मालवाहतुकीसाठी ‘सौं’ची घालमेल! अन् यजमानांनी बसवला ताळमेळ!!

मालवाहतुकीसाठी ‘सौं’ची घालमेल! अन् यजमानांनी बसवला ताळमेळ!!

Tuesday December 22, 2015,

5 min Read

बंगळुरूच्या चंदा अग्रवाल आपल्या व्यवसायातील एका मोठ्या अडचणीचा सामना करत होत्या. प्रिझर्वेटिव्ह-मुक्त खाद्यपदार्थांच्या त्या ई-टेलर म्हणजे ई व्यावसायिक माल आपल्या गंतव्यस्थळापर्यंत पोहोचवायचा तर त्यासाठी भाड्याने वाहन शोधणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने एखाद्या भयावह स्वप्नासारखे होऊन बसलेले होते. कामातला हा भाग डोळ्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला, की त्या अक्षरश: दचकत असत. अव्वाच्या सव्वा भाडे सांगितले जायचेच, त्यात चंदा यांचा आपल्या मालामध्ये आणि ज्या पार्टीला तो पोहोचवायचा त्या पार्टीमध्येही जीव असा अडकलेला. माल बरोबर पोहोचेल ना, याची धाकधूक. त्यात भरवसा ठेवावा, असा एखादा ड्रायव्हर शोधण्यात त्या सपशेल फेल. संजय शर्मा… चंदा यांचे यजमान. SAP मध्ये तेव्हा हे सिनियर एक्झिक्युटिव्ह होते. संजय यांनी विविध कंपन्यांमध्ये लॉजिस्टिक सेक्शन (माल पोहोचवणे) सांभाळणाऱ्या आपल्या काही मित्रांसमवेत पत्नीच्या समस्येसंदर्भात चर्चा केली. पत्नी ज्या समस्येने त्रस्त आहे, त्याच समस्येने हे मित्रही वैतागलेले आहेत, ही बाब या चर्चेतून निदर्शनाला आली.

Trucktransport.in ‘ट्रकट्रान्स्पोर्टडॉटइन’चे संस्थापक संजय शर्मा सांगतात, ‘‘मी पुढे या विषयात आणखी खोलात गेलो तेव्हा हे कळले, की अरे ही काही एकतर्फी समस्या नाही. मालवाहतूकदारांच्या, वेंडर्स किंवा ड्रायव्हर्सच्याही काही समस्या आहेतच. बरेचदा माल ठरल्याप्रमाणे नेमका वेळेवर भरला जात नाही त्यामुळे आमचे ट्रक विनाकारण पडून राहातात. आठवडा नव्हे तर अनेकदा पंधरवड्यापर्यंत ट्रक ‘खोटी होण्याची’ (पडून राहण्याची) मजल जाते. मग माझ्या लक्षात आले की इथे मागणी-पुरवठा दरी कमालीची मोठी आहे. ती भरून काढण्याची गरज आहे.’’

image


गत डिसेंबरमध्ये चाळीस वर्षीय संजय यांनी ट्रकर्स, मुव्हर्स आणि पॅकर्सना ग्राहकाशी जोडणारा हा एक ऑनलाइन प्लेटफॉर्म तयार केला. साधासरळ, परिणामकारक आणि अगदी पारदर्शक असा. पुढले काही महिने त्यांनी ट्रान्स्पोर्टर्स, वेन्डर्स आणि मालवाहतुकीची ऑर्डर नोंदवणारा अशा सगळ्याच घटकांशी सातत्याने चर्चा केली. माल उचलणे ते पोहोचवणे यादरम्यानच्या सगळ्या तापदायक गोष्टी आणि विषय जाणून घेतले.

सप्टेंबर २०१५ मध्ये संजय यांनी Trucktransport.in. ची मुहूर्तमेढ केली. ग्राहकाशी (ज्याला माल पोहोचवायचा आहे तो) थेट कनेक्ट होणारा हा प्लेटफॉर्म. ट्रक्स किवा परवानाधारक वेंडर्स असलेले मुव्हर्स अँड पॅकर्स, किती खर्च येईल ते तत्काळ कळवणे, तुलनात्मक भाडेफलक, बुकिंगचे पर्याय असे सगळे सगळे यात सामावलेले.

संजय सांगतात, ‘‘सेवा पुरवणाऱ्यांसाठी आम्ही जणू एक सूत्र ठरवून टाकले. एक प्रमेय विकसित केले. विविध वेंडर्सकडून आकारले जाणारे दरही उपलब्ध करून दिले, जेणेकरून ग्राहकाला तुलना करता यावी आणि आपल्यासाठी हवी तिथे सेवा बुक करता यावी.’’ संजय यांनी मुंबईतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग’मधून ‘ऑपरेशन मॅनेजमेंट’ या विषयात पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.

असा येतो पैसा…

सेवाशुल्काच्या माध्यमातून कंपनीसाठी पैसा उभा राहातो. प्रत्येक आंतरशहर (या शहरातून त्या शहरासाठी) ट्रक बुकिंग वा मुव्हर्स अँड पॅकर्स व्यवहाराच्या मोबदल्यात केवळ २०० रुपये शुल्क आकारला जातो. शहरांतर्गत ट्रकसेवा आरक्षणापोटी कुठलाही मोबदला कंपनीकडून घेतला जात नाही.

Trucktransport.in च्या पदरी आता दहा लोकांचा चमू आहे. फायनांस, मार्केटिंग, तंत्रज्ञान तसेच व्यवसाय विकास अशा बाजू या दहा सदस्यीय चमूचे खांदे समर्थपणे पेलत आहेत.

गुंतवणूक आणि आकडे प्रगतीचे

स्थापनेपासूनच ‘ट्रकट्रान्स्पोर्टडॉटइन’ची चार आयटी संस्था आणि ऑनलाइन रिटेलर्सशी भागीदारी आहे. भागीदारांसमवेत गोपनियता करार केलेला असल्यामुळे भागीदारांची नावे उघड करण्यास संजय असमर्थता दर्शवतात. कंपनीशी ३० परवानाधारक, प्रमाणित वेंडर्स संलग्न आहेत. कंपनीकडे दरमहा दीडशेवर बुकिंग होतात. २०१८ पर्यंत देशातील २० शहरांमध्ये आपले कार्यक्षेत्र थेट नेण्याची कंपनीची योजना आहे. तेव्हा कंपनीचे वार्षिक उत्पन्न २६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेले असेल.

या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये कंपनीने आपले कामकाज सुरू केलेले आहे. २०१६ च्या उत्तरार्धात गुवाहाटी, पुणे आणि चेन्नईमध्ये कार्यविस्ताराची कंपनीची योजना आहे. मंडी (घाऊक बाजार), वैयक्तिक रिटेलर्स आणि ऑनलाइन रिटेलर्सवर कंपनी सध्या भर देत आहे. तूर्त ऑनलाइन रिटेलर्सशी पूर्वनिर्धारित किंमतीवर सेवा पुरवण्यासंदर्भात कंपनीची चर्चा सुरू आहे. पुढल्या वर्षी राजस्थान, केरळ आणि तमीळनाडूत आपला प्लेटफॉर्म सुरू करण्याची संजय यांची योजना आहे.

योग्य तो परवाना, परमिट असलेले विश्वासार्ह वेंडर्स, ड्रायव्हर्स शोधणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. संजय म्हणतात, की ते याबाबत कमालीचे चोखंदळ आहेत. स्वत: पडताळणी केल्याशिवाय आपल्या प्लेटफॉर्मवर ते कुणालाही संधी देतच नाहीत.

आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी म्हणून संजय यांनी स्वत:ची बचत केलेली रक्कम वापरली. प्रॉडक्टची उभारणी, ‘मार्केट रिसर्च’वर पैसा खर्च केला. काही गुंतवणूकदारांशीही त्यांचे बोलणे सुरू आहे. तूर्त त्यांची नावे सांगण्यास संजय नकार देतात. ते म्हणतात, ‘‘आम्हाला फक्त गुंतवणूक नकोय, या क्षेत्रातली जाणकार माणसे हवी आहेत. नेटवर्क हवंय.’’ दोन दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत वाढ संजय यांना अपेक्षित आहे.

बाजार आणि स्पर्धा

संशोधनांतील माहिती आणि बाजारातील स्थितीनुसार भारतातील मालवाहतूक बाजाराचा विकासदर १२.१७ टक्के असणार आहे. उत्पादन, किरकोळ बाजार, एफएमसीजी आणि ई-कॉमर्समधील विकास हा त्याच्या पथ्यावर पडेलच. भारताच्या ‘जीडीपी’तील १४.४ टक्के वाटा हा मालवाहतूक प्रक्रियेवर खर्च होतोय. तर दुसरीकडे अन्य विकसनशिल देशांमध्ये हा खर्च केवळ ८ टक्के एवढा आहे.

ही आकडेवारी हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे, की बाजारात ट्रकट्रान्सपोर्टडॉटइनसारख्या व्यावसायिकांना सध्या मोठी संधी आहे. वाढत जाणाऱ्या स्पर्धकांसह गुणवत्तेची लढाई मात्र द्यावीच लागेल. ऑनलाइन ट्रान्स्पोर्टेशन बुकिंग करणाऱ्या कंपन्यांची यादी बऱ्यापैकी मोठी आहे. बंगळुरूतील Blowhorn, Shippr, LOTrucks, Zaicus, Instavans आणि theKarrier. मुंबईत ThePorter आणि Quifers. दिल्लीतील truckmandi. आणि विजाग येथील Return Trucks अशी!

पैकी बऱ्याच कंपन्यांनी निधीची बऱ्यापैकी उभारणीही केलेली आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ‘ब्लोहॉर्न’ने ‘युनिटस सिड फंड’मधून निधी मिळवला. ‘दीकॅरिअर’ने दीड कोटी रुपये Sol Primero, Outbox Ventures आणि Nikunj Jain कडून मिळून मिळवले. Shippr ने जुनमध्ये ५००.००० डॉलर i2india Venture Factory कडून मिळवले. याच कालावधीत ThePorter ने Sequoia, Kae Capital आणि इतर गुंतवणूकदारांकडून मिळून ३५ कोटी उभे केले.

संजय यांना या स्पर्धेचे काहीही सोयरसुतक नाही. ते निर्धास्त आहेत. संजय सांगतात, ‘‘माझ्या व्यवसाय क्षेत्रातील इतर कंपन्या आपले सगळे काही ‘मिनी ट्रक’ या एकाच भागावर भागवतात. मी मात्र या क्षेत्रातलं सगळं काही पुरवतो. मोठी ट्रकही पुरवतो. अगदी सर्व प्रकारच्या मालवाहतूक सेवा. गावातल्या गावातही सेवा देतो. माझा विश्वास आहे, याचा मला जास्तीचा फायदा होणारच.’’

‘‘दुसरीकडे उत्तम सेवेच्या बळावर गेल्या काही महिन्यांत आम्ही साधलेली प्रगती पाहून तर भविष्याबाबतचा माझा दृष्टिकोन कमालीचा सकारात्मक बनलेला आहे. ग्राहक आणि मालवाहतूकदार दोन्ही टोकांना आम्ही सुवर्णमध्यासारखे वाटू लागलेलो आहोत. कारण आमच्या कामकाजात या दोघांचाही शिण, ताण घालवणारी तरतरी आहे.’’ संजय हे सांगताना कमालीचे सुखावलेले असतात!

लेखक : तौसिफ आलम

अनुवाद : चंद्रकांत यादव