‘जनआग्रह’- जनतेला जागृत करणारी ऑनलाईन मोहीम

0

आपल्या आजुबाजूच्या परिस्थितीमध्ये बदल घडून त्या परिस्थितीत सुधारणा कशी होईल याबाबत आपण सर्वजण सतत विचार करत असतो. जिथे मूलभूत सोई सुविधांची वानवा आहे अशा ग्रामीण भागामध्ये असा विचार कऱण्याची सर्वात जास्त आवश्यकता असते. जेव्हा असा विचार करणारे अनेक लोक एका व्यासपीठावर एकत्र येऊन त्या साठी प्रयत्न करू लागतात तेव्हा परिस्थिती बदलण्याची शक्यता अधिक मजबूत होत जाते. रमेश आणि स्वाती रामनाथन यांनी याच प्रयत्नांना ‘जनआग्रह’च्या माध्यमातून एक व्यासपीठ दिले आणि तंत्रज्ञानाचा चपलखपणे वापर करून सर्वसामान्य नागरिकांना जागृत करण्याचा एक नवीन आणि आगळा वेगळा असा प्रयत्न केला.

‘आयचेंजमायसिटी’ (IChangeMyCity) हे ‘जनआग्रह’ने सुरू केलेले एक वेबवर आधारित सोशल नेटवर्किंग व्यासपीठ आहे. याच्या मदतीने विविध सामाजिक समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे व्यासपीठ सर्वसामान्यांच्या हाती देण्यात आले आहे. यात सामाजिक प्रश्नाबाबत, तसेच निवडून दिलेल्या स्थानिक जनप्रतिनिधींबाबत पूर्ण माहिती दिलेली असते. यासोबतच नकाशावर आधारित ठिकाणांची चित्रे, मतदार संघांवर आधारित विभागांची माहिती तसेच जबाबदार स्थानिक नेत्यांबाबतच्या संपूर्ण माहितीचा तपशील दिलेला असतो. या पोर्टलवर आल्यानंतर लोकांना मतदारांबाबत माहिती देणे, स्थानिक पातळीवर होत असलेल्या सुधारणांची कामे आणि विविध संस्थांद्वारे केल्या जाणा-या कार्यांची माहिती देणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्त माहिती देऊन नागरिकांना मदत केली जाते.

समस्यांचे निवारण

या पोर्टल द्वारे लोकांना केवळ माहितीच मिळते असे नव्हे, तर त्यांच्या विविध तक्रारींचे निवारण देखील केली जाते. जर एखाद्याला रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची समस्या सतावत असेल, किंवा मग जवळच्या दारूच्या दुकानावर होणा-या गोंगाटाची समस्या असेल, तर त्याने या पोर्टलवर असलेल्या तक्रार करण्याच्या भागात जाऊन आपली तक्रार नोंद करायची आहे. यातील विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर कारवाई सुरू झाली आहे का किंवा ती तक्रार सध्या कोणत्या पातळीवर आहे हे पाहता येते. यात सर्वात मनोरंजक असलेली गोष्ट म्हणजे इथे लोकांना एकमेकांशी बोलूनही आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. वेबसाईटच्या आधारे तर हे शक्य आहेच, परंतु मोबाईल अॅपच्या रूपात कोणीही आपल्या मोबाईलमध्ये हे पोर्टल सेव्ह सुद्धा करू शकतो. ज्या भागाची आपल्याला तक्रार करायची आहे त्या भागाचा फोटो देखील या पोर्टलचा वापर करणारा आपल्या तक्रारीला जोडू शकतो. एकदा का ही तक्रार पोर्टलवर नोंद झाली, की मग ही तक्रार सोडवण्यासाठी संबंधित जबाबदार अधिका-याकडे पाठवली जाते. त्यानंतर त्या तक्रारीवर जी काही कारवाई करण्यात येते त्याबाबतचा अहवाल साईटवर अपडेट केला जातो. आणि जर एखादी समस्या सोडवण्यासाठी एकापेक्षा अधिक लोक प्रयत्न करत असतील तर अशी समस्या जलद गतीने सोडवण्यात येते ही या पोर्टलची सर्वात चांगली गोष्ट आहे.

'चेंज माय स्ट्रीट'

‘जनआग्रह’ने ‘आयचेंजमायसिटी’च्या माध्यमातून ‘आय चेंज माय स्ट्रीट’ ही संकल्पना सुरू केली आहे. शहरातील रस्ते स्वच्छ बनवणे हा या मागचा उद्देश होता. तब्बल २२० शाळांमधील दहा हजार विद्यार्थी, त्यांचे आई-वडिल, स्थानिक रहिवाशी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, नऊ आमदार आणि २० पेक्षा अधिक स्थानिक सभासदांसोबत ‘आय चेंज माय स्ट्रीट’ च्या या संकल्पनेची सूरूवात बंगळुरू शहरात झाली. या मोहिमेबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. श्री साई इंग्लिश स्कूल या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता ११ वीचा विद्यार्थी सूर्या एच.एस. म्हणतो, “ आम्हाला जेव्हा या मोहिमेबाबत सांगितले गेले तेव्हा पासून मी अतिशय उत्सुक होतो. ज्या रस्त्यावरून आम्ही चालतो, तो रस्ता स्वच्छ राखणे ही सुद्धा आपली जबाबदारी असते आणि स्वच्छता राखणे ही गोष्ट सर्वांसाठी चांगली देखील आहे.” या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले, रस्त्यांच्या किना-यांवर बेंच बसवले आणि घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत लोकांना जागृत करण्याचे काम देखील केले. ऑनलाईन ‘आय चेंज माय स्ट्रीट’ या पेजवर जवळजवळ पन्नास हजार लोकांनी या मोहिमेबाबत आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, ही गोष्ट या मोहिमेच्या यशस्वीतेचा अंदाज लावण्यासाठी पुरेशी आहे.

या विशेष प्रसंगी ‘जनआग्रह’च्या सह-संस्थापिका स्वाती रामनाथन म्हणाल्या, “ आपल्या समाजात लोक मुलांना डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि शास्त्रज्ञ बनण्याचा सल्ला देतात, परंतु आपल्या मुलांना एक जबाबदार नागरिक बनवण्याच्या दिशेने कुणीही प्रयत्न करत नाही. आपली मुले एक जबाबदार नागरिक बनावीत यासाठी आपण त्यांच्यासमोर तसे कोणते उदाहरण किंवा आदर्श ठेवतच नाही मुळी. आपल्या आस-पासच्या परिसराची स्वच्छता ठेऊ शकतील यासाठी आपल्या मुलांना एक जबाबदार नागरिक बनवण्याच्या दृष्टीने आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे.” ‘आय चेंज माय स्ट्रीट’ने बंगळुरू शहरात आता प्रत्येक वर्षी सकारात्मक पद्धतीने संपन्न होणा-या एका अनिवार्य माहिमेचे रूप धारण केलेले आहे.

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories