शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासनाने नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प घेतला हाती

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासनाने नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प घेतला हाती

Saturday October 08, 2016,

6 min Read

वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाशिम येथे संपन्न झाले. पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजसमधून उपसा सिंचन करून सुमारे १२ हजार कृषिपंपांद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ११४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची वीजेची गरज लक्षात घेता कृषी पंपांना ८ ऐवजी १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. कृषी पंपासाठी आवश्यक रोहित्रे व अन्य मुलभूत सुविधा प्राधान्याने दिल्या. शेतकरी स्वाभिमानी आहेत. ते काहीच मागत नाहीत, त्यांना फक्त सिंचनासाठी पाणी व वीज दिल्यास तो समाधानी होऊ शकतो, म्हणून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यातील २० गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार गावांपैकी ४ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. उर्वरित २ हजार गावे येत्या डिसेंबरअखेरपर्यंत दुष्काळमुक्त होतील. दुसऱ्या टप्प्यात ५ हजार गावे निवडली असून लवकरच ही गावे दुष्काळमुक्त केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

image


वाशिम जिल्ह्यातील ९ नद्यांची अवस्था नाल्यांसारखी झाली आहे. या नद्यांचे मूळ स्वरूप परत आणल्यास सुमारे ७० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता ४५ टक्के निधी सीएसआर फंडातून उभारण्यात आला असून ५५ टक्के निधी राज्य शासन देणार आहे. याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील ९ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आराखडा तयार करा. याकरिता राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. यामुळे जिल्हा जलमय होऊन शेतकरी समृद्धी होतील.

शेत माल प्रक्रिया उद्योगांमुळे समृद्धी

शेतमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी शेती माल प्रक्रिया उद्योग उभारणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य शासन प्रयत्न करीत असून अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क निर्मितीमुळे कापसापासून कापडापर्यंतची निर्मिती होत आहे. पूर्वी ओस पडलेल्या एमआयडीसी मध्ये आता उद्योग वाढले असून नवउद्योजकांना जागा कमी पडत आहे. मूल्यवर्धित प्रकल्पामुळे कापसाला चांगला दर मिळत आहे. उद्योगाच्या माध्यमातून १५ ते २० हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विदर्भात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वी दलाल शेतकऱ्यांचा माल घेऊन साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करत. दलालांची साखळी तोडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

image


महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात भागीदार व्हा

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासनाने नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या महामार्गामुळे वाशिम येथून शेतमाल ४ तासात मुंबई येथे पोहचवता येईल. शेतमाल मुंबईत नेल्यास अधिक भाव मिळतो. कृषीमाल निर्यात करावयाचा असल्यास तोडणीनंतर १५ तासात माल पोहचला पाहिजे. जेएनपीटी पोर्टद्वारे शेतमाल निर्यात करून मोठा भाव मिळतो, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे आरोग्य सेवा त्वरित मिळणार आहे. या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योगांचा विकास होणार आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना भागीदारी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचे भाव पुढील दहा वर्षात जेवढे होतील, त्या संदर्भात हमीपत्रावर करार करून दर न मिळाल्यास ती जमीन शासन विकत घेईल. या महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीमध्ये वाशिम जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीसाठी या प्रकल्पात भागीदार व्हावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी, या जिल्ह्यात समृद्धी आणण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

image


पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले, महाराष्ट्र समृद्धी प्रकल्पामुळे शेतकरी समृद्ध होणार असून सर्वांनी यात सहभागी होऊन सहकार्य करावे. शेतकरी केंद्र बिंदू ठरवून शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. आरोग्याच्या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या वाढली आहे, यासाठी विद्यापीठाची उपशाखा सुरु करण्याची मागणी केली.

कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर म्हणाले, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान पीक विमा ही महत्वाकांक्षी योजना लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वर्गणीही अत्यल्प आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी राज्यभरातून २ लक्ष ७१ हजार शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी असणारी मुदत वाढीची मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शासनाने ठिबक सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अशा अनेक योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे सांगून पैनगंगेवरील कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजसमध्ये रूपांतरण करण्यासाठी तसेच सिंचन प्रकल्पाची सर्व प्रलंबित कामे येत्या २ वर्षात पूर्ण करू, असे म्हणाले. दुर्धर आजारावरील उपचारासाठी कितीही रुपयांची आवश्यकता भासल्यास आपल्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधा. उपचाराची पुढील सर्व जबाबदारी आमची आहे, असे ते म्हणाले.

आमदार पाटणी म्हणाले, जिल्ह्याला भरघोस निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानून वाशिम जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी कृषी महाविद्यालय, दंत महाविद्यालय मंजूर करावे, मानव निर्देशांक ३३ वरून २०-२५ पर्यंत आणा, अशी मागणी केली. आमदार लखन मलिक यांनी एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्याची मागणी केली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. सूत्रसंचालन किशोर गलांडे यांनी तर उपस्थितांचे आभार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर यांनी मानले.

लोकार्पण व भूमिपूजन झालेल्या विकास कामांचा तपशील

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील अडोळी, अनसिंग, वाई, गव्हा येथील ३३ के. व्ही. सब स्टेशनचे तसेच ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्थेचं आरसेटी इमारत बांधकाम या सर्व कामांसाठी १३ कोटी ७३ लक्ष रुपये खर्च आला असून या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय २२१.३२ कोटी रुपयांच्या विविध २० कामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्याचा तपशील पुढील प्रमाणे.

• महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत वाशिम शहरातील विविध रस्त्यांचे विकास कामे- रु. ८१.५० कोटी रूपये.

• विशेष रस्ता अनुदाना अंतर्गत वाशिम शहरातील विविध रस्ते बांधकाम- रु. ८.५० कोटी रुपये

• वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत वाशिम शहरात टेम्पल गार्डन विकास- रु. ६ कोटी रुपये

• जिल्हा वार्षिक नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत वाशिम येथे अॅडव्हेंचर पार्क व तारांगण- रु. ३ कोटी रु.

• अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास अंतर्गत वाशिम शहरात विविध रस्ते बांधकाम – रु. १.२९ कोटी रु.

• वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत वाशिम शहरामध्ये हायमास्ट व एलईडी लाईट लावणे- रु. १ कोटी

• वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम- रु. १ कोटी

• कारंजा नगर परिषद क्षेत्रातील विविध योजने अंतर्गत विकास कामे – रु. ३ कोटी

• रिसोड नगर परिषद क्षेत्रातील विशेष रस्ता अनुदाना अंतर्गत विकास कामे- रु. ३ कोटी

• मंगरूळपीर नगर परिषद क्षेत्रातील विशेष रस्ता अनुदाना अंतर्गत विकास कामे – रु. ३ कोटी

• वाशिम जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ११ रस्त्यांचे कामे – रु. ६७.५० कोटी

• केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत वाशिम जिल्हा मौजे हराळ-वरखेड ता. रिसोड रस्त्याचे रुंदीकारणासह सुधारणा- रु. १५.२५ कोटी

• मालेगाव येथे तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीचे बांधकाम – रु. ७ कोटी

• वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीचे बांधकाम- रु. ६ कोटी

• वाशिम येथे अन्न व औषध प्रशासन कार्यालय व निवासस्थानांचे बांधकाम- रु. ४.७५ कोटी

• वाशिम येथे जिल्हा ग्रंथालय इमारतीचे बांधकाम- रु. ४ कोटी

• कारंजा येथे पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचे बांधकाम- रु. २ कोटी

• जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे जलतरण तलाव बांधकाम- रु. १.३२ कोटी

• वाशिम रिसोड रस्ता चौपदरीकरण करणे (जुना रिसोड नाका ते नवीन रिसोड नाका) – रु. १.५० कोटी