कॉर्पोरेटमधील तरुणीची विपणन क्षेत्रातील उंच भरारी : मितिका कुलश्रेष्ठ !

मितिका कुलश्रेष्ठ – तरुण आणि धडाडीची मार्केटिंग तज्ज्ञ... तरुण वयातच कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांनी उंच भरारी घेतली.. भारतातील वेरिसाईन (VeriSign) या कंपनीच्या मार्केटींग विभागाची मुख्य म्हणून उत्तम कामगिरी करत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.

0

‘आजचे जग हे मार्केर्टिंगचे जग आहे...’ हे वाक्य हल्ली येताजाता आपल्या कानावर पडत असते. ते खरेही आहे. कोणत्याही गोष्टीच्या यशात मार्केर्टिंगचा अर्थात विपणनाचा वाटा हा मोठाच असतो. सहाजिकच कंपनीमध्येही या विभागाला विशेष महत्व असते आणि या विभागाची सूत्रे सांभाळण्यासाठी सक्षम हातच लागतात...अनेक तरुण-तरुणींनाही मार्केर्टिंग क्षेत्रातील संधी खुणावत असतात. मितिका कुलश्रेष्ठ यांची या क्षेत्रातील कारकिर्द अशा तरुणांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरु शकते. लहान वयातच कॉर्पोरेट जगात मोठ्या स्थानावर पोहचलेल्या मितिका यांच्या यशाचा कानमंत्र जाणून घेण्याचा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मितिका कुलश्रेष्ठ
मितिका कुलश्रेष्ठ

मितिका कुलश्रेष्ठ या जन्माने दिल्लीकर... त्या लहानाच्या मोठ्याही तेथेच झाल्या. मात्र त्यांचे आईवडील मुळचे उत्तर प्रदेशमधील मथुरेचे... दोघांचीही कुटुंबं मोठी होती. वडीलांना आठ भावंडे होती तर आईला पाच... मितिकाची आई शास्त्रज्ञ होती तर वडील संख्याशास्त्रज्ञ... या पार्श्वभूमीमुळे घरामध्ये सहाजिकच शिक्षणला खूप प्राधान्य होते. मितिकाचे शिक्षण स्प्रिंगडेल्स नावाच्या एका अतिशय चांगल्या खासगी शाळेत झाले. मितिका आणि त्यांच्या मोठ्या भावाला सर्वोत्तम ते देण्याचा त्यांच्या आईवडीलांचा प्रयत्न असे. “ मी एका सर्वसामान्य मध्यवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झाले. दिल्लीच्या स्टीफन्स महाविद्यालयात मी फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. मी २००१ साली पदवीधर झाले. खरे तर स्टीफन्सला असताना मी पहिल्यांदाच आपल्याला काय करायला आव़डेल याविषयी गांभिर्याने विचार करण्यास सुरुवात केली,” मितिका सांगतात. त्यांच्या मते हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगिण विकासाबाबतही जागरुक होते. त्यामुळेच तेथे केवळ अभ्यासालाच महत्व नव्हते, तर आजुबाजूला होत असणाऱ्या विविध घडामोडींमध्ये सहभागी होणेही आवश्यक होते. “ स्टीफन्सने मला सर्वांगिण शिक्षण दिले. तसेच माझ्या संगोपनातून किंवा माझ्यावर झालेल्या संस्कारांमधून मी एक गोष्ट शिकले, ते म्हणजे, सुरुवातीला गोष्टी जरी धुसर दिसत असल्या तरी पुन्हा एकदा मागे वळून पहाता (सिंहावलोकन करताना), तुम्हाला त्या गोष्टींचा खरा अर्थ समजतो. त्यामुळे एकाग्रता आणि सकारात्मकता अंगी बाळगा,” मितिका सांगतात.

पदव्युत्तर शिक्षण संपताच मितिका एका स्टार्ट-अप कंपनीमध्ये नोकरीला लागल्या. “ मार्केटिंग आणि गोष्टींच्या व्यावसायिक अंगाबद्दल मला विशेष रस असल्याचे लवकरच माझ्या लक्षात आले. कंपनीच्या संस्थापकांनीही मला खूपच प्रोत्साहन दिले. तसेच हे आव्हान स्विकारण्यासाठी मला सर्वोतोपरी मदत तर केलीच पण त्याचबरोबर माझा आत्मविश्वासही प्रचंड वाढवला. खरे तर या कंपनीत सुमारे दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांनीच मला इंडीयन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी, हैदराबाद) येथे जाऊन एमबीए करण्यासाठी प्रवृत्त केले,” मितिका कृतज्ञतेने सांगतात.

आयएसबी त्यांच्यासाठी खूपच चांगला अनुभव होता. येथील शिक्षक उत्कृष्ट होते. तसेच त्यांचे सहअध्यायीही मस्त होते. भारतात आयएसबीतर्फे पाश्चिमात्य पद्धतीचे शिक्षण दिले जाते. मितिका यांच्या मते या अनुभवातून तुमच्या व्यवसायविषयक कौशल्यांना अधिक धार येते.

आयएसबीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये एयरटेल या नामांकीत कंपनीत नोकरीस सुरुवात केली. सुमारे दिड वर्ष तेथे काम केल्यानंतर त्यांनी लग्न करुन बंगलोरला (आताचे बंगळूरु) जाण्याचा निर्णय घेतला. “ तेथील रिचकोर लाईफसायन्सेस या कंपनीच्या कोअर टिममध्ये मला काम मिळाले. त्यांच्या बिझनेस डेवलपमेंट टिम अर्थात व्यवसाय विकास शाखेत जेंव्हा मी कामाला सुरुवात केली तेंव्हा त्या टिममध्ये आम्ही केवळ तीन जण होतो आणि दोन वर्षांनंतर जेंव्हा मी ही कंपनी सोडली, तेंव्हा हा आकडा ३० झाला होता,” त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या मते स्टार्ट-अप मध्ये काम करण्याचा अनुभव हा थरारक असतो. “कागदावर योजना आखून, त्याची स्वतंत्रपणे अंमलबजावणी करण्याचा थराराक अनुभव स्टार्ट-अप कंपनीतच तुम्हाला मिळू शकतो,” त्या सांगतात. दोन वर्षे तेथे काम केल्यानंतर मात्र आईवडीलांच्या जवळ रहाण्याच्या हेतूने त्या दिल्लीला पुन्हा परतल्या आणि पुन्हा एकदा एयरटेलमध्ये कामाला सुरुवात केली. तेथे त्यांनी कंपनीच्या डेटा आणि ब्रॉडबॅंड ऍक्विजिशन टिममध्ये पुढील दोन वर्षे काम केले.

मितिका यांच्या मते कारकिर्दीतील सुरुवातीचा काळ हा खूपच महत्वाचा असतो. “तुम्हाला नक्की काय करायला आवडते, कामाच्या ठिकाणी कशा प्रकारचे वातावरण आवडते आणि मुख्य म्हणजे कशा प्रकारच्या सहकाऱ्यांबरोबर काम करणे तुम्हाला जास्त सुलभ जाते, याची जाणीव तुम्हाला सुरुवातीच्या काही वर्षातच होते. मीदेखील कायम हा शोध सुरु ठेवला होता. या काळात मला प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टी म्हणजे, प्रभावी काम माझ्यासाठी खूपच आवश्यक गोष्ट आहे, त्याचबरोबर निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पुर्तता केल्यास संस्थेनेदेखील काहीशी लवचिकता दाखवली पाहिजे, आणि मुख्य म्हणजे चाणाक्ष आणि ध्येयाने झपाटलेल्या सहकाऱ्यांबरोबर काम करणे मला आवडते. माझ्यादृष्टीने या तीन गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. नेमके या सर्वच गोष्टी मला वेरिसाईनमध्ये (VeriSign) मिळाल्या आणि मी त्यांच्या विपणन विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्विकारली,” त्या सांगतात. एका मित्राकडून त्यांना वेरीसाईनमधील या संधीविषयी समजले होते. “ नाती आणि माणसे माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. याच लोकांच्या माध्यमातून अनेकदा संधी चालून येतात. तुमच्या नातेसंबंधांना वेळ द्या आणि या नात्यांची जपणूक करा. कारण सर्व चांगल्या गोष्टी नात्यांमधूनच घडतात, यावर माझा विश्वास आहे,” मितिका सांगतात.

विपणन क्षेत्रात मिळालेल्या यशाबाबत त्या सांगतात, “तुमचा तुमच्या ग्राहकांशी किती घनिष्ट संबंध आहे यावर तुमचे या क्षेत्रातील यश अवलंबून आहे. ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ्या.त्यातूनच काय केले पाहिजे हे तुम्हाला समजेल. हाच यशाचा मंत्र आहे.” तसेच स्वतःच्या वाढीसाठी सतत प्रयत्नशील रहाणे, शिकत रहाणे आणि कोणत्याही परिस्थितीत न थंडावता काम करत रहाणे, हेच आपले ध्येय असल्याचेही त्या आवर्जून सांगतात.

या क्षेत्रात एवढी वर्षे घालविल्यानंतर स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेतील फरक त्यांना जाणवू लागला आहे. “ यापूर्वी माझे याकडे लक्ष गेले नव्हते. मात्र लग्न आणि मुलांचा विचार करुन अनेक महिला स्वतःच स्वतःवर बंधने घालून घेतात हे मला जाणवले. या गोष्टी फारशा उघड नसल्या तरी त्या अशा आहेत ज्या आपल्या सामाजिक रचनेचाच एक भाग बनल्या आहेत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे,” त्या तळमळीने सांगतात.

आपल्या निवडींबाबत ठाम राहण्याचा सल्ला मितिका आजच्या महिलांना देतात. “ तुमच्या निवडीबाबत आत्मविश्वास बाळगा आणि त्याबाबत कसलाही अपराधी भाव मनात ठेवू नका. कारण तुमच्या निवडीबाबत तुम्ही स्वतः किती ठाम आहात, यावरच तुमचे यश खऱ्या अर्थाने अवलंबून आहे,” हाच मितिका यांचा यशाचा कानमंत्र आहे.