मदुराईच्या कन्येचा Pith च्या माध्यमातून व्हॅलीत झंजावाती प्रवेश

मदुराईच्या कन्येचा Pith च्या माध्यमातून व्हॅलीत झंजावाती प्रवेश

Wednesday January 06, 2016,

5 min Read

दिव्या स्वर्णराज जर उद्यमाकडे वळल्या नसत्या तरच ते एक नवल होते! मदुराईतील पारंपरिक चाकोरीबद्ध अशा वातावरणात त्या वाढल्या. शेजार, भोवताल असे सारेच रुढींच्या बेडीतले. दिव्यामध्ये एका तऱ्हेवाईक तमिळ मुलीची तशी कुठलीही लक्षणे नव्हती. तिच्या बालपणात तिने जे काही पाहिले ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट, इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट… तिचे वडिल इलेक्ट्रॉनिक रिटेलर्स होते. दिव्याला गॅझेटस् आवडत असत. ते ती सहज हाताळत असे. पीसीबी न्याहाळण्यासाठी ती अनेकदा गॅझेटस् खोलून मोकळे करायची.

दिव्या सांगतात, ‘‘कॅलक्युलेटर माझ्यापेक्षा अधिक वेगाने गणिते कसे सोडवते, ते खरंतर मला पहायचे असे.’’ कॅलक्युलेटर तोडण्यादरम्यानच तिने तिन थरांचा द्रवयुक्त असा एलसीडी पाहिला आणि तिचा गोंधळ उडाला. तिचे हे कृत्य साहजिकच तिचे आईबाबा चिडतील असे होते. पण इलेक्ट्रॉनिकच्या पोटात शिरण्याचा कैफ इतका काही होता, की त्याची दिव्याला पर्वा नव्हती.

image


अवघी पंधरा वर्षांची असताना ती नॅनोटेक्नॉलॉजीच्या प्रेमात पडली. सुक्ष्मतंत्रज्ञानाबद्दलच्या तिच्या ओढीला हद्द नव्हती. गणितातील सूत्रे, समस्या सोडवण्याचा तिचा वेग तिच्या वर्गमित्रांना थक्क करायचा. भौतिकशास्त्र आणि गणितातील आव्हाने तिच्या पुढ्यात आली, की ती कमालीची उत्साही असायची. ‘नॅशनल आंत्राप्र्युनर्शिप नेटवर्क’तर्फे प्रमोट करण्यात आलेल्या उद्यम-आगाराचे नेतृत्व वेल्लामल अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना तिच्याकडे आले, तेव्हाच तिने खरं पाहता उद्यम विश्वात पहिले पाउल टाकलेले होते. पदवीच्या शेवटल्या वर्षाला यावेळी ती होती.

महाविद्यालयातले अखेरचे दिवस लिंबू (लेमन) म्हणून विद्यार्थ्यांत ओळखले जात. त्या सांगतात, ‘‘हे कलते किडकिडे दिवस तेव्हा लेमन डेज् म्हटले जात. मी जेव्हा ई-आगाराची जबाबदारी घेतली, तेव्हा तेही मृतप्राय असेच होते. थोडक्यात कलते किडकिडित असे होते. म्हणून आम्ही त्यालाही ‘लेमन’ म्हणत असू. खरंतर या कलत्या उपक्रमातील मरगळ झटकून त्याला पूर्ववत ताजेतवाने करणे, ही आमची जिद्द त्यामागे दडलेली होती.’’

देशातील ‘कृषी’साठी कार्य

२०१० मध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर दिव्या यांना शेतकऱ्यांच्या जीवनात झपाट्याने बदल घडवून आणण्याचे वेध लागलेले होते. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये येणाऱ्या व्यापारी, अडते, दलाल या सगळ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिला खोडा घालायचा होता. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल ग्राहकांपर्यंत थेट जाईल, असे काही बघायचे होते.

दिव्या सांगतात, ‘‘जेणेकरून पुरवठा साखळी खंडित व्हावी, मला शेतकऱ्यांसाठी ‘अलीबाबा’सारखे काहीतरी दिव्य असे निर्माण करायचे होते.’’ जवळपासच्या खेड्यांना वरचेवर भेटी देणे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणे तिने सुरू केलेले होते. दिव्या यांच्या दृष्टीने हा अनुभव काही फारसा सुखद नव्हता. त्या सांगतात, ‘‘एक तरुण मुलगी त्यांच्याशी त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलते आहे, हे पाहून शेतकऱ्यांना गंमत वाटायची. आनंद व्हायचा. पण जेव्हा व्यावसायिक डिलिंगची गोष्ट आली, तेव्हा मात्र त्यांचा आनंद कुठल्याकुठे पळाला आणि ते आखडता घेऊ लागले.’’

शेतकऱ्यांच्या नेटवर्कबद्दलची तिच्या कल्पनेची व्यापकता पाहाता मोठ्या प्रमाणावर फंडिंगची गरज होतीच. म्हणून मग सहृदयी अँजेलचा शोध सुरू झाला. दिव्या यांनी आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल थेट रतन टाटा यांनाच मेल केला. रतन टाटाच का म्हणून? यावर दिव्या सांगतात, ‘‘कारण ते दयाळू आहेत आणि देशातल्या खेड्यांमध्ये टाटा हा चलनी ब्रँड आहे.’’ आश्चर्य म्हणजे दिव्या यांना टाटांचा रिप्लाय आला. मग त्यानुसार पुढली तजवीज करायला म्हणून त्या मुंबईला रवाना झाल्या. इथं त्यांना टाटांच्या भट्टीत तावून-सलाखून निघायचे होते. त्यांच्या ‘इनोव्हेशन लॅब’मधील चाचण्यांच्या कसोटीवर आपल्या उपक्रमाला खरे उतरवायचे होते.

‘सिंग्युलॅरिटी’तील जलद-तंत्र

सिलिकॉन व्हॅलीतील सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटी शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारे अभ्यासक्रम, प्रशिक्षण देते. सिलिकॉन व्हॅलीचा अनुभव एकदातरी घेणे हे प्रत्येक तंत्रज्ञाचे स्वप्न असते. जुन २०१२ मध्ये दहा आठवड्यांच्या एका प्रशिक्षणासाठी संपूर्ण शिष्यवृत्तीवर दिव्या यांची निवड इथे झाली. क्रुत्रिम, निर्मित बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सुक्ष्मतंत्रज्ञान, बायोइन्फॉर्मेटिक, डिजिटल फॅब्रिकेशन (३ डी प्रिंटिंग), जैवतंत्रज्ञान (सिंथेटिक बायोलॉजीसह), न्युरोसायंस, नेटवर्क्स आणि कॉम्प्युटिंग, अंतराळ आणि शारीरिक शास्त्रे यांसारख्या ‘एक्स्पोटेंशिअल टेक्नॉलॉजीस्’ने प्रशिक्षण इथे देण्यात येते.

दिव्या सांगतात, ‘‘तंत्रज्ञान कधी नव्हे इतके झपाट्याने बदलत असण्याच्या काळात आम्ही आहोत. इतके बदल यापूर्वी कधीही घडलेले नव्हते. मोजक्याच दशकात जग हे अगदी बदलून गेलेले आहे. आणखी बदलेल.’’

इंटरनेट ऑफ थिंग्ज् आणि ब्ल्यूटुथ ४.०

‘सिंग्युलॅरिटी’बाहेर आणि ‘इनोव्हेशन लॅब’मध्ये परतताना दिव्या यांच्याकडे काम करण्यासाठी कल्पनांचे गाठोडेच असायचे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) हे त्यापैकी एक आणि दुसरे ‘ब्लूटुथ ४.०’. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची व्याप्ती आणि उपयुक्तता फार मोठी आहे. साध्या साध्या वस्तू जर अत्यंत कौशल्यपूर्वक बनवल्या, तर त्यांच्यासाठी मानवी साह्याची अगर हस्तक्षेपाची गरज उरत नाही. स्मार्ट सिटी, उत्पादन आणि हेल्थकेअरमध्ये तसे पोटेंशिअल प्रचंड आहे. वस्तूतील मूल्यवर्धन हे तिच्यातल्या उर्जाबचतीचे पोटेंशिअल असू शकते. वस्तूंना (उपकरणांना) जेव्हा माहिती असते, की आपल्याला कधी सुरू व्हायचेय आणि कधी बंद व्हायचेय, तेव्हा उर्जाबचत ही निश्चितच अधिक होणार. ती चालू-बंद करणारा जण माणुस असेल तर त्यातुलनेत तर वस्तू स्वत:च उर्जाबचत अधिक परिणामकारकपणे करू शकतील, हीच गोष्ट नेस्ट (आता गुगलने अधिग्रहित केलेले आहे.) या व्यावसायिक उपक्रमाला जन्म देणारी ठरली.

ब्ल्यूटुथ ४.०ची ब्ल्यूटुथ लो एनर्जी (बीएलई) उर्जाबचतीचे मोठे माध्यम आहे. अत्यंत कमी वीजवापराचा पर्याय याद्वारे उपलब्ध करून दिला जातो. फार कमी विजेत डिव्हाइस एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि सगळे ऑपरेशन पार पडते. मोठ्या जनित्रांऐवजी मिनिट सेलवर हे डिव्हाइस काम करू शकतात. ‘IoT’साठी म्हणून कितीतरी शक्यतांचे पर्याय या डिव्हाइसेसच्या परस्पर संवाद क्षमतेने खुले केलेले आहेत.

‘हेल्थकेअर’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज्‌’चा वापर

दिव्या यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये आपला ‘IoT’ स्टार्टअप सुरू केला. दिव्या व्हॅलीवर प्रेम करतात. त्या म्हणतात, ‘‘इथे ज्याप्रमाणे स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण आहे, तसे कुठेही नाही. जग बदलण्याची, जगात चांगले बदल घडवून आणण्याची एक जिद्द इथं आहे. एखाद्या उद्योगाला प्रभावित करणे, हटकणे यासाठी जी इथे एक धडपड असते, वेडाचाराच्या पातळीवर ती कधीच नसते, पण तरीही अशी धडपड इथली एक सामान्य बाब आहे. काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या इच्छेने आयुष्याचे समर्पण करण्याच्या तयारीला इथे प्रचंड पाठबळ, भरपूर प्रोत्साहन मिळते.’’

दिव्या स्पष्ट करतात, की IoT ची वेअरेबल आणि एम्बेडेड डिव्हाइसेस अशी तंत्रवापराच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात विभागणी केली जाऊ शकते. IoT दोघांपैकी एक असू शकते : (अ) सगळे सेंसर्स नियमित मध्यंतरानंतर आपोआप डाटा कॅप्चर करतात आणि संदर्भासाठी वापरतात तसेच (ब) वैयक्तिक फिटनेस आणि तंदुरुस्तीचे निदान आणि नियमन करण्यासाठी ‘प्रीव्हेंटिव हेल्थकेअर’. (निवारक आरोग्यनिगा)

Pith नावाने दिव्या यांचा स्टार्टअप ओळखला जातो. त्या स्पष्ट करतात, ‘‘संकेतांचा सगळ्यात क्लिष्ट भाग अद्याप प्रमाणित व्हायचा आहे. आम्ही सध्या सुरवातच केलेली आहे. संकेतांचे एकत्रिकरण आणि प्रमाणीकरण या दोन्ही पातळ्यांवर ही खरंतर सुरवातच आहे. खरंतर इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन ६ (IPv6) चे डिझाईनच IoT ला सुलभ करणारे असे आहे. जेणेकरून अधिकाधिक डिव्हाइसेस्‌नी इंटरनेटशी कनेक्ट होणे सुरू व्हावे. थोडक्यात इथून पुढे प्रत्येक ‘थिंग’ला आपली स्वत:ची इंटरनेटमधली आयडेंटिटी क्रमश: मिळत जाईल.’’

विज्ञान आणि दिवसागणिक उदयाला येणाऱ्या नवनव्या तंत्रांबद्दल दिव्या यांना कमालीचे पॅशन आहे. हे सगळे त्यांना नव्या कल्पनांवर आधारलेल्या प्रयोगांसाठी उद्युक्त करत असते. वैज्ञानिक कादंबऱ्यांचे वाचन त्यांना प्रेरणादायी वाटते. Pith हे तसं पाहिलं तर त्यांच्या वाटचालीतलं पहिलंवहिलं पाउल आहे… अजुन त्यांना कितीतरी पावले टाकायची आहेत, कितीतरी पुढे जायचे आहे आणि त्या जातील…

लेखक : व्यंकटेश कृष्णमूर्ती

अनुवाद : चंद्रकांत यादव