उज्ज्वला हावरेः जिद्द आणि निग्रहाची अनोखी कहाणी

सात दिवसांची ओली बाळंतीण असतानाच नवऱ्याचे अकस्मित झालेले निधन... कोणत्याही महिलेसाठी यापेक्षा मोठे दुःख काय असेल? मात्र या दुःखावर मात करत, आपल्या नवऱ्याच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी ती जिद्दीने उभी राहीली...तेदेखील बांधकाम व्यवसायासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात... जाणून घेऊ यात या एका सामान्य गृहीणीची ही असामान्य कहाणी...

0
उज्ज्वला हावरे
उज्ज्वला हावरे

नवी मुंबई आणि ठाणे परिसरात बांधकाम क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणजे हावरे समूह... १९९५ साली सतीश हावरे यांनी या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आणि बघताबघता परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळविले. आज सुमारे साडेसातशे कोटींचा हा समूह बांधकाम व्यवसायात पहिल्या दहामध्ये गणला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्रभरात कंपनीने आपले पाय रोवले आहेत. पालघर आणि कर्जतसारख्या ठिकाणीही हावरे समूहाच्या इमारतींचे काम जोरात सुरु आहे. मात्र हा प्रवास सहजसोपा नक्कीच नव्हता. या क्षेत्रातील माहितगारांना माहितच असेल की, २००५ ला समूहाचे सर्वेसर्वा सतीश हावरे यांचे अकाली निधन झाले. त्यावेळी समूह यशोशिखरावर होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने त्यांनी आपल्यामागे केवळ अनेक जीव अवलंबून असलेला व्यवसायच सोडला नाही तर आपली स्वप्ने आणि महत्वाकांक्षाही अर्ध्यावरच सोडून या जगाचा निरोप घेतला. एक मोठीच पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झाली.

दोन मुलांची आई असलेल्या उज्ज्वला हावरे त्यावेळी एक सुखी गृहीणी होत्या. मात्र व्यवसायातही त्यांचा सहभाग असे. त्या ऑफीसमध्ये जात असत. “याचे कारण म्हणजे मी केवळ घराच्या चार भिंतीतच अडकून पडू नये, अशी सतीशचीच इच्छा होती,” उज्ज्वला सांगतात. मुख्य म्हणजे स्वतः एक प्रशिक्षित वास्तुविशारद असल्यानेही उज्ज्वला व्यावसायिक कामात सुरुवातीपासूनच सहभागी होत्या.विशेष म्हणजे सतीशही आपली सर्व स्वप्ने आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या महत्वाकांक्षांविषयी उज्ज्वलांशी मोकळेपणाने बोलत असत. पती-पत्नीच्या नात्यातील हा अनोखा बंधच म्हणावा लागेल, ज्यामुळे पतीच्या अकस्मात निधनानंतर केवळ बारा दिवसांत आपल्या पतीच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्विकारण्याचे बळ उज्ज्वला यांना दिले.एक ओली बाळंतीण – फक्त सात दिवसांपूर्वीत त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता – तिला या कठीण काळात मातृत्वाबरोबरच ही व्यावसायिक जबाबदारीही शिरावर घेणे भाग होते.

२००५ साली व्यावसायाची धुरा हाती घेतल्यापासून उज्ज्वला यांनी आपल्या दिवंगत पतीच्या स्वप्नांची यशस्वी पूर्ती तर केलीच पण त्याचबरोबर कंपनीने यापूर्वी काम न केलेल्या क्षेत्रांमध्येही दमदार पाऊल टाकले. आम्ही नुकतीच उज्ज्वला सतीश हावरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नववधु (यंग ब्राइड)

लग्न झाले त्यावेळी उज्ज्वला स्थापत्यशास्त्राच्या शेवटच्या वर्षाला होत्या. मराठी वृत्तपत्रात विवाहविषयक एक मोठी जाहिरात पाहून त्यांच्या कुटुंबियांनी या स्थळासाठी संपर्क साधला होता. ती जाहीरात अशी होती, ‘नवी मुंबईतील एका नामांकीत वास्तुविशारदासाठी विदर्भातील वास्तुविशारद वधु पाहिजे’. ‘एन्ड सो ही लिव्हड ऑन’ – सतीशबरोबरच्या आठवणींविषयी उज्ज्वला यांनी लिहिलेल्या या पुस्तकात – मध्ये उज्ज्वला यांनी स्वतःच म्हटले आहे की, हे लग्न म्हणजे त्यांच्यासाठी एक असा जुगार होता, ज्याची सर्व दाने त्यांच्या बाजूने पडली – खऱ्या अर्थाने त्या भाग्यवान ठरल्या.

या ठरवून केलेल्या लग्नातच तरुण उज्ज्वलेला आपल्या स्वप्नांतील राजकुमार भेटला. हळूहळू आपल्या पतीमधील धडाडीचीही त्यांना कल्पना येऊ लागली. सतीशनेही केवळ त्यांना प्रेरीतच केले नाही तर खऱ्या अर्थाने आपली सहधर्मचारीणी मानले – खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातही... त्यामुळेच उज्ज्वलाही ऑफीसमध्ये जाऊ लागल्या आणि सुरुवातीपासूनच व्यावसायिक प्रकल्पातही सहभागी होऊ लागल्या. मुलीच्या जन्मानंतर मात्र घरातील वाढत्या जबाबदाऱ्या पहाता, त्यांच्यातील आईने काही काळासाठी ऑफीसपासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला. मात्र यामुळे सतीशबरोबर हावरे समूहाच्या भविष्याबाबत रंगणाऱ्या चर्चांमध्ये कधीच खंड पडला नाही.

खरे म्हणजे, या चर्चा आणि स्वप्नांच्या देवाणघेवाणीतूनच उज्ज्वला यांना आपल्या महाविद्यालयातील शेवटच्या वर्षाच्या प्रबंधाचा विषय मिळाला – बेघर लोकांसाठी घरबांधणीचा दृष्टीकोन – विशेष म्हणजे सतीश यांनीही आपल्या प्रबंधासाठी हाच विषय निवडला होता. उज्ज्वला ही गोष्ट आवर्जून मान्य करतात की सतीशचा त्यांच्यावर नेहमीच प्रभाव होता. त्यांची नाती जपण्याची पद्धत, काम करण्याची क्षमता आणि आयुष्यावर असलेले प्रेम पाहून, “इतक्या चांगल्या माणसाबरोबर लग्न झाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजत होते,”, उज्ज्वला सांगतात.

सतीशचा पगडाः

सतीश आणि उज्ज्वला या दोघांचीही पार्श्वभूमी सामान्य होती. मात्र त्यांनी दाखविलेली जिद्द आणि निग्रह असामान्य होता. त्यामुळेच हावरे समूहाची भरभराट झाली. बांधकाम व्यावसायिक होण्यापूर्वी सतीश एक वास्तुविशारद म्हणून काम करत होते. त्यादरम्यान त्यांचा या क्षेत्रात दांडगा संपर्क प्रस्थापित झाला होता. एक व्यावसायिक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केल्यावर याच लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. “ आमचा पहिला प्रकल्प खारघरला होता. ती केवळ एक ओसाड जमीन होती. पक्के रस्तेदेखील नसल्याने पावसाळ्यात तर साईटपर्यंत जाणेदेखील कठीण असायचे,” आपल्या पहिल्याच प्रकल्पाचा अनुभव उज्ज्वला सांगतात. त्याकाळी जमिनीचे भाव जरी कमी असले, तर सामान्य पार्श्वभूमी असलेल्या हावरे यांच्याकडे ती खरेदी करण्यासाठीही स्वतःचे भांडवल नव्हते. मात्र सतीशच्या जुन्या ग्राहकांनी आणि परिचितांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच त्यांना या मार्गावर चालणे शक्य झाले. “सतीश हे सर्वांशी जुळवून घेणारे होते – खूपच बोलके आणि सगळ्यांची मने जिंकून घेणारे होते. त्याचबरोबर खूप भरवशाचेही होते. त्याकाळात जेंव्हा बांधकाम व्यावसायिक लोकांचे पैसे घेऊन पळ काढत होते, लोकांचा सतिशच्या प्रामाणिकपणावर आणि सचोटीवर विश्वास होता,” उज्ज्वला अभिनानाने सांगतात.

सतीश यांची जोखीम घेण्याचीही तयारी होती आणि उज्ज्वला यांच्या मते हेच त्यांचे वेगळेपण होते. “ ते खूप मोठी जोखीम पत्करणारे होते. कारण त्यांचा स्वतःवर, स्वतःच्या शिक्षणावर विश्वास होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो तरी हरकत नाही,मी वास्तुविशारद म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करीन, असा त्यांचा विचार होता. आपल्याकडे हरण्यासारखे काहीच नाही, असे त्यांवा वाटायचे,” उज्ज्वला सांगतात. विशेष म्हणजे दोघेही वास्तुविशारद असल्याने येणाऱ्या अडचणींना एकत्र सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती. “ त्यांची निर्णय क्षमता अफाट होती. ते निर्णय घेऊ शकत आणि ते निर्णय अंमलात आणण्याची दृष्टीही त्यांच्याकडे होती,” त्या सांगतात. हावरे समूहाच्या अध्यक्ष असलेल्या उज्ज्वला यांच्या मते सतीश यांचा हा द्रष्टेपणा आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सतीश यांचे आणखी एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे समाजकार्याची त्यांना असलेली आवड.... १९९३ चा लातुरचा भूकंप असो किंवा २००४ मध्ये चेन्नईमध्ये आलेली त्सुनामी... या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सतीश स्वतः बचाव कार्यात सहभागी झाले होते. “ व्यावसायिक कारकिर्दीला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून विदर्भातील चिखलदऱ्याच्या आदिवासींच्या विकासासाठी काम करण्याचा त्यांचा मानस होता,” उज्ज्वला सांगतात. आजही हावरे समूहातर्फे नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतही अनेक धर्मार्थ पुस्तक पेढ्या आणि अभ्यास केंद्रे चालविली जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे परवडणाऱ्या घरांची संकल्पना – ज्यासाठी आज हावरे समूह ओळखला जातो – ती सर्वांना हक्काचे घर मिळावे याच भावनेतून आलेली आहे.


उज्ज्वला हावरे
उज्ज्वला हावरे

व्यावसायिक धुरा स्विकारली

उज्ज्वला यांचे पुस्तक वाचताना वाचकांना उज्ज्वला आणि सतीश यांच्यातील अनोखे नाते सहज लक्षात येते. त्यांच्यावर असलेला नवऱ्याचा प्रभाव आणि प्रेमही जाणवते. सतीश यांनी उज्ज्वला यांना कोणतीही अडचण येऊ नये याची सतत काळजी घेतली. त्यांचे हरप्रकारे लाड पुरविले, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सहाजिकच त्यांचा अपघाती मृत्यू स्विकारणे उज्ज्वला यांच्यासाठी किती मोठा हादरा असेल, ते आपण समजू शकतो. पण कदाचित त्यांच्यामधील नात्यांच्या या बंधानेच उज्ज्वला यांना आपले अश्रू पुसून वाढत्या व्यावसायिक जबाबदाऱ्या स्विकारण्याची ताकद मिळाली. “सतीशबरोबर मी जेवढा काळ व्यतीत केला, त्या संपूर्ण काळात माझ्यावर त्यांचाच पगडा होता. ते माणूस म्हणून खूपच चांगले होते. त्यांच्यामध्ये अनेक गुण होते. आम्ही नेहमीच त्यांची स्वप्ने, महत्वाकांक्षा, भविष्यातील योजनांविषयी बोलत असू आणि त्या सफल करण्यासाठी त्यांच्याएवढीच मी देखील उत्साही होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्या अर्ध्यावरच सोडणे माझ्यासाठी अशक्य होते. मला त्यांची स्वप्ने पूर्ण करायची होती आणि आमच्या झालेल्या या संवादामुळेच मी त्यांच्या मृत्यूनंतर लवकरात लवकर उठू शकले आणि मी ठरविले की मी फक्त रडत बसणार नाही,” उज्ज्वला सांगतात. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले – सासरचे आणि माहेरचेही – त्यांनी कठीण काळात उज्ज्वला यांना भक्कम पाठींबा दिला.

उज्ज्वला हे मान्य करतात की सतीशच्या मृत्यूनंतरचा काळ खूप कठीण होता आणि सुरुवातीला अनेक आव्हानेही होती. “ बरेच जण माझ्या पाठीशी उभे राहीले पण बऱ्याच लोकांना असेही वाटत होते की मला लक्ष्य करणे खूपच सोपे असेल. मी त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. त्यामुळे मला अनेक न्यायालयीन खटल्यांना, गुन्हेगारी खटल्यांना सामोरे जावे लागले. पण मला वाटते हे सगळे या व्यवसायाचा एक भागच आहे आणि देवाच्या दयेने या सगळ्याला सामोरे जाण्याची उर्जा मला मिळाली,” त्या सांगतात. पण या संपूर्ण काळात माघार घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही, कारण त्यांना केवळ त्यांच्या पतीची स्वप्नेच साकारायची नव्हती तर एका स्त्रीची ताकदही दाखवून द्यायची होती.

नॅनो हाऊसिंगची कल्पना खरे तर सतीश हावरे यांचीच..... यामध्ये सामान्य वन बीएचके (एक बेडरुम, हॉल, किचन) चा आकार २५ टक्क्यांनी कमी केला जातो, जेणेकरुन त्या घराची किंमतही २५ टक्क्यांनी कमी होते आणि ते ग्राहकाला परवडू शकते. ज्यावेळी त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळी वन बीएचके किंवा वन आरके (रुम किचन) कोणीच बांधत नव्हते आणि त्यामुळे नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांची चांगलीच कमतरता होती. हीच संधी सतीश यांनी ओळखली आणि हावरे समूहाने परवडणाऱ्या घरांची संकल्पना विकसित केली. “ ११९५ पूर्वी बाजारात चांगलीच तेजी होती मात्र त्यानंतर पतनाला सुरुवात झाली. सीबीडी बेलापूरसारख्या ठिकाणी केवळ मोठ्या सदनिकाच होत्या आणि त्यामुळे जेंव्हा बाजार कोसळला त्यावेळी बऱ्याच काळासाठी ह्या सदनिका विक्री न होता पडून होत्या,”” उज्ज्वला आपला अनुभव सांगतात. मात्र या काळातही हावरे समूहाचा व्यवसाय मात्र जोरात होता. त्यांचा एक प्रकल्प – पाडगा येथील निसर्ग प्रकल्प – त्याविषयीच्या घोषणेनंतर अवघ्या दोन दिवसांत पूर्णपणे विकणे हावरे समूहाला शक्य झाले. ५५० सदनिका बुकिंगला (आरक्षणला) सुरुवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांत विकल्या गेल्या.

आज या समूहाचे प्रकल्प ठाणे, मुंबई, पालघर आणि कर्जतमध्ये सुरु असून उज्ज्वला अतिशय कार्यक्षमतेने त्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे स्वप्न आहे ते मात्र श्रमिकसारखा आणखी एक प्रकल्प साकारण्याचे – जो सतीश यांनी खारघरमध्ये केला होता. “ श्रमिक हा खूपच चांगला प्रकल्प होता, जो आम्ही खारघरमध्ये केला होता. सतीशच्या कल्पनेतीन साकारलेला हा प्रकल्प आमच्या हृदयाच्या अगदी जवळचा होता. हा प्रकल्प अशा लोकांसाठी होता, ज्यांच्याकडे सॅलरी स्लीप नसतात आणि ज्यांना कर्जही मिळू शकत नाही. त्यामुळे फेरीवाले, रिक्षावाले, घरकाम करणाऱ्या महिला आणि यांच्यासारखे समाजातील इतर घटक ज्यांच्याकडे पैसे आहेत मात्र पे स्लीप नसल्याने बॅंका त्यांना कर्ज देण्यास तयार नसतात,” उज्जवला सांगतात. हावरे समूहाने अशा दोनशे वन रुम किचनची निर्मिती केली ज्यांची किंमत प्रत्येकी दोन लाख रुपये होती आणि या वर्गातील लोकांसाठी ती बांधण्यात आली होती. एवढेच नाही तर त्यांच्या स्वतःच्या फायनान्शियल कंपनीतर्फे कर्जपुरवठाही करण्यात आला आणि उज्ज्वला अभिमानाने सांगतात की त्यांच्यापैकी एकानेही कर्ज बुडवले नाही, सर्वांनी परतफेड केली.

“आम्ही यी प्रकल्पाची पुनरावृत्ती करु शकलो नाही, कारण घरांच्या किंमती खूपच वाढल्या होत्या आणि एवढ्या कमी किंमतीत घरे देणे त्यानंतर शक्यच नव्हते. मात्र भविष्यात जर आम्ही हे करु शकलो तर आम्हाला नक्कीच आवडेल,” उज्ज्वला सांगतात. आजपर्यंत हावरे समूहाने पंचेचाळीस हजार कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकार केले आहे. एक महिला व्यवसायिक असल्यामुळे सुरुवातीला उज्ज्वला यांना लोक गांभीर्याने घेत नसत आणि कित्येकांनी तर या गोष्टीचा फायदा उठवत त्यांची फसवणूक करण्याचाही प्रयत्न केला. मात्र आज हा भूतकाळ आहे आणि एक महिला अध्यक्षपदी असलेला हावरे समूह आज महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे.

जरी व्यवसाय उत्तम सुरु असला, तरी मुलांना पुरेसा वेळ देता येत नसल्याने उज्ज्वला यांना नेहमीच अपराधीपणाची भावना वाटते. खास करुन त्यांची मुलगी, जिला केवळ आईच्या बरोबर असण्यातूनच आनंद मिळतो. “आम्ही जेंव्हा मुलांना विचारतो की त्यांना मोठेपणी काय व्हायचे आहे? त्यावेळी माझी मुलगी म्हणते तिला गृहीणी व्हायचे आहे. तिच्या अनेक मित्रमैत्रिणींची आई गृहीणी आहे आणि ते आपल्या आईबरोबर खूप वेळ घालवत असल्याचे ती पहाते, त्यामुळेच तिची तशी इच्छा आहे,” उज्ज्वला हसून सांगतात. मात्र जेंव्हा शक्य असेल तेंव्हा त्या मुलांबरोबर वेळ घालवतात आणि आजही वर्षातून दोनदा सुट्टीसाठी जातात किंवा जमेल तेंव्हा कौटुंबिक सहलींना जातात. जरी आपल्या दोन्ही भूमिका त्या समर्थपणे निभावत असल्या तरीही एक व्यावसायिक म्हणून महाराष्ट्राबाहेर विस्तार करण्याची आणि देशभरात हावरे ब्रॅंड एक नामांकीत ब्रॅंड म्हणून स्थापित करण्याची त्यांची इच्छा आहे.

उज्ज्वला यांच्या धैर्य आणि निर्धाराला आमचा सलाम.... खूप खूप शुभेच्छा