आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी ‘मराठी माणूस’ लिओ वराडकर

आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी ‘मराठी माणूस’ लिओ वराडकर

Saturday June 03, 2017,

2 min Read

पहिल्यांदाच भारतीय वंशाचे  मालवण येथील वराडकर कुटुंबाचा वंश असलेले लिओ वराडकर हे आज ब्रिटनचा भाग असलेल्या आयर्लंडच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. एन्डा केनी यांनी पंतप्रधानपद सोडल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत लिओ यांचा मुख्य मुकाबला सीमोन कोवनी यांच्याशी झाला. 


image


पेशाने डॉक्टर असलेल्या ३८ वर्षीय लिओ यांचा राजकारणातील प्रवास खूप वेगवान आहे. वयाच्या २२व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केलं. २७ व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते. 

लिओ यांचे मुळ घर मालवण तालुक्यातील वराड हे होय. वराडकर कुटुंब हे या गावातील प्रतिष्ठीत मानले जाते. लिओ यांचे वडील अशोक यांचे प्राथमिक शिक्षण वराडलाच झाले. अत्यंत हुशार असलेल्या अशोक यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईत नेले पुढे हे कुटुंब मुंबईतच स्थायिक झाले. अशोक यांनी शिष्यवृत्ती मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी १९६० मध्ये इंग्लड गाठले. तेथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. यातच त्यांची ओळख नर्स असलेल्या आयरिश वंशाच्या मिरीअम यांच्याशी झाली. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला. त्यांना एकूण तीन मुले यातील सानिया आणि सोफिया या लिओ यांच्या मोठ्या बहिणी. ही तिन्ही भावंडे डॉक्टर आहेत. सानिया या तर आयर्लंडमधल्या सगळ्यात मोठ्या रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 

लिओ यांना तसा फारसा राजकीय वारसा नाही. मात्र देशभक्तीचा खूप मोठा वारसा या कुटुंबाच्या मागे आहे. लिओ यांच्या वडिलांचे काका मधुकर वराडकर आणि मनोहर वराडकर हे स्वातंत्र्य संग्रामात अग्रेसर होते. त्यांनी ब्रिटीशांचे राज्य जावे म्हणून तुरुंगवासही भोगला. आयर्लंडमध्ये स्थायिक होवूनही वराडकर कुटुंबाने गावाशी असलेली नाळ तोडलेली नाही. गावात त्यांचे वडीलोपार्जित घर, जमीन जुमला आहे. चारच वर्षापूर्वी त्यांनी नवे टुमदार घरही बांधले. हे दाम्पत्य दर दोन वर्षांनी धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने गावाकडे आवर्जुन येते. लिओ हे मात्र अद्याप वराडला आलेले नाहीत. २०११ मध्ये विश्व्चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने तत्कालीन आयर्लंडचे क्रीडामंत्री या नात्याने लिओ हे भारतात आले होते. यावेळी त्यांनी मुंबईला भेट दिली होती.