मागणी-पुरवठ्यातील दरीतला पुल : ‘हातमाग’केंद्रित Artisangilt

मागणी-पुरवठ्यातील दरीतला पुल : ‘हातमाग’केंद्रित Artisangilt

Wednesday December 23, 2015,

4 min Read

हातमाग उद्योगातील मागणी आणि पुरवठ्यातील तफावत राहुल गर्ग आणि प्रियेश निमा यांच्या लक्षामध्ये २०१२ च्या शेवटीशेवटी मुंबईतील एका हातमाग प्रदर्शनादरम्यान आली. प्रदर्शनासाठी दोघे खास आलेले होते. हातमाग उद्योगातील उत्पादनांना मोठी बाजारपेठ आहे, हे दोघांनाही इथे जाणवले. दोघे मिळून कितीतरी हातमाग कलावंतांना भेटले. अशा उत्पादनांचे व्यावसायिक मूल्य जाणून घेण्यासाठी कला समिक्षकांनाही भेटले. स्थानिक पुरवठादारांनाही भेटले. पुढे दोघांनी मिळून तीन व्यावसायिक प्रदर्शनं मुंबईत भरवली आणि तिन्ही यशस्वी ठरली.

जुन २०१३ मध्ये या दोघांसह मेघा अग्रवाल आणि अनुराग निमा अशी टीम तयार झाली. चौघे मिळून Artisangilt ची स्थापना करण्यात आली. हँडमेड गृहोपयोगी आणि परिधान म्हणून वापरावयाच्या उत्पादनांची छोटेखानी जमवाजमव केली. Artisangilt चे सहसंस्थापक राहुल गर्ग सांगतात, ‘‘ग्राहक आणि पुरवठादारांशी संबंध जसजसे दृढ होत गेले, संवाद वाढत गेला तसतसे आमच्या लक्षात आले, की हस्तकौशल्यातून साकारल्या गेलेल्या वस्तूंतच नव्हे तर कितीतरी नॉन-ब्रँडेड, नॉन-स्टँडर्ड डिझायनर प्रॉडक्टच्या बाबतीत मागणी आणि पुरवठ्यात कमालीची तफावत आहे. उदाहरणार्थ साड्या, फॅन्सी दागिने, पेंटिंग.’’

image


राहुल, प्रियेश आणि अनुराग आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. राहुल आणि प्रियेश यांनी अनुक्रमे गुंतवणूक बँकर्स म्हणून अनुक्रमे ‘लेहमन ब्रदर्स’ व ‘नोम्युरा’ या फर्म्समध्ये याआधी काम केलेले आहे. तर अनुरागने एकापाठोपाठ कितीतरी व्यवसाय केलेले. ‘मॅचबॉक्स एंटरटेन्मेंट’चा तो सहसंस्थापकही होता. तर मेघा ही हातमाग उद्योगाशी दशकाहून अधिक काळ (वर्षे) हातमाग उद्योगाशी संलग्न आहेत.

सध्या Artisangilt पन्नासांवर लाइफस्टाइल कॅटेगरीतील पंधरा हजारांवर उत्पादने विकते. मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत एकट्याने भरून काढण्याची कंपनीची आकांक्षा आहे. एरवी हजारो अशी उत्पादने जी ठराविक भागातच मिळत असत ती सगळी Artisangilt च्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.

प्रियेश म्हणतात, ‘‘मोठ्या प्रमाणावरील ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यापेक्षा, मोठे पुरवठादार म्हणून नाव कमावण्यापेक्षा शॉपिंगच्या अत्युच्च अनुभवासह उत्तम दर्जाची उत्पादने ग्राहकांना पुरवणे, यावर आम्ही व्यावसायिक म्हणून अधिक भर दिला.’’ सध्याच्या परिस्थितीत Artisangilt च्या यादीत ३० पुरवठादार आहेत. कंपनीला त्यामुळे उत्तम आणि समर्पित पुरवठादारांची निवड करणे अधिक सोपे जाते. अत्यंत वाजवी किमतीत कंपनी ग्राहकांना माल उपलब्ध करून देते. कुठलेही प्रॉडक्ट असो किंमतीच्या बाबतीत ती रास्तच आहे, याची खात्री ही कंपनी देते. राहुल म्हणतात, ‘‘आमच्या वेबसाइटमधील यादीनुसार एखाद्या वस्तूची जी किंमत आहे, त्यापेक्षा कमी किंमतीत जर कुठल्या अन्य विख्यात कंपनीच्या वेबसाइटवर तीच वस्तू उपलब्ध असेल तर आम्ही आमच्या ग्राहकाला वस्तूच्या दुपटीने रक्कम परत करण्यास बांधील आहोत.’’

image


कंपनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाची बनलेली आहे. २०० वर देशांमध्ये कंपनीचा माल गेलेला आहे. FedEx, DHL आणि Blue Dart या थर्ड पार्टी लॉजिस्टिक पार्टनर्सच्या (माल पोहोचवून देणाऱ्या कंपन्या) माध्यमातून हा माल पाठवण्यात आला. Artisangilt ने दोन वर्षांपूर्वी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचावीत म्हणून मार्केटिंग कँपेनिंगही सुरू केले आहे. मेघा म्हणतात, ‘‘सेल जरा कमी असला तरी आमच्याबद्दलचे ग्राहकांमधले आकर्षण संपलेले नसते. ते वाढतेच आहे.’’ कंपनीच्या वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसाला ५००० आहे, यावरून मेघा यांच्या म्हणण्यातले तथ्य लक्षात यावे. १० हजार ग्राहकांचा डाटाबेस कंपनीकडे आहे. मेघा सांगतात, ‘‘मंदीतही धंदा कसा होतो, याचे उदाहरण म्हणजे आम्ही आहोत. रोजच्या किमान ५० ऑर्डर तरी या काळातही आमच्याकडे असतातच असतात.’’

योग्य कामासाठी योग्य लोकांची निवड करणे आणि त्यांना योग्य तो मोबदला देणे, ही गोष्ट Artisangilt साठी सर्वांत मोठे आव्हान ठरले. राहुल सांगतात, ‘‘स्टार्टअपसाठी चांगली माणसे वाजवी मोबदल्यात मिळवून देणारे प्लेसमेंट सल्लागार बाजारात उपलब्ध नाहीतच. येणारे उमेदवार एक तर उपयुक्त नसतात किंवा मग उपयुक्त असले तर तोंड फाडून पगार मागतात.’’

संपूर्ण भारतभर सेवा देणारे सुव्यवस्थापित ‘मार्केटप्लेस मॉडेल’ म्हणून Artisangilt समोर आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे ग्राहकांपर्यंत माल व्यवस्थितपणे व वेळेत पोहोचवणे. मालवाहतूक कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्यांचे काम प्रादेशिक पातळीवर चालते. दुसरे म्हणजे या कंपन्यांची कार्यशैली वेंडर-ग्राहक अशाच स्वरूपाची असते. ई- कॉमर्स कंपन्यांसाठी पार्टनर म्हणून काम करण्याची या कंपन्यांची शैली नसते. प्रियेश सांगतात, ‘‘ज्या काही या क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या आहेत, त्या फार मोठ्या आहेत आणि पुन्हा महागड्या आहेत. वरून लहान कंपन्यांसमवेत काम करायला त्या उत्सुक नसतात.’’

१५ हजार प्रॉडक्ट्सची रेंजवरून Artisangilt ने सुरवात साजरी केली. ३० हजार, ६० हजार असे करत नजीकच्याच काळात ही रेंज लाखभरापर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे. राहुल सांगतात, ‘‘आम्ही लवकरच मोबाईल वेबसाइट सुरू करणार आहोत. कारण आमच्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास २५ टक्के ग्राहक आम्हाला मोबाईलच्या माध्यमातून भेटी देत असतात.’’ संस्थापकांनी कंपनीची चांगली सुरवात केलेली आहे. पुढल्या टप्प्यात कंपनीची श्रीमंती वाढवत नेणे, हेच या संस्थापकांचे उद्दिष्ट असणार आहे.

लेखक : जयवर्धन

अनुवाद : चंद्रकांत यादव