अनु मल्होत्राच्या कॅमेऱ्यातून शोध अद्भुत भारताचा

अनु मल्होत्राच्या कॅमेऱ्यातून शोध अद्भुत भारताचा

Saturday January 16, 2016,

4 min Read

विकास आणि प्रगतीच्या झंजावातामध्ये इतिहासाच्या पानात कुठेतरी आपली प्राचीन विद्वान संस्कृती आणि काही समाज वेळेच्या आधीच निवृत्त झाला. मात्र जो नक्कीच स्वेच्छेने निवृत्त झाला नाही. जगातील सर्वात विविधरंगी राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे आणि हेच या संस्कृती आणि समाज निवृत्तीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते, मात्र हे कारण साफ चुकीचे असल्याचे मत व्यक्त करतात अनु मल्होत्रा. दूरचित्रवाणी क्षेत्रात कामकरणाऱ्या एक महत्वाकांशी महिला.


image


अनु यांच्यासाठी माहितीपट बनवणं म्हणजे फक्त व्यवसाय नव्हता तर त्यापेक्षा वेगळं काहीतरी होतं. त्यांना जे काही वाटतं ते व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे असं त्यांना वाटतं. दूरचित्रवाणी किंवा टेलिव्हिजनसाठी अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम बनवणं हे त्यांचं ध्येय आहे. १९९३ मध्ये जेव्हा चंदेरी पडद्यावर त्यांची पहिली मुलाखत झाली तेव्हापासून त्यांचं तेच स्वप्न आहे.

जेव्हा त्या २० वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की, उत्तम दर्जाचे कार्यक्रम तयार करून भारतीय टेलेव्हिजनला धक्का द्यायचा. " मी जाहिरात व्यवसायातून माझ्या कारकिर्दीला सुरवात झाली. तेव्हा दूरचित्रवाणी व्यवसायाचा विकास होत होता. त्यावेळी म्हणजे १९९४ मध्ये मी माझी स्वतःची कंपनी एम टेलिव्हिजन सुरु केली. त्यावेळी दूरचित्रवाणी क्षेत्राचा विकास सुरु झाला होता, त्यामुळे काम करायला मजा यायची."


image


एक बुटिक प्राॅडक्शन कंपनी म्हणून तिने झी टीव्ही, सोनी आणि दूरदर्शन या वाहिन्यांसाठी ६०० तासांचा कार्यक्रम तयार केला. बी बी सी, डिसकव्हरी, ट्रॅव्हल चॅनल युके, फ्रांस ५ या वाहिन्यांसाठी ज्ञानरंजन करणारे कार्यक्रम तयार केल्याने लासो प्राॅडक्शन कंपनी हे एक प्रतिष्ठीत नाव झालं.

आधुनिकता, माहिती आणि नव्या गोष्टी याचा चेहरा बनत असलेलं हे माध्यम वेगाने लोकप्रिय होत होतं, त्या संधीचा उपयोग करणाऱ्या अनु सुरवातीच्या काळातील एक अग्रणी निर्माता आणि दिग्दर्शक होत्या. पर्यटन विषयक कार्यक्रम सगळ्यात जास्त बघितले जातात. नमस्ते इंडिया आणि इंडियन हॉलिडेज हे कार्यक्रम म्हणजे अनु यांनी जगाला दाखवलेली भारताची पहिली झलक.


image


यशाच्या पायऱ्या चढताना त्यांनी दूरचित्रवाणी क्षेत्रातील अनेक पुरस्कार पटकावले. तरीही त्यांना असं वाटतं अजून बरच काही मिळवायचं आहे. पर्वत रांगांमध्ये कॅमेरा घेऊन फिरणं आणि त्यावर माहितीपट बनवणं हे तर त्यांना आवडतच, पण त्या माध्यमातून नवनवीन गोष्टीं शोधायला त्यांना आवडतात आणि त्यावर फिल्म बनवणं यामुळेच त्यांना काहीतरी मिळवल्याचं समाधान मिळतं.

" मला भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचा फिल्मच्या माध्यमातून शोध घ्यायचा आहे. मला संस्कृती जपून ठेवायची जी वेगाने नाहीशी होत आहे. दर्शकांना संस्कृतीची आठवण करून द्यायची आहे आणि त्याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे."

अनु यांनी टेलिव्हिजनसाठी भारतीय संस्कृतीवर आधारित केलेल्या फिल्मसमुळे त्या आज सर्वपरिचित आहेत. त्यांनी तयार केलेल्या काही फिल्म्स तर फारच सुंदर आहेत. द अपतानी ऑफ अरुणाचल प्रदेश, द कोन्याक ऑफ नागालंड , द महाराजा ऑफ जोधपूर आणि शमंस ऑफ हिमालया या त्यांच्या काही अप्रतिम फिल्मस आहेत.

आज टेलिव्हिजन म्हणजे सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान झाला आहे. मग त्याचा उपयोग सामाजिक बदलांसाठी प्रभावीपणे झाला पाहिजे. मला असं नेहमी वाटतं की, जे माध्यमांमध्ये काम करतात त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव असावी. त्यामुळे आपण लोकांना काय दाखवणार आहोत याची त्यांनी काळजी घ्यावी. मी नेहमी काही तत्त्व पाळली आहेत मग कार्यक्रम कोणताही असो खाद्य पदार्थ, पर्यटन किंवा पेहराव विषयक असो, मी माझ्यासाठी काम करणाऱ्या दिग्दर्शकांनाही सांगितलं आहे की त्यात सकारात्मक, आशादायी आणि अर्थपूर्ण असावं."

" आज आपल्याला अध्यात्माची गरज आहे. शहरीकरणामुळे साधेपणात समाधान मानणं याचा विसर पडत चालला आहे. आज आपण अशा वळणावर आहोत जिथे नैतिकता आणि परिस्थिती बदलली आहे." त्या त्यांच्या माहितीपटाचा विषय सांगतात.

देशातील विविध संस्कृती परंपरांवर त्यांनी फिल्मस बनवायचं ठरवलं ज्याठिकाणी भाषा, राहणीमान, यापासून ते विचारधारा या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि ज्यांचावर त्या फिल्मस् करत आहे, त्यांचा विश्वास प्राप्त करणं म्हणजे साहसच आहे.

" आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझे असे काही सिद्धांत नाहीत त्यामुळे माझ्या कामात कधी अडचण आली नाही. माझा सिद्धांत एकच 'पर्यटन हेच लक्ष्य'. आणि मी नेहमीच उत्साहाने आणि मेहनतीने काम केलं त्यामुळे काम करताना ज्या गोष्टी किंवा अनुभव मिळाले ते म्हणजे कामाचा भाग असल्याचं मी मानलं. ज्या अडचणी आल्या त्या आव्हान म्हणून स्वीकारल्या, तर संधीचा फायदा, शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी घेतला. मला असं जाणवलं की, ग्रामीण आणि आदिवासी लोक हे बदल पटकन स्वीकारतात आणि शहरी लोकांपेक्षा ते अधिक मुक्त विचारांचे आहेत."

"कालीडोस्कोप हेच माझं जग आहे. रंगीबेरंगी छायाचित्रांची दुनिया मला अधिक भावते. एकमेकात मिसळणारे रंग आणि त्यातून निर्माण होणारा जीवनाचा नवीन रंग शोधणं मला आवडतं." हे एक अशी महिला सांगतेय जी फार कमी काळ एका ठिकाणी असते. ती सतत जगातील नवीन गोष्टी शोधत असते.

त्यांच्या याच जिज्ञासेमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि स्वतःच कलात्मक कर्तृत्व सिद्ध केलं आहे. " कला ही माझी आवड नाही तर तो माझ्यासाठी दैनंदिन व्यवहार आहे. मी माझ्या विचारातही माझ्या प्रवासातील छायाचित्र बघत असते. कॅनडातील पर्वत रांगा, सरोवर यांची मोहक दृश्य, मेघहिन निळं आकाश, थक्क करणारं विस्तीर्ण लद्दाख, मोहक निळ्या रंगाच्या तिथल्या पर्वत रांगा. अमल्फी आणि कॅप्री मधील निळे शार आणि सुंदर समुद्र किनारे, मालदीव मधील समुद्राच्या आतील अद्भुत दुनिया.

रंग मला लगेच आकर्षित करतात. वाळवंटातील चमकदार रंगांच्या ओढण्या, गोव्यातली विविध रंगी घरं, नागालंडचे रंगीबेरंगी दागिने, कर्नाटकातील मंदिरांची शृंखला, हे रंग आणि छायाचित्र हे व्यक्त होण्याचं पर्यायी माध्यम आहे. त्यामुळे १५ वर्ष आधी फावल्या वेळात मी चित्र काढायला लागले," ती सांगते.

मोठ्या प्रमाणावर कला प्रदर्शनं भरवली. प्रभावी संकल्पना रंगांचा सुंदर मिलाफ आणि त्यातून निर्माण होणारी सुंदर कलाकृती, यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे हे लक्षात येतं. त्यांनी स्वीकारलेलं प्रत्येक आव्हान हे वेगळं असतं आणि यामुळे इतरांना प्रेरणा मिळते. त्यांची कौशल्य आणि आवड यातून नेहमीच काहीतरी अद्भुत जन्माला येतं.

लेखक : बिन्जल शहा

अनुवाद : श्रद्धा वार्डे