दुष्काळग्रस्त उत्तर महाराष्ट्रात शिरपूर पॅटर्नची जलक्रांती करणारे आधुनिक भगिरथ : सुरेश खानापूरकर

0


महाराष्ट्रात सध्या १९७२ नंतरची सर्वात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश्य स्थिती जाणवते आहे. ही स्थिती काही अचानक निर्माण झाली नाही. गेल्या तीन चार वर्षापासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत राहिले आहे. त्यावर जलसंधारणाच्या माध्यमातून परिणामकारक उपाय योजना करता येऊ शकते मात्र त्याबाबत प्रभावीपणाने उपाय योजना करण्यात लक्ष देण्यात आले नाही.

उत्तर महाराष्ट्रात नर्मदा, नारपार, तापी या नद्यांच्या पाण्याचा प्रभावी वापर मागील काळात करण्यात आला मात्र या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्यावर अनेक धरणे झाली तरी सिंचनाच्या बाबतीत टंचाईची स्थिती अलिकडच्या काळात पहायला मिळत होती. धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यातही या टंचाईच्या झळा पहायला मिळत होत्या त्यात शिरपूर परिसारात ४६ गावांचा पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता. जानेवारी महिन्यापासूनच इथल्या वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी देण्याची मागणी केली जाऊ लागली होती. मात्र सन २००४ नंतर हळुहळू दोन तीन वर्षात हे चित्र पालटले आणि आज सारा महाराष्ट्र भीषण पाणीटंचाईला सामोरा जात असताना शिरपूर परिसरात पाण्याची टंचाई जाणवत नसून लोकांनी तिबार  पिके घेऊनही मुबलक पाणीसाठे  उपलब्ध राहिले आहेत. ही जलक्रांती केली आहे भुगर्भ शास्त्रज्ञ आणि अभियंता सुरेश खानापूरकर यांनी. स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधी अमरिश पटेल यांनी खानापूरकर यांना निमंत्रण दिले आणि त्यांनी भुगर्भातील पाणीसाठे तर निर्माण केलेच शिवाय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर शाश्वत पाणीसाठे तयार करून दिले.

भुगर्भ शास्त्रज्ञ आणि अभियंता सुरेश खानापूरकर
भुगर्भ शास्त्रज्ञ आणि अभियंता सुरेश खानापूरकर

या शिरपूर पँटर्नचा व्यापक प्रमाणावर वापर करत आज परिसरातील अनेक तालुक्यात पाण्याच्या टंचाईवर कायमची मात करण्यात आली आहे. मे अखेर राज्यात लातुर सारख्या शहरात पिण्याचे पाणी नसताना शिरपूर परिसरात हिरवी शेती आणि मुबलक पाणी पहायला मिळते आहे. या कामाची दखल घेऊन जलयुक्त शिवार या नव्या योजनेत शिरपूर पँटर्नचे अनुकरण केले आहे. दुष्काळाची पावले ओळखून वेळीच दूरदृष्टीने नियोजन केल्याने खानापूरकर यांच्या या कामाला अनेकांनी आज वाखाणले आहे. युअर स्टोरीच्या वाचकांना या कामाची माहिती देण्यासाठी खानापूरकर यांच्या या यशोगाथा देत आहोत.

जमिनीच्या खाली पाण्याची पातळी वेगाने घटत आहे, पावसाचे पाणी वेगाने कमी होते आहे. त्यामुळे धरणे आटली आहेत. आणि राज्यात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. हे ओळखून खानापूरकर यांना स्थानिक लोकप्रतिनिधी अमरिश पटेल यांनी २००४ मध्ये तीन कोटी रुपये उपलब्ध करून दिले. या सा-या यशाच्या कहाणीची माहिती देताना खानापूरकर म्हणाले की, “राज्यातील ८१.२० टक्के जमीनीखाली बेसाल्टचा थर आहे. यामध्ये जास्त पाणी मुरण्याची शक्यता नसते. त्या खाली असलेल्या मुरुमाड जमिनीत पाणि मुरते आणि ते आपल्याला विहीरी आणि बोरवेल मधून मिळते.” खानापुरकर आणि त्यांच्या टीमने काय केलं तर हा दगडी थर काढून टाकला त्यामुळे पाणी मुरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुर्वीपेक्षा आठपट जास्त पाणी जमिनीत जिरण्यास मदत झाली. त्यामुळे भुगर्भात पाणीसाठे वाढले असे खानापूरकर सांगतात. या शिवाय नद्या, नाले आणि पाणी वाहून नेणा-या जागांवर खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आली. नद्या नाले यावर ठराविक अंतरावर लहान लहान बंधारे वीस फुटांचे घेण्यात आले.

भुगर्भ पाण्याच्या सर्वेक्षण विकास संस्थेत २००४ मध्ये खानापूरकर यांची नेमणूक झाली. तेथे ज्येष्ठ भुगर्भ शास्त्रज्ञ म्हणून ते काम करत असताना शिरपूरचे आमदार अमरिश पटेल यांनी त्यांना निमंत्रण दिले. “मी त्यांना काही कठीण गोष्टींची कल्पना दिली पण त्यांनी सर्व मान्य केल्या आणि तीन कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली” खानापूरकर सांगतात. आणि कामे सुरू झाली.

आज खानापूरकर यांच्या शिरपूर पँटर्नचा देशभर इतका बोलबाला झाला आहे की, रास्वसंघाचे प्रमुख मोहन भागवत, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पासून सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे काम पाहिले आणि कौतुक केले आहे. मराठवाड्यातील जालना येथील उद्योजक रघूनंदन लाहोटी यानी तर त्यांच्या मित्रपरिवारासह भेट दिली आणि एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करून खानापूरकर यांच्याकधून हे काम समजावून घेतले. आज आपल्या पत्नी आणि मुलासह खानापूरकर अनेक गावातून येणा-या आमंत्रणांचा स्विकार करत जातात आणि हा पँटर्न समाजावून सांगतात.

या शिरपूर पँटर्नच्या यशाबद्दल अमरिश पटेल म्हणाले की, “ आम्ही फारच कमी खर्चात ही कामे केली आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचे संवर्धन केल्याने आमच्या शेतीचे उत्पादन वाढले आहे.” ते म्हणा्ले की दरवर्षी आम्ही ठराविक गावे घेऊन त्यात चेकडँम बांधणे खोलीकरण रुंदीकरण करणे ही कामे घेत आहोत”.

गोडी गावातील शेतकरी सुमन धोंडे यांनी शिरपूर पँटर्न नंतर शेतीचे उत्पादन वाढल्याचे सांगितले. आणखी एक शेतकरी विजय पाटील यांनी याबाबत ते नशिबवान असल्याचे सांगितले की, चार महिन्यापूर्वी त्यांनी शेतात बोरवेल घेतली असता लगेच पाणी लागले. आज शिरपूर परिसरातील १६० गावात हा पँटर्न यशस्वी झाला आहे. १०० गावात त्याची नव्याने कामे सुरु आहेत.

शिरपूर पँटर्न ने राज्यात मोठी जलक्रांती केली आहे. शाश्वत पाण्याच्या स्त्रोतांसाठी हा पँटर्न उपयुक्त असल्याचे सिध्द झाले आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारनेही त्याचे महत्व मान्य केले आहे. कमी खर्चात सिंचनाच्या सुविधा देणा-या या योजनेचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे. पावसाच्या पाण्याशिवाय जमिनीतील पाणीसाठे वाचवले पाहिजेत तरच येणा-या भविष्यातील पिढ्या आपल्याला धन्यवाद देतील!

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

'जलदिंडी' करतेय नदी संवर्धनाचा जागर

दुष्काळग्रस्त औसा तालुक्यातील महिला बचत गटाची कामगिरी : सॅनिटरी नॅपकिनची अमेरिकेला निर्यात

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !