खवय्यांसाठी शेफ आणि ब्रँड अँम्बॅसॅडर विकास खन्ना यांचा ‘जुनून’!

0

सहा वर्षाच्या वयात आपल्यापैकी बहुतेकजण जेव्हा एखाद्या उद्यानात धावण्यात, बागडण्यात, आपले हात मातीने माखवण्यात, खेळण्यांसाठी भावंडांसोबत भांडण्यात गुगं होतो , त्या वयात विकास खन्ना हे अमृतसरमधील आपल्या घरातील स्वयंपाकघरात आपल्या आजीची मदत करत होते. त्यांच्या कमजोर (बेडौल) पायांमुळे त्यांच्या क्रियाशीलतेला मर्यादा येत होत्या. मात्र ही गोष्ट त्यांनी कधीही आपली अडचण होऊ दिली नाही. मोठे झाल्यानंतर विकास अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लंगरच्यावेळी स्वेच्छेने आपली सेवा देऊ लागले. हे करत असतानाच १७ वर्षांच्या वयात त्यांनी 'लॉरेन्स गार्डन'मध्ये आपला स्वत:चा कॅटरिंग व्यवसाय सुरू केला.

आज न्यूयॉर्क आणि दुबईतील मिशलीन- स्टार रेस्टॉरट असलेल्या ‘जुनून’चे मुख्य शेफ आणि ब्रँड अँम्बॅसॅडर या नात्याने विकास खन्ना भारतीय आहाराचे जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्व करणारे एक जागतिक 'सेलिब्रिटी' आहेत. अनेक उत्साही शेफ आणि आहार जगात काही करण्याचा प्रयत्न करणा-या उद्योजकांसाठी विकास खन्ना हे प्रेरणास्त्रोत बनले आहेत.

'युवरस्टोरी'ला नुकतीच त्यांना भेटण्याची संधी मिळाली. अमृतसर ते न्यूयॉर्क पर्यंतच्या त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्याशी छान गप्पा झाल्या.

प्रवासात असताना जागतिक पातळीवर प्रसिद्ध शेफ बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते असे विचारल्यानंतर ते म्हणाले, “ या साठी आवश्यक असणा-या गोष्टी म्हणजे, दृढता,प्रामाणिकपणा , कल्पकता आणि नवसंशोधकता .”

चिकाटी

अमेरिकेत गेल्यानंतर विकास यांना अत्यंत कठीण काम करावे लागले होते. ते म्हणतात, “ मी ज्या छोट्याशा स्तरावरून सुरूवात केली तशी कुणीही केली नसावी.” त्यांनी भांडी धुण्यासारख्या अगदी हलक्या दर्जाच्या कामापासून सुरूवात केली. न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटजवळ असलेल्या ‘तंदूर पॅलेस’ नावाचे आपले रेस्टॉरंट सुरू करेपर्यंत विकास खन्ना आपल्या पद्धतीने काम करत राहिले. ‘तंदूर पॅलेस’ अतिशय छोटया स्तरावरचे काम होते. परंतु त्यानंतर विकास यांनी आहार क्षेत्रात आपले अस्तित्व अधोरेखित करायला सुरू केले. त्यांनी २००७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये संकटग्रस्त असलेल्या ‘डिल्लन रेस्टॉरंट’ ला पुन्हा उभे करण्यासाठी कंसल्टंट शेफ म्हणून काम केले आणि शेफ गार्डन ‘रामसे’च्या ‘किचन नाईटमेयर’मध्ये आपली उपस्थिती दाखवली. ‘डिल्लन्स’चे पुनर्निर्माण करून त्याचे नाव पूर्णिमा असे ठेवण्यात आले. विकास त्याचे प्रभारी बनले. त्यांनी हे रेस्टॉरंट सुमारे दिड वर्षे चालवले. त्यानंतर रेस्टॉरंटचे मालक राजेश भारद्वाज यांच्या सोबत आपल्या दुस-या योजनेवर त्यांनी काम करणे सुरू केले. अनेक वर्षांची योजनेची निर्मिती प्रक्रिया आणि कठीण परिश्रमानंतर दोन महिन्यांनी डिसेंबर २०१० मध्ये विकास यांनी ‘जुनून’चे व्यावसायिक काम सुरू केले. विकास खन्ना म्हणतात, “ ‘जुनून’ ही काही सक्षम अशी संकल्पना नाही असे मत ब-याच लोकांनी व्यक्त केले. ‘जुनून’ चालणार नाही असेही लोकांनी म्हटले. वास्तवात सामान्य डिझाईनमुळे ‘जुनून’वर अशी टीका करण्यात आली होती.”

ते लोक चुकीचे होते यात काही संशय नाही. ‘जुनून’ला पहिला ‘मिशलीन स्टार’ २२ ऑक्टोबर २०११ या दिवशी केवळ १० महिन्यांच्या कालावधित मिळाला. विकास खन्ना सांगतात, “ मला त्या वर्षी अमेरिकेचा हॉटेस्ट शेफ मानले गेले. आणि मग अचानक या गौरवर्णीय मुलाला पाहण्यासाठी लोक आणि प्रसारमाध्यमे गर्दी करू लागली.” त्यानंतर पुढे ‘जुनून’ला सलगपणे चार वर्षे “मिशलीन स्टार’ मिळत राहिला. ‘जुनून’ने नुकतीच दुबईत एक शाखा सुरू केली आहे.

शोध नाविन्याचा

विकास खन्ना यांच्या पुस्तकांच्या नावांमध्ये आहार विषयक विपुल असे साहित्य सामावलेले आहे. या पुरस्कारप्राप्त शेफने १७ पुस्तके लिहिलेली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकात विविध प्रकारचे साहित्य आणि आहारविषयक गोष्टींचा समावेश करून विकास खन्ना यांनी नियमीत ‘कुकबुक’च्या संकल्पनेला साकार केले आहे. आहार विषयक साहित्याचा शोध घेणा-या जुगनू नावाच्या एका मुलाची गोष्ट त्यांनी ‘द मॅजिक रोलिंग पीन’ नावाच्या पुस्तकात लिहिलेली आहे. जुगनूला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बनवलेल्या डॉक्युमेंटरी चित्रपट मालिका ‘होली किचन्स’ मध्ये अध्यात्मिक संदर्भात अन्न वाटण्याची परंपरा तपासून पाहिली आहे.

प्रामाणिकपणा

स्वयंपाकघरात वाढत असलेल्या तंत्रज्ञानाच्या प्रभावाबाबत छेडले असता विकास खन्ना तात्काळ उत्तर देतात, “ खाण्याबाबतच्या तंत्रज्ञानाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हात. मी शक्यतो यंत्रापासून दूरच राहतो. तंत्रज्ञानाची तशी काही आवश्यकता नाही. आवश्यकता जर कशाची असेल तर ती तंत्र किंवा कौशल्याची आहे.”

नवीन्यपूर्णता

बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी विकास खन्ना सतत नाविण्यपूर्ण संशोधन करून नवे नवे प्रयोग करत असतात. नवे साहित्य, चव आणि अनुभवांचा समावेश केल्याने परिवर्तन झालेल्या ‘जुनून’च्या मेनूमध्ये विकास खन्ना यांची ही संकल्पना प्रभावीपणे काम करताना दिसते.

विकास खन्ना सांगतात, “ अमेरिकेत टेम्प्लेट मेनू प्रभावी राहिलेला नाही. खाद्यपदार्थांबरोबर कलात्मक पद्धतीने बरेच काही करत राहणा-या ‘शेफ’चे आता नवे युग अवतरलेले आहे. काहीतरी नवे आणि नाविण्यपूर्ण असावे या शोधात हल्ली लोक असतात.”

या पासून धडा घेत विकास खन्ना यांनी अमेरिकेत येणाया प्रवासी भारतीय लोकांना वाढण्यात येणा-या भारतीय पद्धतीच्या भोजनाहून वेगळा असा नवीन ब्रँड तयार करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. विकास खन्ना सांगतात, “ काही तथाकथित डिशेस केवळ प्रसिद्ध आहेत या निकषाच्या मर्यादेत न पाहता, त्या पलिकडे जाऊ लोकांनी भारतीय भोजनाच्या सखोलतेला गांभिर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.”

प्रेरणा

स्वयंपाकघराला आपली कारकिर्द ( करिअर) बनवावे या दृष्टीने अनेकांना विकास खन्ना यांनी प्रेरित केले आहेत. ‘मास्टरशेफ इंडिया’ शृंखलेदरम्यान लोकांवर पडलेला त्यांचा प्रभाव या गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. यांमध्ये ते स्वत: बील युसूफ, डॅनियल बॉलूद, संजीव कपूर, विनीत भाटीया आणि अतुल कोचर अशा काही प्रसिद्ध शेफ्सची प्रशंसा करतात. या यादीत सर्वात मोठे नाव होते ज्यूलिया चाईल्ड यांचे. विकास खन्ना यांना भेटण्याची त्यांनी वेळ निश्चित केली होती, परंतु भेट होऊ शकली नाही. कारण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

जर आपण त्यांच्या आकर्षक दिसणा-या व्यक्तीमत्वावरून नजर हटवून शेफच्या वेशात नसलेल्या वेगळ्या व्यक्तीला पाहण्याचा प्रयत्न केलात, तर विकास खन्ना हे सामान्य, छानछौकी आणि दिखाव्यापासून दूर राहणारे सेलिब्रिटी आहेत. ते आपल्याला भेटायला येणा-याला वेळ देतात आणि त्यांना लक्षपूर्वक ऐकण्यातही उदारपणा दाखवतात. पुस्तकांवर स्वाक्ष-या करून, सेल्फी काढून आणि कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सर्व लोकांसोबत बोलून त्यांना खूप आनंद मिळतो. आपण त्यांना जरी एकदाच भेटलेलो असलो, तरी दुस-या दिवशी दुस-या कार्यक्रमात भेटल्यानंतर देखील ते आपल्यासोबत त्याच आत्मियतेने आणि उत्साहाने बोलतात.

शेफ विकास खन्ना यांच्यासोबत झालेल्या चर्चेतील आणखी काही अंश देत आहोत. त्यांचा आनंद घ्या ( एच.राजा यांनी चित्रित केलेला आणि अंजली अचल यांनी संपादित केलेला व्हिडिओ)

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories

Stories by sunil tambe