"दादा कोंडकेंच्या “एकटा जीव” या चरित्रात्मक पुस्तकावर सिनेमा हे एक मोठं यश" - लेखिका अनिता पाध्ये

"दादा कोंडकेंच्या “एकटा जीव” या चरित्रात्मक पुस्तकावर सिनेमा हे एक मोठं यश" - लेखिका अनिता पाध्ये

Tuesday December 22, 2015,

3 min Read

१२ मार्च १९९९ ला एकटा जीव हे दादा कोंडके यांचे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित झाले. दादांवरचे हे पहिले चरित्रात्मक पुस्तक. पत्रकार आणि लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकाचे लेखन केले. यानंतर अगदी वर्षभरातच काही महिन्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली होती. आणि आता याच पुस्तकाची दहावी आवृत्ती प्रकाशनासाठी सज्ज झाली आहे. येत्या २७ डिसेंबरला पुण्यात या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. यानिमित्त लेखिका अनिता पाध्ये यांनी त्यांच्या प्रकाशकांचे आणि वाचकांचे आभार मानलेत. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजेच लवकरच दादांच्या आयुष्यावर एक मराठी सिनेमा येऊ घातलाय, बॉलीवूड स्टार अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या या सिनेमासाठी एकटा जीव या पुस्तकाचे कॉपीराईटस घेण्यात आले आहे.

image


चांगल्या वाईट प्रतिक्रियांमधून चालत आलेल्या या पुस्तकाचा प्रवास मांडताना अनिताजी भावुक नाही झाल्या तरच नवल. “दादांवर एक अख्ख पुस्तक लिहावे हा विचार मी कधीच केला नव्हता. पत्रकार म्हणून अनेक वर्ष काम करत असतानाच मी टेलिव्हिजन माध्यमातही सक्रीय झाले होते. यादरम्यान बऱ्याच वर्षाचा मनोरंजन पत्रकारितेचा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोचवावा या हेतूनं मी या क्षेत्रातल्या पाच दिग्गज कलाकारांवर एक पुस्तक लिहायचे ठरवले, यात संगीतकार नौशाद यांचेही नाव होते तर मराठीतनं दादा कोंडकेंवर लिहायचे मी ठरवले,

यानंतर मी दादांना फोन केला आणि आपल्या या पुस्तकाबद्दलची कल्पना दिली, दादांनी लगेच होकार दिला, त्यानंतर मी दादांकडे पुस्तकासाठी जाऊ लागले आणि त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आले की दादांचा या क्षेत्रातला प्रवास आणि त्यांच्याकडच्या अनुभवांची शिदोरी इतकी मोठी आहे की यासाठी स्वतंत्र पुस्तक लिहिणे हाच एक पर्याय आहे आणि इथून सुरु झाला एकटा जीव या चरित्राचा प्रवास".

image


“१९८६ सालापासून मी दादांना पत्रकार म्हणून ओळखत होते, मुलाखतींच्या दरम्यान अनेकदा त्यांच्याशी गाठ भेट व्हायची, तेव्हा पत्रकारितेमध्ये टेक्नॉलॉजीचा प्रभाव आजच्यासारखा नव्हता त्यामुळे प्रत्यक्ष भेटणे, गप्पा मारणे, अशा गोष्टी पत्रकार आणि कलाकारांमध्ये आवर्जुन घडायच्या, यातनं कलाकार आणि पत्रकार यांच्यात एक सकारात्मक भावबंध तयार व्हायचे.

खरेतर दादांवर पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न त्यावेळी अनेक मान्यवर व्यक्तींनी केला होता, पण दादांनी मात्र काही ना काही कारणांनी त्यासर्वांचे लिखाण थांबवले होते, मी जेव्हा पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा अर्थातच या लोकांकडून मला चांगलाच विरोध झाला, मी आणि अगदी माझ्या पुस्तकाबद्दलही चुकीच्या चर्चा घडवल्या जाऊ लागल्या. मी मात्र यासर्वांकडे दुर्लक्ष करत होते. ”

image


“जवळ जवळ अकरा महिने या पुस्तकासाठी मी दादांना भेटत होते, पण पुस्तक जेव्हा प्रत्यक्ष तयार झाले तेव्हा मात्र ते पहायला दादा नव्हते. त्याआधीच दादांनी जगाचा निरोप घेतला होता.

माझे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतरही अनेकांनी यातला संदर्भ, मजकूर याबद्दल टीका केल्या, यातल्या मजकूराबद्दल प्रश्न उभे केले, अनेकदा फोनवरुन पुस्तकासंदर्भात माझ्या मुलाखती घेतल्या जायच्या आणि प्रत्यक्ष पेपरमध्ये मात्र या मुलाखतींमधून वेगळाच मजकूर छापला जायचा. ज्याचा त्यावेळी मला खुप मानसिक त्रास झाला, यादरम्यान मी अनेकदा भावूक झालेय, ढसाढसा रडायचे पण त्यानंतर लगेचच पुन्हा नव्या टिकाटिप्पणीसाठी स्वतःला तयार करायचे. मी आज जेव्हा या गोष्टी आठवते तेव्हा मला हसायला येते कारण या सगळ्या चर्चांमुळे आणि प्रतिक्रियांमुळे खरेतर माझ्या पुस्तकाची प्रसिद्धीच होत होती. ”

ज्यावर्षी एकटा जीव हे पुस्तक प्रदर्शित झाले त्याच वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात केस दाखल केली होती. मात्र यातनंही हे पुस्तक सुखासुखी बाहेर पडले आणि त्यानंतर २००० साली याच पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचकांसाठी प्रकाशित करण्यात आली.

image


“एकटा जीव या माझ्या पुस्तकाचे नाव दादांनाही खूप आवडले होते किंबहुना त्यांनीच या नावाला मान्यता दिली होती. आपल्या उमेदीच्या काळात चाहत्यांच्या गराड्यात आणि त्यांच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघालेला हा कलाकार त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात मात्र खूप एकटा होता. या एकटेपणातच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

आज त्यांचे सिनेमे, त्यांनी दिलेली गाणी यातनं दादा आजही लोकांच्या आठवणीत आहेत, पण सिनेमा आणि गाण्यांपलिकडले दादा एकटा जीवमधून तुम्हाला अनुभवायला मिळवतात. म्हणूनच की काय आज या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीच्या प्रकाशनाची तयारी करताना दादांमधला कलाकारच नाही तर माणूसही वाचकांना भावतोय असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही. ”