विणकरांच्या गावात कठीण परिस्थितीत शिक्षणाची मशाल तेवत ठेवणाऱ्या तीन मुली

0

वाराणशीच्या सजोई गावात शिक्षणाची मशाल तेवत ठेवण्याची धुरा आज तीन मुली करीत आहेत. मुस्लिमबहुल असलेल्या या गावात एका पडक्या घरात चालणाऱ्या या शाळेमुळे गाव ९०% साक्षर झाले आहे. काही वर्षापूर्वी हेच प्रमाण १०% होते. तबस्सुम, तरन्नुम आणि रूबिना ज्या गावात राहतात त्या गावातील लोकसंख्या २०,००० आहे. विणकर लोकांच्या या गावात आज अनेक मुले पदवीत्त्युर शिक्षण घेत आहेत तर काही मुले आयटीआय चा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.


तबस्सुम, तरन्नुम आणि रुबिना यांचे वडील पण विणकर आहेत, तरीही यांच्या पालकांची इच्छा होती की त्यांच्या मुलींनी कामात मदत करण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्यावे यासाठी ते जास्त आग्रही होते. सजोई गावात शाळेच्या नावाखाली एक मदरशा होता जिथे अभ्यासाची नियमितता नव्हती. पण या तिघींचे शिक्षण प्रथम प्राथमिक शाळेत आणि त्यानंतर एका सरकारी शाळेत झाले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा असूनही शिक्षणाला अल्पविराम द्यावा लागला. पुढच्या शिक्षणाची वाटचाल करण्यासाठी त्यांनी एक अभिनव कल्पना अंमलात आणली जेणेकरून अशिक्षित गावकऱ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करता येऊ शकेल. त्यातच त्यांना एका स्वयंसेवी संस्थेची साथ मिळाली, त्यांनी या तिघींच्या शिक्षणाची जबाबदारी तर घेतलीच पण गावकऱ्यांना पण शिकवण्याचे आश्वासन दिले.


सन २०१० मध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी मुलांना शिकवण्याचा श्रीगणेशा केला. कारण समाजात शिक्षणाप्रती जागृती नव्हती. उलट तुम्ही मुली असून या मुलांना किती दिवस शिकवू शकणार अशा गावकऱ्यांच्या कुचेष्टेला सामोरे जावे लागले. गावातल्या लोकांना या मुलींच्या कामावर विश्वास नव्हता, त्यांच्या मतानुसार या मुली लवकरच आपला उपक्रम बंद करतील व म्हणूनच गावकऱ्यांनी प्रारंभी आपल्या मुलांना त्यांच्याकडे शिकायला पाठवले नाही. पण खंबीर आणि दृढ निश्चयाच्या मुलींनी हार मानली नाही.


तरन्नुम सांगते की, त्यांनी निश्चय केला की त्या स्वतः लोकांपर्यंत जाऊन त्यांना भेटतील. घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देतील. अशाप्रकारे सहा महिने प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. लोकांनी मुलांना शिकायला आमच्याकडे पाठविले पण त्यात मुली नव्हत्या. त्यानंतर आम्ही शिवणकाम शिकवायला सुरुवात केली की ज्यामुळे मुलीसुद्धा आमच्याकडे शिकायला येतील.


याप्रकारे या तीन मुलींनी एकीकडे आपल्या पदवीचा अभ्यासक्रम सुरु केला आणि दुसरीकडे गावात शिकवण्याचा आरंभ एका सामुदायिक मदराशामधून सुरु केला. मुलांच्या अभ्यासाची तसेच खेळण्याच्या साहित्याची सोय पण एका स्वयंसेवी संस्थेने केली. मुलांना शिकवण्याचे काम सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत चालत असे. शुक्रवारी शाळा बंद असते. या तिघींनी गावातल्या अशिक्षित मुलांना या लायक बनविले की त्यांचा प्रवेश कोणत्याही सरकारी अथवा खासगी शाळेत होऊन ते आपला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. याव्यतिरिक्त जी मुले नियमित शाळेत जातात तेसुद्धा यांच्याकडे अभ्यासासाठी येत होते. त्यांच्या यशस्वी प्रयत्नाने आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांनी आतापर्यंत ३०० मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे.


सामुदायिक मदरशा मध्ये मुलांना शिकवण्याच्या कामाला काही स्थानिक लोकांनी विरोध केला. यानंतर या मुलींनी आपल्या घरातच मुलांना शिकवण्याचे काम सुरु केले. त्याचबरोबर गावातल्या मुलांबरोबर महिलांचा पण उत्साह वाढून त्यांना शिकवण्याचे काम सुरु झाले. आज त्यांच्या शाळेत पाच वर्षापासून सोळा वर्षापर्यंतची १०० मुले येतात. आज या तिघीजणी मुलांना शिकवण्याबरोबरच स्वतः आयटीआय मध्ये कॉम्प्युटर ट्रेनिंग घेत आहेत.

तरन्नुम सांगते की, "त्या गावातल्या मुलामुलींना अभ्यासाव्यतिरिक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये व्होकेशनल ट्रेनिंगपण देत आहेत, यात फ्लावर मेकिंग, पॉट बनविणे, मेहेंदी काढणे आणि ब्युटीशियन ट्रेनिंग इ. सामील आहे. आज यांच्या या तालीमी मुळे मुले दररोज विविध प्रकारच्या शैक्षणिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्वतःचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. तसेच त्यांच्या कडे शिक्षण घेतलेल्या मुलांना दहावीच्या परीक्षेत ९०% गुण मिळाले आहेत. तरन्नुमला भविष्यात एक उत्तम शिक्षक व्हायचे आहे की ज्यामुळे मुलांबरोबर स्वतःचा विकास होईल.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे