बरैली ते नवी दिल्लीः कथा रश्मी वर्मा यांच्या रंजक प्रवासाची....

0

बारा वर्षे अमेरिकेत घालविल्यानंतर रश्मी वर्मा आपल्या पतीसह भारतात परतल्या आणि १९९२ साली भारतात त्यांनी मॅपमायइंडिया या आयटी सर्विस प्रोव्हायडर कंपनीला सुरुवात केली. या कंपनीने १९९४ साली जीआयएस एरीनामध्ये पाऊल टाकले आणि आजच्या घडीला डिजिटल मॅप आणि डेटा, जीपीएस नॅव्हीगेशन, लोकल-बेस्ड सर्विसेस (एलबीएस), जीआयएस आणि इतर संबंधित व्यवसायांत ही एक आघाडीची कपंनी आहे.

उत्तर प्रदेशमधील बरैली या लहानशा शहरात रश्मी यांचा जन्म झाला. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात (आयआयटी रुरकी) प्रवेश मिळविला. तो ही अशा काळात जेंव्हा अभियांत्रिकी शाखेची निवड करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या खूपच कमी होती. रश्मी यांना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रात ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या बारा वर्षे अमेरिकेत होत्या आणि त्यापैकी आठ वर्षे त्यांनी आयबीएमबरोबर काम केले. त्या काळात त्यांनी हाय-एन्ड संगणक सॉफ्टवेअर (संगणकप्रणाली) वर काम केले. “ आयबीएम मध्ये मेनफ्रेम तंत्रज्ञानावर माझे नियंत्रण होते. त्या तंत्रज्ञानाबरोबर मी अगदी आरामात काम करत असे. त्याकाळी भारतात हे तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय होते पण हळूहळू संगणक आणि ल्रॅपटॉपच्या दिशेने त्यामध्ये बदल होत गेले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नव्याने रचना करावी लागली. हे अगदी सुरुवातीच्या काळातच घडले आणि आमच्यापैकी बहुतेकांनी ही गोष्ट ओळखली की तंत्रज्ञानाच्या ज्या क्षेत्रात आपल्याला जायचे आहे ते क्षेत्र आहे जीआयएफ मॅपिंग वर आधारीत क्षेत्र...” रश्मी सांगतात.

मॅपमायइंडिया

रश्मी आणि त्यांचे पती भारतात परतले ते काहीतरी नवीन सुरु करण्यासाठीच.. शिवाय रश्मी यांना अनुभव असलेल्या एखाद्या क्षेत्रातच त्यांना उद्योग सुरु करायचा होता. रश्मी मॅप डेवलपमेंट आणि निर्मितीचे काम बघतात त्याचबरोबर भरती प्रक्रियेची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे.

“ आमच्या मॅप आणि डेटा उत्पादनांचे प्रमाण खूपच मोठे असून विविध उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यास आम्ही सक्षम आहोत. आमच्या उत्पादनांमध्ये विविध ऍप्लिकेशन्सचा समावेश असून त्यांचा उपयोग इ-कॉमर्स, ऑटोमोटीव्ह, ट्रॅकींग, ट्रान्सपोर्टेशन, लॉजिस्टीक्स आणि शासकीय कामकाज इत्यादी अनेक गोष्टींसाठी करता येतो. याचाच अर्थ आमच्याकडे अनेक थर आणि हजारो गुण आहेत. एवढा उच्च दर्जाचा डेटा तयार करणे आणि त्याची देखरेख करणे हे एक मोठे आव्हान आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि दृष्टीकोन नियमितपणे आणणेही गरजेचे असल्याने, हे खूपच डायनॅमिक वातावरण आहे आणि आम्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहोत,”रश्मी सांगतात.

जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकून रहाणे खूपच आव्हानात्मक असते. यावर आपले मत व्यक्त करताना रश्मी म्हणतात की, कायम आघाडीवर टिकून रहाण्याच्या दृष्टीने कंपनीने सतत एखाद्या स्टार्टअप प्रमाणेच विचार करायला हवा. “ नाविन्य आणि विकास ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि ग्राहकांना आज काय हवे आहे किंवा भविष्यात काय हवे आहे, हे जाणून घेणेही अतिशय गरजेचे आहे. मी हे पाहिले आहे की ज्या कंपन्यांना – मग ती स्टार्टअप असो किंवा स्थिरस्थावर झालेली – हे समजते त्या या खेळात कायमच पुढे रहातात,” रश्मी सांगतात.

महत्वाचा धडा

तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्द आणि त्याचबरोबर अमेरिकेत काम करण्याचा अनुभव रश्मी यांना बरेच काही शिकविणारा ठरला आहे. पण त्यापैकी सर्वात महत्वाच्या धड्याबाबत सांगताना त्या म्हणतात, “ आयबीएममध्ये असताना मी एक गोष्ट शिकले की, जर एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला खात्री वाटत असेल, तर तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रीत केले पाहिजे आणि त्यावर ठाम राहिले पाहिजे. म्हणजे मला म्हणायचे आहे की, पहिली अडचण येताच त्यापासून दूर पळता कामा नये. त्या अडचणीचा सामना करायला हवा आणि हे करताना चिकाटी ठेवायला हवी. मी बऱ्याचदा पाहिले आहे की अडचणी आल्यास, लोक ती गोष्ट सोडून देतात आणि दुसऱ्या गोष्टींच्या मागे जातात. तुम्ही लवचिक असायला हवे.”

त्यांच्या मते कल्पकतेविषयीचा धडाही महत्वाचा आहे. “ अमेरिकेतील लोक तंत्रज्ञान अगदी आरामात वापरत असत. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून ते प्रत्यक्ष व्यवहारात वापरले जाते. त्याचबरोबर एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणून किंवा एखाद्या उत्पादनासाठी म्हणून, या तंत्रज्ञानात फेरफार करुन त्याचा उपयोग करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते,” रश्मी सांगतात.

त्यांच्या मते, याच प्रवृत्तीची त्यांना आणि त्यांच्या टीमला भारतातील प्रश्नांवर उत्तरे शोधण्याच्या आणि कंपनीचा विकास करण्याच्या कामी मदत झाली.

सेफमेट

मॅपइंडियाने नुकतेच आपले सेफमेट हे ऍप आणले आहे, ज्याचा वापर करुन वापरकरता कुठे आहे, ते त्यांच्या जवळच्या माणसांना समजू शकणार आहे. सेफमेट हे प्राधान्याने महिला आणि लहान मुलांसाठी तयार करण्यात आल्याचे रश्मी सांगतात.

“ सेफमेट ची खासियत ही आहे, की याचा वापर करण्यासाठी ऍपवर किंवा स्मार्टफोनवर अंवलबून असण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठीदेखील हे उपयुक्त ठरणार आहे. आपले वयस्कर पालक कोठे आहेत, हे समजण्यासाठीही मुलांना याचा वापर करता येईल. जेणेकरुन बाहेर गेलेले वयस्कर पालक रस्ता चुकल्यास किंवा विसरल्यास मुलांना त्यांचा सहजपणे शोध घेता येईल. तसेच शाळादेखील आपल्या विद्यार्थ्यांना सेफमेट उपलब्ध करुन देऊ शकतात किंवा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना हे पुरवू शकतात, खास करुन जे कर्मचारी रात्री उशिरा असुरक्षित ठिकाणी प्रवास करतात अशा कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक पोलीसही त्याभागातील नागरिकांना त्यांच्या मुलांची, स्त्रियांची किंवा एकूणच लोकांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सेफमेटचा वापर करण्यास सुचवू शकतात,” रश्मी सांगतात.

काम-वैयक्तिक आयुष्याचा तोल सांभाळताना

काम आणि वयैक्तिक आयुष्यातील तोल सांभाळणे हे रश्मी यांच्या मते त्यांनी सामना केलेले सर्वात मोठे आव्हान आहे. त्यांच्या मुलांच्या वाढत्या वयात त्यांना खूप उशिरापर्यंत काम करावे लागत असे. कारण ग्राहकांचे काम वेळेत पूर्ण करुन देणे, अतिशय गरजेचे होते. “ या आव्हानाचा सामना मी यशस्वीपणे करु शकले यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे माझ्या पतीचा मला असलेला भक्कम पाठींबा... आम्ही आळीपाळीने ही जबाबदारी घेत असू आणि खरे सांगायचे तर ते कायमच माझा आधारस्तंभ राहिले आहेत,” रश्मी सांगतात.

‘ग्लास सिलिंग’

ग्लास सिलिंग अर्थात महिला किंवा इतर अल्पसंख्यांना बढतीमध्ये येणाऱ्या अडचणी... तर असे ग्लास सिलिंग मॅपमायइंडियामध्ये आहे का, याबाबत विचारल्यास, रश्मी तत्परतेने सांगतात, “ मला मुळीच तसे वाटत नाही. कमीत कमी मॅपमायइंडियामध्ये तरी नक्कीच नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे आवश्यक तो अनुभव आणि कौशल्ये असतील, उपक्रमशीलता असेल आणि ते कुठल्याही स्तरावर काम करु शकतात, असे मला दिसल्यास, त्या व्यक्तीची बढती कोणीही थांबवू शकत नाही.”

रश्मी यांची आणखी एक ओळखः

रश्मी यांच्यामध्ये एक कलाकारही दडला आहे. त्या एक प्रशिक्षित नृत्यांगना असून, त्यांनी लहानपणी, महाविद्यालयात असताना आणि लग्नानंतरही कार्यक्रम सादर केले आहेत. शास्त्रीय संगीताबद्दल म्हणाल, तर त्या नियमितपणे रियाज करतात. “ जरी मी सादरीकरण करत नसले, तरी मला त्याविषयी अत्यंत आदर आहे आणि मी त्या गोष्टीला ध्यानाचा सर्वोच्च प्रकार मानते,” त्या हसून सांगतात.