हमारा साहस: चूल आणि मुलाच्या पलीकडचं

पुरूषप्रधान व्यवस्थेनं घातलेली बंधनं झुगारून आपलं स्वत:चं विश्व निर्माण करणा-या ‘हमारा साहस’ या साहसी स्वयंसेवी संस्थेची ही कथा. खरं म्हणजे ही संस्था निर्माण करणा-या दूरदृष्टीच्या तमन्ना भाटी या साहसी महिलेची ही कथा. चार भिंती ओलांडून क्षितिजापलिकडचं मोकळं जग दाखवत तमन्नांनी महिलांच्या सूप्त गुणांना वावही दिला आणि आपलं जग सुंदर बनवण्याची सौंदर्यानं भरलेली साहसी दृष्टीही दिली. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था स्थापन करणं हे फारच नाविण्यपूर्ण असं काम नाही हे एकवेळ मान्य केलं तरी, तसा विचार करणं, तो प्रत्यक्षात उतरवणं आणि यशस्वी करून दाखवणं ही असामान्य घटना आहे हे मात्र मान्य करावच लागतं. सामान्य काम करणा-या असामान्य महिलेची ही प्रेरणादायी कथा.

0

तमन्ना भाटींनी जेमतेम १० महिन्यांपूर्वी ‘हमारा साहस’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था महिलांनी महिलांसाठी चालवलेली समाजिक संस्था आहे. समाजातल्या वंचित महिला आणि मुलांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी ही संस्था कार्य करते. विशेष म्हणजे ही संस्था गृहिणी आणि नोकरदार महिलांनी चालवलेली संस्था आहे. ‘हमारा साहस’ हे तमन्ना यांचं मुल (संस्था) आता कुठ चालायला लागलं आहे. अशा या मुलाची आई असलेल्या तमन्ना म्हणतात, “ दुस-या महिलेच्या समस्या काय आहेत, त्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, त्यांच्या मर्यादा काय आहेत, आणि त्यांचा संघर्ष कोणत्या स्वरूपाचा असू शकतो हे सगळं आम्ही महिला असल्यामुळं सहज समजू शकतो. आमचे प्रयत्न फळाला येण्यासाठी आम्हाला महिलांच्या स्थितीबाबत असलेलं हे अंतर्ज्ञान आणि विचार आम्हाला चांगले उपयोगी पडतात.”

मिळून सा-याजणी
मिळून सा-याजणी

महिलांच्या विदारक स्थितीबाबत माहिती देताना त्या पुढं म्हणतात, “ मी एक प्रशिक्षित फॅशन डिझायनर आहे. माझं जेव्हा लग्न झालं, तेव्हा जोधपूरमधल्या रतनदा या भागात माझ्या शेजारी राहणा-या एका महिलेला मी अतिशय भयानक स्वरूपाचं जीवन जगताना पाहिलं. माझ्या आसपास राहणा-या असंख्य महिला बालविवाहाच्या बळी होत्या आणि लहान वयातच त्यांना मुलं सुद्धा झाली होती. त्यांच्यापैकी काही महिलांवर तर शाळा आणि कॉलेज सोडण्याची जबरदस्तीच करून त्यांना चुपचाप घरकाम करायला भाग पाडलं गेलं होतं.”

पुढं त्या म्हणतात, “ या महिलांसाठी काहीतरी करावं असं मला वाटत होतं. बाहेर मी अत्यंत सुंदर अशी दुनिया पाहिली होती आणि मला वाटत होतं की या महिलांनीही स्वातंत्र्या देणा-या अशा मोकळ्या दुनियेचा आनंद घ्यावा. सुदैवानं माझ्या कुटुंबातल्या आणि नात्यातल्या लोकांना माझ्या या भावना समजत होत्या आणि या महिलांच्या आयुष्यात चांगले बदल घडावेत यासाठी ते माझ्या विचारांना प्रोत्साहनसुद्धा देत होते.” या पूर्वी तमन्नांनी दुस-या एका स्वयंसेवी संस्थेसोबत १० वर्षं काम केलं होतं. पण आता त्यांनी राजस्थानातल्या जोधपूरकडं आपलं लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं. हमारा साहसनं आपल्या या परोपकारी कामाचा शुभारंभ रतनदा या भागातूनच केला. या भागात गरीब आणि दु:खात बुडालेला कुंभार समाज राहत होता.”

या समाजातले बहुसंख्य पुरुष हे पिणारे, बाईचा नाद लागलेले आणि लहान मुलांवर अत्याचार करणारे असे होते. या समाजातल्या महिलांनी मात्र या सगळ्या गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवलं होतं, परंतु त्यांच्यात आत्मविश्वास आणि जागृतीचा अभाव होता. हमारा साहसनं या समाजात काम करण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत नक्कीच सुधारणा घडेल असा विश्वास संस्थेला वाटत होता. हमारा साहस या संस्थेची सुधारणा घडवण्याची ही मोहीम यशस्वीही ठरली. याचं उदाहरण म्हणजे शासकीय एजन्सींनी बहुसंख्य प्रशिक्षित महिलांना नोक-याही देऊ केल्या आहेत.

संस्थेनं आता आपला तळ जोधपूरच्या जालोरी गेट विभागात हलवला आहे आणि तिथूनच संस्था आपलं कामकाज चालवते. तमन्ना सांगतात, “ आम्ही नेहमीच मेरी कोमचं उदाहरण घेतो.” त्या पुढं म्हणतात, “ अतिशय खडतर परिस्थितीवर मात केल्यानंतर जर मेरी कोम आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवू शकली, तर मग आम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं यश ही गोष्ट आमच्यासाठी सहजसोपी अशीच गोष्ट आहे.”

‘हमारा साहस’चं पहिलं पाऊल

हमारा साहसच्या संस्थापिका अससेल्या तमन्ना भाटी या फॅशन डिझायनर आहेत. आपल्या जीवनाचा हा पैलू त्या एका उपक्रमात रुपांतरीत करतात ही गोष्ट प्रशंसनीय अशीच आहे.

तमन्ना सांगतात, “ या महिला कायम दु:खात जीवन जगत असतात, आणि ही स्थिती ओढवण्यामागचं सर्वात मोठ्या कारणांपैकी एक कारण म्हणजे या महिलांनी आपल्या घराबाहेरचं जगच पाहिलेलं नाही हे होय. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी एखाद्या व्यावसायाची निवड करावी अशा स्वरूपाचं प्रशिक्षण देखील त्यांना दिलं गेलेलं नाही. म्हणूनच चूल आणि मुल या पलीकडचं काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत त्या नसतात , कारण त्यांना कुठंही जायचं नाहीये.”

त्या पुढं म्हणतात, “आम्ही ‘हमारा साहस’च्या माध्यमातून या महिलांसाठी भरतकाम, शिवणकाम आणि हस्तकलेचं प्रशिक्षण देणारे अल्पकालीन कोर्सेस चालवतो. अशी व्यावसायिक कौशल्ये शिकवून ही संस्था या महिलांचं सक्षमीकरण करते आणि या कामासाठी या संस्थेनं माझ्या फॅशन डिझायनिंगच्या पदवीचा चांगला उपयोग करुन घेतला आहे.” गरीबीनं ग्रासलेल्या समाजाच्या एका मोठ्या भागातल्या प्रत्येक महिलेला आत्मविश्वासानं आदराचं जीवन जगता आलं पाहिजे हे उद्दीष्ट ठेवूनच हमारा साहस ही संस्था काम करते आहे.

स्वत:च्या पायावर उभं करणारे सक्षम हात उद्योगत रमताना
स्वत:च्या पायावर उभं करणारे सक्षम हात उद्योगत रमताना

आव्हानं

या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी साधनसुविधा पुरवण्यासोबतच हमारा साहसला अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यायचं आहे. भ्रूणहत्या, अस्पृष्यता, साक्षरता, हुंडापद्धती आणि बालविवाह या घातक गोष्टींचं उच्चाटन करणं हे हमारा साहसचं लक्ष आहे. तमन्ना आपला अनुभव सांगताना म्हणतात, “ तरूण आणि वयस्कर लोक बदल चटकन स्वीकारताहेत, पण मध्य वयोगटातल्या लोकांना पटवणं जरा कठीणच आहे.” या समस्यां सोडवण्यासाठी हमारा साहसनं विविधांगी दृष्टीकोण अंगिकारला आहे.

तमन्ना सांगतात, “ आपल्या समाजात खोलवर रूजलेल्या आणि इतर अनेक सामाजिक समस्यांचं कारण असलेल्या लिंगभेदाच्या विषयाला आम्ही सर्वप्रथम हात घालत आहोत. तरूणांना शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही समस्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.”

स्वयंसेवक आणि व्यावसायिकांच्या मदतीनं ‘हमारा साहस’ मुलांना प्राथमिक शिक्षण देते आणि या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं या मुलांच्या आयांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी वेळही काढते.

तमन्ना याबाबत अधिक विस्तारानं सांगताना म्हणतात, “ तरूण लवचीक मनांमध्ये व्यापक दृष्टीनं विचार करण्याची पात्रता निर्माण करण्याचं कामसुद्धा शिक्षण करतं. समान संधी, आत्मविश्वास आणि प्रत्येकाला प्रतिष्ठा आणि आदर देण्याचं महत्त्व त्यांना समजू लागलं आहे.”

एकीकडं गरीब भागातल्या महिलांना व्यावसायिक साधनं उपलब्ध करत असताना, दुसरीकडं महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाद्वारे महिलांमध्ये नेतृत्वगुण तयार करणं, आत्मविश्वास निर्माण करणं आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणंही साध्य होतं.

तमन्ना म्हणतात, “ शिवणकाम, हस्तकला, भरतकाम अशासारख्या कोर्सेसची या महिलांची गरीबी दूर करण्याच्या कामात मोठी मदत झाली आहे. अशा प्रकारे या महिला आता अधिक सुखी असलेल्या स्वावलंबी उद्योजिका बनल्या आहेत.”

त्या पुढं सांगतात, “ फंडींग हे आमच्यासाठी दुसरं मोठं आव्हान राहिलेलं आहे. शासकीय अधिका-यांनी फंडींगचे कडक नियम तयार केलेले आहेत. फंडीगच्या प्रक्रियेत येण्यासाठी आम्हाला एक वर्षभऱ तरी काम करावच लागेल. त्यानंतर देखील फंडींग मिळवायला वेळच लागेल. सध्या सरकारी फंडींग शून्य असल्यामुळं सध्यातरी आम्हाला आता स्थानिक देणगीदार आणि स्वयंसेवकांवरच अवलंबून रहावं लागतय.

तमन्ना मोठ्या अभिमानानं सांगतात, “ महिलांकडून चालवली जाणारी ‘हमारा साहस’ ही राजस्थानात काम करणारी एकमेव संस्था आहे. “ मला असा समाज बघायचा आहे, ज्या समाजात महिलांना प्रतिष्ठेनं आणि समानतेनं वागवलं जाईल. मला या सुंदर स्त्रियांना आत्मविश्वास आणि स्वावलंबी बनून जगताना बघायचय. जेव्हा महिला मजबूत आणि स्वत:च्या बाजूनं उभ्या राहतील तेव्हाच त्या ख-या अर्थानं स्वावलंबी बनतील आणि तेव्हाच समाज त्यांचा आदर करु लागेल.”

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe