मुंबईच्या सुरक्षेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर - मुख्यमंत्री 

0

आठ वर्षांपूर्वी २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या आणि सागरी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, सागरकवचच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सुरक्षा विषयक विविध संस्थांमध्ये समन्वय आणि संनियंत्रण राखले जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

२६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामध्ये अनेकांनी धैर्य दाखवत कर्तव्य बजावून समाजाला मदत केली. अशा सामान्यातील असामान्य लोकांना समाजासमोर आणण्यासाठी इंडियन एक्सप्रेसच्या वतीने ‘26/11 स्ट्रेन्थ ऑफ स्टोरीज’ या कार्यक्रमाचे आयोजन येथील काळाघोडा चौकात करण्यात आले होते. यावेळी इंडियन एक्सप्रेसचे स्ट्रॅटेजीक एडिटर प्रविण स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 26/11 चा हल्ला हा कुठल्या एका हॉटेल किंवा शहरावर नव्हता तर तो देशावर आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेला हल्ला होता. सर्व देशवासियाच्या मनावर खोलवर जखम करणारा हा हल्ला होता.


या हल्ल्यानंतर मुंबईच्या आणि समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दोन वर्षापूर्वी आम्ही सत्तेत आल्यानंतर संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यासाठी पाऊले उचलली. सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही मात्र सुरक्षेसाठी किती निधी खर्च करावा यापेक्षा तो खर्च कसा करावा याकडे लक्ष देण्यात येत आहे. पोलिसांच्या आधुनिकीकरणाबरोबरच सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सागरकवचच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्यांतून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. केंद्र व राज्य शासनाच्या सुरक्षाविषयक संस्थांमध्ये समन्वय राखणे महत्त्वाचे असून सागरकवचच्या माध्यमातून मुख्य सचिवांच्या संनियंत्रणाखाली त्याचा आढावा घेतला जातो.

सागरी सुरक्षेसाठी मुंबईतील मच्छीमार बोटींना कलरकोडींग करण्यात आले आहे. त्याचबरोबर मच्छीमारांना बायोमेट्रीक ओळखपत्र देण्यात आले आहे. मुंबई परिसरात 600 निमर्नुष्य लॅण्डीग पाँईटस आहे. याठिकाणी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मनुष्यविरहित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन इलेक्ट्रॉनिक सर्व्हीलन्सवर आम्ही भर दिला आहे.

इसिससारख्या दहशतवादी संघटनेमध्ये राज्यातील तरुण ओढले जाऊ नये यासाठी अशा तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. यासाठी सामाजिक-आर्थिकस्तर सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. धार्मिक भावना भडकावून तरुणांना इसिस ही संघटना आपल्या जाळ्यात ओढू पाहत आहे. माझे या तरुणांना आवाहन आहे की, तुम्हीही समाजाचे सदस्य आहात. सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. सामाजिक-आर्थिक मागासलेपणाच्या शत्रूशी लढायला तरुणांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी झालेल्या मुलाखतीच्या दरम्यान  स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांना 26/11 चा हल्ला झाला त्यावेळी आपण कुठे होतात, असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी मुंबईतच आमदार निवासाच्या माझ्या खोलीत होतो. रात्रभर फायरिंगचे आवाज ऐकत होतो. प्रत्येक क्षणा-क्षणाला दु:खद अशी बातमी येत होती, असा अनुभव मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.

26/11च्या हल्ल्यामध्ये धैर्य दाखवून शौर्य गाजविणाऱ्या असामान्य माणसांच्या यशकथा इंडियन एक्सप्रेसच्या 26/11 स्ट्रेन्थ ऑफ स्टोरीज या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आल्या आहेत. यावेळी याविषयावरील ध्वनीचित्रफितीचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास 26/11 च्या घटनेमध्ये शौर्य गाजविणाऱ्या व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.