आर्वी येथील ‘आयटीआय’च्या दर्जावाढीसाठी टाटा मोटर्ससह सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना मिळणार टाटा मोटर्समध्ये प्रशिक्षणाची संधी

आर्वी येथील ‘आयटीआय’च्या दर्जावाढीसाठी टाटा मोटर्ससह सामंजस्य करार

Thursday December 15, 2016,

1 min Read

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) प्रशिक्षण सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि टाटा मोटर्स यांच्यात दोन महत्वपूर्ण सामंजस्य करार झाले. विधान भवनात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार आर्वीतील विद्यार्थ्यांना टाटा मोटर्समध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

आर्वी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित कुशल कारागीर तयार करण्यासाठी संस्था व्यवस्थापन समिती करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे. विधानभवनात झालेल्या सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील, प्रधान सचिव दीपक कपूर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दयानंद मेश्राम, सहसंचालक पी.टी. देवतळे, उपसंचालक योगेश पाटील, टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, बसवराज कोरड्डी आदी उपस्थित होते.

image


या करारांतर्गत टाटा मोटर्स लि. यांच्या व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व (सी.एस.आर) अंतर्गत उपलब्ध निधीतून आर्वी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षण सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या करारांतर्गत टाटा मोटर्स लि. यांच्याकडून यंत्रसामग्री, उपकरणे व हत्यार पुरविणे, प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेशित व्यवसाय अभ्यासक्रमासोबतच अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निदेशकांना प्रशिक्षणांचा दर्जा अद्ययावत ठेवण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण देणे, विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सुशोभीकरण करणे, तसेच उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.                सौजन्य : महान्युज