एका क्लिकवर किराणा...

0

किराणा मालाचं दुकानं आणि ग्राहक यांचं नातं काही वेगळंच असतं. ते फक्त दुकानदार आणि ग्राहक इतकंच मर्यादित नसतं. त्यापेक्षा हे नातं अनेक वर्षांचं किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं आणि ते तेवढंच टिकून राहतं. आता मोठे बाजार आले. फ्रि होम डिलीवरीसारख्या सुविधा आल्या. स्वस्त दरात वस्तू देण्याचं फॅड आलं. पण किराणा दुकानांची संख्या कमी होण्यापेक्षा ती जास्त वाढत आहे. याचं कारण हे ग्राहक आणि या किराणा दुकानातलं नातं. ते या कुठल्याही ऑफरपेक्षा पुढचं आहे. यामुळंच आता जग ऑनलाईन झालं असलं तरी हे नातं तसंच कायम आहे. याचाच फायदा घेत या नात्याला नवा साज चढवण्याचा प्रयत्न इबाझार या वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल की वेबसाईट आली म्हणजे जुनं नातं कुठे टिकून राहिलं. पण आपल्या जवळचा किराणावालाच या वेबसाईटवर उपलब्ध आहे. म्हणजे दुकानात जाऊन किंवा फोनवर प्रत्येक वस्तूची किंमत विचारण्यापेक्षा ती एका क्लिकवर उपलब्ध करण्याचं काम ebzaar.com या वेबसाईटनं केलंय. किराणा मिळतोय फक्त एका क्लिकवर. म्हणूनच त्याची टॅगलाईन आहे सबका बाझार, ईबाजार.


चार्टर्ड अकाऊन्टंट असलेल्या विरल ठक्कर यांना नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. वेगवेगळ्या कंपनीत त्यांनी काम केलं होतं. पण आपला स्वत:चा व्यवसाय असायला हवा हे त्याचं स्वप्न होतं. खुप संशोधन केल्यानंतर किराणा मालाचं दुकान आणि ग्राहक यांच्यातल्या नात्याला आणखी पुढे कसं नेता येईल यावर त्यांनी विचार केला. यातून ebzaar.com ची संकल्पना पुढे आली. किराणाच्या दुकानाला ऑनलाईन व्यासपीठ देण्याची कल्पना पुढे आली. यासाठी ना कुठल्या गोदामाची गरज होती ना वस्तू कुठून आणून देण्याची. फक्त नेहमीच्या किराणा मालाच्या दुकानाला ऑनलाईन करणं. अगोदर विरल यांनी मुंबईत हा प्रयोग केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं त्यांनी सुरतमध्ये ही सेवा सुरु केली.

ebzaar.com ची कामाची पध्दत फार सोपी आहे. त्यांनी किराणा मालाच्या दुकानांची नोंदणी वेबसाईटवर केलीय. शिवाय तिथं मिळणाऱ्या वस्तूंचं वर्गीकरणही केलंय. यामुळं आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची नक्की किंमत कळते. ऑर्ड़र दिल्यानंतर काही मिनिटांतच किंवा आपल्या सवडीनुसार डिलीवरी घेण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलीय. म्हणजे तुम्हाला वेळ नाहीये. तुम्ही ऑफिसमध्ये आहात. तर तिथं बसल्या बसल्या हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करा आणि घरी पोचल्यावर डिलीवरी घ्या अशी ही सोय आहे. शिवाय कॅश ऑन डिलीवरीची सुविधाही देण्यात आलीय. यामुळं व्यवहार करणं ही फार सोपा जातो.

या किराणा मालांच्या दुकानांशी अॅग्रीमेन्ट केलं जातं. परिसरातल्या नवीन ग्राहकांशी त्यांना जोडण्यात येतं. यामुळं ग्राहक संख्येतही वाढ होते. याचा फायदा दुकानदाराला मिळतो. सध्या फक्त मुंबई आणि सुरतमध्ये उपलब्ध असलेली या वेबसाईटची सुविधा येत्या काही वर्षांमध्ये देशभरातल्या १५ ते २५ शहरांमध्ये विस्तारण्याचा विरल ठक्कर यांचा विचार आहे.