'जूगनू'महिला प्रवाशांचा सोबती

0

देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा वाटा दिवसोंदिवस वाढतोय. याचाच विचार करुन चंदीगडमध्ये ‘जूगनू’ या अॅपची सुरुवात झाली. याच्या मदतीनं महिला ऑटो ड्रायव्हरना रोजगार तर मिळतोच. शिवाय त्यांना प्रशिक्षण आणि सुरक्षा उपायांच्या टिप्सही दिल्या जातात. सध्या ही योजना चाचणी स्वरुपात सुरु आहे. नुकतीन नोईडामध्ये कंपनीनं पहिली महिला ऑटो चालकाची नोंदणी केली आहे. आता प्रत्येक शहरातून दोन महिला ऑटो ड्रायव्हर जोडण्याची कंपनीची योजना आहे.

पेटीएमच्या मदतीनं चालणारं हे अॅप्लिकेशन महिला ऑटो चालकांना वाहतूकीच्या नियमांची माहिती तर देतंच. त्याचबरोबर संकटाच्या प्रसंगी आपली सुरक्षा कशी करायची याचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे. जूगनूचे सीईओ आणि सहसंस्थापक समीर सिंगला यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले,

“ सामाजिक जबाबदारीबरोबरच महिला प्रवाशांची संख्या वाढवणे हे देखील कंपनीचे लक्ष्य आहे. सुदैवानं महिलांनी या प्रयोगाचे स्वागत केले आहे. पुरुषाचं वर्चस्व असलेल्या या उद्योगात त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी यातून उपलब्ध झालीय.”

बंगळूरुच्या ‘जिप गो’या संस्थेनं दिल्ली एनसीआरच्या काही परिसरात ( द्वारका, गुडगाव आणि मानेसर ) महिलांसाठी खास शटल सर्व्हिस सुरु केली आहे. आता संपूर्ण एनसीआरमध्ये अशा प्रकारची सर्व्हिस सुरु करण्याची त्यांची योजना आहे. समीर सांगतात,

“ आपलं आयुष्य चांगलं जगता यावं यासाठी सामाजिक बंधनं तोडून ऑटो रिक्षा चालवण्याचं धाडस या महिलांनी केलं आहे. या महिलांना जूगनूबरोबर जोडतानाच त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले तरच जूगनूचा उद्देश पूर्ण झाला, असे म्हणता येईल.”

महिलांसाठी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषत: रोज प्रवास करणा-यांना तर या अडचणीचा नेहमी सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये कॅब हा महागडा पर्याय आहे. त्याचबरोबर कामाच्या वेळेत ( पिक अवर ) मध्ये कॅब मिळणे त्रासदायक ठरते. त्या तुलनेत ऑटो सहज उपलब्ध होऊ शकतो. कॅबच्या तुलनेत याचं भाडेही कमी आहे. तसंच कुठेही कमी वेळात पोहचण्यासाठी ऑटो हे चांगले वाहन आहे.

महिला चालक आणि प्रवासी दोघांसाठीही हे फायद्याचे माध्यम आहे. दिल्लीमध्ये २०१४ साली घडलेल्या दुर्दवी घटनेनंतर कॅब आणि ऑटोची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुडगावसारख्या शहरात यापूर्वीच केवळ महिलांसाठी गुलाबी ऑटो ही योजना सुरु करण्यात आली आहे. पण ही फारशी लोकप्रिय नाही. मात्र ‘जिप गो’ आणि ‘जूगनू’ , बजेट हॉटेल एग्रीगेटर, ‘ओयो’ यांना दिल्ली, गुडगावमध्ये महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तसेच त्यांची मागणीही वाढत चालली आहे.

फोटो: संग्रहित

लेखक – समीर बिस्ट

अनुवाद – डी.ओंकार

Related Stories

Stories by Team YS Marathi