नागपूरला आधुनिक शहर म्हणून विकसित करणार - मुख्यमंत्री

0

 नागपूर शहराने नवनवे प्रकल्प काही वर्षात सुरु केले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने नागपूरला 21 व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून विकसीत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 दीक्षाभूमी येथील एनआयटी ऑडोटोरियम येथे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातील पहिल्या एकात्मिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. देशातील पहिले सार्वजनिक वायफाय हे देखील नागपूर येथे सुरु होत आहे. ही गौरवाची बाब आहे. काही प्रकल्प येथे सुरु करण्यात आले असून काही प्रकल्पाच्या सर्व मुलभूत सुविधा 31 मार्चपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल. नागपूर येथे स्मार्ट आणि सेफ सिटीच्या ज्या मुलभूत सुविधा निर्माण केल्या आहेत त्या केवळ देशातीलच नव्हे तर जगातील मुलभूत सुविधांपैकी एक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर स्मार्ट सिटीसाठी जी सिस्टिम तयार केली आहे ती पुण्याने देखील घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता देशातील सर्व शहरे हे मॉडेल सिस्टिम म्हणून स्विकारत आहे. माहिती तंत्रज्ञानाची कणा असलेली मुलभूत सुविधा येथे विकसीत केली आहे. जगातील आधुनिक कॅमेरे इथे लावण्यात येत आहे. जवळपास चार हजार कॅमेरे शहरात लावण्यात येणार आहे. पोलीसांना या कॅमेरांची मोठी मदत होणार आहे. हे कॅमेरे ऑनलाईन करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनाचा नंबर काढून त्या व्यक्तीच्या घरी चलान पाठविले जाणार आहे.


शहरातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कॅमेराच्या माध्यमातून त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करण्यात येतील असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, स्मार्ट कॅरिडॉर तयार करण्यात येणार असल्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था स्मार्ट होण्यास मदत होणार आहे. शहरातील विविध वार्डातील कचरा उचलला की नाही हे देखील मनपा आयुक्तांना त्यांच्या कक्षात बसूनच दिसणार आहे. माहिती तंत्रज्ञानावर आधारीत व्यवस्था निर्माण केल्यानंतर तिचा वापर करण्यास शहरातील नागरिकांना आग्रह धरावा. त्यामुळे चांगले व्यवस्थापन करता येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पब्लीक वायफाय सिस्टिम नागपुरातील दहा चौकात सुरु करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 31 मार्चनंतर ही वायफाय सेवा संपूर्ण नागपूर शहरात सुरु करण्यात येईल. ती अर्धा तास कोणालाही मोफत वापराता येईल. त्यानंतर मात्र पैसे द्यावे लागतील. या सिस्टिमचा वापर करुन प्रत्येक घरी दहा एमबीपीएस वायफायची स्पिड देता येईल. यातून शहराला विकसीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किऑस सिस्टिम तयार केली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, किऑसच्या सुविधेमुळे नागरिकांना महानगरपालिकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यावरुनच सर्व प्रकारच्या सेवा मिळणार आहे. मनपाच्याच नाही तर राज्य शासनाच्या तीनशे प्रकारच्या सेवा किऑसवरुन मिळणार आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेले भीम ॲप किऑसवर देण्याची व्यवस्था करावी असे त्यांनी यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांना सांगितले. मनपाच्या प्रशासनात खऱ्या अर्थाने 21 शतकातील ई-प्रशासन, स्मार्ट प्रशासन आपण सुरु करीत आहोत. 2017 हे वर्ष जेव्हा संपलेले असेल तेव्हा देशातील आधुनिक शहर म्हणून नागपूर शहर बघायला बाहेरचे लोक नक्की येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गडकरी यावेळी म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाची व्यवस्था असणारे नागपूर हे देशातील महत्वाचे शहर बनत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे कुशल मार्गदर्शन आणि मपनाच्या उत्साहातून हे काम होत आहे. देशात उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था सुरु करण्याचे धोरणात्मक ठरले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारची मदत मिळविण्याआधीच राज्य सरकारने मुंबई व नागपूर येथे उत्तम वाहतूक व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करुन  गडकरी पुढे म्हणाले, या व्यवस्थापनामुळे वाहतूक नियमांचे आता उल्लंघन केल्याचा या सुविधेमुळे पुरावा राहणार आहे. शहरातील अपघात प्रवणस्थळांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना कराव्यात. मनपा क्षेत्रातील व जिल्हा मार्गावरील अपघात प्रवणस्थळ पोलीसांच्या मदतीने शोधून काढावीत व त्यामध्ये सुधारणा कराव्यात. एकीकडे नागपूर स्मार्ट शहर होत असतांना अपघातमुक्त करावे. यासाठी मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्तांनी बैठक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रविण दटके यांनीही मनोगत व्यक्त केले. नागपूर सेफ जंक्शन डिझाईन स्पर्धा आयोजित केली असून विजेत्यांना भरघोस बक्षिस देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान विभागाने सुरु केलेल्या देशातील पहिल्या स्मार्ट शहर प्रकल्पात अंमलबजावणी भागीदार म्हणून लार्सन ॲण्ड टूर्बो या कंपनीचे स्मार्ट वर्ल्ड कम्युनिकेशन बिजनेस युनीट सहभागी असून राज्य शासनासोबत या कंपनीचा करार झाला आहे. डिजीटल तंत्रज्ञान, उत्कृष्ट माहिती संकलन व विश्लेषण आणि स्मार्ट उपाययोजनांचा वापर करुन नागपूर शहर हे देशातील प्रथम क्रमांकाचे सुरक्षित आणि स्मार्ट शहर व्हावे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

या प्रकल्पाअंतर्गत बाराशे किलोमीटर लांबीचे ऑप्टीकल फॉयबर केबल नेटवर्क निर्माण करणे, शहरावर निगरानी ठेवण्यासाठी 3800 आयपी कॅमेरे बसविणे, शहरात 136 जागी वायफॉय हॉटस्पॉट निर्माण करणे, 100 डिजीटल किओस्क स्थापित करणे, जपानी गार्डन ते ऑरेंज सिटी हॉस्पीटल दरम्यान सहा किमी लांबीचा स्मार्ट पथ जगातील अत्याधुनिक स्मार्ट प्रणालीचा वापर करुन त्यामध्ये स्मार्ट विद्युत पथ, स्मार्ट वाहतूक प्रणाली, स्मार्ट पार्कींग, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन पध्दती, शहरामध्ये व्हिडीओ व्यवस्थापन आणि विश्लेषण प्रणाली पायाभूत सुविधेअंतर्गत निर्माण करण्यात येतील. ( सौजन्य - महान्युज)