सोमालियाच्या मदर तेरेसा ‘डॉ हावा आबिदी’

0

सोमालिया म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गृहयुद्ध, दुष्काळ आणि समुद्री चाचे असलेल्या देशाचे चित्र उभे रहाते. मात्र या सगळ्याबरोबरच तिथे एक अशी महिलाही आहे जी आपल्या कुटुंबासमवेत सोमालियाच्या युद्धातील शरणार्थींना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता कार्यरत आहे. ही महिला म्हणजे डॉ हावा आबिदी. डॉ हावा आबिदी यांना लोकांना आरोग्य सेवा पुरविण्याच्या कार्यासाठी २०१२ मध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. डॉ आबिदी ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’च्या संस्थापिका आहेत. या संस्थेचा कारभार डॉ आबिदी आणि त्यांच्या दोन कन्या डॉ डेको आदान व डॉ अमीना आदान सांभाळतात. डॉ डेको आदान या संस्थेच्या मुख्य कार्यकारी आहेत. सध्या ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’ ९० हजारांहून जास्त शरणार्थींचे घर आहे. या संस्थेमध्ये २०१२ पर्यंत १०२ बहुराष्ट्रीय कर्मचारी कार्यरत होते. त्याशिवाय १५० सदस्यीय टीममध्ये स्वयंसेवक, मच्छीमार आणि शेतकरीसुद्धा सहभागी आहेत. ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’ने आपल्या स्थापनेपासून आतापर्यंत जवळपास २० लाख लोकांची मदत केली आहे.

डॉ हावा आबिदींने १९८३ मध्ये ‘रुरल हेल्थ डेव्हलपमेंट फाऊंडेशन’पासून आपल्या कामाची सुरुवात केली. ही संस्था आता ‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’ या नावाने ओळखली जाते. याची सुरुवात एका खोलीत सुरु केलेल्या एका दवाखान्यापासून झाली होती. सोप्या सोप्या उपायांनी बऱ्या होऊ शकणाऱ्या आजारांमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांचा बळी जात होता. या स्त्रीयांमध्ये डॉ आबिदींची आईसुद्धा होती. जेव्हा डॉ आबिदी १२ वर्षांच्या होत्या तेव्हाच प्रसूती संदर्भातील समस्येमुळे त्यांच्या आईचे निधन झाले. जेव्हा की योग्य औषध आणि उपचारांद्वारा ती समस्या सोडविणे फार कठीण नव्हते. आईच्या मृत्यूने त्यांना डॉक्टर बनण्यासाठी प्रेरित केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा गावातील महिलांची सेवा करण्यासाठी परतल्या. मात्र इतर सामाजिक संस्थांप्रमाणेच डॉ आबिदी यांनाही समाजाची स्विकारार्हता मिळविण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यांनी आपल्या संस्थेची स्थापना केली तेव्हा लोकांच्या मनात अनेक संशय होते. लोक त्यांच्याकडून उपचार करुन घ्यायला घाबरायचे. मात्र त्यांनी जसजसे एक एक करुन लोकांवर उपचार करायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या लक्षात आले की त्यांचे उपचार खरोखरच प्रभावी आहेत, लोक त्यांच्या उपचारांनी बरे होत आहेत आणि त्यानंतर हळूहळू लोकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होऊ लागला. दिवसेंदिवस डॉ आबिदींवर लोकांचा विश्वास वाढू लागला आणि लोक त्यांचा आदर करु लागले. “त्यावेळी सर्वात मोठं आव्हान लोकांचा विश्वास संपादन करण्याचंच होतं. मला वाटतं माझ्या आईने लोकांच्या प्रती आदर आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतीप्रती सन्मान दाखवूनच लोकांचा विश्वास संपादन केला. लोकांना नवीन चिकित्सा पद्धतीचा प्रभावशाली परिणाम दाखवूनही तिने त्या लोकांचे मन जिंकले ज्यांची ती सेवा करु इच्छित होती. याला वेळ लागतो, मात्र धैर्याने तुम्ही एक असे नाते बनविता जे विसरणं सोपं नसतं,” डॉ डेको सांगतात.

सोमालिया संबंधित पूर्वापार चालत आलेल्या समजांना छेद देत आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी जागवत डेको सांगतात, “जेव्हा मी लहान होते, मी माझ्या आईबरोबर गावोगावी जायचे आणि पट्टी बांधणे, रेकॉर्ड ठेवणे यासारख्या कामांमध्ये आईची मदत करायचे. मला ते सर्व करणं आवडायचं. कुणाची तरी मदत करणे आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मला खूप आनंद द्यायचा. मोठं होता होता दुसऱ्याची मदत करणे माझा स्वभाव बनला. सोमाली लोक खूप मनापासून पाहुण्यांचं आदरातिथ्य करतात. तुम्हाला तुमच्या घरी बोलावतील, चहा देतील आणि दिवसभर तुमच्याशी गप्पा मारतील. इथे पूर्ण गाव म्हणजे एक समुदाय आहे. मी माझ्या आईबरोबर जिथे कुठे जायचे तिथे माझ्या आईचे जोरदार स्वागत झालेले मी पाहिले आहे.”

‘डॉ हावा आबिदी फाऊंडेशन’मधील वातावरण खूप प्रगतीशील आणि तरुणांच्या विचारानुसार चालणारे आहे. डॉ हावा सोमालियातील सुरुवातीच्या काही प्रसूतीतज्ज्ञांपैकी एक. डॉ हावा त्या काळातील डॉक्टर आहेत जेव्हा महिलांना घरी राहून मुलांचा साभाळ कर असे सांगितले जायचे. “या संस्थेत जास्त ते लोक तिशीच्या आतले आहेत आणि आम्ही कोणत्याही नव्या विचाराचे स्वागत करतो. मी आणि माझी बहिण डॉ अमीना, आमचा दोघांचाही आमच्या आईच्या कार्यावर दृढ विश्वास आहे. आम्ही दोघी बहिणी तिच्या पावलावर पाऊल ठेऊनच पुढील वाटचाल करीत आहोत आणि तिचे कार्य पुढे घेऊन जात आहोत. आमच्या आईने सोमाली बंधु-भगिनींच्या सेवेत आपले सारे आयुष्य घालविले. हजारो लोकांचे आयुष्य वाचविण्यासाठीची तिची तळमळ पहात आम्ही मोठ्या झालो आणि त्यामधूनच आम्हाला तिने सुरु केलेले हे कार्य पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली,” डॉ डेको अभिमानाने सांगतात. डॉ डेको पुढे सांगतात, “माझे माझ्या कामावर प्रेम आहे. आयुष्य वाचविण्याची योग्यता असल्यामुळे, मी एका आईला आपल्या मुलाला कुशीत घेताना होणारा आनंद पाहू शकते. हा आनंद खरंच अद्भूत आहे. हा तो क्षण आहे जो माझे काम सार्थकी लावतो. मला माहिती आहे की माझ्या आणि माझ्या मेडिकल टीमशिवाय या सर्वात जोखीमग्रस्त समाजाला कुठल्याही प्रकारच्या उपचारांची सुविधा मिळू शकत नाही. ३१ किमीच्या परिसरात केवळ आमचे रुग्णालयच रुग्णांना मोफत चिकित्सा सेवा प्रदान करते. दोन दशके जेव्हा गृहयुद्ध भडकले होते, फक्त मी, माझी आई आणि बहिण असे आम्ही तीन डॉक्टरच एक एक दिवस जवळपास ३०० रुग्ण तपासायचो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचार देण्यासाठी मला अनेकदा रात्री ३ वाजता उठावं लागलेलं आहे. मात्र आम्हाला माहिती आहे की लोकांना आमची गरज आहे.” हे सांगताना त्यांचा चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

सामाजिक क्षेत्रातील उद्योजकांनी लक्षात ठेवावे असे काही मुद्दे डॉ डेको सांगतात –

1. कोणीही व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काही काम सुरु करु इच्छिते तेव्हा तिचे आपल्या कामावर प्रेम आणि कामाची अतिशय आवड असायला हवी. मी सल्ला देईन की तुम्ही स्थानिक पातळीवरील गरजा काय आहेत ते जाणून घ्या. त्यानंतर पहिल्यापासून काय सेवा किंवा सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घ्या. त्यानंतर नेमकं काय काम करण्याची गरज आहे ते समजून घ्या. इतर अनेक संस्था आधीपासूनच खूप चांगले काम करत असतील तर त्या संदर्भातील नव्या संस्थेला शून्यातून काम करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना त्याविषयी आधीपासूनच कार्यरत असलेल्या संस्थेच्या कार्यात सहयोग करणे अधिक चांगले होईल.

2. दुसरं म्हणजे तुम्ही स्थानिक लोकांचा सन्मान करणं आवश्यक असतं. तुम्ही ज्यांची सेवा करु इच्छिता ते अत्यंत समजूतदार लोक असतात. आम्ही ज्या सुविधा देतो त्या घेण्यासाठी महिला आणि मुलं दूरवरुन चालत येतात. ते सर्वात काटक लोक असतात. मी अशा लोकांना भेटले आहे जे सर्वात कठीण प्रसंगीसुद्धा खंबीरपणे उभे होते.

3. शेवटचं म्हणजे, तुमचा दृष्टीकोन लवचिक असला पाहिजे. प्रत्येक वेळी नवीन विचार सुचत असतात आणि जुन्या विचारांना नाकारलं जातं. तुम्ही नवीन पद्धती आणि स्थितीचे स्वागत करायला हवे, त्यासाठी लवचिक असायला हवे. आज आपण ज्या जगात रहातो आहोत तिथे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे आणि विचार सीमेपलिकडे पोहचत आहेत. हे सुद्धा एक प्रकारचे आव्हान आहे, मात्र ही एक संधी सुद्धा आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये मदत मिळू शकते.लेखक : आदित्य भूषण द्विवेदी

अनुवाद : अनुज्ञा निकम