ग्रामीण भागातील मुलांच्या स्वप्नांना पंख देणारे ‘प्रोजेक्ट उडान’

ग्रामीण भागातील मुलांच्या स्वप्नांना पंख देणारे ‘प्रोजेक्ट उडान’

Thursday October 29, 2015,

6 min Read

कोणाला माहिती होते की सिद्धार्थ वशिष्ठच्या ‘प्रोजेक्ट उडान’ची सुरुवात होण्यामागचे कारण शाहरुख खान असेल.

image


एनआयटी तिरुचिरापल्ली येथून प्रोडक्शन इन्जिनिअरची पदवी प्राप्त केलेल्या सिद्धार्थला टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाली. भारतातील ग्रामीण भाग कसा विकासापासून दूर आहे याविषयी तावातावात चाललेल्या लोकांच्या चर्चा तो अनेकदा ऐकायचा. लोकांच्या या बिनकामाच्या चर्चा आणि किरकिर ऐकून कंटाळलेल्या सिद्धार्थने ही समस्या सोडविण्यासाठी काहीतरी करण्याचे ठरविले. याविषयी प्रत्यक्ष जाणून घेण्याच्या उद्देशाने त्याने युथ इंडिया फेलोशिपसाठी अर्ज केला आणि निवडलाही गेला. त्याला ओडिशाला पाठविण्यात आले. इथे ३६ वर्षांपासून ओडिशातील लोकांसाठी काम करणाऱ्या ‘ग्राम विकास’ या स्वयंसेवी संस्थेच्या कामात त्यांना मदत करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. फेलोशिपचा भाग म्हणून प्रत्येकाने एक प्रोजेक्ट सुरु करुन स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्याचे नेतृत्व करायचे होते.

सिद्धार्थने कालाहंडी जिल्ह्यातील कुमुदाबहल गावात मशरुम लागवडीविषयी माहिती द्यायचे आणि त्याचा प्रसार करण्याचे काम घेतले. हे गाव कर्लापाट अभयारण्यापासून ६७ किमी अंतरावर आहे. हा भाग दुष्काळग्रस्त आहे. आणखी एका गोष्टीसाठी हा भाग ओळखला जातो आणि ती म्हणजे मलेरिया. इथे असताना सिद्धार्थलाही दोनदा मलेरिया झाला होता. या गावामध्ये मोबाईल नेटवर्क नाही आणि जर तुम्हाला फोन कॉल करायचा असेल तर जिथे तुमचा फोन काम करु शकेल अशी जागा आहे ठुअमुल रामपूर हे शहर, जे गावापासून १३ किमी अंतरावर आहे. पण जर तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त मेहनत घेऊन गावापासून ६७ किमी अंतरावर असणाऱ्या भवानीपटना जिल्ह्यात जावे लागते. सिद्धार्थ सांगतो, “मी रहात असलेल्या ठिकाणापासून गावामध्ये मशरुम लागवडीचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी मला २६ किमी अंतर चालत पार करावे लागायचे.”

एकदा सिद्धार्थ मर्दिगुडा गावामध्ये उपजिविकेच्या माध्यमांविषयी प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना, त्याने एक मुलगा मोबाईलवर ‘लुंगी डान्स’ हे ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटातील गाणे ऐकत असताना पाहिले. मध्येच त्या मुलाने मोबाईल स्क्रीनकडे बोट दाखविले आणि तो त्याच्या वडिलांना शाहरुखने घातलेले सनग्लासेस घेऊन देण्यासाठी विनंती करु लागला. सिद्धार्थला काय करावे कळेना; तो त्या मुलाजवळ गेला आणि म्हणाला,“तू शाहरुखसारखं नाचून दाखवू शकलास तरच तुला ते सनग्लासेस मिळतील.” क्षणार्धात, जराही न लाजता तो गाण्याच्या धूनसमवेत एकरुप झाला. सिद्धार्थ स्तब्ध झाला आणि आदरयुक्त नजरेने त्या मुलाकडे पहात असताना मनातल्या मनात विचार करु लागला, “वा! याला जमलं!”

सकाळच्या प्रार्थनेसाठी एकत्र जमलेले ‘शिक्षा निकेतन’ शाळेचे विद्यार्थी

सकाळच्या प्रार्थनेसाठी एकत्र जमलेले ‘शिक्षा निकेतन’ शाळेचे विद्यार्थी


नृत्य आणि संगीताची आवड असणारा सिद्धार्थ त्या मुलाबरोबर बोलू लागला. त्याच्याशी बोलताना सिद्धार्थला लक्षात आले की ज्या शाळेत सिद्धार्थ अनेकदा जातो त्या शिक्षा निकेतनचाच (‘ग्राम विकास’ मार्फत चालविली जाणारी शाळा) तो विद्यार्थी होता. सिद्धार्थ पुढे सांगतो, “त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शिक्षा निकेतनमध्ये गेलो, तेव्हा तेव्हा मी त्या मुलाला भेटलो.” त्याने केवळ मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ पाहून आत्मसात केलेले नृत्य पाहून प्रत्येकवेळी माझ्या अंगावर रोमांच उभा रहायचा. नृत्याची आवड असलेल्या माझ्या मनात विचार आला, “मी मला जमेल तेवढं नृत्य या मुलाला आणि त्याच्या मित्रांना का शिकवू नये?”

सिद्धार्थचा फोन व स्पिकर्स आणि गाणी डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या शोधात १४० किमी अंतरावर मारलेल्या अनेक खेपांसह प्रोजेक्ट उडानला सुरुवात झाली. २५ विद्यार्थ्यांचा ग्रुप स्टुडंट मेसमध्ये सराव आणि नृत्य करु लागला. या आदिवासी भागातील अनेक मुलांना काही गीतांचे बोल समजत नाहीत. सिद्धार्थ सांगतो, “भाषा कुठलीही असली तरी आम्ही सर्वजण ज्या गाण्यावर नृत्य करतोय त्याचे बोल गायला शिकतो आणि या दरम्यान एखादे ओळखीचे गाणे ऐकू आल्यावर मुलांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते.”

यामधून सिद्धार्थच्या हे लक्षात आले की या मुलांसाठी एक अशी जागा पाहिजे, जिथे ते त्यांच्या कौशल्यामध्ये अधिक तरबेज होऊ शकतात आणि त्याचबरोबर विविध कला आणि संस्कृती आत्मसात करु शकतात. “मी ठरवलं की खास या मुलांसाठी अशी एक जागा तयार करायची जिथे या मुलांना शिकता येईल, शिकवता येईल, त्यांना त्यांच्या हस्तकलेचा सराव करता येईल आणि नवीन नवीन गोष्टी शिकता येतील.”

नृत्याचा सराव करताना विद्यार्थी

नृत्याचा सराव करताना विद्यार्थी


दुर्लक्षित पण प्रतिभावान होतकरु नर्तकांचे, गायकांचे आणि अभिनेत्यांचे स्वतःची आवड जोपासायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि कदाचित एक दिवस या छंदालाच उपजिविकेचे साधन बनविण्यासाठी त्यांची मदत करणे हाच यामागचा उद्देश आहे. तो पुढे सांगतो,“ही मुलं खूप प्रतिभावान आहेत. त्यांची आकलन शक्ती थक्क करणारी आहे. केवळ त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जोपासण्यासाठी लागणाऱ्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांची स्वप्न त्यांच्या लक्षातच येऊ नयेत असं व्हायला नको.”

image


ऑडिओ सिस्टीम बसविणे, भिंत रंगविणे, आरसे, वाद्य आणि संच इ. मूलभूत गोष्टींनी सुसज्ज अशी सुविधा पुरविणे ही इथली पहिली गरज आहे. विविध नृत्य प्रकारांवर कार्यशाळेचे आयोजन, संगीतकारांचे कार्यक्रम, नाटकांचे आयोजन पुढच्या टप्प्यात येईल. सिद्धार्थ पुढे सांगतो, “यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याबाहेर अस्तित्वात असलेल्या विविध कलाप्रकारांची ओळख होईल.” या प्रोजेक्टला आपण होऊन काम करायला सरसावणाऱ्या आणि या मुलांना कायम शिकविण्याची हमी देणाऱ्या कलाकारांसाठीचे व्यासपीठ बनविणे हा प्रोजेक्ट उडानचा तिसरा टप्पा असेल. सिद्धार्थ सांगतो की हे सर्व काम कायम सुरु ठेवण्यासाठी या कामाला समर्पित होऊ शकणाऱ्या प्रशिक्षकांचीही त्याला गरज आहे.

अनेकांकडून मदत घेऊन सिद्धार्थने जवळपास १.०७ लाख रुपये उभे केले आहेत. “संगीतकारांनी देणगी स्वरुपात दिलेली वाद्ये आता प्रोजेक्टला मिळाली आहेत. आम्ही अशा प्रकारच्या आणखी देणग्या मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत.” प्रोजेक्ट उडानला लोक सढळ हस्ते करित असलेली मदत सुखावणारी आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘पेंटकोलार’ हा सिद्धार्थच्या कॉलेजमधील ज्युनिअर्सने सुरु केलेला नवीन उपक्रम.

image


सिद्धार्थ सांगतो, “त्यांच्याबरोबर उडानबद्दल बोलल्यानंतर ते म्हणाले की त्यांना या प्रोजेक्टविषयी जनजागृती करायला आणि पैसा उभा करायला आवडेल. पेंटकोलारच्या क्रिएटिव्ह टीमने ओडिशाच्या संस्कृतीतून प्रेरणा घेऊन काही अप्रतिम आर्टवर्क तयार केले. जे त्यांनी टी-शर्ट्स, लॅपटॉप स्कीन्स आणि पोस्टरवर वापरले. मला ही कन्सेप्ट आवडली कारण यामुळे लोकांना इथल्या संस्कृतीचे ओझरते दर्शन घडेल, जे त्यांना ऐरवी घडणार नाही आणि त्याचबरोबर प्रोजेक्टला आर्थिक सहाय्यही मिळेल. ते या वस्तूंच्या विक्रीतून मिळालेला सर्व पैसा प्रोजेक्ट उडानला देणगी स्वरुपात देतात. त्यांनी मला शाळेच्या भिंतीवर चित्र काढण्यासाठी त्यांची आर्टवर्कही दिली आहेत. ”

पेंटकोलार टीमची  निर्मिती असलेले हे चित्र अनेक टी-शर्ट्सवर वापरले आहे. या टी-शर्ट्सच्या विक्रीतून मिळणारा पैसा प्रोजेक्ट उडानला दिला जातो.

पेंटकोलार टीमची निर्मिती असलेले हे चित्र अनेक टी-शर्ट्सवर वापरले आहे. या टी-शर्ट्सच्या विक्रीतून मिळणारा पैसा प्रोजेक्ट उडानला दिला जातो.


शाळेची जागा हे या प्रोजेक्टसमोरचे एक सर्वात मोठे आव्हान आहे. वाहतूकीची समस्या आणि परिसरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसणे ही आणखी एक समस्या आहे. सिद्धार्थ सांगतो की इथे बरेच दिवस राहून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एखाद्याला तयार करणं खूप कठीण आहे. स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांबाबतही हीच समस्या आहे. हा भाग जंगलात येत असल्यामुळे सूर्यास्तानंतर इथून ये-जा करणे सुरक्षित नाही. तो पुढे सांगतो, “कलामपूरची दरी पार करताना मी चित्त्याचा सामना केला आहे.” मूलभूत गोष्टी, वाहतूक, भाषा आणि आरोग्य सुविधांचा अभाव या इथल्या आणखी काही समस्या आहेत.

सिद्धार्थ त्याच्या आणखी एका चित्तवेधक दृष्टीकोनाबद्दल बोलला, “निश्चितच इथे आरोग्य, वाहतूक, शिक्षण इ. समस्या आहेत, पण म्हणून हिरव्यागार जंगलाच्या सानिध्यात वाढलेल्या या मुलांना इथून उचलायचं आणि शहराच्या ठिकाणी ते जास्त प्रगती करु शकतात असं आपल्याला वाटतं म्हणून त्यांना काँक्रीटच्या जंगलात नेऊन टाकायचं याची आम्हाला काहीही गरज वाटत नाही. समस्यांवर उपाय हा जागेचा, माणसांचा आणि परिस्थितीचा विचार करुनच शोधला पाहिजे. सगळ्या समस्यांवर एकच उत्तर असू शकत नाही.”

image


एवढ्या समस्या असून सुद्धा सिद्धार्थने स्वयंसेवी संस्थेबरोबर रहायचे आणि फेलोशिपचा कालावधी संपला तरी प्रोजेक्ट उडान सुरुच राहील याची काळजी घ्यायची हे निश्चित केले आहे.

जाता जाता तो सांगतो, “मुलांना शिकण्याची, प्रावीण्य संपादन करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी बहाल करायची आणि हे करत असतानाच त्यांना जगाच्या संपर्कात आणायचे हे माझे स्वप्न आहे. त्यांना त्यांच्यातील अव्यक्त कौशल्य प्रथम ओळखता आले पाहिजे आणि त्यानंतर त्याचा सर्वतोपरी वापर करता आला पाहिजे. नाटक, नृत्य, संगीत इ. कलाप्रकारांतील त्यांची आवड जोपासण्याचे विविध मार्ग शोधण्यासाठी हे व्यासपीठ त्यांना मदत करेल. स्वतःमधील कौशल्याच्या आणि घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारावर पुढे जाणारी, सर्वसाधारणपणे वंचित समाजातील मुलांसोबत जोडल्या गेलेल्या दया भावनेला बळी न पडणारी धीट, आत्मविश्वासपूर्ण व्यक्ती घडविणे, हाच उद्देश आहे.”

सिद्धार्थला सामर्थ्य आणि प्रेरणा देणारे ‘कबर पर सर उठा कर खडी हो जिंदगी, है ऐसे जिना मुझे’ हे गाणे गुणगुणत तो सांगतो,“मला उद्देशपूर्ण आयुष्य जगायचे आहे, मी काहीतरी वेगळं केलं असं मला वाटलं पाहिजे, नाहीतर उपयोग काय?”

    Share on
    close