतो, यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. तू जर लेखक आहेस, तर रस्त्यावर चहा कसा काय विकतो, असंच त्यांचं म्हणणं होतं.’’

हिंदी भवनाबाहेर लेखक चहावाला!

लोकांचे तर लोकांचे, पण नियतीचीही विडंबना बघा कशी… २४ हिंदी पुस्तकांचा हा लेखक चक्क ‘हिंदी भवना’बाहेरच चहाचं खोकडं घेऊन बसलाय. हिंदी भवन म्हणजे हिंदी साहित्याचं सर्वांत मोठं भांडार. लेखक म्हणून राव हे साहित्याच्या जगात अस्पृश्यच आहेत. हिंदी भवनातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असलेले वातावरण त्यांना स्वीकारायला तयार नाही. अर्थात स्वत: राव यांनाही या वातावरणाचे तसे वावडेच आहे.

‘आयटीओ’जवळील विष्णू दिगंबर मार्गावरील आपल्या खोखड्यापासून लांब म्हणजे जवळपास दिल्लीच्या दुसऱ्या टोकावरील रोहिणी आणि वसंत कुंजपर्यंत सायकलीने जातात-येतात.

चहाचं अस्थिर खोखडं म्हणजे मोकळ्या आकाशाच छत लाभलेलं एक बिऱ्हाडच. खोकड्यात चहा तयार करण्याचं थोडफार सामान, थोडंफार चहा विकण्याचं सामान. असं. रॉकेलवर चालणारा स्टोव्ह, दोन तपेल्या. काही कप, काही ग्लास, किटली असं किडुकमिडुक. खोकड्यातच एक प्रतिष्ठित कोपरा आहे. इथं त्यांची पाच पुस्तकं हमखास विराजमान असतात. पावसाचे लक्षण दिसताच लक्ष्मण आपलं खोकडं पाणी लागणार नाही, अशा ठिकाणी हलवतात. दिमतीला प्लास्टिकची पन्नी असतेच. आणिबाणीत या पन्नीचंच छत केलं जातं. बाकीचं जाऊ द्या. पुस्तकं ओली व्हायला नकोत ना… गळून पडतात बिचारी!

४०० शाळांत पोहोचवली पुस्तके

आता दोन्ही मुलं त्यांच्या हाताशी आलेली आहेत. दररोज सकाळी ते सायकलीने खोकड्यावर येतात. दोन्हींपैकी कुण्या एका मुलाला खोकड्याची जबाबदारी सोपवतात. झोळीत पुस्तके घेतात आणि ठरलेल्या शाळेच्या दिशेने निघतात सायकलवरनं. दुपारपर्यंत परततात. मुलाला सांगतात जा जेवून ये आणि खोकडं सांभाळतात. भेटी देऊन झालेल्या शाळांची यादीच त्यांनी करून ठेवलीय. यादीत लहान-मोठ्या मिळून ८०० शाळा आहेत. पैकी ४०० हून जास्त शाळांनी राव यांची पुस्तके विकत घेऊन आपापल्या वाचनालयांची शोभा वाढवली आहे. उर्वरित शाळांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

राव सांगतात, ‘‘एखाद्या शिक्षकाने मला बाहेर निघा म्हणून सांगितले तरी मी नाराज होत नाही. निघा सांगणारा शिक्षक वाईट नाही, तो दिवसच आपल्यासाठी वाईट होता म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच शिक्षकाची भेट घेतो. मी तोवर प्रयत्न सुरू ठेवतो, जोवर ते माझ्या पुस्तकावरून नजर फिरवायला तयार होत नाहीत.’’

पुस्तके नाहीत, तोच एक दरिद्री

दिल्लीतील अंगावर येणारी ट्रॅफिक आणि कडक उन, कडक थंडी अशा स्थितीतही ते सायकलीनेच फिरतात. बस वा रिक्षाचे भाडे ते भागवू शकत नाहीत. पुस्तके लिहिणे आणि ती स्वत: प्रकाशित करणे आणि स्वत: विकणे हे सगळे कुणालाही अतर्क्य आणि अशक्यही वाटावे असेच आहे, पण लक्ष्मण यांचा दृष्टिकोनच वेगळा आहे. ते म्हणतात, ‘‘पैसे कमवण्यात मला रस नाही. त्यासाठी माझा चहाचा धंदा मला पुरेसा आहे. पुस्तकांवर प्रेम न करणारा धनाढ्य माणूसही मला खरं तर दरिद्री वाटतो. पैशांच्या दृष्टीनं मी गरिब असलो तरी लेखक म्हणून जगणं मला कमालीचा आनंद आणि कमालीचे समाधान मिळवून देते.’’

पत्नी रेखा, मुले हितेश आणि परेश असे राव यांचे चौकोनी कुटुंब आहे. भाड्याच्या घरात ते रहातात. राव आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊ इच्छितात. राव यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या लेखनाच्या छंदाने रेखा गोंधळून गेल्या होत्या. राव यांच्याशी जुळवून घेणे त्यांना कठीण झाले होते, पण पुढे सगळे कळतही गेले आणि वळतही गेले.

राव सांगतात, ‘‘अनेकांच्या दृष्टीने मी एक मुर्ख माणूस आहे. आजही असे बरेच लोक आहेत, पण पूर्वीपेक्षा त्यांची संख्या जरा कमी झालेली आहे म्हणा.’’ विष्णू दिगंबर मार्गावरील अन्य दुकानदार आणि अन्य चहावाल्यांना राव म्हणजे एक अजब रसायन असेच वाटते. राव म्हणतात, ‘‘माझ्यापासून ते जरा अंतर राखूनच असतात. त्यांना माहिती आहे, एकतर मी त्यांच्यासारखा सामान्य चहावाला नाही आणि बरं पुन्हा एखादा श्रीमंत वा सुप्रसिद्ध असा लेखकही नाही.’’

image


राव मूळचे अमरावतीतले

राव मूळचे महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातले रहिवासी आहेत. त्यांचे तिन्ही भाऊ अमरावतीतच राहातात आणि त्यांच्या तुलनेत परिस्थितीही या भावंडांची चांगली आहे. एक प्राध्यापक आहे, दुसरा अकाउंटंट आहे तर तिसरा भाऊ पिढीजात शेती व्यवसायात आहे. राव सांगतात, ‘‘मी घरून पळून आलो तेव्हा माझ्या खिशात फक्त ४० रुपये होते. मला जग पहायचे होते. शिकायचे होते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तके लिहायची होती.’’

घरून निघाले तसे पहिल्यांदा लक्ष्मण भोपाळला पोहोचले. घरगडी म्हणून लागले. भांडे घासण्यापासून कपडे धुण्यापर्यंत सगळी कामे इथं त्यांना करावी लागत. तीनवेळ जेवण आणि निजायला जागा असा मोबदला त्याबद्दल मिळे. पण या मालकाने आणखी एक गोष्ट लक्ष्मण यांना मोबदला म्हणून दिली आणि ती म्हणजे शिक्षण!

राव सांगतात, ‘‘त्यांनी मला शाळेत जाण्याची सूट दिली होती. काम करत करत मी तिथेच मॅट्रिक झालो.’’

पुस्तकांसाठी जंग जंग...दरियागंज!

लक्ष्मण १९७५ मध्ये दिल्लीला आले आणि पडेल ते काम करू लागले. बांधकाम मजुर म्हणून अनेक वर्षे त्यांनी काढली. ढाब्यांवर भांडी घासण्याचे कामही केले. १९८० मध्ये चहा विकायला सुरवात केली. हा व्यवसाय आजतागायत सुरू आहे. पण त्यांचे जग खरं तर आजही पुस्तकांभोवतीच फिरत असतं. ते म्हणतात, ‘‘मी माझा संपूर्ण रविवार दरियागंजमधल्या गल्ल्यांमध्ये पुस्तकांच्या शोधात घालवून देत असे.’’ वाचनाच्या या छंदाने त्यांना प्रेमचंदसारख्या हिंदी लेखकांचा जिथे परिचय करून दिला, तिथेच शेक्सपियर आणि जॉर्ज बर्नार्ड शॉसारखे इंग्रजी लेखकही त्यांच्या नजरेखालून गेले.

रसिक हो घ्या इथे विश्रांती...

लक्ष्मण यांच्या चहाच्या खोकड्यावर येणारे बरेचसे लोक तर असे आहेत, ज्यांना चहाचे घोट रिचवत रिचवत लक्ष्मण यांच्यासोबत गप्पांचा फडही रंगवायचा असतो. अर्थात हे सगळे लक्ष्मण यांचे हक्काचे वाचक. विष्णू दिगंबर मार्गावरील कार्यालयांतून काम करणाऱ्या अनेकांना माहिती आहे लक्ष्मण लेखक आहेत म्हणून ही मंडळी मग हमखास इथं गप्पांसाठी येतेच. सुशील शर्मा हे अशा मंडळींपैकी एक. कामावरून सुटले, की सरळसोट इथं येतात. चहाचा घोट लक्ष्मण यांच्या पुस्तकातील एखाद्या उताऱ्याचे बोट धरून गप्पाष्टकाला सुरवात करतात… आणि सुरूच होते मग लक्ष्मणायण… लक्ष्मण यांच्याकडे विष्णू दिगंबर मार्गावरीलच मंडळी येते, असे नाही. असेच अन्य लोकही येतात.

एका कार्यालयाचे व्यवस्थापक असलेले संजीव शर्मा हे असेच. शर्मा म्हणतात, ‘‘माझे ऑफिस सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये आहे आणि मी इथपर्यंत स्कुटर दामटत काही केवळ चहासाठी येत नाही. मला इथं ‘क्वालिटी टाइम’ घालवायचा असतो. लक्ष्मण राव यांच्याशी मी रोजच्या बातम्यांसह वैचारिक विषयांवरही गप्पा करतो. मी इथून घरी परततो तेव्हा माझ्या माहितीत, ज्ञानात दोन चांगल्या गोष्टींची भर पडलेली असते.’’

शिक्षित आणि अभिजात मंडळींसह विष्णू दिगंबर मार्गावर लहानमोठे धंदे करून उपजिविका भागवणाऱ्या अनेकांना लक्ष्मण यांच्यामुळे वाचनाचा ‘आजार’ जडलेला आहे. एका इमारतीतील सुरक्षा रक्षक शिवकुमार चंद्र हे आता लक्ष्मण राव यांचे निष्ठावंत वाचक आहेत. शिवकुमार म्हणतात, ‘‘मला राव यांची पुस्तके आवडतात. वाचताना मजा येते. ‘नर्मदा’ आणि ‘रामदास’ या त्यांच्या कादंबऱ्या तर केवळ अप्रतिम आहेत. मी माझ्या वडिलांनाही या दोन्ही कादंबऱ्या वाचायला दिल्या आणि त्यांनाही त्या फार आवडल्या.’’ शिवकुमार सांगतात, की परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकानेच त्यांना पहिल्यांदा लक्ष्मण यांचे पुस्तक वाचायला दिले होते.

ओलांडिली ऐसी लक्ष्मणरेषा...

लक्ष्मण यांचे आयुष्य आणि जगण्याची त्यांची एकूण तऱ्हा बघितली तर कुणालाही वाटेल, की जगण्याच्या संघर्षाभोवती त्यांचे कथानक घिरट्या घालत असावे. तसे काहीही नाही. लक्ष्मण यांच्या पुस्तकात ना वर्गसंघर्ष आहे ना अर्थसंघर्ष. लक्ष्मण यांच्या कादंबऱ्यांतील बहुतांश पात्रेही श्रीमंत आहेत. ऐशआरामाची प्रत्येक वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कादंबऱ्या व्यक्तिकेंद्रित स्वरूपाच्या आहेत. अर्थात या व्यक्तींच्या वाट्याला संघर्ष नाही, असेही नाही, पण तो जगण्याचा संघर्ष नाही, तर प्रेम मिळवण्यासाठीचा संघर्ष आहे. कलात्मक परिपूर्णता प्राप्त करण्यासाठीचा संघर्ष आहे. मोठेपणा मिळवण्याचा संघर्ष आहे.

लक्ष्मण यांनी या अर्थाने लक्ष्मणरेषा ओलांडलेली आहे. साधनसामुग्रीच्या उपलब्धतेबाबत अभावाचा सामना करणारे त्यांचे जीवनही अभावाच्या कारणाने दु:खी नाही आणि त्यांची साहित्यसंपदाही या अभावाचे रडगाणे गाणारी नाही. शेवटी त्यांचे एकच सांगणे…

‘‘मी लिहिलेली पुस्तके माझ्या आयुष्यावर आधारलेली नाहीत. तरीही माझी पुस्तके वास्तववादी आहेत, यावर मी ठाम आहे. स्वत:च्या अवतीभवती मी जे बघत आलेलो आहे, तेच लिहित आलेलो आहे. उलट जे स्वत: अनुभवलेले असते, ते लिहिले तर अतिशयोक्तीचा धोका असतो. पण जे बघितलेले आहे, ते लिहिले तर एक प्रकारची तटस्थता या लिखाणात असते. तटस्थता हाच खरं तर वास्तववादी लिखाणाचा मानदंड असला पाहिजे.’’