मायक्रोसॉफ्टमधली नोकरी सोडून दाम्पत्याचं स्टार्टअपच्या जगात यशस्वी पाऊल : 'www.workadvantage.in'

0

आधुनिक काळात ब्रॅंडेड वस्तुंना मागणी वाढू लागली आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रातही प्रगती होतेय. ब्रँडेड वस्तुंची अधिकाधिक विक्री व्हावी यासाठी कंपन्या कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही विविध सवलती जाहीर करतात. पण विक्रेता आणि ग्राहक यांच्यात दुवा नसल्यानं या सवलतींची माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, ही समस्या हेरुन सौरभ या नवउद्योजकानं www.workadvantage.in या कंपनीची स्थापना केली आणि आज 220 ब्रँड आणि 55 कॉर्पोरेट कंपन्या त्यांचे भागीदार म्हणून काम करत आहेत. यात रेलीगेर, टेक महिंद्रा आणि बाटासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.


वर्कऍडव्हान्टेज कंपनीचं काम सध्या गुडगाव, दिल्ली एनसीआर आणि बंगळुरुमध्ये सुरू आहे. पण आता मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकातासारख्या शहरांमध्ये सेवा पुरवण्याची त्यांची योजना आहे. त्याचबरोबर परदेशातही विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. प्रत्येक ब्रँडेड कंपनीला आपलं उत्पादन कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत पोहोचवायचं असतं पण त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे कॉर्पोरेट कर्मचारऱ्यांना ती कंपनी कोणत्या सवलीत देते याची माहिती नसते. त्यामुळे ब्रँड आणि कार्पोरेट कंपन्या यांच्यातील दुवा म्हणून वर्कऍडव्हान्टेज काम करते, असं सौरभ सांगतात. त्याचबरोबर कंपनी तांत्रिक अडचणी सोडवण्याचंही काम करते.


सौरभ यांचं शिक्षण पंजाबमधल्या थापर विद्यापीठातून झालं. शिक्षण घेत असतानाच सौरभ यांनी मित्रांच्या मदतीनं ‘फनदुरी’ नावाची वेबसाईट सुरू केली. शहरातील विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट सोशल नेटवर्कचं काम करायची तसंच यावर चित्रपटांची वेळ, रेस्टॉरंटसमधील ऑफर आणि इतर सेवाही पुरवल्या जायच्या. या वेबसाईटला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आंणि दहा महिन्यातच 5-6 लाख उत्पन्न मिळाल्याचं सौरभ सांगतात. पण हळूहळू वेळेअभावी त्यांचे मित्र यातून बाहेर पडले आणि ही वेबसाईट बंद पडली. पण असाच व्यवसाय करण्याचा निर्धार सौरभ यांनी केला आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून मशीन लर्निंग आणि डेटा मायनिंगचा अभ्यास केला.


२०१० मध्ये अमेरिकेत शिकत असताना सौरभ यांचा स्मिती यांच्याशी परिचय झाला आणि त्या आता वर्कऍडव्हान्टेजच्या सह संस्थापक आहेत. दरम्यान सौरभ यांनी शिकत असताना अमेझॉन इंडिया आणि मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशीप केली आणि त्यानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये नोकरीही केली. मायक्रोसॉफ्टमध्ये कामानिमित्त सौरभ आणि स्मिती एकत्र आले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करत असताना कार दुरूस्ती, हॉटेलमधील जेवण, चित्रपटगृह यासारख्या ठिकाणी त्यांना बिलात सवलत मिळायची. ज्यांना तंत्रज्ञानाची माहिती नाही अशा कर्मचाऱ्यांनाही या सवलतींचा फायदा मिळत असल्याचं सौरभ आणि स्मिती यांच्या लक्षात आलं आणि भारतात अजून हा प्रकार नसल्यानं त्यात खूप संधी असल्याचं त्यांना जाणवलं. पण त्यासाठी त्यांना एक मोठा धाडसी निर्णय घ्यावा लागला. मायक्रोसॉफ्टमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून सौरभ आणि स्मिती यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. लवकरात लवकर स्टार्टअप सुरू करण्याची आवश्यकता असल्यानं एप्रिल 2014 मध्ये दोघांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते भारतात परतले. परतल्यानंतर काय करायचं हे तर ठरलं होतं पण ते कसं करायचं याची त्यांना माहिती नव्हती म्हणून त्यांनी 8 महिने संशोधन करुन या क्षेत्रातील संधी आणि अडचणी तसंच त्या सोडवण्याचे पर्याय यांचा अभ्यास केला. या दरम्यान त्यांनी ब्रँड्स आणि कंपन्यांसोबत काम करण्याचे प्रयत्नही सुरू केले होते. अखेर फेब्रुवारी 2015मध्ये काम सुरू केलं तेव्हा त्यांच्यासोबत 75 ब्रँड्स आणि 10 कंपन्या जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काही मित्रांच्या मदतीनं कंपनीची बीटा टेस्ट केली. आज कंपनीकडे 30 ते 40 असे ब्रँड्स आहेत जे कंपनीशी करार केलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सवलती देतात.


कंपनीकडे 70 टक्के ऑफर खास असल्याचा दावा सौरभ यांनी केलाय. विविध ब्रँड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सवलती देतात आणि त्याबदल्यात कंपन्यांकडून किरकोळ सदस्यत्व शुल्कही आकारतात. कंपनी सुरू करताना सौरभ आणि स्मिती यांनी आपली बचत आणि मित्रांच्या मदतीनं निधी उभा केला. तीन महिन्यात कंपनीच्या उत्पन्नात 40 टक्के वाढ झाल्याचा दावा सौरभ करतात. सध्या www.workadvantage.in कंपनी ऍप, वेबसाईट आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून सेवा पुरवते. यात हॉटेलमधील जेवण, मनोरंजन, शाळा, आरोग्य, किराणा आणि लॉन्ड्री या सेवांचा समावेश आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेवेच्या दर्जावर भर देत असल्याचं सौरभ सांगतात. त्याचबरोबर ग्राहक पैसे मोजून सेवा किंवा वस्तू विकत घेत असल्यानं त्यांच्या तक्रारींची गांभिर्यानं दखल घेऊन ती संबंधित ब्रँडसपुढे मांडली जाते, असंही सौरभ सांगतात.लेखक- हरीश बिश्त

अनुवाद- सचिन जोशी