भगवत गीतेतील पाच महत्वाचे धडे प्रत्येक उद्योजकासाठी...

भगवत गीतेतील पाच महत्वाचे धडे प्रत्येक उद्योजकासाठी...

Thursday April 07, 2016,

4 min Read

जगातील कुठलीही माहिती सहजपणे मिळविण्यासाठी, आज आपल्याकडे गुगल सर्च नावाचे एक अद्भुत साधन हाताशी आहे. एवढेच काय यशाचा मंत्र जाणून घेण्यासाठीही गुगलची मदत घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. यशस्वी उद्योजकांकडून ज्ञानाच्या चार गोष्टी जाणून घेण्यासाठीही गुगल सर्चच वापर सर्रास केला जातो. असे करण्यात चूक काहीच नाही, पण हे करत असताना कुठेतरी आपल्याला आपल्या बुद्धिमान वारशाचा विसर तर पडत नाही ना? बऱ्याचदा या प्रश्नाचे उत्तर हे होकारार्थीच असते. अशा वेळी, पुन्हा एकदा आपल्या या मुळांपर्यंत जाण्याचा प्रयत्न का करु नये? खऱ्या अर्थाने शाश्वत अशा या ज्ञानापासूनच शहाणपणाचे चार शब्द का शिकू नयेत? कारण तिथून शिकण्यासारखे तर बरेच काही आहे. खास करुन आपल्या महान महाकाव्यांमधून.... त्यामधील ज्ञान हे आज पूर्वीपेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात उपयुक्त आहे. मला खात्री आहे की, आपल्यापैकी बहुतेकांनी भगवत गीतेतील या खजिन्याचा कधी ना कधी नक्कीच शोध घेतला असेल किंवा किमान त्याबाबत ऐकले तरी असेल. या प्राचीन धर्मग्रंथातील काही श्लोकांचा अर्थ लावण्याचा मीदेखील प्रयत्न करुन पाहिला आणि विशेष म्हणजे उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी तर याद्वारे ज्ञानाची नवीन कवाडेच खुली झाल्यासारखे मला वाटले. पुढील काही श्लोकांमधून उद्योजकांना नक्कीच नवे काहीतरी मिळेल, अशी मला आशा आहे.

image


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोSस्त्वकर्मणि।। २-४७

‘कर्म’ या विषयावर खरं तर आतापर्यंत बरेच काही विस्तृतपणे सांगितले आणि ऐकले गेले आहे, पण त्या शब्दाचे खरे सार सामावले आहे ते वरील दोन साध्यासोप्या ओळींमध्ये... यशापयाशची किंवा फळाची कोणतीही अपेक्षा न बाळगता, प्रत्येक उद्योजकाने त्याच्या कामावर अर्थात कर्मावरच लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अंतिम उत्पादनावरच केवळ संपूर्ण लक्ष केंद्रीत न करता, तेथपर्यंत पोहचण्याच्या प्रवासाचा आनंद लुटला पाहिजे. आपल्या स्वप्नावर आणि त्याच्या यशावरच खूप जास्त अवलंबून राहिल्याने आपण विचलित होतो. एखाद्या अनिश्चित गोष्टीची आशा करत बसण्याच्या नादात, आपण त्या प्रवासाचा आनंद घेणेही तितकेच महत्वाचे असल्याचे विसरुनच जातो. लक्षात ठेवा, आशा बाळागणे किंवा आशावादी असणे, यामध्ये चुकीचे काही नाही, पण प्रत्यक्ष कृती शिवाय, तुमचा मार्ग हा भयंकर असेल.

दोरावरुन चालण्याची कसरत करताना त्याचा आनंदही लुटता यायला हवा... तिच खरी कला आहे... जर ही कसरत करणारी व्यक्ती खूपच घाबरलेली असेल किंवा अति उत्साहात असेल, तर ती नक्कीच खाली पडेल. कारण दुसऱ्या टोकावर यशस्वीपणे पोहचण्यासाठी, चालत असताना त्यातून आनंद मिळविणे, हीच खरी युक्ती आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृहाति नरोSपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णा –

न्यन्यानि संयाति नवानि देही।। २२।।

अष्टपैलुत्व किंवा हरहुन्नरीपणा आणि जुळवून घेण्याची कला, या यश मिळविण्यासाठी खूपच महत्वाच्या बाबी आहेत, हे बोलणे सोपे असते. पण बदलांबरोबर चटकन जुळवून घेण्यास शिकणे, हाच उद्योजकासाठी सर्वात मोठा धडा असतो. तुमच्या प्रारंभिक दृष्टीकोनातच अडकून राहू नका. जुळवून घेण्यास शिका, नाविन्याचा ध्यास ठेवा आणि नवीन संधींचा शोध घ्या. एखाद्या प्रवाशाप्रमाणेच तुमचा प्रवास करा, जो, तो भेट देत असलेल्या शहरामध्ये किंवा हॉटेलमध्येच मनाने अडकून पडत नाही, तर त्या संपूर्ण अनुभवातून आनंद मिळवितो.

हटवादी बनू नका, तर नाविन्यपूर्ण विचार करा आणि खुल्या दिलाने, एखाद्या स्पंजप्रमाणे अनुभव शोषून घेण्यासाठी तयार रहा. जितक्या लवकर तुम्ही बदलांशी जुळवून घ्याल, तितके चांगले. लक्षात ठेवा, बदल ही एकच गोष्ट अशी आहे, जी कायम आहे.

क्रोधाभ्दवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।।

प्रत्येक उद्योजकाने आपल्या रागावर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक आहे. रागाबरोबर आपली सारासार विचार करण्याची क्षमताच नष्ट होते आणि विभ्रम निर्माण होतो. रागामुळे मनात निर्माण झालेला गोंधळ आणि अनागोंदीमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. त्यामुळे ती व्यक्ती त्याच्या उद्देशापासून किंवा ध्येयापासून दूर जाते. जी व्यक्ती आपले ध्येयच विसरली आहे किंवा ज्याच्या विचारातील सुस्पष्टताच हरवली आहे, अशी व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळेच स्वतःला रागापासून मुक्त करणे आवश्यक आहे. या समस्येवरील सोपा उपाय म्हणजे लक्ष केंद्रीत करणे. तुमचे लक्ष कधीच विचलित होऊ देऊ नका आणि संयम बाळगा. कारण टिकून रहाण्यासाठी संयम या गुणाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुषः।।

सगळ्या गोष्टींचे खुल्या दिलाने स्वागत करण्याची सवय अंगी बाणवून घ्या आणि कशातच मनाने अडकून पडू नका. एखाद्या कामात मन अडकून पडल्यास कामाला ताकद मिळते आणि स्वतःहून जास्त आपण त्यावर प्रेम करतो, पण त्यामुळे आपल्यावर मर्यादाही येतात आणि आपला प्रवास आणि वाढ कठीण होते, खास करुन जर आपला हा उद्देशच आपल्यापासून हिरावला गेला.. अति इच्छा ही वाईटच असते कारण त्यातूनच पुढे हाव निर्माण होते. हाव ही तुम्हाला तुमच्या खऱ्या इच्छेपासून आणि स्वप्नापासून दूर नेते.

तुमच्या कामात अति गुंतून जाऊ नका, कारण त्यामुळे एक उद्योजक म्हणून तुमचा प्रवास कठीण होईल आणि बंदीस्तही... सातत्याने होणाऱ्या बाजारपेठेतील बदलांबाबत तुमचे मन हे खुले असू द्या, त्या बदलांशी जुळवून घ्या. तुमच्या ध्येयावर जवळून लक्ष ठेवा, मात्र त्यामुळे पछाडून जाऊ नका.

धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च।

यथोल्बेनावृत्तो गर्भास्तथा तेनेदमावृत्तम्।।

या साध्या श्लोकामध्ये अतिशय गहन अर्थ सामावलेला आहे. हा एक प्रकारचा परावृत्त करणारा शाप आहे – कारण प्रत्येक अस्सल गोष्टीवर दिशाभूल करणारे असे आवरण असते. उदाहरणार्थ आगीला धूराचे वेष्टन असते, जे आपल्याला तिच्यापर्यंत जाण्यापासून रोखते आणि जर आरसा हा चकाकीने झाकलेला असेल, तर ती चकाकी हटविल्याशिवाय त्यातील प्रतिबिंब आपण पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्ञान हे देखील इच्छाआकांक्षांनी झाकलेले असते. खरे ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपण इच्छाआकांक्षांच्या या पडद्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, जेणे करुन आपली प्रगती होण्यास मदत मिळेल. हे दिसते तेवढे सोपे निश्चितच नाही. पण शहाणा माणूस तोच असतो, ज्याला काय टाळायचे आणि काय निवडायचे हे बरोबर माहित असते.

लेखक – अतुल प्रताप सिंग

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

    Share on
    close