चाळीस वर्षांचा बोन्साय कलेचा वसा निकुंज आणि ज्योती पारेख

चाळीस वर्षांचा बोन्साय कलेचा वसा
निकुंज आणि ज्योती पारेख

Thursday November 26, 2015,

3 min Read

आंबा, चिकू, पेरु, करवंद, रतांबा, फणस, अननस...भारतात फळं देणाऱ्या वृक्षांची कमतरता नाही. केळी, चिकूसारखी बारमाही फळं देणारी झाडं...तर आंबा, फणसासारखं वर्षांतून एकदाच फळं देणारी झाडं...फळझाडांची अशी ही वर्गवारी मोठी आहे. भारतातील याच ट्रॉपिकल झाडांची ओळख संपूर्ण जगाला व्हावी म्हणून निकुंज आणि ज्योती पारेख हे दांपत्य गेली अनेक वर्ष झटताहेत. मात्र बोन्सायच्या माध्यमातून...

निकुंज आणि ज्योती पारेख गेली चाळीस वर्ष बोन्सायच्या क्षेत्रात काम करताहेत. वर्ल्ड बोन्साय फ्रेंडशीप फेडरेशन, बोन्साय कल्ब इंटरनॅशनल या संस्थांचं अध्यक्षपद भुषवत पारेख यांनी मुंबईबरोबरीनचं भारतभरात बावीस ठिकाणी आणि परदेशात मस्कत इथे बोन्साय कल्बच्या माध्यमातून बोन्साय कलेचा प्रचार आणि प्रसाराचं व्रत स्विकारलय आणि म्हणूनच निकुंज पारेख यांनी भारतात बोन्सायचा पाया रचलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही.

image


‘’बोन्साय पद्धत जपानी पण झाडं मात्र आपल्या मातीतली’’ या विचारानं प्रेरित होत चिंच, आवळा, चिकू, या फळझाडांवर पारेख यांनी प्रयोग केले तर मधूकामिनी (फुलझाड), वड, पिंपळ, उंबर अशा जंगलात वाढणाऱ्या वृक्षांचंही त्यांनी यशस्वीपणे बोन्साय केलं. बोन्सायसाठी उन,पाणी आणि खत हे तीन महत्वाचे घटक. या तीन घटकांच्या उपलब्धतेनुसार बोन्सायसाठी झाड निवडणं आवश्यक असल्याची माहिती ज्योती पारेख देतात. “अनेकांना बोगनवेल आवडते. घराच्या बाल्कनीत किंवा बॉक्स ग्रीलमध्ये बोगनवेलेची लाल, पिवळी, केशरी,गुलाबी फुलं खुपच सुंदर दिसतात. मात्र तुमच्याकडे ऊन कमी येत असेल तर तुमची बोगनवेल फुलणार नाही, नुसतीच पानं वाढत जातील. त्यामुळे बोन्साय करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी’’ अशी खास टीप पारेख काकू देतात. योग्य माहिती आणि ज्ञानचं उत्तम रिझल्ट देऊ शकते, म्हणूनच आम्ही शिकवून तयार केलेले शिक्षक अनेक ठिकाणी बोन्साय लागवडीसाठी मार्गदर्शन करतात. बोन्सायसाठी झाड निवडताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की, सगळ्याच झाडांचं बोन्साय होत नाही. पपई, केळं, नारळ तसचं हिरवी दांडी असलेल्या झाडांचं बोन्साय होत नाही, कारण या झाडांच्या फांद्या कापल्यानं त्यांना नव्या फांद्या फुटत नाहीत. बोन्साय म्हणजे मोठ्या डेरेदार वृक्षाचं छोट रुप. त्यामुळे पानांचा आकार, खोडाची जाडी, बोन्सायची मूळं जमिनीत किती आणि जमिनीवर किती आणि कशी दिसतील या सगळ्याचा विचार करुन तुम्हाला तुमचं बोन्साय डिझाईन करावं लागतं. एखादं बोन्साय त्याच्या नैसर्गिक वृक्षाइतकंच हुबेहुब दिसायला हवं...अशी योग्य देखभाल केलेली बोन्साय वर्षानुवर्ष टिकतात.

“बोन्साय म्हणजे झाडांवर अत्याचार”... बोन्साय कलेवर हा आरोप नेहमीच केला जातो. मात्र पारेख काका बोन्सायमागचं विज्ञान सांगत हा आरोप खोडून काढतात. “माणसांची आणि झाडांची फिजिओलॉजी वेगळी आहे. माणसाचं बोट कापलं तर आपल्याला वेदना होणार, रक्त येणार, मात्र झाडांची फांदी कापली तर त्यांची वाढ जोमानं होते. एकाच्या दोन, दोनाच्या चार असं झाड चोहोबाजूंनी बहरत जातं. जितक्या फांद्या जास्त तेवढी फुलं जास्त, जेवढी फुलं जास्त, तेवढी फळं जास्त”.

बॉटनी शिकवणाऱ्या अनेक कॉलेजेस् मध्ये पारेख सरांची पुस्तकं अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत.बोन्सायवरील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारतीय ट्रॉपीकल वृक्षांवर माहिती देण्यासाठी पारेख यांना आग्रहाचं निमंत्रण असतं. पारेख यांनी केलेल्या बोन्सायवरील संशोधनाची दखल घेत एकोणसाठ देशांनी त्यांचा सन्मान केलाय. बोन्साय म्हणजे निखळ आनंद देणारी कला, निसर्गाच्या जवळ जाणारी, परमेश्वराशी दुवा साधणारी साधना या नित्सिम भावनेतून पारेख दांपत्य बोन्साय कलेचा हा वसा देत जगभर फिरताहेत. बोन्सायच्या निर्मितीतील आनंद आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून विविध बोन्साय प्रदर्शन आणि वर्कशॉपचं आयोजन केलं जातं.

image


निकुंज पारेख यांच्या कार्याची दखल घेत २०१२ मध्ये जपान काउंसलेटतर्फे निकुंज पारेख यांचा विशेष गौरव करण्यात आला. तीन दशकाहुन अधिक काळ बोन्साय विषयातील त्यांच्या संशोधनाबद्दल आणि जपानी- भारतीय जनतेमध्ये हा मैत्रीचा सेतू बांधल्याबद्दल निकुंज यांचा हा सन्मान करण्यात आला.

“आम्ही आता म्हातारे झालो, तरुणांचे हात या मातीला लागतील तर बोन्साय या कलेचं भविष्य सुरक्षित राहील”. पारेख काका हसत हसत सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांचं जाळं बोन्सायच्या मुळांची आठवण करुन देतात. छोटी परिपक्व मूळं...आपल्या झाडाकडे अभिमानानं पहाणारी...

image