कोटीचा पॉकेटमनी ‘कॅलोस’च्या कल्पनेतून, प्रियांका अग्रवाल… एक कॉलेजियन बिझनेस टायकून!

कोटीचा पॉकेटमनी ‘कॅलोस’च्या कल्पनेतून, प्रियांका अग्रवाल… एक कॉलेजियन बिझनेस टायकून!

Sunday December 20, 2015,

8 min Read

उण्यापुऱ्या पंचविशीत वा गद्धेपंचविशीत म्हणा… तुम्ही असाल ना एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत कुठल्या तरी विभागाचे प्रमुख. मस्त जगतही असाल. माहितीच्या मायाजालात आपापले सामाजिक भावविश्व गुंफणारा भोवतालही तुम्हाला लाभलेला असेल. ‘ध्येय’ टॅग करणारा… वगैरे.

…पण आता जी गोष्ट तुम्ही वाचणार आहात, ती वाचल्यानंतर तुमच्याही लक्षात येईलच, की अरे आपली गाडी चुकली होती कुठेतरी! माझंही असंच झालं होतं. एक तरुणी नव्हे एक मुलगी, तिनं कॉलेजात असतानाच तिला हवं ते मिळवलेलं होतं… आणि तेही काही साधंसुधं नाही… तर इतर आमच्यासारख्यांना आमच्या महत्त्वाकांक्षी दहा वर्षांच्या ‘प्लॅनिंग’नंतरही जे मोठ्या मुश्किलीनं मिळतं ते तिनं कॉलेजची मुलगी असतानाच मिळवलेलं होतं.

वैयक्तिक प्रसाधन सामुग्रीच्या शुंखलेची कल्पना तिला सुचली तेव्हा ती अवघी विशीची होती. पंचविशी मग कुठे राहिली? ‘कॅलोस’ ही तिची कल्पना पुढे गर्भश्रीमंतही झाली, हे विशेष! सहा राज्यांमध्ये ‘कॅलोस’ आपल्या सौंदर्याची अक्षरश: उधळण आता करते आहे. प्रत्येक राज्यात कॅलोसचे शंभरावर स्टोअर्स आहेत, यावरून लक्षात येतेच ना, हे शंभर नंबरी यश आहे म्हणून… अगदी सोन्यासारखं!

image


प्रियांका एक प्रतिभासंपन्न प्रतिष्ठान!

सौंदर्यप्रसाधनांतील वैशिष्ट्यपूर्ण वैयक्तिक निगेचा मार्ग व्यवसाय म्हणून चोखाळताना प्रियांका अग्रवाल यांनी हे काही फार ठरवून केलेले नव्हते. योगायोगच म्हणा याला. आपल्या बळावर त्या स्वत:च एक प्रतिभासंपन्न असे प्रतिष्ठान म्हणून प्रतिष्ठापित झाल्या हाही तसाच एक योगायोग! ‘मी यू केले मी त्यू केले’, सांगणाऱ्यांपैकी त्या नाहीत. ‘मी अशी जोखीम पत्करली, असे आव्हान स्वीकारले’ म्हणून स्वत:ला मिरवणाऱ्यांपैकीही त्या नाहीत. अत्यंत उमेदवारीचा म्हणावे, अशा काळात ऐन तारुण्यात एक प्रयत्न आपण सुरू केला आणि त्याला फळे आली, एवढेच त्यांचे म्हणणे असते.

प्रियांका सांगतात, ‘‘इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र हे माझे आवडते विषय होते. क्रीडा आणि नृत्यावर माझे प्रेम. बालपणही माझे मजेत गेले. अनिश्चितता अशी नव्हतीच. सगळे आलबेल होते. मी जेव्हाही मागे वळून स्वत:कडे पाहते, आजवरचा माझा प्रवास पाहते, या सगळ्यांच्या दरम्यान अगदी कुठल्याही क्षणात ‘जोखीम पत्करणारी’ म्हणून मी स्वत:ची कल्पनाही करू शकत नाही.’’

पण म्हणतात ना… संधी जेव्हा दार ठोठावते, तेव्हा जे झोपा काढत नाहीत. संधीच्या स्वागतासाठी आपल्या मनाचीही दारे अगदी व्यवस्थित उघडतात, तेच खरे हुशार. तेच खरे प्रतिभावंत! प्रियांका यांच्याबाबतीत हेच लागू होते. त्या म्हणतात, ‘‘मी कॉलेजच्या दिवसांतच वडिलांच्या ऑफिसमध्ये वरचेवर पण दररोज जायला लागलेले होते. तिथले काम कसे चालते, ते पाहू लागलेले होते आणि यादरम्यान आपण आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, अशी जिद्द माझ्यातही बळावत चाललेली होती. वैयक्तिक निगा किंवा कॉस्मेटिक्स अशी कुठलीही हद्द या जिद्दीला अर्थातच नव्हती. सुरवातीला मला सलुन सुरू करायचे होते. केशकर्तन आणि सौंदर्याशी निगडित एका कोर्ससाठी मी एका नामांकित प्रशिक्षण संस्थेतून प्रवेशही घेतला. एखादे काम करायचे तर त्यातले सगळे बारकावे कळायला हवेत, हा माझा दृष्टिकोन त्यामागे होता. मी मग या सगळ्या बारकाव्यांत शिरले, खोलात गेले, पण मला पुढे हे सगळे निरस वाटू लागले. माझ्या लक्षात आले, की अरे आपला आनंद यात नाहीच.’’

पण म्हणून प्रियांका यांची पुढली वाटचाल मात्र मंदावली नाही. आपल्याला काय बरे करायला आवडेल, याबाबत त्यांनी पुनर्विलोकन सुरू केले. पुनर्विचार सुरू केला. आणि आपला स्वतंत्र व्यवसायाबाबतचा उत्साहही ओसंडता ठेवला.

प्रियांका सांगतात, ‘‘काही महिन्यांनंतर मी माझ्या वडिलांशी याविषयी बोलले. नंतर माझ्या लक्षात आले, की मला खरंच काही आवडत असेल तर ते म्हणजे विकसित होत जाणारा व्यवसाय. वडिलांनी मला सुचवले आणि मी वैयक्तिक कॉस्मेटिक निगेचा मार्ग धरला. आधी मी त्यावर हसले होते, हे विशेष!’’

‘‘जेव्हा मी हा व्यवसाय सुरू करायला घेतला तेव्हा मी जे काही कार्यालयात पाहिले होते, त्याव्यतिरिक्त मला ‘एफएमसीजी’ मार्केटची पद्धत, यंत्रणा, संचालन असे बाकीचे काहीही माहिती नव्हते. म्हणून मग ऑफिसातल्या इतरांच्या मते मी केवळ उन्हाळ्याची सुटी घालवायला आलेली मालकाची मुलगी तेवढे होते. ते वरवरच्याच गोष्टी मला सांगत. आता मी एमबीए काही यासाठी केलेले नव्हते. हे लोक ज्या गोष्टी सांगत त्या तर खरं पाहता बीबीए पातळीच्याही नव्हत्या.’’

जेव्हा काहीही तुमच्या आवाक्यात नसते

प्रियांका कॉलेजात होती, केवळ हेच काय ते अडचणीचे होते, असे नाही. तर प्रियांकासमोर दोन समान ध्येयं होती. दोन सारखे प्राधान्यक्रम होते. तिसरीकडे यावरून विरोधात बोलणारी तोंडेही होतीच. शंका-कुशंकाखोर आणखी वेगळे. प्रियांका सांगतात, ‘‘म्हणून मग आम्ही माझा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही तोवर लाँचिंग लांबवण्याचे ठरवले. कॉलेजनंतर सगळं काही जमून यायला आणखी एक वर्ष उजाडावं लागलं. लोकांची पुन्हा जमवाजमव करणे, नव्याने धोरण ठरवणे असे बरेच करावे लागले. काहीही थेट कृती न करता सरलेल्या या वर्षाने विचार करायला भरपूर वाव दिला. त्यातूनच नव्याने टिम बनवणे, उत्पादन सुरू करणे, माल बाजारात उतरवणे या सगळ्या गोष्टींसाठी अवरोधाचे हे वर्ष कामी आले, असे मानायला हरकत नाही.’’

‘‘नावे ठेवणे, तोंडं वेंगाळणे या सगळ्या गोष्टींच्याही पुढे विरोधातली मंडळी आता गेलेली होती. माझा सगळा उत्साह खचून जावा, अशी कृत्ये काहींनी केली. लिंगभेदाची सामाजिक रचना स्त्री म्हणून मला नक्कीच बोचणारी ठरली. अनेकांनी माझ्या या कष्टांची संभावना ‘टाइमपास’ अशा शब्दांत केली. लग्न होत नाही तोवर मुली जे-जे म्हणून उद्योग करतात, त्यातलाच प्रियांकाचाही हा एक उद्योग, असे वाट्टेल ते ही मंडळी बोलायची. मला तर महिला म्हणून हमखास वाटते की आम्ही (महिला) एखाद्या कामातील गुणवत्तेत टोकाच्या सरस असू तरीही आम्ही अपयशी ठरू शकतो आणि त्याला कारण म्हणजे आमच्या बाबतीत कुठेतरी काहीतरी चुकीचे चाललेलेच असते. म्हणून हे असे चुकीचे सगळे हाणून पाडले पाहिजे. प्रतिउत्तर दिलेच पाहिजे आणि पुन्हा आपले काम सुरू ठेवले पाहिजे, त्यात खंड पडू देता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:च्या समाधानासाठी काम करा. माझ्यापुरते बोलायचे तर इतरांनी आव्हान दिले म्हणून मग अमुक एक गोष्ट करूनच दाखवली, असे कधीही मी केले नाही. तिसरे म्हणजे मी सतत अशा लोकांच्या समवेत राहिले जे मला प्रोत्साहन देत. माझा उत्साह वाढवत. मला पाठबळ देत. इतर लोक मी बाजूला केले.’’

image


वादळ शमले अन्‌ अवतरला इंद्रधनू

कोणत्याही व्यवसायाची सुरवात करताना कुणालाही ज्या ज्या अडचणींतून जावे लागते, त्या साऱ्या अडचणींनी अर्थातच प्रियांका यांचा काही अपवाद केला नव्हता. एकतर अत्यंत कमी वयात त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केलेला, हीच एक मोठी अडचण होती. महिला असणे ही दुसरी अडचण होती. प्रियांका यांच्या जमेच्या बाजू म्हणजे तपासणी आणि झालेल्या चुकांना त्या आपल्या गुरू मानत आल्या. तीच चुक पुन्हा घडू दिली नाही. प्रियांका यांचा मुख्य दोष म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांच्याच व्यवसायातील अन्न विभागातील चमू आपल्या नव्या व्यवसायासाठी वापरण्याचा प्रयत्न केला, असं म्हणायलाही एखाद्याला वाव असू शकतो. या मंडळींतूनच त्यांना त्रास झाला.

प्रियांका म्हणतात, ‘‘पहिल्या दोन महिन्यांत सगळीच गती मंद मंद अशी होती. आणि या ओघातच अव्यवस्थितपणाही आलेला होताच. विकायला आमच्याकडे माल असा पडून होता. माझ्या वडिलांनी माझ्या शब्दाखातर गुंतवलेले १० लाख रुपये पाण्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी माझा स्वत:चा चमू उभारायचे ठरवले. स्वत:ची टीम. दुसरा पर्यायच नव्हता. चार जणांची टिम होती. चौघांच्या डोक्यात ठोक आणि ठोस विचार होते. मग द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांवर आम्ही आमचे मार्केट म्हणून भर दिला. वितरणाचे आमचे जाळे या शहरांतून विणले. तिथले प्रभागनिहाय स्टोअर्स, त्यांचा दर्जा, संख्या असे सगळे विचारात घेऊन आमचा माला त्या-त्या स्टोअर्समध्ये पेरला. लोकसंख्येचे विवरण जोखणे हे आमचे सुरवातीच्या काळातले पहिले प्राधान्य राहिले.’’

इंद्रधनूच्या तळात ऐसी छटा सोनेरी…

उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यात वडिलांनी केलेली दहा लाखांची मदत मोलाची होती, पण पुढे आणखी पैसा लागणार होता, मग या बीजभांडवलाव्यतिरिक्त पैसा उभारायला प्रियांका यांनी सुरवात केली.

प्रियांका सांगतात, ‘‘दहा लाखांनी सुरवात झालेली होती. पुढे आम्ही एक कोटीच्या वर उलाढाल नेली. गेल्या काही महिन्यातच हे साध्य झाले. अरे यात काय मोठी गोष्ट असे अनेकांना वाटू शकते, पण आमच्यासाठी हे दिव्यच होते. कारण विशुद्ध मार्केटिंगच्या बळावर हे यश आम्ही मिळवलेले होते. एचयूएल, पी अँड जी, डाबर इत्यादी महाबलींसह कितीतरी प्रादेशिक स्पर्धक या व्यवसायात आमच्यासमोर आहेत. नवनव्या आणखी कंपन्या या क्षेत्रात येतच आहेत, त्या वेगळ्या. वितरक आणि ग्राहकांकडून आता मोठा प्रतिसाद मिळू लागलेला आहे. आमच्या उत्पादनांबद्दल विचारणा होऊ लागलेली आहे. पुरवठा यंत्रणा, वितरण तंत्र एकदाचं विस्कटलं, की काही म्हणून शिल्लक राहात नाही, याचं भान आम्हाला आहे.’’

प्रियांका केवळ तरुण व्यावसायिक म्हणून आगळ्या ठरतात असे नाही. ‘एस. पी. जैन’मध्ये एबीएच्या द्वितीय सत्रात असतानाच प्रियांका यांनी आपल्या आस्थापनेमध्ये स्वत:पेक्षा जास्त शिकलेल्या-सवरलेल्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. पण म्हणूनही त्या आगळ्या ठरतात, असे नाही तर त्यांचे वेगळेपण हे त्यांच्या बहुश्रुततेत दडलेले आहे. व्यवसाय वृद्धीसंदर्भातील निर्णयांमध्ये आपल्या या सहकाऱ्यांची मते ऐकून घेणे आणि ती अंमलात आणणे, प्रियांका यांना कधीही अवजड, अवघड गेले नाही. प्रमुख म्हणून अहंकाराचा अडथळा त्यात आला नाही.

प्रियांका सांगतात, ‘‘सन्मान देणे आणि त्या बळावर सन्मान मिळवणे हे फार महत्त्वाचे असते. विशेषत: तुम्ही प्रमुख असता आणि तुमच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा वयाने लहान असता, तेव्हा तर हे अधिकच महत्त्वाचे ठरते. मी सहकाऱ्यांशी सातत्याने संवाद कायम ठेवला. संयमी राहिले. आवश्यक तिथे ठामही राहिले. चांगल्या कल्पनांचे स्वागत केले. प्रतिभेला वाव दिला. मी निवडलेल्या या माझ्या चमूसमवेत काम करत असताना या क्षणापर्यंत तरी लिंगभेदाची अडचण मला आलेली नाही. मी महिला आणि त्यात प्रमुख म्हणून माझ्या एखाद्या पुरुष सहकाऱ्याला त्यात काही वावगे वाटलेले नाही. वाटत नाही. देव करो पुढेही हे सगळे असेच राहो.’’

सुरवातीच्या काळात महिला असणे जरी प्रियांका यांना अडचणीचे ठरलेले असले तरी पुढे नव्या सहकाऱ्यांचा त्यांच्यासंदर्भातला दृष्टिकोन सकारात्मक राहिला, राहात गेला तसे त्यांनीही (प्रियांका यांनीही) याबाबतची आपली तक्रार केराच्या टोपलीत टाकून दिली. लिंगभेदाबाबत प्रियांका यांच्यासंदर्भात बदललेले हे चित्र महिलांना नोकरीतील मोठ्या संधींसाठी तसेच स्वत:चा नवा उद्यम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणारे खचितच आहे.

उद्यमातील भीती आणि अनिश्चिततेचे सावट दूर करणारे संकेत एका गोष्टीतून मिळताहेत आणि ती म्हणजे खूप सारे नवे उद्यम आणि व्यवसाय अलीकडच्या काळात महिलांकडून सुरु केले जात आहेत. खरोखरच ही बाब महिलांच्या संदर्भात फार महत्त्वाची आहे. एकूण परिस्थितीकडे तुम्ही डोळसपणे दृष्टिक्षेप टाकला तर हेसुद्धा स्पष्टपणे दिसते, की या सगळ्या महिला काही त्यांच्या पती, पिता वा सहकाऱ्यांच्या सावल्या नाहीत… आपापल्या उद्यम-व्यवसायात या रणरागिणींनी आपापल्या स्वतंत्र प्रतिमेची व प्रतिभेची छाप सोडलेली आहे. प्रियांका आणि अशा सर्व रणरागिणींना सलाम!


लेखक : बिंजल शाह

अनुवाद : चंद्रकांत यादव