जग मुखवट्यांचं....

0

झारखंडचे बिचित्र सरैकेला पहिल्यांदाच मुंबईत आले होते. आज त्याचं वय आहे ८०. मुंबईतल्या बीकेसी ग्राऊंडजवळच्या एका छोट्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय करण्यात आली होती. सकाळी उठायचं आणि बीकेसीतल्या मेक इन इंडियातल्या आपल्या छहू मुखवट्यांच्या स्टॉलवर येऊन बसायचं. धोती, खादीचा कुर्ता आणि खांद्यावर गमछा... असा त्यांचा पेहराव.. मेक इन इंडियाच्या गर्दीत त्यांचं हे व्यक्तिमत्व अगदी उठून दिसायचं. उंची जवळपास सहा फुटांची. आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते पाहत रहायचे. या लोकांबद्दल कमालीची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून यायची. झाडीझुडपात गावाकडे राहणारे आपण कुठे आणि ही सुटाबुटातली माणसं कुठे असा तुलनात्मक विचार त्यांच्या मनात येत होता. 

"लोकमान्य टिळक टर्मिनसचं नाव ऐकून होतो पण पहिल्यांदा पाहिलं. ट्रेन इथं आली तेव्हा फार अंधार होता. आम्ही प्लॅटफॉर्मवरच बसून राहिलो. आजूबाजूला छोट्या इमारती दिसत होत्या. रांची जमशेदपूरमध्येही अश्याच इमारती आहेत. अंधारात या इमारती तेवढ्या स्पष्ट दिसत नव्हत्या. हळूहळू प्रकाश पसरायला लागला आणि समोर दिसलं के अगदी आमच्या रांची सारखंच होतं. पण इथल्या इमारती दाटीवाटीनं उभ्या होत्या. सकाळी आम्हाला एका बसमधून बीकेसीला आणण्यात आलं. तेव्हा मुंबई कशाला म्हणतात ते आम्हाला समजलं. अगोदर आजूबाजूला दाट लोकवस्ती असलेली झोपडपट्टी दिसली. मनात आलं हे कसलं महानगर. सिनेमात तर किती चांगलं दिसत होतं. पण जसजसं आम्ही बीकेसीकडे वळलो तसतश्या काचेच्या इमारतींची संख्या वाढली आणि आम्ही एका वेगळ्या जगात पोहचलो. कुर्ला स्टेशन जवळच्या जगाशी याचा काहीही संबंध नव्हता. हे जग निश्चितच वेगळं होतं. तेव्हा पासून आत्तापर्यंत मी इथं येणाऱ्या लोकांकडून पाहून हाच विचार करतोय की हा कुठल्या जगातून आला असावा.” 

बिचित्र सरैकेला यांच्याबरोबर एकूण २०  जण मेक इन इंडिया कार्यक्रमाला आले होते. हे सर्व कागदी लगद्यापासून मुखवटे बनवणारे कलाकार. सरैकला आणि आसपासच्या गावात मुखवटे बनवण्याची परंपरा आहे.  छहू नृत्य मुखवटे म्हणून ते प्रसिध्द आहेत. देशातल्या विविध भागात पारंपारिक नृत्यांसाठी लागणारे सर्वप्रकारचे मुखवटे इथं बनवले जातात. गावच्या गाव या मुखवटे बनवण्याच्या धंद्यात. त्यामुळे प्रत्येक घरात कागदाचा लगदा आणि माती, नैसर्गिक रंग असं सर्व काही मिळतं. आणि मुख्य म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत घरातल्या प्रत्येकाला मुखवटे बनवण्याची कला अवगत असते. .  बिचित्र सांगतात, “ आम्ही घरातले सर्वच हे बनवतो. अनेकदा घरातले मोठे या मुखवट्याचं मोल्डींग करतात. त्यातून हा मुखवटा बाहेर आला की मग पुढे त्याला माती लावून रंग काम करण्याचं काम छोट्यांकडे असतं.” 

एक मुखवटा बनवण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. चार दिवसातले तीन दिवस हे फक्त मुखवटा मोल्डींगमधून बाहेर काढून त्याला सुकवण्यात जातात, मग एक दिवस रंगाचा. हे असे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर ते व्यापाऱ्यांपर्यंत पाठवले जातात. “एक मुखवट्याचे अगोदर १०  रुपये मिळायचे. तसं पाहिलं तर खर्च फक्त पाच रुपयांचा आहे. पण त्यावर लागणारी मेहनत, चार दिवसांचा कालावधी पाहता आता आम्ही ते २०-२५ रुपयांना व्यापाऱ्याला विकतो . व्यापारी  ७०-८०  रुपयांपासून ते अगदी २५०  रुपयांपर्यंत ते विकतात. आम्हाला मात्र २०-२५  रुपयेच मिळतात. आम्हाला माहितेय पण थेट ग्राहकांपर्यंतचा संपर्क आमचा नाही. आम्ही तसा कधी विचारही केला नाही. संगीत नाटक अकादमीनं आता आम्हाला व्यासपीठ दिलंय बहुतेक नवीन तरुण मंडळी आता चांगल्या प्रकारे आपल्या कलेसाठी पैसे कमवू शकतील.” बिचित्र सांगत होते. 

बिचित्र यांनी मुबंई पाहिली ती फक्त बिकेसीतली. त्यानंतर त्यांनी मुंबईचा अंदाज लावला तो फक्त इथं येणाऱ्या लोकांवरुनच. “या शहरात खूप गर्दी आहे हे ऐकूण होतो. आम्हाला ती गर्दी फक्त या प्रदर्शनातच दिसली. खरी मुंबई काय आम्ही पाहिली नाही. पण इथं आलेली माणसं पाहिली की समजतं की मुंबई फक्त श्रीमंतांची नाही तर आमच्या सारखे माणसं ही इथं राहत असणार. अनेक लोक आले होते. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आलात. अनेकांना आमचं गाव कुठे आहे याची कल्पनाच येईना. लोकांना आम्ही आदिवासी वाटतो.” हे सांगताना बिचित्र हसतात. 

आता ते पुन्हा झारखंडसाठी रवाना झालेत. आपल्या सोबत दोन वेगवेगळ्या मुंबईची दृश्य घेऊन. ते म्हणतात, पुन्हा मुंबईला कधी येणं होईल असं वाटत नाही. पण आमच्या नवीन पिढीला या मुंबई शहरातून खूप काही मिळावं अशी अपेक्षा आहे. या शहरात कलेला आदर आहे म्हणे, खरं खोटं माहित नाही, पण तो आमच्या पुढच्या पिढीला मिळावा आणि त्यांच्या कलेला योग्य मोबदलाही मिळावा अशीच अपेक्षा आम्ही करतोय...” हे सांगताना त्यांचे डोळे पाणवतात.